Categories

Most Viewed

23 जुलै 1950 भाषण

“वकिलीच्या व्यवसायात नीतीमत्ता राखली पाहिजे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबाद येथे तारीख 21 जुलै 1950 रोजी दुपारी येऊन दाखल झाले. स्टेशनवर त्यांच्या स्वागताकरिता तालुकेदार श्री. गोविंदराव देशपांडे, पोलीस सुपरिटेंडेंट श्री. हरिश्चंद्र, इतर अधिकारी, स्थानिक पुढारी वकील व शे. का. फेडरेशनचे हजारो लोक उपस्थित होते.

हार अर्पण करण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले व स्थानिक पोलीस दलाची सलामी स्वीकारून गार्ड ऑफ ऑनरची पहाणी केली. त्यानंतर त्यांना अनेक घोषणांच्या निनादात शे.का.फे. च्या लोकांनी हार अर्पण केले. यानंतर डॉ. आंबेडकर हे प्रिन्सिपाल चिटणीस व श्री. चित्रे यांच्यासह पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीकडे रवाना झाले व पहाणी करून सलूनमध्ये परत आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉलेजच्या समारंभाला उपस्थित राहून कॉलेजच्या नवीन इमारत बांधण्याच्या जागेची पहाणी केली. इमारतीची कोनशिला बसविण्याचा समारंभ डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते होणार आहे.

तारीख 23 रोजी त्यांनी नवीन कॉलेजची जागा पाहिल्यावर येथील सेशन्स कोर्टाला भेट दिली. सेशन्स कोर्टाचे जज्ज श्री. चंद्रकांत गोडसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांनी कोर्ट व बार असोसिएशन फिरून दाखविले.

यानंतर डॉ. साहेबासंबंधी बोलताना डॉ. आंबेडकर हे आधुनिक मनू आहेत. असे उदगार गोडसे जज्जनी काढले. यानंतर डॉक्टर साहेबांनी मुनसिफ कोर्टातील उर्दूमधून चालणारे कामकाज ऐकले. या कामकाजाला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

उर्दूमधील कामकाज मला कळले नाही तरी ते समाधानकारक असले पाहिजे असे माझे मत बनले आहे. कोर्टातील भाषा कोणती रहावी याच्या विचाराने माझे मन व्यग्र होते. काही लोक म्हणतात कोर्टाची भाषा हिंदी रहावी; तर काहींच्या मते ती इंग्रजी रहावी. स्थानिक भाषातून कायद्यातील शब्द व्यक्त करता येत नाहीत, असा अनुभव आहे. उदाहरणार्थ इक्विटीला योग्य असा शब्द नाही. याकरिता स्थानिक भाषा कोर्ट भाषा होणे सर्वांनाच फायदेशीर होणार नाही. त्यामुळे राज्यकारभारात कितीतरी अडचणी उद्भवतील. अर्थात राष्ट्रीय भाषा कार्यक्षम झाल्यावर तिला तिचे योग्य स्थान मिळेलच.

मला वकिलीचा धंदा फार आवडतो. पण या धंद्याविषयी लोकात आदर नाही. भारतात वकिलावर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीलाच वाहून घेणार आहे. आज या देशात लायक असे वकील थोडेच आहेत आणि लायक वकील नसतील तर खात्याची अधोगती होईल. आज या धंद्याला अवनत कळा आली आहे. याचे एक कारण म्हणजे या धंद्यात काम करणारे लोक निवृत्त होऊन तरुण वकिलांना संधी देत नाहीत. अर्थात धंद्याची प्रतिष्ठा राहावी म्हणून तरुण वकिलांना संधी दिली जाणे अवश्य आहे.

यानंतर या धंद्यात काही झाले तरी नीतीमत्ता राखली पाहिजे असे सांगून, त्यांनी कायदे पंडितांनी स्वातंत्र्य, हेबीअस कॉर्पस व इतर कामकाजाचे महत्त्व ओळखून राष्ट्राची सेवा करावी अशी सूचना केली.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 29 जुलै 1950 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password