Categories

Most Viewed

13 जुलै 1941 भाषण

“मुला-मुलींना शिक्षण द्या : परंपरागत कामात गुंतवू नका.”

रविवार तारीख 13 जुलै 1941 रोजी तीन वाजता मुंबई येथील कावसजी जहांगीर हॉलमध्ये म्युनिसीपल कामगार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंडित केले होते. सभेस जवळजवळ दोन अडीच हजार म्युनिसीपल कामगार हजर होते.

प्रथम संघाचे सेक्रेटरी श्री. डी. व्ही. प्रधान यांनी गेल्या वार्षिक सभेचा अहवाल वाचून दाखविला. तो मंजूर केल्यानंतर संघाचा वार्षिक छापलेला अहवाल वाचण्यात आला. त्याला संघाचे उपाध्यक्ष श्री. इझीकेल यांनी अनुमोदन दिल्यानंतर अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नंतर म्युनिसीपल कामगारांची राहाण्याची सोय उत्तम व्हावी म्हणून म्युनिसीपालिटीने जास्त चाळी बांधाव्या या आशयाचा ठराव प्रिं. एम. व्ही. दोंदे यांनी मांडला. त्याला श्री. मडकेबुवा यांनी अनुमोदन दिल्यावर ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.

सध्याच्या महागाईच्या काळात म्युनिसीपल कामगारांना महागाई भत्ता देण्यात यावा या आशयाचा दुसरा ठराव श्री. टी. एस. तासकर यांनी मांडला. त्याला श्री. वाडेकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो पास करण्यात आला. आणखी दोन ठराव पास करण्यात आले. तद्नंतर पुढील वर्षाकरिता कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. शेवटी डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या कडकडाटात भाषण करण्यास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

म्युनिसीपल कामगार संघाच्या अहवालाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला काही सांगावे अशी माझी इच्छाच नव्हती. संघाच्या छापलेल्या अहवालावरून, संघ उत्तमप्रकारे चालला आहे. अशी कोणाचीही खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. 1938 आणि 1940 सालच्या संघाच्या सभासदांच्या संख्येकडे जर पाहिले तर 1938 साली सभासदाची संख्या दोन हजारांच्या घरात होती पण तीच संख्या 1940 साली पाच हजारांच्या घरात गेलेली आहे.

म्युनिसीपल कामगार संघासारखे संघ, मुंबईमध्ये कमी आहेत असे नाही. श्री. निमकरांचा संघ, टेक्स्टाईल युनियन वगैरे वगैरे, त्या संघाची आणि आपल्या संघाची तुलना जर केली, तर ते संघ आपल्या या म्युनिसीपल संघाच्या पासंगालाही पुरणार नाहीत. त्या संघाच्या पुढान्यांचे कार्य, मी 1919 पासून ते 1941 पर्यंत पहात आलेलो आहे. त्यांनी कामगार लोकांचा थोडा देखील फायदा केलेला नाहीच, उलट नाश मात्र केलेला आहे. या लोकांनी एकंदर 30-40 संप केले असतील, परंतु त्यातला एकही संप यशस्वी झालेला नाही. नुकत्याच गेल्या वर्षी गिरणी कामगारांचा संप त्या लोकांनी घडवून आणिला तो कसा तरी 3-4 आठवडे चालविला. शेवटी कामगारांच्या पदरात एक पै देखील न पडता संपाचे तीन-तेरा वाजले. ही गोष्ट आपणापैकी बऱ्याच जणास माहित असेल.

त्याउलट आम्ही दोन वर्षापूर्वी फक्त एकच संप तुम्हास करावयास लावला आणि त्याला इतक्या थोड्या अवधीत यश आले की. मुंबई म्युनिसीपालिटी आपल्याला शरण आली आणि आपल्या कामगारांच्या सर्व अटी वगैरे मान्य करून त्यांना पगारही वाढविले.

यावरून म्युनिसीपल कामगार संघाला कोणीही नावे ठेवणार नाही. या माझ्या म्हणण्याबद्दल कोणाला संशय असेल तर त्यांनी मुंबई सरकारचे लेबर गॅझेट पहावे. सरकार प्रत्येक संघाची व युनियनची मधून मधून तपासणी करीत असते व नंतर लेबर गॅझेटमध्ये नमूद करीत असते. म्युनिसीपल कामगार संघाबद्दल ‘ म्युनिसिपल कामगार संघासारखा व्यवस्थित असा कोणताही संघ अथवा युनियन चालत नाही ‘. असा शेरा सरकारने दिलेला आहे.

या संघाकडून जी कामे होण्याची राहिलेली आहेत त्याबद्दल संघात काम करणा-या मंडळीना कोणताही दोष देता येणार नाही. संघाचे काम करणारी माणसे अगदी कर्तबगार आहेत याबद्दल मला शंका नाही. त्याबद्दल मला जर कोणाला दोष द्यावासा वाटत असेल तर तो संघाच्या सभासदांना. संघात काम करणारी माणसे त्याच्या स्वतःच्या जोरावर काहीही करू शकणार नाहीत. त्यांना तुम्हा सर्वांची मदत पाहिजे आहे आणि असे झाले तरच संघाला यश येईल. संघात काम करावयास तुम्हाला चांगली माणसे लाभलेली आहेत आणि तुम्ही जर एकीने राहाणार नाही तर मोठे दुर्दैव असेच मला म्हणावे लागेल.

मी या सभेत तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आणि तुमच्या मुलांनी व मुलींनी तुम्ही जे काम करीत आहात तेच काम सतत करावे. तुम्ही जे काम करता ते फार घाण आहे परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीत चो-या, दरोडे इत्यादि गोष्टी करण्यापेक्षा हे काम बरे असे मला वाटले. परंतु तुम्ही तुमच्या मुलांना व मुलींना शिक्षण देऊन तुम्ही जे काम करता त्या कामात त्यांना पडू न देण्याची खबरदारी घ्या. तुम्ही हे इतके घाणीचे काम करता तेच काम दुसऱ्या जातीच्या लोकांना कितीही पैसा दिला तरी ते काम करणार नाहीत. असे असताना या घाणेरडया कामाचा मोबदला तुम्हाला चांगला तरी मिळतो का? तुम्ही जर हे काम करण्याचे नाकारले तर मुंबईत राहाणारे लोक कॉलराने व इतर रोगानी पटापट मेल्याशिवाय राहाणार नाहीत. मुंबईची किल्ली तुमच्या हातात आहे. तुमच्याकरिता दुसऱ्याने काहीही करण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमचे भले करू शकाल एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे. या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालतील. याकरिता तुम्ही तुमच्यात एकी ठेवली पाहिजे. चेंबूर कचरापट्टी येथे काही भानगड झालेली आहे असे मी ऐकतो. तेथे इतर लोक तुमच्यात बेकी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या त्या कंपटनितींना भुलाल तर भुलून गेलेले लोक फसल्याशिवाय राहणार नाहीत. एकीच्या बळावर तुम्हाला वाटेल ते करता येईल. मुंबईतील ड्रेनेज खात्यातील लोकांनी जर संप केला आणि चेंबूरच्या लोकांनी त्यांना सहाय्य केले तर म्युनिसीपल कमिश्नर तुमच्यापुढे धावत आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या ह्या सामर्थ्याच्या जोरावर हिंदू-मुसलमानांच्या तीन महिन्यांच्या दंग्यात जितका हा:हा:कार झाला त्याच्यापेक्षा जास्त हा:हा:कार तुम्ही एक आठवड्याच्या संपाने करू शकाल. परंतु त्याकरिता तुमच्यात एकी असणे अत्यंत जरुरीचे आहे.

म्युनिसीपल संघाच्या चार आणे वर्गणीसाठी काही लोकांकडे दहा वेळा जावे लागते ही नामुष्कीची गोष्ट आहे. पगाराच्या दिवशी पान, बिडी, सिनेमा वगैरे चैनीसाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि संघाच्या वर्गणीसाठी चार आणे मिळू नये? परंतु तुम्हाला मी निक्षून सांगतो की, जो कोणी दुसऱ्यांना जाऊन मिळेल आणि तुमच्यात फाटाफूट करील त्याला पूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने जातीचा गुन्हा केला असताना त्याला वाळीत टाकण्यात येत होते त्याचप्रमाणे या बाबतीतही करावे असे सांगण्यास मी मागेपुढे पहाणार नाही. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. तुमच्यात एकी असल्यावर तुमच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तुम्हास दुसऱ्याजवळ याचना करण्याची जरुरी नाही. चेंबूर कचरापट्टी येथे आतापर्यंत चांगले काम चालले होते. तेथील लोकांची एकी वाखाणण्याजोगी होती. परंतु तेथील अधिकारी लोकांनी काही लोकांना आमिष दाखवून तेथील लोकात फाटाफूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचा बंदोबस्त आम्ही करणार आहोतच. परंतु तुमच्यात जिल्ह्या-जिल्ह्याचे जे भेद काही लोक पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल मला तुम्हाला सांगावेसे वाटते, हे म्यूनिसीपल कामगारांकरताच आहे असे नसून ते सर्वसाधारण अस्पृश्य मानलेल्या लोकांकरता आहे.

काही वर्षापूर्वी आपल्या समाजाला राजकारणात काहीही स्थान नव्हते, परंतु आता आपला पक्ष काँग्रेस व मुस्लिम लीग या राजकीय पक्षाबरोबरचा झालेला आहे. त्यांना जे महत्त्व ते आपल्या पक्षाला आहे. हा कशाचा परिणाम ? आमच्यातील एकजुटीचा. त्याचप्रमाणे या म्युनिसीपल संघात हे असले भेद असता कामा नयेत. म्युनिसीपल अधिकाऱ्यांना म्युनिसीपल कामगार संघाचे फार वावडे होऊन बसले आहे. त्यांना हा संघ नको आहे. या संघामुळे त्यांना पैसे. लाचलुचपत खाता येत नाही म्हणून हे अधिकारी फोडा आणि झोडा या भेदनितीचा अवलंब करीत आहेत. म्हणून वेळीच सावध होऊन तुम्ही जर या जिल्ह्यांचा भेद नाहीसा कराल तरच तुमचा फायदा होईल.

महार जात येथून तेथून सारखी आहे. कुठलाही महार कुठल्याही महाराच्या पंक्तीला जेवतो. त्याला कोणत्याही प्रकारे वाईट वाटत नसते. ज्याप्रमाणे कोणत्याही प्रांताचा मुसलमान बिसमिल्ला म्हणाला की, कुठल्याही दुसऱ्या प्रांताच्या मुसलमानाबरोबर जेवतो त्याचप्रमाणे महार जातीचे आहे. म्हणून जे लोक हा नाशिकचा, हा सातारचा, हा नगरचा असा भेद करून आपल्यातील एकी फोडण्याचा प्रयत्न करतील तर सर्वांचे नुकसान झाल्याशिवाय राहाणार नाही.

युरोप देशाकडे पहा. युरोपातील राष्ट्र स्वतंत्रपणे पृथक पृथकपणे असल्यामुळे त्यांना हिटलरने पादाक्रांत केले. परंतु या सर्व राष्ट्रांनी एकी केली असती तर त्यांनी जर्मनीचा कधीच नाश करून टाकला असता. तुम्ही तुमच्यात एकी ठेवली तरच आम्हाला तुमच्याकरिता भांडता येईल. नाही तर आमच्या हातून होणार नाही. आमच्या पायाखालील मातीच जर ढासळली तर काय करणार! म्हणून तुम्ही सर्वांनी एकोप्याने राहून म्युनिसीपल संघाचे बळ वाढवा एवढी मी तुम्हास विनंती करतो.

नंतर डॉ. बाबासाहेबांनी जमलेल्या लोकास. मुंबई विधिमंडळाच्या यादीत आपापली नावे नोंदविण्यविषयी सूचना दिली व आपले भाषण संपविले.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 19 जुलै 1941 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password