“संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे.”
दिनांक 21 जुलै 1950 शुक्रवार रोजी भारत सरकारचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनमाड मार्गाने औरंगाबाद येथे दुपारी दीड वाजता स्पेशल सलूनने आले. रोटेगाव-लासूर येथे डॉ. बाबासाहेबांचे असंख्य जनसमुदायाने मोठ्या आदराने व भक्तिभावाने स्वागत केले. स्टेशनवर पोलिसानी सलामी (Guard of Honour) दिली.
दिनांक 22 जुलै 1950 शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 2,001 रुपयाच्या थैली कार्यक्रमास हजर राहाणार ही वार्ता सर्व शहरात विद्युतवेगाने पसरली. दहा वाजल्यापासून हजारो पुरुष स्त्रिया शहरातून व बाहेरून सभेच्या ठिकाणी येताना दिसत होते. बाबांचे दर्शन होणार व बाबांचे भाषणही ऐकावयास मिळणार म्हणून कित्येक स्त्रियांना लहान मुलांची आठवण राहिली नाही. साडे पाच वाजता मोटार येताच असंख्य ललनानी दुरूनच बाबांना भक्तिभावाने ओवाळले तसेच पुष्पांचाही वर्षाव केला. शिस्त राखण्याच्या कामी मुनाजी लळिंगकर व हं. शु. निकम, चाळिसगाव यांनी औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना चांगली मदत केली.
अखिल हैदराबाद स्टेट शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, औरंगाबादच्या विद्यमाने श्री. बी. एस. मोरे कन्नडकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्टेटमधील परिस्थिती त्रोटक शब्दात निवेदन करून दलित जनतेत स्वातंत्र्य, प्रेम व स्वाभिमान निर्माण करून दलित अस्पृश्यात माणुसकी निर्माण केल्याचे श्रेय सर्वस्वी डॉ. बाबासाहेबांनाच आहे असे सांगितले. किसान मजूर व अस्पृश्याचा उद्धार डॉ. बाबासाहेबाशिवाय दुस-याकडून होणार नाही याची परिपूर्ण कल्पना सर्वांना झाली आहे, असेही ते म्हणाले. शेवटी 2,001 रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सादर अर्पिण्यात आली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उठले. ते म्हणाले, माझे मित्रहो आणि बंधु भगिनींनो,
आज या ठिकाणी आपण एकत्र होऊन जी थैली अर्पण केली आहे याबद्दल मी आपला आभारी आहे. थैली अर्पण करण्याचे काही कारण नव्हते. आमिष व लोभाने मी कधी सेवा केली नाही. तुमची अल्प-स्वल्प सेवा करीत राहाणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मला थोडा फार थैल्यांचा पैका मिळाला तो मी स्वतः करता वापरलेला नाही. गांधीस काही कोट रुपयांच्या थैल्या दिल्या गेल्या. टिळकास नऊ लाख रुपयाच्या थैल्या दिल्या गेल्या, तसे आपले मुळीच नाही.
माझ्यापासून तुमची निस्वार्थ बुद्धीने सेवा व्हावी हीच माझी महत्त्वाकांक्षा आहे. माझे मित्र श्री. बी. एस. मोरे यांनी ज्या गोष्टी प्रास्ताविक भाषणात सांगितल्या त्या अंगावरती शहारे आणणाऱ्या आहेत. पूर्वीची परिस्थिती व आताच्या परिस्थितीत जमीन अस्मानचा फरक आहे. दौलताबादचा किल्ला बघावयास आलो असताना माझे सवंगडी पाणी पिण्यासाठी हौदावर गेले व पाणी पिऊ लागले. त्यावेळी 15-20 वर्षाच्या मुसलमान पोराने आम्हावर शिव्याचा वर्षाव केला. त्याच काळात आम्ही औरंगाबादला आलो, असे पाहिल्यानंतर त्यावेळी येथील लोकांनी भजन करून रात्र घालविली. अन्याय सहन करीत राहाणे हा त्यावेळी तुमचा विषय होता. स्वागताध्यक्षाच्या प्रास्ताविक भाषणावरून असेच वाटते की, निजामशाहीची सावली अजून शिल्लक आहे. आगामी राजकारणात तुम्हास मोठा भाग सापडणार आहे. स्टेटमधील आपली लोकसंख्या 25 टक्के आहे. राज्यकारभारात आपण राज्यातील कारभारी होणार आहोत. लोकसत्ताक-प्रजासत्ताक राज्यातील मंत्रिमंडळात आपला एखादा प्रतिनिधी येईल. पूर्वीचा काळ गेला. येणारा काळ उज्ज्वल आहे. आपणास राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे. ती संघटनेने होणार आहे. हुकूम ऐका. तुम्हाला जास्त पुढारी नको. जो पुढारी असेल त्याचा हुकूम ऐका.
पाणी मैदानावर पडले तर ते पसरून जाईल, डोहात पडले तर तेथे पाण्याचा संचय होईल. तद्वतच तुम्ही आपसात एकजूट ठेऊन शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्याच झेंड्याखाली या. माणुसकीचे हक्क तुम्हास आहेत. ते कोणी हिरावून घेतले तर त्या सरकारच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी राष्ट्राचे जे सुप्रीम कोर्ट आहे तिकडे जाता येते. तेव्हा घाबरण्याचे नाही. एकीने वागा, हेच आज तुम्हास सांगावयाचे आहे.
2,001 रुपयांची थैली बाबासाहेबांनी श्री. सुबय्यासाहेब यांना आगाम निवडणुकीसाठी खर्च करण्याकरिता दिली व शेवटी जयघोषात सभा संपली.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 05 ऑगस्ट 1950 रोजी प्रसिद्ध झाले.