“पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करणे हिताचे.”
मोटार ड्रायव्हर अस्पृश्य सेवक संघाचा प्रथम वार्षिकोत्सव शनिवार तारीख 29 सप्टेंबर 1934 रोजी मुंबईतील परळ दामोदर हॉलमध्ये डॉ. पी. जी. सोळंकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीतीने पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. ब. बोले वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. स्वागतपर पद व अध्यक्षांची निवड झाल्यावर संघाचे अध्यक्ष श्री. मारुतीराव गमरे यांनी रिपोर्ट वाचन करून संस्थेविषयी छोटेसे भाषण केले. यानंतर रा. ब. बोले यांचे भाषण झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषण करण्यास अध्यक्षांनी विनंती केली. या विनंतीवरून ते बोलावयास उभे राहिले.
त्यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याविषयी संतोष व्यक्त केला. संघाच्या आवश्यकतेबद्दल विस्तृत असे भाषण करताना ड्रायव्हर लोकांना कळकळीचा उपदेश केला. आपणास कराव्या लागणाऱ्या पैशाचा विनियोग अनाठायी करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणाकडे, समाजाकडे व विशेषतः गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे करणे खरे हिताचे ठरेल. तसेच अनीती किंवा दुर्व्यसनाचा फैलाव न होण्याकडे सर्वांनी विशेष लक्ष पुरवावे. आपल्याला संघटनेशिवाय समाजहितासारखे बिकट कार्य पार पाडणे शक्य नसते. वाडवडिलांच्या नावलौकिकावर विकून घेऊन त्यांच्या नावाच्या बळावर आपण स्वतःला विकून घेण्यात काय अर्थ आहे. तरी माझ्या बांधवांनी उद्योग धंद्यामध्ये मिळणाऱ्या पैशाचा सदुपयोग करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे अशी आशा प्रदर्शित करतो. डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर इतर वक्त्यांची भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. सोळंकी साहेबांचे फार मननीय व परिणामकारक असे भाषण झाले.
यानंतर कलेमध्ये अपूर्व कौशल्य दाखविल्याबद्दल गंगाराम रघुनाथ व समाजकार्य करून वेळोवेळी ऋणी केल्याबद्दल श्री. साबाजी मिरके यांना अनुक्रमे रौप्य पदके व पुष्पहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे अर्पण करण्यात आले. या समारंभात सर्वश्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, शिवतरकर, उपशाम, भातनकर वगैरे मंडळींची प्रसंगानुसार भाषणे झाली. शेवटी आभार प्रदर्शन, निवडक निमंत्रित मंडळींना अल्पहार झाल्यावर हा समारंभ संपविण्यात आला.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 20 ऑक्टोंबर 1934 रोजी प्रसिद्ध झाले.