“गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ?”
शनिवार तारीख 29 सप्टेंबर 1934 रोजी रात्री मुंबईतील परळ पोयबावडी वरील कामगार मैदानावर पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्याकरता एक प्रचंड जाहीर सभा भरली होती अस्पृश्य गणलेल्या समाजातील दहा हजारावर लोक या समेत हजर होते. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मननीय व समाजात नवचैतन्य उत्पन्न करणारे असे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले.
जवळ जवळ गेली दोन हजार वर्षे अस्पृश्य समाज हा देशातील समाजाचा अभिन्न असा एक घटक म्हणून कधीच समजला गेला नाही. एखादे राजकीय अगर सामाजिक कार्य उपस्थित झाल्यास त्या कार्यासंबंधी विचार करण्याची संधी अस्पृश्य समाजास कधीच मिळाली नव्हती. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लक्ष दिल्यास ब्राह्मण, कायस्थ, मराठे इत्यादी जातींकडे या गोष्टींचा विचार करण्याचा जणू मक्ताच दिला होता असे दिसते.
या कार्यात महाराची कामगिरी वर्दी देण्यापलिकडे म्हणजे जासूदगिरी पेक्षा अधिक वरच्या दर्जाची कधीच नव्हती. इतर जातींना आमंत्रणे पोचती केल्यावर फार तर त्यांनी दरवाज्याबाहेर बसून अंतर्गृहात चाललेल्या गोष्टीचा कानोसा घ्यावा. आत काय विचार चालू आहे त्याची गंधवार्ताही त्यास नव्हती.
अस्पृश्य समाज जिवंत प्राण्यांचा बनलेला असून त्यांना इतर मानवजातीप्रमाणेच गरजा आहेत. मनुष्यमात्राला ज्याप्रमाणे सुखदुःखाच्या भावना आहेत. त्याचप्रमाणे या समाजालाही भावना आहेत. ही कल्पनाही स्पृश्य समाजास कधी शिवली नाही व त्यामुळे अस्पृश्य समाजास देशातील सामाजिक काय किंवा राजकीय काय, कोणत्याच प्रकारच्या उलाढालीत वाव मिळाला नाही. पृथ्वीवरील कोणत्याच देशात न आढळणारी अशी विपरीत पध्दती हिंदुस्थानदेशात मात्र कित्येक शतके दृढमूल झाली होती. या कालात समाजशास्त्र्यांनी राज्यकर्त्यांनी किंवा तत्त्वज्ञान्यांनी या समाजघातकी विचारसरणीस आळा घालून विचारास नवीन वळण लावण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. याचा अनिष्ट परिणाम अस्पृश्य जनतेवर होऊन त्यांचे जीवन कष्टमय, स्वाभिमानशून्य व निष्प्रभ तर झालेच पण त्याची कडूफळे सर्व देशाला विशेषतः हिंदू समाजाला चाखावी लागली आहेत. आतामात्र मनु पालटला आहे. 1930 साली गोलमेज परिषदेला अस्पृश्य समाजाच्या प्रतिनिधीस हजर राहण्यास हिंदुस्थानच्या राज्यकत्यांकडून निमंत्रण आले. तो प्रसंग या बदलतलेल्या कालाचा प्रारंभ होय, असे मी समजतो. पूर्वकालीन हिंदू समाजाच्या अमदानीत जे घडले नाही. मोगल बादशाहीत जे घडू शकले नाही, मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यात जे घडले नाही ते विसाव्या शतकात घडून आले.
हिंदुस्थानच्या भावी राज्यव्यवस्थेसंबंधी भिन्न भिन्न समाजांशी विचारविनिमय करीत असताना अस्पृश्य समाज दूर ठेवणे म्हणजे तो विचारविनिमय अपुरा ठेवणे होय. तसेच या विचारविनिमयातून निघणारे निर्णय अस्पृश्य समाजाची मते आजमावून त्यात त्यांच्या आकांक्षा समाविष्ट केल्याशिवाय ते निर्णय अपुरे राहतील असे राज्यकर्त्यांना वाटले. इतकेच नव्हे तर त्या निर्णयावर उभारलेल्या राज्यव्यवस्थेस खऱ्या लोकशाहीचे स्वरूप येणार नाही, ही जाणीव ब्रिटिश राज्यकत्यास झाली आणि त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस राऊंड टेबल कॉन्फरन्सला आमंत्रण केले. या आमंत्रणाच्या द्वारे अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस इतिहासास माहीत नसलेल्या समानतेचा, उच्च मानल्या जाणाऱ्या इतर समाजाच्या तोलाचा मान मिळाला. सर्व देशाच्या हितसंबंधात अस्पृश्य समाजाचे हितसंबंध निगडित झाले असून त्यांच्या हक्कांचे रक्षण केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही ही जाणीव या प्रसंगाने सर्व समाजास करून दिली व अस्पृश्यांच्या प्रतिनिधीस इतरांबरोबर देशाचे भवितव्य ठरविण्याची संधी मिळाली आणि याच पालटलेल्या मनुचा भरभक्कम पाया तयार करावा म्हणून तुमच्या प्रतिनिधींनी आपल्या भविष्यकाळातील उज्ज्वल इतिहासास आरंभ केला. हा आरंभ करणे मात्र त्यांना सोपे गेले नाही. त्यांना आपल्या समाजाचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता इतरांशी अभूतपूर्व झगडा करणे प्राप्त झाले.
दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी जातीजातीतील तंट्याने सर्वजण हताश झाले होते आणि आम्ही सर्व महात्मा गांधींच्या आगमनाची वाट पाहात होतो. पक्षातीत गणलेले महात्मा गांधी हा तंटा सोडवितील असे सर्वांना वाटत होते. मी स्वतः न्याय्य हक्क कबूल केले जाऊन त्यांना पुढील राज्यकारभारात रीतसर वाव मिळेल अशी अपेक्षा करीत होतो. कोणाला एक एक पत्रावळ मिळेल, तर कोणाला दोन दोन पत्रावळी मिळतील. माझ्या समाजाच्या वाट्यास निदान एक द्रोण तरी येईल, अशी माझी समजूत होती पण ती आशा फोल ठरली.
‘मुसलमानांना मी हवे ते देईन, खिश्चन समाजास मी जरूर ते देईन, युरोपियन किंवा अग्लो इंडियनांचे हक्क मी मान्य करीन, शिखांस मी त्यांच्या मागण्या बहाल करीन, पण अस्पृश्य समाजाचे हक्क मी काडीइतकेही मान्य करणार नाही. ” असा रोखठोक जबाब मला महात्मा गांधीकडून मिळाला व मी विस्मित झालो. महात्मा गांधींच्या या कृतीस मला इतिहासात उदाहरण मिळत नाही पण महाभारतातील एका प्रमुख प्रसंगाची स्मृती झाल्याशिवाय राहात नाही, कौरव-पांडवांचे भांडण विकोपास न जाता सलोख्याने मिटावे व रक्तपात टाळावा या उद्देशाने श्रीकृष्णाने दुर्योधनाजवळ भारतीय युद्धापूर्वी शिष्टाई केली होती, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यावेळी दुर्योधनाने पाच पांडवांना अर्ध राज्य काय पण पाच गावे देखील देण्यास आपण तयार नाही, इतकेच नव्हे तर सुईच्या अग्राएवढी देखील जमीन देण्यास मी तयार नाही असे स्पष्ट सांगितले. त्याचप्रकारचा जबाब मला मिळाला. यानंतरचा इतिहास आपणास विदितच आहे.
अस्पृश्य समाजाचे न्याय्य हक्क ब्रिटिश सरकारने मान्य करून त्या हक्कांच्या आधारे जातीय निर्णयात त्यांना स्थान दिले. हा निर्णय जाहीर होताच केलेल्या पापाचे क्षालन करण्याकरिता म्हणा अगर मनाची जळजळ शांत करण्याकरिता म्हणा किंवा त्यांच्या समजुतीने झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याकरिता म्हणा, महात्मा गांधींनी प्राणान्तिक उपवास केला व त्या उपवासाचा शेवट पुणे करारात झाला हे सर्वश्रुतच आहे. आणि त्याच कराराची स्मृती जागृत ठेवण्याकरिता आज आपण येथे जमलो आहोत.
या कराराच्या भवितव्याबद्दल काही जणांनी आज निराधार भीती दर्शविली व जातीय निर्णयावर अनेक बाजूंनी आघात होत असल्यामुळे सरकारने तो मागे घेतल्यास पुणे करारास बाध येईल किंवा काय अशी शंका प्रदर्शित केली. मी तुम्हाला निक्षून सांगतो की, ही शंका किंवा भीती अगदी निराधार आहे. तुम्हाला पुणे कराराबद्दल धास्ती बाळगण्याचे काहीच कारण नाही. राष्ट्रीय सभेने असे जाहीर केले आहे की व्हाईट पेपरचा इन्कार करून तो नष्ट केल्यास जातीय निर्णय देखील आपोआप नष्ट होतो. या वादात आपणाला शिरण्याचे कारण नाही. तुम्हाला भीती वाटत आहे ती ही की अशा रीतीने जातीय निर्णय नष्ट झाल्यास पुणे करार देखील नष्ट होईल, तार्किकदृष्ट्या किंवा कायद्याच्या दृष्टीने या प्रकाराची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. ते कसे हे ब्रिटिश सरकारच्या जातीय निर्णयात कलम पाच मध्ये स्पष्टपणे असे नमूद केले आहे की. जातीजातीत वाद सलोख्याने न मिटल्यामुळे हा जातीय निर्णय सरकारास देणे भाग पडले. म्हणजे हा वाद आपसात मिटला असता तर सरकारला निर्णय देणे जरूर पडले नसते आणि यदाकदाचित हिंदुस्थानात कोणत्याही जातीत यापुढे आपसात समजुतीने तडजोड झाल्यास ती सरकार जरूर मान्य करील. पुणे करार या प्रकारची तडजोड आहे व ती तडजोड सरकारने पूर्णांशाने मान्य केली आहे. जातीय निर्णयात फक्त प्रान्तिक कौन्सिलातील जागांची वाटणी समाविष्ट आहे. त्यात वरिष्ठ कायदे कौन्सिलातील जागांचा उल्लेख नाही. पुणे करारात या दोनही कौन्सिलातील जागांची वाटणी झाली आहे आणि सरकारतर्फे ज्या वेळेस पुणे करारास मान्यता मिळाली त्या वेळेस सरकारने कम्युनल अवॉर्ड (जातवार निवाडा) मधील प्रान्तिक कौन्सिलातील जागांची वाटणी बदलून पुणे करारातील प्रान्तिक जागांची वाटणी ग्राह्य धरली व वरिष्ठ कायदे कौन्सिलासंबंधी पुणे करारात समाविष्ट केलेले प्रमाण मान्य केले व त्याच तत्त्वानुसार पुढे व्हाईट पेपरमध्ये पुणे करारातील वरिष्ठ कौन्सिलातील जागाचे प्रमाण ठरविले. म्हणजे पुणे करारात झालेल्या हिंदू व अस्पृश्यामध्ये तडजोडीचे तत्त्व सरकारच्या कम्युनल अवॉर्डच्या पाचव्या कलमानुसार मान्य केले व त्यावर आपले शिक्कामोर्तब मारले. या करारात कोणत्याही प्रकारचा बदल करणे झाल्यास तो सरकारला करता येणार नाही किंवा एकट्या हिंदूस करता येणार नाही. तो बदल हिंदू व अस्पृश्य यांनाच आपसातील परस्पर चर्चेने करण्याचा अधिकार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने फरक होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हास याबाबतीत निःशंक राहाण्यास प्रत्यवाय नाही.
आता हिंदूंकडून कदाचित असे सांगण्यात येईल की ज्या वेळेस दोन पक्षात करार होतो त्यावेळेस कोणताही पक्ष संकटात असता कामा नये. महात्मा गांधींनी आपले प्राण पणास लावले व त्यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न झाली की त्यांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. त्यावेळी सर्व हिंदू समाज माझ्यावर संतप्त झाला होता. मी नमते घेऊन त्वरेने कसातरी करार घडवून आणावा म्हणून चोहो बाजूने मला पेचात घरले होते. देशातील कित्येक तरुण माझा जीव घेण्यास सज्ज झाले होते. बंगाल्यातील अत्याचारी तरुणांकडून मला धमकीची पत्रे येत होती. कोणत्याही प्रकारे महात्मा गांधींच्या जीवितास अपाय झाल्यास मला त्याबद्दल जबाबदार धरून माझे प्राण धोक्यात तर येतीलच पण असहाय अशा सर्व अस्पृश्य समाजावर हिंदू समाजाकडून सूड घेतल्या जाईल. हे भीषण चित्र माझ्या डोळ्यांपुढे होते. अशा मनःस्थितीत प्रतिपक्षाजवळ वाटाघाट करून मला करारावर सही करावी लागली. असे असता आपले प्राण संकटात होते. म्हणून करार मान्य करणे आपल्याला भाग पडले, असे म्हणण्याचा कुणालाही हक्क पोचत असेल तर कायद्याच्या दृष्टीने तो मला पोचत आहे. यात शंका नाही.
परंतु पुणे करारातील सर्व बाबी माझ्या मताप्रमाणे जरी घडून आल्या नसल्या तरी या प्रकारचा हक्क बजावण्यास मी तयार नाही. मी पुणे कराराच्या बाबतीत इमानी राहाणार आहे. अशा प्रकारे पुणे करार अभेद्य राखण्यास अस्पृश्य समाज तयार असला तरी सर्व हिंदू समाज तसेच वर्तन ठेवील असे म्हणवत नाही. आणि हिंदू समाजातील कित्येक जबाबदार पुढारी व संस्था यांच्या अलिकडच्या चळवळी पाहिल्या व उद्गार ऐकले तर हिंदू समाज पुणे करारास इमानी राहील किंवा नाही याची मला जबरदस्त शंका वाटते आणि याकरिता आपण जागरूक राहून आपल्याला मिळालेल्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे.
आजच्या काही वक्त्यांनी पुणे करारास गांधी-आंबेडकर या नावाने संबोधिले. ते चुकीचे आहे. या करारावर महात्मा गांधी यांची सही नाही. पण महात्मा गांधी हे हिंदुचे पुढारी गणले जात नाहीत. हिंदू समाजाचे खरे पुढारी पं. मदन मोहन मालवीय हे आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली अखिल भारतीय हिंदू समाजाचे पुढारी म्हणून त्या वेळच्या सर्व वाटाघाटी चालू होत्या आणि या नात्यानेच करारावर पहिली सही पं. मदन मोहन मालवीय यांची आहे. आपल्या सर्वमान्य पुढान्याच्या शब्दांची हिंदू समाजाला चाड नसेल तर त्या समाजासारखा कृतघ्न व निर्लज्ज दुसरा समाज नाही, असे म्हणावे लागेल. पण मला आशा आहे की, हिंदू पुढारी आपल्या शब्दास जागतील.
अस्पृश्य समाजास आपल्या शब्दाची चाड आहे. हेच जाहीर करण्याकरिता तुम्ही आज येथे जमला आहात, असे मी समजतो. परंतु याच वेळी मी तुम्हास हे सांगू इच्छितो की गेल्या वर्षापासून पुणे करार दिन पाळण्याची जी तुम्ही प्रथा पाडली आहे ती एक केवळ प्रथा म्हणूनच तुम्ही समजता कामा नये, एक दिवस एके ठिकाणी जमून इतर वार्षिक उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याचा, ५-२ वक्त्यांची भाषणे करावयाची व आपण कृत-कृत्य झालो म्हणून समजावयाचे इतक्या साच्या किंवा इतक्या हीन दर्जाचा हा दिन नव्हे पुणे करार हा अस्पृश्यांच्या इतिहासात एक चिरस्मरणीय असा प्रसंग आहे. या कराराच्या द्वारे आपल्या समाजाने बेदरकार हिंदू समाजास आपले राजकीय अस्तित्व कबूल करण्यास भाग पाडले आहे. याकरिता तो आपला राजकीय दिन म्हणून आपण पाळला पाहिजे. पुणे करारान्वये आपल्या समाजास मिळालेले अधिकार आपण योग्य रीतीने उपयोगात आणतो की नाही, हे पाहाण्याकरिता आपण या दिवशी जमले पाहिजे.
मुंबई प्रांताकरिता तुम्हास 15 जागा अडविण्याकरिता उभे राहणारे उमेदवार आपल्या समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत किंवा नाहीत हे पाहून आपण त्यांची निवड करावयास हवी. या 15 प्रतिनिधींपैकी जर 5 भांडवलदारांच्या हाती गेले, 5 हिंदू समाजाचे हस्तक बनले तर राहिलेल्या पाचांचा काय उपयोग आहे ? याकरिता या 15 प्रतिनिधींच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहिले पाहिजे, तरच मिळालेल्या हक्कांची सांगता होईल व अस्पृश्य समाजाचे पाऊल पुढे पडेल.
पुढील काळात प्रत्येकाने कर्तबगार बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बापाच्या नावावर खपण्याची हाव सोडून मी स्वतः काहीतरी करून दाखवीन अशी महत्त्वाकांक्षा मनात स्मरण केली पाहिजे. याबाबतीत मला एक साधा दृष्टांत द्यावासा वाटतो एका सुभेदाराच्या मुलाची गोष्ट माझ्या पाहण्यात आहे. या गृहस्थाचा नेहमी असा अट्टाहास असे की लोकांनी आपल्यास, बापाप्रमाणेच सुभेदार म्हणावे. याकरता आपल्या खोलीच्या दारावरील नावाच्या पाटीवर देखील सुभेदार ही पदवी तो लावीत असे. सुभेदार म्हणून जर कोणी बोलविले तरच आपण तेथे जावयाचे असे त्याचे वर्तन असे. अर्थातच मिलिटरीमधील ही मानाची पदवी त्याच्या बापाची असून ती या मुलाने कमविलेली नाही हे जाणून लोक सुभेदार ही पदवी त्यास बहाल करण्यास तयार झाले नाहीत. या इसमाने कोणत्याही प्रकारे आपली लायकी वाढविण्याचा प्रयत्न केला नाही व आपल्या मूर्खपणाचे केवळ प्रदर्शन करून तो लोकांच्या उपहासास मात्र पात्र झाला. करिता भूतकालीन मोठेपणाचा वृथा अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. अंगी मोठेपणा आणण्यास मनुष्याने स्वतःच झटले पाहिजे. बापाचे मोठेपण मुलाच्या कामी येणार नाही. आणि ही योग्यता अंगी आणण्याकरिता शिक्षण संपादन करण्यासारखा दुसरा उपाय नाही.
आपल्यातील शिक्षणाच्या अभावी उच्च दर्जाच्या नोकऱ्या तुम्हास कशा संपादन करता येतील? सरकारने एक नुकतेच पत्रक काढून मुसलमान समाजाकरिता निरनिराळ्या खात्यात जागा राखून ठेवल्याचे जाहीर केले आहे. त्या जागा भरण्याकरिता लायक माणसांची निवड करण्यास मुसलमान समाजात वाव आहे. अस्पृश्य समाजाकरता अशा प्रकारची व्यवस्था करण्याची सरकारची तयारी असली तरी त्या जागा भरण्याकरिता लायक माणसे आपल्या समाजात कशी मिळणार ? तुमच्या समाजाकरिता नोकऱ्या राखावयास पाहिजे, पण तुमची लोकसंख्या जरी मोठी असली तरी त्यात सुशिक्षित माणसांचा अभाव असल्याकारणाने तशी व्यवस्था करता येणे शक्य नाही, असा सरकारने जबाब दिल्यास आपण काय सांगणार ? तरी उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळवून समाजात आपली प्रतिष्ठा वाढवावयाची असेल तर आपल्या मुलास योग्य ते शिक्षण देणे हे प्रत्येक व्यक्तिचे काम आहे.
शाळेतील या शिक्षणाबरोबरच देशातील चाललेल्या हालचालीचे शिक्षण घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्याचा काळ म्हणजे आपल्या समाजाचा संक्रमणाचा काळ आहे. पूर्वीच्या मनूतून नव्या मनूमध्ये अस्पृश्य समाज प्रवेश करीत आहे. अशा महत्त्वाच्या काळात आपण डोळ्यात तेल घालून जागले पाहिजे. निरनिराळ्या ठिकाणी काय चालले आहे. आपल्या उन्नतीच्या मार्गात किंवा आपण आखलेल्या प्रगतीच्या मार्गात कोण आड येत आहे. आपल्या समाजातल्या प्रतिपक्षाच्या हालचाली काय आहेत. नाशिकाला काय चालले आहे, नागपुरात काय घडत आहे किंवा कोकणात काय प्रकार चालला आहे. याचे यथार्थ ज्ञान होऊन आपणा सर्वांत एक संवेदना उत्पन्न झाली पाहिजे व त्याप्रमाणे उपाययोजना आपण केली पाहिजे आणि हे घडणे आपल्या समाजाचे एक जोरकस व स्वतंत्र वृत्तीचे व स्वावलंबी वर्तमानपत्र असल्याशिवाय होणार नाही. या कार्याकडे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपले लक्ष पुरवून आपले वर्तमान पत्र जिवंत ठेवणे हे पवित्र कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे. आणि या शैक्षणिक कार्यात आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की त्यात परावलंबनाचा लवलेशही असत्ता कामा नये.
अस्पृश्य समाजातील मुलामुलीस शिष्यवृत्त्या देण्याबद्दल हल्ली जिकडे तिकडे घोषणा चालू आहे. परंतु मला मोठी भीती वाटते की, स्पृश्य वर्गाकडून येणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने गुलामवृत्ती बळावल्याशिवाय राहणार नाही. शिष्यवृत्ती स्वीकारणारी कच्च्या दिलाची मुले शिष्यवृत्ती देणाऱ्या वर्गाचे दास बनल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्यप्राणी पैशाचा दास बनतो. महाभारतातील गोष्ट घ्या. भीष्माचार्यासारख्या सत्यनिष्ठ पुरुषास माहीत होते की कौरवांचा पक्ष न्यायाचा नाही. पांडवांच्या मागण्या सर्वस्वी न्याय्य आहेत तरी देखील पांडवांच्या वनवासात कौरवांच्या पदरी राहून त्यांचे अन्न खाल्ल्यामुळे भीष्मास कौरवांचा पक्ष सोडता येईना व ते पांडवाचा नाश करण्यास सज्ज झाले.
लॉर्ड लोथिअनच्या अध्यक्षतेखाली फाँचाइज कमिटीवर काम करीत असता आम्ही पंजाबात गेलो होतो. अस्पृश्य समाजातर्फे साक्षी देण्याकरिता काही सुशिक्षित गृहस्थ पंजाबात आहेत का अशी चौकशी करता कॉलेजात शिक्षण घेत असलेली काही मुले मला आढळली. ती मुले आर्य समाजाने चालविलेल्या वसतिगृहात राहत असून त्या समाजाच्या खर्चाने त्यांचे शिक्षण चालू होते. त्या मुलांनी मला सांगितले की आर्य समाजाकडून आपल्यास असे स्पष्ट बजावण्यात आले होते की, समाज सांगेल त्याचप्रमाणे त्यांनी साक्ष न दिल्यास वसतिगृहातून त्यांची हकालपट्टी होईल व शिक्षणाकरिता त्यास मिळणारी मदत एकदम बंद करण्यात येईल. या धूमकीने अर्थातच ते हतबुध्द झाले व त्यांचे खरे हृद्गत कमिटीच्या दप्तरात मला नमूद करून घेता आले नाही. तेव्हा ज्या लोकांपासून आपणास आपले हिरावले हक्क परत मिळवावयाचे आहेत त्यांच्या मदतीची अपेक्षा करणे धोक्याचे आहे, हे तुम्हास कळून येईल.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हास मला सांगावयाची आहे. महात्मा गांधीपाशी अस्पृश्यता निवारणाबद्दल ज्यावेळेस माझे बोलणे झाले त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की अस्पृश्यता हिंदू समाजात कित्येक शतके घट्ट मूळ धरून बसल्यामुळे एकदम नष्ट होणे शक्य नाही व याकरिता तुम्ही हिंदू समाजास अवसर द्या. कित्येक शतकांची चाल एकाएकी नाहीशी होणे शक्य नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. ती नाहीशी करण्याकरिता अव्याहत प्रयत्न चालू ठेवला पाहिजे हेही मला कबूल आहे. पण ती चाल नष्ट करणे म्हणजे काय हे आपण पाहिले पाहिजे. महात्मा गांधींनी मंदीर प्रवेशाची चळवळ हाती घेतली. त्यावेळेस ते असे म्हणाले की, अस्पृश्यांचा मंदिरात शिरकाव करून घेणे हे ध्येय ठेवून हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा ठिकाणी त्यांचा रिघाव करून घेतल्यास, अस्पृश्यता नष्ट होईल व आज विहिरी, तळी, शाळा इत्यादि स्थळांसारखी देवालयांपेक्षा कमी दर्जाची जी स्थळे आहेत ती अस्पृश्यांस मग आपोआप मोकळी होतील. या त्यांच्या विचारसरणीचा मतितार्थ असा की, अस्पृश्यतेच्या वर्मावर घाव घालावयाचा व त्यायोगे अस्पृश्यतेची मगरमिठी सैल करावयाची. त्यांच्या दृष्टीने मंदीर प्रवेश ही पहिली व शेवटची पायरी होय. मला ही विचारसरणी संमत नाही. माझे असे ठाम मत आहे की, अस्पृश्यता ही चातुर्वर्ण्य कल्पनेवर उभारलेली इमारत आहे. हिंदू समाजातील जातीभेद हे त्याचे प्रतिबिंब आहे. हिंदू समाजास ग्रासून टाकणाऱ्या या कल्पनेस मूठमाती देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीस आपल्या बुद्धीचा विकास करण्याची संधी दिल्याशिवाय किंवा जातीभेदाच्या कल्पनेस मुळातच विरोध केल्याशिवाय हिंदू समाजाची सर्वांगीण सुधारणा होणार नाही. अस्पृश्यतेचे मूळ वरपांगी दिसणाऱ्या हिंदू समाज रचनेच्या पृष्ठभागावरच पसरलेले नसून ते जातीभेदाच्या कल्पनेत खोल गेले असून तेथे दृढ झालेले आहे. आणि अस्पृश्यता समूळ नष्ट करावयाची असेल तर जातीभेदांचे हे मूळ आज सुधारकांनी उखडून काढले पाहिजे. आता हे कार्य अवघड आहे व ते पार पाडण्यास अवधी लागेल हे न समजण्याइतके बुद्धिमांद्य माझ्या ठिकाणी नाही. मी इतकेच म्हणतो की, हे ध्येय मानून किंवा हे तत्त्व मान्य करून तुम्हास जे जरूर वाटतील ते प्रयत्न करा. तपशीलाबद्दल माझे विशेष म्हणणे नाही. तो निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या समाजात भिन्न भिन्न असू शकेल, पण खेदाची गोष्ट ही की ते तत्त्वच मुळी हिंदू समाजास मान्य नाही. नाईलाज आहे.
हिंदू धर्मातील अगदी निकृष्ट स्थितीत असलेल्या समाजाने आपल्यावर कोणता जुलूम होतो हे जाणून त्यातून मुक्त होण्याकरिता आपल्यास काय हवे आहे हे स्वयंनिर्णयाच्या न्यायाने ठरविण्याचा अधिकार अस्पृश्य समाजासच असला पाहिजे; पण हिंदू समाज ही साधी गोष्टही मान्य करण्यास तयार नाही. अस्पृश्य समाजास आजपर्यंत गुलामगिरीत ठेवून त्यांनी भविष्यकाळी कोणत्या स्थितीत राहावे हे ठरविण्याचा अधिकार हिंदू समाज आपल्या हातात ठेवू पाहात आहे. राजकीय क्षेत्रात डोमिनिअन स्टेटस म्हणजे वसाहतीचे स्वराज्य हे ध्येय ठेवून राजकीय अधिकार हत्याहत्याने हिंदुस्थानातील लोक घेत आहेत. तद्वतच अस्पृश्य समाज आज आपले एक ध्येय ठरवून ते हप्त्याहप्त्याने घेण्यास आपण तयार आहो असे सांगत आहे. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानास डोमिनिअन स्टेटस देऊन त्यास आपल्या बरोबरीच्या नात्याने वागविण्याचे आपले ध्येय आहे असे कबूल केले आहे, पण हिंदू समाज मनाचा एवढा दिलदारपणाही दाखविण्यास तयार नाही. इतकेच नव्हे तर अस्पृश्य समाजास आपला म्हणण्याची देखील त्यांची तयारी नाही.
महात्मा गांधींच्या प्राणान्तिक उपासानंतर वरिष्ठ कायदे कौन्सिलात एका हिंदुने मंदीर प्रवेशाचे बिल आणले होते. हिंदू समाजास अस्पृश्यांबद्दल प्रेमाचा पाझर फुटला आहे असा म. गांधीच्या उपवासानंतर जिकडे तिकडे बोलबाला झाला होता. मंदीर प्रवेशाचे बिल बिनाविरोध पास होईल अशी बढाईही मारण्यात येत होती. या बिलापासून आपली उन्नती जवळ येईल अशी आशा बाळगण्याजोगे त्या बिलात काहीच नसल्यामुळे त्या बिलाच्या भवितव्यतेबद्दल अर्थातच अस्पृश्य समाज बेफिकीर होता, हिंदुच्या देवालयाबद्दल हे बिल असल्यामुळे अस्पृश्य समाजास त्यात लुडबूड करण्याचे काहीच कारण नव्हते व त्यामुळेच हे बिल कायदेमंडळासमोर असताना ते गाडले गेल्यानंतरही त्या बिलाची विचारपूस त्यांनी केली नाही. बिल पास झाले असते तर अस्पृश्य समाजास आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या आणि ते मागे घेतले गेले म्हणून त्यांना खिन्नता वाटली नाही. तुमच्या मंदिराबद्दल तुम्ही पाहून घ्या. देवालयासारखी धार्मिक ठिकाणे अस्पृश्यांस खुली करून त्याचे प्रेम संपादन करून अगर ती बंद करून त्यात प्रवेश करण्याचा अस्पृश्यास मज्जाव करणे हे हिंदू समाजाचे काम आहे. आमचे नव्हे. पण इतका शहाणपणा दाखविला तर तो हिंदू धर्म कसला! शेवटी व्हायचे तेच झाले ! बिलास पुरेशी मते न पडून ते नापास झाले असे नाही तर सर्व हिंदू समाजाने त्यास असा कडक विरोध केला की बिलाचे जनकचं ते वादविवादाकरिताही पुढे आणण्यास घजले नाहीत. ते बिल काखेत मारून रंगा आयरना मागे पळ काढावा लागला. आपण हिंदू समाजास आपले हृद्गत खुले करण्यास पूर्ण मुभा दिली व आपण तटस्थ वृत्ती धारण केली.
आता मात्र आपण या बिलाच्या मृत्यूवरून बोध घेतला पाहिजे. हिंदू समाजाचे मनोगत आपणास कळले आहे. तो अस्पृश्य समाजास आपला म्हणावयास तयार नाही हे आपल्याला स्पष्टपणे कळले आहे. अशारितीने हिंदुनी तुम्हाला लाथाडल्यावर तुम्ही हिंदुचा कासोटा किती दिवस धरून चालणार ? अस्पृश्यांस हिंदू समाजशरीराचा एक अभिन्न अवयव म्हणून समजण्यास आज कोणी तयार नाही. पायातील वहाणेचा जरूर तितका उपयोग करून घेऊन मनुष्य तीस घराच्या बाहेर ठेवतो व जरूर नसल्यास ती फेकून देतो. आज हिंदू लोक तुमची पायातील वहाणेपेक्षा अधिक किंमत समजत नाही. तुम्हाला गुलाम म्हणूनच वागवावयाचा त्यांचा कृतनिश्चय आहे. असे असता हा अपमान तुम्ही किती दिवस सहन करणार ? तुम्ही दुसऱ्यांचे गुलाम म्हणून किती दिवस राहणार ? आजची परिस्थिती तुमच्या स्वाभिमानास पोषक आहे का ? स्वाभिमानरहित गुलाम आपली स्वतःची किंवा देशाची कधीतरी उन्नती करू शकला आहे काय ? या प्रश्नाचा तुम्ही नीट विचार करा. आपल्यास हिंदू म्हणवून घेऊन दुसऱ्यांचे गुलामच तुम्ही राहू इच्छिता काय ? या प्रश्नांचा विचार करता हिंदू म्हणवून घेण्यास माझी तरी मनोदेवता सांगत नाही.
मी आज दोन वर्षे या प्रश्नाचा खोल विचार करीत आहे आणि माझी पूर्ण खात्री झाली आहे की, माझा स्वाभिमान जागृत ठेवावयाचा असेल, मला समतेच्या वातावरणात वागावयाचे असेल तर मला हिंदू म्हणवून घेता येणार नाही. मी हिंदू नाही तर मी स्वतःला काय म्हणवून घेईन. खिश्चन म्हणेन किंवा मुसलमान म्हणेन किंवा बुद्धधर्मीय म्हणेन हे मी आज सांगत नाही. आतापर्यंत हिंदू राहिलो. तुमच्याबरोबर राहिलो केवळ तुमच्याच करिता, तुमच्या अशिक्षिततेमुळे तुम्हास सोडून जाणे म्हणजे तुम्हास आंधळे करणे, हे जाणूनच मी आजपर्यंत तुमचे बरोबर राहिलो. परंतु लवकरच आपण या गोष्टीची शहानिशा करू व जे काय करावयाचे ते सर्वजण एकदम करू. कड्यावरून उडी टाकणे झाल्यास सर्वजण एकदम उडी टाकू सध्या तुम्ही आपल्या मनाशी हिंदुचे आपल्याशी कोणत्या प्रकारचे वर्तन आहे याची खूणगाठ बांधून ठेवा.
शेवटी आपण आज या ठिकाणी माझे हृद्गत बोलून दाखविण्यास संधी दिली याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून मी आपणा सर्वांची रजा घेतो.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 20 ऑक्टोंबर 1934 रोजी प्रसिद्ध झाले.