Categories

Most Viewed

28 सप्टेंबर 1952 भाषण

“सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही.”

(1) शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (2) शेड्यूल्ड कास्ट इंप्रूव्हमेंट ट्रस्ट, (3) म्यु. कामगार संघ, (4) महार ज्ञाति पंचायत व (5) समता सैनिक दल या पाच संस्थांतर्फे रविवार दिनांक 28 सप्टेंबर 1952 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नरे पार्कवर मुंबईतील अस्पृश्य जनतेचे जाहीर संमेलन घेण्यात आले होते. या संमेलनात मुख्यतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण हाच मुख्य कार्यक्रम होता. साडेपाच वाजण्यापूर्वी अस्पृश्य स्त्री-पुरुषांनी नरे पार्क अक्षरश: फुलून गेलेला होता. बरोबर साडेपाच वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माईसाहेब आंबेडकरांसह संमेलनाच्या ठिकाणी आले. सर्व जनतेने मोठ्या उत्कंठेने व अंतःकरणपूर्वक टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर व व्यासपीठाच्या बाजूस मुंबईतील सर्व निवडक मंडळी बसलेली होती. बॅ. कांबळे. श्री. बी. सी. कांबळे (एम.एल.ए.) श्री. बोराळे (अध्यक्ष, म्यु. कामगार संघ) श्री. भंडारे (एम. ए., एल. एल. बी.) श्री. जे. जी. भातनकर, श्री. शां. अ. उपशाम (सेक्रेटरी शे. का. इप्रुव्हमेंट ट्रस्ट) श्री. आर. जी. खरात (अध्यक्ष शे. का. फेडरेशन) इत्यादि मंडळींचा उल्लेख करता येण्यासारखा आहे.

प्रथम श्री. उपशाम यांनी आजच्या संमेलनाचा हेतू समजावून दिला. ते म्हणाले, आज पुष्कळ दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य जनतेत दिसत आहेत. यापूर्वीच त्यांना आपली सर्वांची भेट घ्यावयाची होती. परंतु पावसामुळे त्यांना इतके दिवस दम धरावा लागला. आज पाच संस्थांतर्फे हे जाहीर संमेलन घेण्यात येत आहे. परंतु या पाच संस्था अशा काही अगदी अलग अलग नाहीत. एका झाडाच्या पाच फांद्या असाव्यात तशी त्यांची स्थिती आहे. या फांद्यांचा एकच बुंधा आहे व त्यातूनच त्यांना जीवनरस मिळत असतो. अस्पृश्य चळवळीतील निरनिराळ्या उद्देशांसाठी जरी या संस्था निघाल्या असल्या तरी त्या सर्वांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच आहेत. तेव्हा आजच्या प्रसंगी भाषण करण्यास मी त्यांना आपण सर्वांतर्फे विनंती करीत आहे.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या कडकडाटात भाषण करावयास उठले. ते म्हणाले,

भगिनीनों व बंधुनो,
आजकाल बऱ्याच लोकांचे मन राजकीय कार्यात गुंतले आहे. माझे मन मात्र आज राजकारणात रमत नाही. सध्या माझे सर्व लक्ष आपण इमारत फंड स्थापन केला आहे त्याकडे आहे. मुंबईत अनेक जातीच्या इमारती आहेत. ब्राह्मणांची ज्ञातिगृहे आहेत. मराठ्यांची ज्ञातिगृहे आहेत. क्षत्रियांची ज्ञातिगृहे आहेत. एवढेच नव्हे तर कुणब्यांनीही आपले ज्ञातिगृह किंवा हॉल बांधलेला आहे. त्याप्रमाणे अस्पृश्य समाजाचेही एक ज्ञातिगृह किंवा हॉल मुंबईत असावा ही कल्पना फार जुनी आहे. या कामासाठी मी 1938 साली मुंबईत इमारत फंड स्थापन केला. हे कार्य अंगावर घेऊन आज 10-15 वर्षे लोटली आहेत. तरीही या कार्याला अद्याप मूर्त स्वरूप आले नाही. आता तरी हे कार्य पार पाडावयासच पाहिजे, असे मी ठरविले आहे. हे कार्य पार पाडल्याशिवाय मी दुसरे कोणतेही कार्य हातात घेणार नाही. तुम्ही सर्वांनी हे काम अतिशय निकडीचे आहे असे समजून प्रत्येकाने यात अंतःकरणपूर्वक भाग घेतला पाहिजे.

या कामासाठी आज मजजवळ पुढीलप्रमाणे रक्कम आहे. पूर्वीची शिल्लक 40 हजार रुपये, मुंबईच्या लोकांनी जमविलेले हीरक महोत्सवाचे 18 हजार रुपये, यात बाहेर गावचे 1 हजार रुपये आहेत. मुंबई बाहेरील लोकांनी इमारत फंडासाठी पाठविलेले 4 हजार रुपये व बिनव्याजी मिळालेले 32 हजार रुपये. बाकीची रक्कम तुम्ही सर्वानी जमविली पाहिजे. सदर कामासाठी कर्ज उभारण्याचा माझा विचार होता. परंतु तो आता मी सोडून दिला आहे. कारण कर्ज घेतले तर शेकडा 10-12 रुपये आपणास निव्वळ व्याजासाठी द्यावे लागणार व्याजासाठी एवढी रक्कम देण्याची माझी तयारी नाही. तुम्ही सर्वांनी मनावर घेतले तर कर्ज न घेताही हे काम आपणास पार पाडता येईल. मुंबईत चाळ कमिट्या नेमून व मुंबईबाहेर काही गावच्या गाव कमिट्या किंवा तालुका कमिट्या नेमून हे काम तुम्ही केले पाहिजे. याबाबतीत मी परत काही सांगणार नाही. हे सांगण्यासाठीच मी आज येथे आलो.

पहिल्या तारखेनंतर मी दिल्लीस जाणार आहे आणि कदाचित बरेच दिवस परत येणार नाही. मी येथे नाही म्हणून तुम्ही हे काम पाडून ठेवत कामा नये. मी येथे असताना जे काम चालले आहे त्यापेक्षाही जोराने काम ते मुंबईबाहेर गेल्यावर तुम्ही केले पाहिजे. तुमच्या कामाचे रिपोर्ट मी दिल्लीला गेल्यावर तिकडे आले पाहिजेत व ते मला समाधान देतील असे पाहिजेत. येथे ज्या संस्थांतर्फे संमेलन घेण्यात आले आहे त्या सर्वांनी हे कार्य आपले आहे असे समजून आपापल्या विभागात कामास लागले पाहिजे.

आज दसरा आहे. दसरा हा सोन्याचा दिवस आहे. मात्र सोने तुमच्या जवळही नाही आणि मजजवळही नाही. आजचा प्रसंग मात्र सोन्यासारखा आहे. येथून जाण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी इमारत फंड जमविण्यासाठी सोन्यासारखी प्रतिज्ञा केली पाहिजे. तुमच्या प्रतिज्ञेला कस लावला तर ती 100 नंबरीच ठरली पाहिजे.

माझी सर्व जनता गरीब आहे. मात्र तिच्यावर माझा विश्वास आहे. ती गरीब असली तरी ती माझ्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहाणार नाही. याबद्दल माझी खात्री आहे. मात्र, शिकल्या सवरलेल्या लोकांना याप्रसंगी मला दोन शब्द सांगावयाचे आहेत. गरीब जनतेने दिलेल्या पैशाचा हिशेब त्यांनी व्यवस्थित ठेवावा व एका पैचीही अफरातफर होणार नाही याची त्यांनी काळजी बाळगावी. सार्वजनिक पैशाचा हिशेब व्यवस्थित ठेवून तो जनतेस वेळोवेळी दाखविणे यासारखे पवित्र कार्य दुसरे नाही. तसेच सार्वजनिक पैशाचा अपहार करणे यासारखे नीच कृत्य दुसरे नाही.

माझा माझ्या समाजातील सुशिक्षितांवरील विश्वास उडाला आहे. मला इमारत फंडाचा सर्व हिशेब हवा. सर्वसामान्य गरीब आणि अशिक्षित माणसावरच आता माझा सर्व भरवसा आहे.

मी मुंबईत असेपर्यंत लोकांनी माझ्या बंगल्यावर पैसे आणून द्यावेत व मी दिल्लीस गेल्यावर श्री. शांताराम अनाजी उपशाम, सेक्रेटरी, शेड्यूल्ड कास्ट्स इंप्रूव्हमेंट ट्रस्ट, मुंबई यांच्याकडे त्यांनी द्यावेत,

सध्या ते माझ्या बंगल्यावर पैसे घेण्याचे काम करतात. मी दिल्लीस गेल्यावर त्यांचे ऑफिस भारत भूषण प्रिंटींग प्रेसमध्ये राहील, असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविले,

शेवटी श्री. जे. जी. भातनकर यांनी बाबासाहेब व माईसाहेब यांचे आभार मानून त्यांना सर्व संस्थांतर्फे पुष्पहार घातले. सर्वांचे आभार मानल्यावर सभेचे काम संपले.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 04 ऑक्टोंबर 1952 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password