“पुणे करारनामा बंधनकारक समजून स्पृश्य बंधुंनी कृती करावी.”
पुण्याला म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधे तडजोड होऊन एक नवीन करारनामा तयार करण्यात आला. हा सर्व हिंदू पुढारी मंडळींना पसंत पडताच गेल्या शनिवारी करारनाम्यावर अस्पृश्य व स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांच्या सह्या झाल्या. हा करारनामा पास झाल्यानंतर मुंबईत पुन्हा सर्व हिंदू पुढारी जमले व रविवार तारीख 25 सप्टेंबर 1932 रोजी कोर्टातील इंडियन मर्चन्टस् असोसिएशनच्या हॉलमध्ये मुंबई नागरिक इमर्जन्सी कौन्सिल तर्फे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सभा भरून कराराला सर्वानुमते संमती देण्यात आली.
प्रथमतः परिषदेचे अध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात तडजोडीला ज्या ज्या पुढाऱ्यांचे जिवाभावाचे सहाय्य झाले त्या त्या मंडळीचे त्यांनी अंतःकरणपूर्वक आभार मानले. तथापि, अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. आंबेडकर यांचे आभार प्रामुख्याने मानणे अगदी योग्य आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय ही तडजोड होणे कठीण होते. करारनाम्यातील कलमांचा विचार करता स्पृश्य हिंदूवर ती प्रत्यक्ष कृतीत पार पाडून दाखविण्याची मोठी जबाबदारी आहे.
: पंचवीस लाखांचा फंड :
अस्पृश्यता निवारण्यासाठी मुख्यतः पैशाची अत्यंत जरूरी आहे. सर्व देशभर जागृतीचे कार्य करण्यासाठी पैशाशिवाय सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. या कार्याकरिता आपण एक लहानशी कमिटी नेमून या कमिटीतर्फे निदान 25 लाख रूपये फंड उभारण्यात आला पाहिजे आणि पुढील तीन-चार महिन्यात प्रत्यक्ष कार्य करून आपल्या हिंदू धर्माचे तेज वाढविणे, आपल्या दलित बांधवांना समानतेचे सर्व हक्क देणे आणि आपली अंतःकरणे शुद्ध करून उच्चनीचतेचा भाव समूळ नाहीसा करणे इत्यादि गोष्टी तात्काळ झाल्या पाहिजेत. आपल्या समाजातून अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्यासाठी महात्माजींनी आपला प्राण पणास लाविला होता ही गोष्ट सर्वांनी पूर्णपणे लक्षात ठेवावयास पाहिजे.
पंडितजीचे हृदयस्पर्शी भाषण झाल्यावर पुण्याला झालेल्या करारनाम्यास समती देणारा मुख्य ठराव शेठ मथुरादास वसनजी खिमजी यांनी पुढे मांडला. ठराव मांडताना ते म्हणाले की, पुण्याला झालेल्या करारनाम्याला ब्रिटिश सरकारने आता आपली संमती द्यावयास कोणतीच हरकत नाही. तरी सरकारने म. गांधी यांच्या बिकट अवस्थेतील प्रकृतीचा विचार करून तात्काळ मान्यता असल्याचा विद्युत संदेश पाठवून द्यावा.
ठरावाला अनुमोदन देण्याकरिता सर तेजबहादूर सप्रू हे बोलावयाला उठले. ते म्हणाले की, या करारनाम्याचे सारे कार्य पंडित मालवीयजींच्या अध्यक्षतेखाली झाले आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पंडितजींनी आपला कट्टर धर्मनिष्ठपणा बाजूला ठेवून बदलत्या काळानुसार वागण्याचे जे मनोधैर्य दाखविले ते कितीतरी पटीने अलौकिक आहे. आपण सर्वांनी आजच्या परिस्थितीत असेच घडाडीचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच ह्या तडजोडीच्या यशस्वीतेचे बरेच श्रेय डॉ. आंबेडकर यांना दिले पाहिजे. त्यांनी आपल्या समाजाच्या न्याय्य हक्कासाठी झगडण्यात जे धैर्य व जो करारीपणा दाखवला तो अभिनंदनीय असाच होता. त्यांच्या धैर्याकडे पाहता ते अस्पृश्यांचेच नव्हे तर हिंदुस्थानचे भावी खरे निधड्या छातीचे पुढारी होतील यात तिळमात्र शंका वाटत नाही. ब्रिटिश सरकारच्या कम्यूनल अवार्डपेक्षा ह्या नवीन कराराने अस्पृश्य वर्गाचे अधिकच हित झाले. तरी आपण सर्वांनी यापुढे सहकार्याने वागून अंगिकारलेल्या कार्यामध्ये यश मिळविण्याचा कसून प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. आंबेडकर भाषण करावयास उभे राहाताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की,
थोड्याच दिवसापूर्वी माझी बिकट परिस्थिती व आजचा आनंदाचा समय याचा विचार केल्यास हे सारे स्वप्नवत असे दृश्य दिसले. एकीकडे मला म. गांधींचे प्राण वाचवावयाचे होते तर दुसरीकडे मला माझ्या समाजबंधुंच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण जिवापाड करावयाचे होते. हा दुहेरी पेच यशस्वीरीतीने सुटला जाईल अशी मला बिलकूल शंका वाटत नव्हती. परंतु एकंदर भयानक व जबाबदारीची परिस्थिती जाणून सर्व हिंदू पुढा-यांनी जे सारासार विचारसरणीचे व सहकार्याचे धोरण स्वीकारले त्यामुळे ह्या बिकट प्रश्नातून समाधानकारकरित्या बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकला आणि यामुळे मला खरोखर अत्यानंद होत आहे. या लढ्याच्या वाटाघाटीतून पार पडण्यास मुख्यतः म. गांधीच कारणीभूत झालेले आहेत. मला मोठे आश्चर्य वाटते की, माझ्या सर्व मागण्यांना म. गांधींनी मान्यता देऊन उलट माझेच अभिनंदन केले. म. गांधींनी जी एकप्रकारची तडजोड मान्य केली ती दुसऱ्याच राऊंड टेबल परिषदेच्या प्रसंगी मान्य केली असती तर आजचे बिकट व भयानक असे वातावरण कधीच उत्पन्न झाले नसते. असो. ह्या यशस्वी करारनाम्याला मान्यता देण्यात मला आनंद होतो. माझ्या स्पृश्य बंधुनी हा करारनामा बंधनकारक समजून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत कार्य करून दाखविल्यास मला व माझ्या समाजाला अत्यानंद होणार आहे. या करारनाम्याच्या यशाचे श्रेय म. गांधींशिवाय सर तेजबहादूर सप्रू, पंडित मालवीय व सी. राजगोपालाचारी यांना दिल्याशिवाय मला राहावत नाही.
डॉ. आंबेडकर यांच्या भाषणानंतर रा. ब. राजा व मि. के. नटराजन यांची भाषणे झाल्यावर श्री. सी. राजगोपालाचारी यांचे आभार प्रदर्शनार्थ भाषण झाले. पुढील विधायक कामकाजाकरिता जी कमिटी नेमावयाची तिच्याबद्दल सर्वस्वी अधिकार अध्यक्षांना असावा अशी सूचना शेठ मथुरादास वसनजी यांनी केली व तिला सभेने मान्यता दिल्यावर परिषद बरखास्त करण्यात आली.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 01 ऑक्टोंबर 1932 रोजी प्रसिद्ध झाले.