Categories

Most Viewed

25 सप्टेंबर 1928 भाषण

“अस्पृश्यतेचा उगम जाती भेदातूनच.”

मंगळवार दिनांक 25 सप्टेंबर 1928 रोजी रात्री 8 वाजता मुंबईतील दादर गणेशोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्याचे श्री. बापूसाहेब माटे यांची व्याख्याने एकाच वेळी ठरविण्यात आली होती. परंतु श्री माटे यांनी आपला घसा बसल्याचे निमित्त सांगून ते या व्याख्यानाला आले नाहीत. ते येणार नसल्याचे ऐकून स्पृश्यवर्गीय विशेषतः सनातनी मंडळीची निराशा झाली होती. तसेच या जाहीर सभेतील व्याख्यानाच्या वेळी डॉ. बाबासाहेबांना शह देण्याचे सभेत दंगल किंवा पेचप्रसंग उत्पन्न करण्याचे सारे बेत जवळजवळ ढासळले होते. तरीपण या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पृश्य वर्गीयांबद्दल काही गैर बोलले तर त्यांचा योग्य तो समाचार घेण्याचाही बेत या मंडळीनी रचला होता. ही सारी हकिकत गुरुवर्य केळुस्कर यांना कळताच ते या सभेत मुद्दाम हजर राहिले होते.

परंतु डॉ. आंबेडकर साहेबांचे भाषणच इतके मुद्देसूद व परिणामकारक झाले की, सभेत दंगल माजविण्याच्या उद्देशाने जमलेली ही सारी मंडळी शांततेने डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचे गोडवे गात आपापल्या घरी निघून गेली. डॉ. बाबासाहेबांनी ही सभा जिंकली होती. ते आपल्या भाषणात म्हणाले,

“अस्पृश्यता निवारणाची अस्पृश्यांनी चालविलेली चळवळ व तिच्यावर ब्राह्मणादी स्पृश्य जातीकडून घेण्यात येणाऱ्या आक्षेपांचा विचार” या विषयावर मी आज आपल्यासमोर बोलण्याचे ठरविले आहे. विषयाचे नाव सुटसुटीत नसून लांबलचक आहे; पण वेळ थोडा असल्यामुळे त्याची चर्चा आपल्याला कंटाळा येईपर्यंत लांबली जाऊ नये अशी माझीही इच्छा आहे.

आमच्या चळवळीवर मुख्यतः तीन आक्षेप घेण्यात येतात. पहिला आक्षेप असा की, आम्ही स्पृश्य वर्गाशी सहकार्य न करता स्वतंत्र चळवळी करतो. दुसरा आक्षेप आमचे धोरण चढाईचे असते. तिसरा आक्षेप आम्ही जातिभेद व अस्पृश्यता या दोन वेगवेगळ्या व स्वतंत्र प्रश्नांना अभिन्न लेखून त्यांची निष्कारण खिचडी करतो व ह्यामुळे अस्पृश्यता निवारणाचा दिवस दूर ढकलण्यास कारणीभूत होतो.

पैकी पहिल्या आक्षेपाविषयी मला सांगावयाचे ते हेच की, सहकार्य न करणे याचा अर्थ स्वतंत्रपणे व स्वावलंबनाच्या तत्त्वावर चळवळ चालविणे असा जर असेल तर हा आक्षेप अगदी यथार्थ आहे. पण याचा अर्थ आम्ही कोणत्याच स्पृश्य माणसाबरोबर सहकार्य करीत नाही अगर कोणाचेच सहाय्य घेऊ इच्छित नाही, असा जर होत असेल तर हा आक्षेप खरा नाही. जो आमचा माणूस आहे असे आम्हाला खात्रीपूर्वक वाटते तो जातीने ब्राह्मण असो की अब्राह्मण असो त्याच्याशी आम्ही सहकार्य करण्यास सदैव तयार असतो. ह्या संघाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला लाभला आहे व जातिभेद मोडून अस्पृश्यतेचे हिंदू समाजातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या अल्प शक्तिनुसार जो संघ झटत आहे त्या आमच्या समाज समता संघात ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अस्पृश्य वगैरे कोणालाच येण्याची मनाई नसून त्यात या सर्व जातीचे लोक आहेत. आपल्या चळवळीची सूत्रे अस्पृश्यांनी आता आपल्या हाती घेतली या घटनेतही विलक्षण असे काही नाही. एखादा समाज अगर वर्ग जेव्हा अगदी खालावलेल्या स्थितीत असतो तेव्हा त्याला सहाय्यतेचा हात देऊन वर घेण्यासाठी पुढारलेल्या जातीतील काही माणसे आधी पुढाकार घेत असतात. आपल्या इंडीयन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात काही इंग्लिश गृहस्थांनी पुढाकार घेतला होता. इंग्लंडातील मजूर पक्ष निर्माण करण्यास उदारमतवादी लिबरल पक्षाच्या लोकांचे प्रयत्नच आधी सहाय्यभूत झाले. पण आरंभी सहाय्य करणाऱ्या पुढारलेल्या वर्गातील लोकांची सहाय्यता मागासलेल्या लोकांना काही विशिष्ट व ठराविक मर्यादेपर्यंतच मिळू शकते. ह्या मर्यादेपलीकडे मागासलेल्या लोकांबरोबर ते येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर आधीचे हे कैवारी पुढे पुढे त्याचे प्रतिस्पर्धी, विरोधक व शत्रू बनतात. एके काळी सहाय्यक व आश्रयदाता असलेला लिबरल पक्ष, लेबर-मजूर, पक्षाचा याचमुळे आज प्रच्छन्न शत्रू व प्रतिस्पर्धी बनल्याचे दृश्य आपण पहात आहो. पण यामुळे मजूर पक्ष कृतघ्न आहे अगर त्याने स्वतंत्र चळवळ करू नये, असे कोणीही विचारी मनुष्य म्हणणार नाही.

अस्पृश्यता निवारण चळवळीचाही असाच इतिहास आहे. ब्राह्मणादी पांढरपेशा वर्गातील काही सुधारक व उदारमतवादी लोकांनी अस्पृश्यांना आधी सहाय्यतेचा हात दिला. कै. आगरकर, रानडे वगैरे लोक, अस्पृश्यांना शिवण्यास हरकत नाही असे म्हणत व त्यांच्या सभेला वगैरे हजर राहून त्यांना सुधारणेच्या सहानुभूतीपर दोन गोष्टीही सांगत आणि यामुळे त्यांना आपल्या जातीची निंदाही सोसावी लागे पण या सुधारकांचा ज्या जातीत जन्म झाला त्याच जातीत त्यांना अनेक सुधारणा घडवून आणावयाच्या होत्या. ज्यांना मागासलेल्या लोकात गावठी मराठी भाषेत ‘पाट’ असे म्हणतात ते पाट अगर पुनर्विवाह ब्राह्मण स्त्रियांचे करावे अगर करू नयेत. विधवांचे केशवपन करणे शास्त्रसंमत आहे किंवा ते धर्मशास्त्राविरुद्ध आहे. पुरुषांनी केस राखावे की राखू नयेत. स्त्रियांना शिक्षण द्यावे अगर देऊ नये, याच पांढरपेशा प्रश्नांची चर्चा करण्यात या पुढारलेल्या वर्गातील सुधारकाचा वेळ गेला. अस्पृश्यादी मागासलेल्या लोकांच्या हिताहिताशी या चर्चेचा काहीच संबंध पोहचत नव्हता. ब्राह्मण स्त्रियांचे पुनर्विवाह रूढ झाले काय अगर विधवाचे केशवपन होण्याची रूढी थांबली काय, अस्पृश्यतेच्या रूढीवर यामुळे काहीच आघात होण्यासारखा नव्हता.

ही रानडे, आगरकर वगैरे महाराष्ट्रीय ब्राह्मण सुधारकांच्या अमदानीतील अस्पृश्यता निवारक प्रयत्नांची दिशा व मर्यादा झाली. सध्या हिंदूसभा वाल्यांच्या प्रयत्नांची महाराष्ट्रात धामधूम चाललेली आहे. रानडे, आगरकरांच्या ठायी सुधारणेबद्दल जी एक प्रकारची तळमळ होती तीही महाराष्ट्रातील हिंदूशुद्धि संघटनवाद्यांच्या ठायी दिसत नाही. आत्मशुद्धिपेक्षा परधर्मीयांच्या शुद्धिकडे व संघटनेपेक्षा संख्येकडेच त्यांचा ओढा आहे. जर खरे सामर्थ्य संख्येत असते तर आजही हिंदूच बहुसंख्यांक आहेत पण त्यांच्यात संघटना नसल्यामुळे त्यांची संख्या अधिक असूनही तिचा काही उपयोग होत नाही, ही गोष्ट त्यांना दिसते पण तिच्याकडे ते मुद्दाम दुर्लक्ष करतात. यांपैकी बहुतेक पुढारी वारा येईल तशी पाठ फिरविणारे आहेत. यांच्यावर विसंबून अस्पृश्यतेच्या जाचातून आपली सुटका होणार नाही असे अस्पृश्यांस वाटले तर त्यात त्यांचा काय दोष ?

एका मानव जातीला स्वकीयांच्या गुलामगिरीतून सोडविण्याकरता दुसरी मानव जात मनोभावाने झटल्याचे फक्त एकच एक उज्ज्वल उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणारे आहे व ते निग्रो लोकांची गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गो-या लोकांचे होय. भाऊ भावाशी, मुलगा बापाशी, मित्र मित्राशी त्या प्रसंगी लढले. जातिभेदावर कुऱ्हाड घालून अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारून टाकणारा जर एकादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा गौतम बुद्धच होय. पण वरच्यासारखी उदाहरणे व अशा घटना वारंवार घडत नसतात म्हणून असे काही घडेल अशा वेड्या आशेवर आम्हीही विसंबून राहू इच्छित नाही.

आमचे धोरण चढाईचे आहे. आम्ही विनम्र भावाने व अधोवदनाने जे काही मागावयाचे ते मागत नाही. त्यामुळे अस्पृश्यता निवारणाला अनुकूल असलेले लोकसुद्धा प्रतिकूल बनतात असा एक दुसरा आक्षेप आमच्याविरुद्ध आहे. पण असा आक्षेप घेणा-यांना जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटावयाला पाहिजे असे मला वाटते. अस्पृश्याइतका नम्र व लाचार समाज अलम दुनियेत दुसरा कोणता आहे ? आज शतकानुशतके आम्ही नम्र राहिलो नाही काय ? पाषाणालाही पाझर फोडणा-या दीनावस्थेत व नम्रतेत आम्ही दिवस काढले ना ? आता तरी कृपा करून नम्रतेचे व विनयाचे पाठ आम्हाला देऊ नका. ते आता उच्च वर्णीयांनाच शिकवा. विनंत्या, अर्ज. शिष्टमंडळे यांच्या साहाय्याने गमाविलेली स्वातंत्र्ये व दडपलेले हक्क मिळणे शक्य असते तर नेमस्त पक्षाचे लोक आतापर्यंत हिंदुस्थानचे राजे बनले असते व हिंदुची धर्मसत्ता अस्पृश्यांच्या घरी पाणी भरू लागली असती ! उद्दामपणाची आम्हाला सवय आहे अगर चढेलपणाचे चाळे करण्याची आम्हाला हौस आहे असे थोडेच आहे ! दिवसभर काबाडकष्ट करून पोटासाठी दोन घास कसे मिळविता येतील ही विवचना आमची रोजची सोबतीण; पण भाकरीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ म्हणून आम्ही या यातायातीत पडलो. कारण ठोठावल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत आणि हिसकावून घेतल्याशिवाय माणुसकीचे आमचे साधे हक्कही तुमच्या हातून सुटत नाहीत.

तिसऱ्या आक्षेपाला उत्तर देताना प्रारंभी मी आपल्याला एवढे सांगू इच्छितो की, आमची अस्पृश्यता निवारणाची चळवळ फक्त अस्पृश्य वर्गापुरतीच नाही, तर सगळ्या हिंदू समाजातील या जन्मजात अस्पृश्यतेचा नाश करणे हा आमच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे. तो साध्य होणे सोपी गोष्ट नाही. याची आम्हाला अगदी पुरेपूर जाणीव आहे. पण हिंदू समाजातील या रोगाचा नायनाट करण्याची जर कोणाला खरी तळमळ लागून राहणे शक्य असेल तर ती आम्हा अस्पृश्यांनाच होय. ब्राह्मणव्यतिरिक्त इतर सर्व जातींना या सामाजिक व धार्मिक अस्पृश्यतेची झळ थोड्याफार प्रमाणात लागलेली आहे व लागत आहे. खुद्द ब्राह्मणाब्राह्मणातच जातिविशिष्ट अस्पृश्यतेचा व उच्चनीचपणाचा भाव आहे. पळशीकर ब्राह्मणाचा चित्पावन ब्राह्मणाला पूजेच्या वेळी विटाळ होतो. कायस्थ स्त्रीच्या स्पर्शाने आपले वस्त्र अस्पर्श होऊ नये म्हणून ब्राह्मण स्त्री कुंकवाचा करंडा खाली ठेवते. अशी स्पृश्य जातीतच परस्परविषयक अस्पृश्यता वसत आहे. अस्पृश्य जातीत ती पूर्णत्वाला पोहचली आहे हाच काय तो फरक. म्हणून आमचे भेटीबंद तुटून आम्ही जरी शूद्र वर्णात आलो व मुसलमानादी परधर्मीयाइतके जरी स्पृश्य बनलो तरी, अस्पृश्यतेची भावना समूळ मरत नाही. ती मारावयाची असेल तर सर्रास रोटी-बेटी व्यवहार सुरू झाला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यतेचा रोग नष्ट व्हावयाचा नाही आणि तो तर समूळ नष्ट झालाच पाहिजे, तेवढ्यासाठीच आम्ही झटत आहो. नुसते स्पर्शपावनच व्हावयाचे असते तर परधर्मात जाऊनही अस्पृश्यांना तसे सहजासहजी व सन्मानपूर्वक यापूर्वीच होता आले असते. इतक्या यातायातीची व खेचाखेचीची मग जरूरच नव्हती.

सदर भाषण समता वृत्तपत्रात दिनांक 05 ऑक्टोंबर 1928 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password