Categories

Most Viewed

24 सप्टेंबर 1941 भाषण 2

“शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा.”

मद्रास इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या विद्यमाने मद्रास येथील मेमोरियल हॉल, पार्क टाऊन येथे रविवार दिनांक 24 सप्टेंबर 1944 रोजी संध्याकाळी 6 वाजता अस्पृश्यांची प्रचंड जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी रावबहादूर एन. शिवराज होते. यासभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तेव्हा लोकांनी उठून त्यांचे प्रचंड टाळ्यांनी व जयघोषांनी स्वागत केले. अध्यक्षांनी बाबासाहेबांचे स्वागत करणारे भाषण केले. त्यांना या सभेत (1) मद्रास आणि द्रविड वर्कर्स असोसिएशन (2) साऊथ इंडियन बुद्धिस्ट असोसिएशन (3) शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ऑफ दी सिव्हील अँड मिलीटरी स्टेशन, बंगलोर (4) मद्रास शेड्यूल्ड कास्ट्स स्टुडंट्स असोसिएशन (5) आंध्र प्रॉव्हिन्शियल शेड्यूल्ड कास्ट्स वेलफेअर असोसिएशन आणि इतर संस्थातर्फे मानपत्रे देण्याचा समारंभ झाला. एका तरुणाने बाबासाहेबांना भगवान बुद्धाचे सुंदर रंगीत चित्र अर्पण केले. मानपत्राबद्दल आभार मानून बाबासाहेबांनी या सभेत भाषण केले. त्यात त्यांनी प्रतिपक्षांना प्रक्षोभक वाटणारी पूर्वीची काही माहिती सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,
या मद्रास शहरात आपण जो माझा मोठ्या प्रमाणावर सन्मान केलात त्याबद्दल मी तुमचे प्रथमतःच आभार मानतो.

ह्याच मद्रास शहरात एका फार मोठ्या गृहस्थाने हल्लीच दोन वेळा आपल्या भाषणात माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले आहेत. हे गृहस्थ म्हणजे नेक नामदार श्रीनिवास शास्त्री हे होत. सुरवातीसच मला त्यांचा परामर्श घेतला पाहिजे. काही दिवसांपूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या प्रश्नाने नामदार शास्त्रींच्या मनात गोंधळ उडवून दिला नव्हता व कोठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत हिंदुस्थानचे एकमेव प्रतिनिधी व भारतवर्षाचा आत्मा या नात्याने महात्मा गांधीच बसू शकतील, असे त्यांना वाटत होते, त्यावेळी ते एकदा म्हणाले की काही झाले तरी डॉ. आंबेडकरांना कोठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घ्यावयाला मिळणार नाही, अशी काळजी हिंदी जनतेने घेतली पाहिजे. त्यांच्यासारख्या वयोवृद्ध व पूज्य माणसाच्या तोंडी ही भाषा ऐकून मला अंमळ आश्चर्य वाटले. माझे सार्वजनिक आयुष्य नामदार शास्त्रींच्या तुलनेने लहानच आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या इतकी कीर्तीही मी संपादन केली नसेल. परंतु या लहानशा सार्वजनिक आयुष्यातही मी असे कोणते दुष्कृत्य केले की ज्यामुळे मला एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बसलेला बघून हिंदी जनतेला शरमेने मान खाली घालण्याची पाळी यावी ? याबद्दल मी बरेच आत्मसंशोधन करून पाहिले. मी काही येथे शिव्या देण्यासाठी उभा नाही. नाहीतर मी नामदार शास्त्रींना ब्रिटिश सरकारच्या मांडीवरचे कुत्रे सहज म्हणू शकलो असतो. संबंध आयुष्य त्यांनी ब्रिटिश सरकारच्या मांडीवर बसून घालविले आहे. देशात किंवा देशाबाहेर जर त्यांनी काही कुप्रसिद्धी आणि मोठेपणा मिळविला असेल तर केवळ ब्रिटिश सरकारने त्यांना शोभेसाठी पुढे करण्याची कृपादृष्टी ठेवली म्हणूनच होय. शास्त्रींची वटवट म्हणजे कुजलेल्या मढ्यावर चालविलेली एका म्हाताऱ्या कावळ्याची कावकाव आहे असे मी म्हणू इच्छित नाही.

बहुतेक काँग्रेसवाले म्हणत तरी काय असतात ? हेच की अस्पृश्य वर्ग देशहिताच्या आड येतो ! श्री. गांधी, नामदार शास्त्री, सर तेजबहादूर सप्रू व हिंदी राजकारणात प्रथम पंक्तीचा मान असलेल्या अनेक पुढाऱ्यांच्या बरोबर मी बसलो आहे. राष्ट्रवाद्यांकडून ज्याची आपण अपेक्षा करू नये अशा गोष्टी करताना त्यांना मी पाहिलेले आहे. माझी खात्री आहे, नुसतीच खात्री नाही तर या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, की ज्या ज्या वेळी एखादा सार्वजनिक प्रश्न गोलमेज परिषदेत चर्चेस आला त्या त्या वेळी त्या देशभक्त म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकांपेक्षा माझे वर्तन कितीतरी पटीने चांगले व राष्ट्रीय बाण्याचे होते. (टाळ्या)

येथे जमलेल्या बहुतेक लोकांना गांधींनी गोलमेज परिषदेत काय केले ते माहीत नसेल. आम्ही सर्वांनी तेथे श्रेष्ठ कामगिरी बजावली, अशीच तुमची समजूत असेल, हे खरे आहे का ? श्री. गांधींनी काय केले ? 1931 साली जेव्हा गांधी गोलमेज परिषदेत गेले त्यावेळी काँग्रेसची त्यांना आज्ञा होती की संपूर्ण स्वातंत्र्याचीच त्यांनी मागणी करावी, काहीही कमी स्वीकारू नये. हिंदुस्थानातले दुसरे मोठे राजकारणी धुरंधरदेखील त्या मागणीच्या जवळ आले नव्हते. पण गांधींनी काय केले ते सांगण्यास मला दुःखच वाटते. परंतु ज्याअर्थी मी गोलमेज परिषदेत संघ फोडण्याचे काम केले असा माझ्यावर नेहमी आरोप करण्यात येतो त्याअर्थी मला काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत.

अर्थात गांधींनी स्वातंत्र्याच्या मागणीचे गाठोडे बरोबर आणल्यामुळे ते आमच्या मागणीच्या पुष्कळच पुढे जातील, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु आश्चर्य हे की हिंदुस्थानच्या दुर्दैवाने या म्हाता-याला असे काही खेळविण्यात आले की त्याने सायमन कमिशनच्या शिफारशीवरच संतुष्ट होण्याची तयारी दर्शविली. अर्थात, त्यामुळे त्यावेळचे भारतमंत्री सर सॅम्युअल होअर व अधिकारारूढ असलेली कॉन्झव्हेंटिव्ह पार्टी यांना परिषद संपविण्याची घाई झाली. पार्लमेन्टमधील कॉन्झव्हेटिव्ह, लेबर व लिबरल् या तीन पक्षांचे एक कमिशन त्यावेळी आम्ही नेमले होते. पार्लमेन्टने सायमन कमिशनच्या शिफारशी मान्य कराव्यात. त्यापलिकडे जाऊ नये, याकडे आपल्या मानाचा प्रश्न म्हणून सर सॅम्युअल होअर पाहात होते. त्यांना गांधींचे हे धोरण म्हणजे ईश्वरी प्रसादच वाटला. त्यांनी लगेच बोलावयास सुरवात केली की गांधींहून मोठा माणूस हिंदुस्थानात आहे तरी कोण ? सप्रू कोण आहेत ? आंबेडकर कोणत्या झाडाचा पाला ? आणि जिना तरी कोठले आले ? गांधींचे जर प्रांतिक स्वायत्ततेने समाधान होते तर परिषदा बंद कराव्यात व लगेच पार्लमेन्टने सायमन कमिशनच्या सांगण्याप्रमाणे कायदा करावा. त्या विरुद्ध आवाज आम्हीच उठविला. आम्ही स्पष्ट सांगितले की, आम्हाला हे मुळीच मान्य नाही व असल्या गोष्टीत आम्ही कधीही साथीदार होऊ शकत नाही. आम्ही एवढी ओरड केली की शेवटी ब्रिटिश मंत्रिमंडळाला परिषदेतील प्रतिनिधींची मते अजमावण्यासाठी एक छोटीशी कॅबिनेट कमेटी नेमणे भाग पडले. या कमिटीपुढे साक्ष देणा-यांपैकी मी एक होतो. कमिटीचे अध्यक्ष लॉर्ड चॅसेलर व सभासद, मुख्य प्रधान व भारत मंत्री हे होते. मला सांगण्यास मोठा अभिमान वाटतो की अस्पृश्य वर्गालादेखील पार्लमेन्टने मागे पाऊल टाकलेले सहन होणार नाही हेच मी सांगितले. माझे हे कृत्य निंद्य होते असे कोणी म्हणू शकेल ? मध्यवर्ती सरकार लोकमतानुवर्ती करण्यात अस्पृश्यवर्ग विरुद्ध आला असे कोणीतरी म्हणेल काय ?

त्यावेळी गांधींनी संस्थानिकांपुढे लोटांगण घातले. सरळ सांगितले की, संस्थानिकांनी प्रतिनिधींची पसंती करण्यात त्याची काहीच हरकत नाही. संबंध गोलमेज परिषदेत या प्रश्नावर झगडणारा मी एकटाच प्रतिनिधी होतो. (टाळ्या) नामदार शास्त्री त्यावेळी कोठे दडले होते ? त्यांच्याविषयी काही गमतीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन, आम्ही सर्व फेडरेशनच्या अगदी विरुद्ध होतो. मी सुरुवातीपासून लढविलेला एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानातील राजकारणाची संस्थानातील राजकारणाशी भेसळ करू नये. या दोघांना निरनिराळे होऊन आता जवळ जवळ 150 वर्षे झाली. अर्थात आम्ही एकच लोक आहोत. आमचे भवितव्यही एक असणार यात शंका नाही, तरी शेवटी ही गोष्ट राहतेच की 150 वर्षे आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी चाललो आहोत. आम्हाला मिळालेले राजकीय शिक्षण वेगवेगळे आहे.

माझे आग्रहाचे सांगणे होते की ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानला राष्ट्रस्वातंत्र्या कडे स्वतःच्याच विशिष्ट मार्गाने जाऊ द्यावे. त्यांच्या पासंडीला हिंदी संस्थानिकांना जोडून त्यांचे भवितव्य गुंतागुंतीचे करू नये. नामदार शास्त्री त्याच मताचे होते किंवा या कटात माझ्या बरोबर सामील होते म्हणा ! आम्ही तिघेजणच ह्याप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानला हृदयाशी बाळगून होतो. ना. शास्त्री, सर चिंतामणी व मी. माझ्यासारख्या पोरापेक्षा नामदार शास्त्रीसारख्या कीर्तीमान मनुष्याकडे लोक जास्त आदराने बघतील म्हणून आम्ही त्यांना आमच्या वतीने बोलण्यास उभे केले. परिषदेपुढे ते बोलले. त्याच्या आदल्या दिवशी मी व चिंतामणी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचे मत त्या वेळीही तसेच निश्चित असल्याचे आम्हास आढळले. तीन वाजता किंग जेम्स पॅलेसमध्ये नामदारसाहेब बोलणार होते तेथे आम्ही गेलो, ते काय बोलले असतील असे तुम्हाला वाटते ? माझे व सर चिंतामणीचे हृदय चांगले मजबूत होते म्हणून बरे, नाहीतर त्याचवेळी त्या धक्क्याने आम्ही ठार झालो असतो. श्री. शास्त्री यांनी सांगितले की ते फेडरेशनच्या बाजूने होते! आणि त्यांचे मला सांगणे होते. की, मी दुराग्रह करून सर्व योजनेचा विचकाच करीत आहे म्हणून मी गप्प बसावे. जर गांधी प्रामाणिक असते आणि हिंदी संस्थानातील जनतेबद्दल त्यांना खरी कळकळ असती तर संस्थानिकांच्या जुलूमापासून त्यांची सुटका व्हावी ह्या तत्त्वानुसार ते वागले असते. संस्थांनी प्रजेचे प्रतिनिधी जनतेने निवडले पाहिजे असा त्यांनी सर्वांच्या आधी आग्रह धरला असता. उलट गांधींनी सांगितले की, संस्थानिकांनी प्रतिनिधींची पसंती करण्यास त्यांची मान्यता आहे ! मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे ती ही की गांधींना राजकारण फार थोडे एक गोष्ट कळते. हे काही मी त्यांची निंदा करण्याच्या दृष्टीने म्हणत नाही किंवा टाळ्या मिळविण्याच्या हेतूनेही म्हणत नाही. परंतु ही सत्य गोष्ट आहे. मी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर होतो. गांधी नव्हते. मला त्यातील पुष्कळ खाचखळगे माहीत होते आणि गांधींनी बोलण्यापूर्वी त्या सर्व बऱ्यावाईट, खोट्या नाट्या गोष्टी त्यांना कळाव्यात म्हणजे त्यांनी काय बोलावे काय नाही ते कळेल. अशी मला कळकळ वाटत होती. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी असताना फेडरल स्ट्रक्चर कमिटीवर मी होतो. अर्थात अस्पृश्यांचा प्रतिनिधी असल्यामुळे मला अध्यक्षस्थानी असलेल्या लॉर्ड चैंसेलर शेजारी जागा मिळण्याची आशा नव्हती. मला शेवटी कोठेतरी बसविण्यात आले होते. पहिल्या दिवशी गांधी आले तेव्हाच सभेचा विषय चर्चेला निघाला होता. आधीच गांधीना राजकीय ज्ञान कमी व त्यातच ते पहिल्या परिषदेला हजर नव्हते या दोन गोष्टींमुळे मला बरीच काळजी वाटत होती. सर्वांआधीच बोलण्याची संधी मिळाली तर सर्व परिस्थिती मी उघडकीस आणीन आणि गांधींना त्याची चांगली जाणीव करून देईन, अशी मला उत्कंठा होती.

तेव्हा थोडा ताप आल्याचे निमित्त करून मी लॉर्ड चॅसेलर साहेबांकडून प्रथम बोलण्याची परवानगी मागितली. त्यांनी गांधींना काही विरोध असल्याचे विचारले. गांधींनीही उदारपणा दाखवून नाही म्हटले. जवळ जवळ दीड तास मी बोललो. विलायतेत याहून अधिक मी कधीच बोललो नसेन. भाषण झाल्यानंतर आधी ताप आल्याची जी सबब सांगितली होती ती खरी भासविण्यासाठी मला निघून जाणे भाग होते. गांधी नंतर काय बोलले, हे कळून येण्यासाठी संबंध रात्र आतुरतेने वाट पाहणारा संबंध लंडनमध्ये मीच एकटा त्यावेळी असेन. बरोबर मध्यरात्रीला परिषदेचा रिपोर्ट माझ्या हाती पडला. घाई घाईने मी ते पाकीट फोडले आणि गांधीचे पहिलेच वाक्य माझ्या नजरेस पडले. माझ्या मनाला डॉ. आंबेडकरांचे म्हणणे पटते पण बुद्धीला पटत नाही ! माझ्या भाषणात मी जे काही सुचविले होते त्याच्या अगदी उलट ते बोलले होते. मला अतिशय संताप आला आणि सकाळी जरी नव्हता तरी मात्र मला रात्री थोडा ताप आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परिषदेस गेलो. गांधी व इतर सर्व तेथे होतेच. सभा सुरु होताच मी लॉर्ड चॅसेलरकडे गांधींना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली, माझे व गांधींचे भांडण असण्याचे मूळ कारण हेच होय.

मी गांधींना तीन प्रश्न विचारले. माझा पहिला प्रश्न हा होता की संस्थानी प्रजेचे प्रतिनिधी संस्थानिकांनीच पसंत करावे, असे म्हणण्यात काँग्रेसने त्यांना काही आज्ञा केली होती काय ? कोंग्रेसने कधी यावर चर्चा केली होती काय ? काँग्रेसने त्यांना त्या बाबतीत बोलण्यास काही अधिकार दिला होता काय ? दुसरा प्रश्न निवडणुकीविषयी होता. कॉन्झव्र्हेटिव्ह पार्टीला निवडणुका अप्रत्यक्ष व्हाव्या अशी इच्छा होती. गांधींनी ते मान्य केले. आमचा सर्वांचा त्याला विरोध होता. परंतु मी गांधींना प्रश्न केला की याच तत्त्वाचा पुरस्कार केल्याबद्दल काँग्रेसने मिसेस अँनी बेझंटचे होमरूल बिल फेटाळले होते. ही गोष्ट खरी आहे की नाही ? तिसरा प्रश्न आता काही माझ्या ध्यानात नाही. अध्यक्षांनी गांधींना काही उत्तर द्यावयाचे आहे का म्हणून विचारले. गांधींनी उत्तर देण्यास नकार दिला. जर हिंदुस्थानला बुडविण्याचे पाप कोणाच्या हातून घडत असेल तर ते माझ्या हातून नाही, अस्पृश्यवर्गाच्याही हातून नाही, ते पाप गांधी, शास्त्री व अशाच दुसन्या लोकांच्या हातून घडलेले आहे.

आयर्लंडची परिस्थिती हिंदुनी आठवावी. 1916 साली त्या देशाची एकजूट करण्याचे शेवटचे प्रयत्न झाले. दक्षिण आयर्लंडमधील कॅथालिकांतर्फे रेडमंड व आयलंडतर्फे सर एडवर्ड कार्सन यांची बोलणी चालली होती. ज्यावेळी रेडमंडने उत्तर आयर्लंडमधील प्रॉटेस्टन्ट पंथाच्या लोकांसाठी खास हक्क देऊ केले, तेव्हा कार्सनने उत्तर दिले. ‘जळोत ते तुमचे खास हक्क. आम्हाला तुमच्या हुकमतीखाली मुळी कसेही राहावयाचे नाही!’ आम्ही असे कधी म्हटले आहे काय ? आम्हाला तसे म्हणायला सबळ कारणे आणि हक्क असूनही आम्ही तसे म्हटलेले नाही. त्याहून कितीतरी नम्रतेने आम्ही बोलत आहोत. हिंदू महासभेच्या अध्यक्षाप्रमाणे आम्ही अजून म्हटलेले नाही की तुमची लोकशाहीची बोलणी म्हणजे स्वतःची सुलतानशाही झाकण्यासाठी दिलेल्या थापा आहेत. आम्ही म्हटले तुम्हाला स्वराज्य पाहिजे, घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. फक्त एक लहानशी न्याय्य अट आहे. आम्हाला आमच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी खास हक्क द्या. कार्सनच्या भूमिकेपेक्षा आमची भूमिका कितीतरी उच्च पातळीवर आहे.

आमची ही भूमिका देशप्रेमाची नाही, उदात्त नाही, उदार अंतःकरणाची नाही असे शास्त्री किंवा गांधी किंवा कोणीही काँग्रेस पुढारी म्हणू शकेल काय ? दोन हजार वर्षांचा ब्राह्मणांचा केवढा भयंकर जुलूम आम्ही विसरावयास तयार आहोत ! व ते एका आशेवर की आम्हाला हे खास हक्क मिळाले तर देशातील इतर विशाल अंतःकरणाच्या माणसांच्या मदतीने आम्ही आमच्या समाजाला व राष्ट्राला खऱ्या माणुसकीचे व राष्ट्रत्त्वाचे हक्क प्राप्त करून देऊ. सर्व राजकारणात ह्याहून अधिक उदार, अधिक उदात्त आणि थोर भावना कोणी दाखवू शकेल काय ? म्हणून मी माझ्या हिंदू बांधवांना सांगतो की आतातरी तुमची मनोवृत्ती बदलून टाका आणि आम्ही जो स्वार्थत्याग करीत आहोत, भविष्यकाळाच्या आश्वासनावर विसंबून आम्ही आज जो धोका पत्करण्यास तयार होत आहोत त्याचा नीट विचार करा. आपण सामोपचाराने हा प्रश्न सोडवू एकी करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तयार आहे. परंतु दुर्दैवाने अजून मला ह्या बाबतीत हिंदू समाजाचा अनुभव बरा नाही.

जेव्हा जेव्हा आम्ही आमचे डोके वर केले तेव्हा तेव्हा त्यांनी हशावरी गोष्ट घालविली. 1932 साली प्रथम अस्पृश्यांचा प्रश्न वर आला आणि मुसलमानांच्या जोडीचे स्थान त्यांना मिळाले. तेव्हा मतदान कमिटीने संबंध देशात फिरून प्रत्येक प्रांतातील अस्पृश्यांची संख्या शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला सर्वत्र हाच अनुभव आला की सगळे हिंदू, मग ते जुने सनातनी असोत की स्वतःला व्यापक दृष्टीचे म्हणविणारे असोत. सर्व एका सुरात सांगावयाचे की अस्पृश्य नावाची काही चिजच नाही. संयुक्त प्रांत, बिहार, पंजाब सगळीकडे हीच स्थिती असे का ? कारण अगदी उघड आहे. आमच्या हिंदू बांधवांना कळले होते की, सरकार अस्पृश्यांचे वेगळे प्रतिनिधी कायदे मंडळात घेणार आहे आणि त्या प्रतिनिधींची संख्या अस्पृश्यांच्या एकंदर संख्येवर अवलंबून राहाणार आहे. सरकारचा निर्णय बदलणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून अस्पृश्य नावाचा समाजच अस्तित्त्वात नाही, असा धादांत खोटा कांगावा त्यांनी केला होता. असा नीच डाव 1932 साली हिंदू खेळत होते. आज ते निराळाच डाव खेळत आहेत.

गांधी व व्हाईसरॉय यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला तुम्हास माहीतच आहे. त्यामध्ये 15 जुलै 1944 चे पत्र फार महत्त्वाचे आहे. व्हाईसरॉयांनी म्हटले आहे की, युद्धाअंती हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश सरकार तयार आहे. परंतु एका अटीवर ती अशी की, जी घटना त्यावेळी अंमलात येईल ती हिंदुस्थानातील राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकांना संमत असली पाहिजे. हे प्रमुख घटक कोणते, हेही व्हाइसरॉयांनी सांगितले आहे. आपल्या सुदैवाने आणि हिंदुबांधवांच्या दुर्दैवाने त्यात अस्पृश्यांचाही एक प्रमुख घटक म्हणून त्यांनी उल्लेख केला आहे.

या बाबतीत काही वर्तमानपत्रे ओरड करीत आहेत की. व्हाइसरॉयचे हे विधान नवीन आहे आणि क्रिप्सने ब्रिटिश सरकारतर्फे जी योजना मांडली होती तीत असे काही म्हटले नव्हते. या गोष्टींची मला चीड येते. असा खोटा आणि दुष्ट विचार त्यांनी का करावा कळत नाही. हिंदू वर्तमान पत्रकारांनी आणि संपादकांनी आपण ज्याविषयी बोलतो त्याची माहिती तरी नीट घ्यावी आणि सर्व कळल्यानंतर त्यांना जी भ्याड टीका करावयाची ती करावी.

अस्पृश्यांचा मतदार संघ निराळा असावा अशी शिफारस सायमन कमिशनने किती आग्रहाने केली, ते सांगण्याची गरज नाही. कोणाची असे म्हणण्याची छाती आहे काय की. अस्पृश्य समाज हा या देशातील एक स्वतंत्र व महत्त्वाचा घटक नाही. गोलमेज परिषदेत सरकारने त्यांना वेगळे प्रतिनिधीत्व का दिले ? अस्पृश्य समाज म्हणजे हिंदुची एखादी शाखा किंवा जात नाही. तो एक स्वतंत्र घटक आहे. म्हणूनच त्याचे स्वतंत्र प्रतिनिधी घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे जॉईंट पार्लमेन्टरी कमिटीचा रिपोर्ट पाहा. हा सारा जुना इतिहास आहे. त्यानंतर कितीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. अस्पृश्य समाज स्वतंत्र घटक आहे.

मला माझ्या हिंदु बांधवांना स्पष्ट सांगावयाचे आहे की त्यांनी ह्या सर्व जुन्या कल्पना आता टाकून द्याव्यात आणि बऱ्यासाठी म्हणा अथवा वाईटासाठी म्हणा. अस्पृश्य समाज हा हिंदुस्थानचा एक स्वतंत्र घटक आहे, याची त्यांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधावी. मला त्यांना अगदी स्पष्टपणे सांगावयाचे आहे की, याबद्दल त्यानी कसलीही शंका ठेवू नये.

गांधी-जिनांच्या वाटाघाटीतील मुख्य प्रश्नाबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. लोक मला विचारतात तुम्ही गांधी-जिना वाटाघाटीविषयी काहीच का बोलत नाही ? या वाटाघाटीविषयी काय म्हणावे तेच मला कळत नाही.

आता चालला आहे तसा फक्त दोन पक्षांमधील तडजोडीचा प्रयत्न केव्हाही संशयास्पद आहे. तिस-याला लुबाडून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हा दोघांचा डाव असल्यासारखे मला वाटते. गांधींकडून जिनांना काय हवे आहे आणि गांधी काय द्यावयाला तयार आहेत, हे मला माहीत नाही. पण जिनांना योग्य त्याहून जर काही जास्त गांधींनी दिले तर ते माझ्या वाट्यातून देतील अशी भीती वाटते. तेव्हा या वाटाघाटीमुळे मला एवढी काळजी का वाटते है तुम्हाला सहज कळेल. देशातील सर्वात मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळवून काँग्रेसची ताकद वाढविणे व त्याच्या जोरावर ब्रिटिश सरकारला घाबरवून अस्पृश्याच्या मागण्या डावलून तडजोड करण्यास भाग पाडणे, हा गांधींच्या धोरणाचा सर्वात मोठा भाग आहे.

जातीय प्रश्न क्षितिजावर दिसू लागल्यापासून आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये गांधींनी जर काही केले असेल तर ते अस्पृश्यांकडे दुर्लक्ष करणे हेच होय.

गोलमेज परिषदेत मला एकटा वेगळा पाडण्याचा गांधींनी खूप प्रयत्न केला. हिटलरच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे मला त्यांनी चौफेर घेरून घेतले. मला एकटा करून माझा सर्व पाठिंबा नाहिसा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरेच दिवस प्रयत्न फसल्यानंतर कोठलाही प्रामाणिक मनुष्य करणार नाही अशी गोष्ट त्यांनी केली. मुसलमानांकडे जाऊन जिनांना त्यांनी त्यांच्या 14 अटी देण्याचे कबूल केले. पण ते एका अटीवर की, त्यांनी ह्या ‘नालायक अस्पृश्य कुतरड्या बरोबर बोलणी करू नयेत. ह्याचा माझ्याकडे लेखी पुरावा आहे. गोलमेज परिषदेत गांधी व लीग यांच्यात झालेला एक लेखी मसुदा माझ्याकडे आहे. यावेळी तरी तसे होणार नाही, अशी मला आशा आहे.

आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोक-यांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरवण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनाचा किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही. कदाचित गांधी त्याला हवेत उडवून लावतील.

गांधींना व सरकारलादेखील दोघांनाही दाखवावे लागेल की ह्यावेळी आम्ही मनाचा निश्चय करून हे सांगत आहोत व सरकारलाही आपल्याला निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल. आपण आता काहीही टाळाटाळ चालू देणार नाही. सरकारने एकदा जे वचन दिले आहे ते सरकार पाळील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण सरकारच्या किंवा इतर कोणाच्याही सदिच्छेवर अवलंबून राहाण्यात काही अर्थ नाही. आपण स्वतःवरच विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपली जोरदार संघटना केली पाहिजे. दुसऱ्या सर्व अडचणी आपण बाजूस सारल्या पाहिजे.

ह्या शहरातील अस्पृश्यांमध्ये मला अत्यंत मोठा उत्साह दिसून येत आहे. तो कदाचित माझ्या आगमनामुळे असेल, परंतु स्थानिक वृत्तीने स्थानिक कार्यक्रम करून आपली शक्ती वाढणार नाही. आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये जमलो पाहिजे व जगाला दाखवून दिले पाहिजे की, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमध्येच अखिल अस्पृश्य समाजाची एकजूट झालेली आहे. (प्रचंड टाळ्या)

डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र चां. भ. खैरमोडे, खंड 9 पृष्ठ 356-357 • भाषण उपलब्ध जनतेच्या अंकात पृष्ठ 4 ते 6 वर प्रकाशित परंतु त्या पृष्ठावर अंकाची तारीख नाही व पहिले पृष्ठही नाही संपादक,

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password