Categories

Most Viewed

24 सप्टेंबर 1944 भाषण 1

“सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही.”

दक्षिण भारतात 1920-1936 या काळात ब्राह्मणेतरांचा पक्ष, जस्टिस पार्टी फार प्रबळ होता. तो 1937 च्या नंतर डबघाईस आला. त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न जून 1944 पासून सुरू झाले. यासाठी मद्रास प्रांतात बऱ्याच सभा झाल्या. अशा तऱ्हेची एक मोठी सभा 24-25 सप्टेंबर 1944 ला सालेम या शहरात भरविण्याचे जाहीर झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या चळवळीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना ब्राह्मणेतर पुढा-यांच्या बरोबर चर्चा करून या विषयाची संपूर्ण माहिती मिळविण्याची इच्छा झाली. त्यांनी सदर चळवळीचे प्रमुख श्री. ई. व्ही. रामस्वामी नायकर यांना भेटण्यास या म्हणून आमंत्रण पाठविले, तेव्हा श्री. नायकर बाबासाहेबांना भेटण्यासाठी मद्रासला शनिवार, दिनांक 23 सप्टेंबर 1944 ला आले. चेट्टीनाड हाऊस, अड्यार येथे दोघांनी दोन तास चर्चा केली. ब्राह्मणेतर पक्षाच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला आपला पाठिंबा आहे व पुढेही राहील, असे बाबासाहेबांनी श्री. नायकर यांना आश्वासन दिले. ‘करूर’ येथे भरणाऱ्या ब्राह्मणेतर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी श्री. नायकर, मद्रास येथून दिनांक 23 सप्टेंबरच्या रात्री रेल्वेने गेले.

रविवार, दिनांक 24 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मद्रास शहरातील अस्पृश्य महिलातर्फे बाबासाहेबांना रायपेट्टा येथील ‘वुडलँडस’ या भव्य इमारतीत चहापार्टी देण्यात आली. स्त्रियांनी चळवळीत भाग घ्यावा व आपल्या समाजाच्या उन्नतीच्या कार्याला हातभार लावावा, अशा अर्थाचे भाषण त्यांनी तेथे केले. आपल्या समाजातील शिकलेल्या लोकांना आपल्या जातीचा नामनिर्देश करण्याची भीती वाटते ही नामुष्कीची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

‘दी संडे ऑब्झर्व्हर’, मद्रास या पत्राचे संपादक श्री. पी. सुब्रह्मनियम मुदलियार, यांनी बाबासाहेबांना कोन्नेमर हॉटेलमध्ये जेवण दिले. जेवणानंतर हॉटेलच्या ग्रीन रुममध्ये आमंत्रित पाहुणे (सरकारी अधिकारी व इतर) गप्पा मारण्यास बसले, त्यावेळी यजमानाने बाबासाहेबांना ब्राह्मणेतर चळवळीसंबंधी मार्गदर्शक विचार प्रदर्शित करण्याची विनंती केली. तेव्हा बाबासाहेबांनी आपले विचार प्रदर्शित केले. ते म्हणाले,

बंधु भगिनींनो,
ब्राह्मणेतर पक्षाचे सुशिक्षित तरुण येथे आलेले असते व त्यांच्यापुढे आपणास एखाद्या तत्त्वज्ञान्याप्रमाणे विद्वत्ताप्रचूर भाषण करावे लागले असते तर तसे करण्यात मला उत्साहही वाटला असता. पण येथे नवविचारांच्या तरुणापेक्षा जुने पुढारी व कार्यकर्ते जास्त संख्येने असलेले पाहून माझ्या उत्साहावर पाणी पडले आहे. तरी पण मी माझे विचार तुमच्यापुढे मांडतो.

मद्रास ब्राह्मणेतर पक्ष, जस्टीस पार्टी, 1917 ते 1937 पर्यंत या इलाख्यात वीस वर्षे अधिकारावर होता. असे असताही तो पक्ष 1937 च्या निवडणुकीत का पडला ? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. ब्राह्मणेतर पक्ष निर्माण झाला. ही एक लोकशाहीच्या दृष्टीने मोठी महत्त्वाची ऐतिहासिक घटना होय. ती फार महत्त्वाची आहे. ब्राह्मणेतर या शब्दाने त्याला जातीयवादी स्वरूप प्राप्त झाले हा पक्ष लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हिंदू समाजात ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन वर्ग हजारो वर्षे अस्तित्त्वात आहेत. ब्राह्मणवर्ग विषमता मानतो. त्याच्या हातात धार्मिक व राजकीय सत्ता हजारो वर्षे अनियंत्रितपणे चालू आहे. ब्राह्मणेतर वर्ग समतेचा पुरस्कर्ता आहे. त्याने हुकूमशहा ब्राह्मण वर्गावर आतापर्यंत हजारो वेळा निकराचे हल्ले केले, ते समाजात समता निर्माण करण्यासाठी. पण हुकूमशहा ब्राह्मणवर्ग धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मोक्याच्या सर्व जागा बळकावून बसलेला असल्यामुळे ब्राह्मणेतर पक्षाचे सर्व हल्ले त्याने नेस्तनाबूद केले. त्यामुळे ब्राह्मणवर्ग हा ब्राह्मणेतर वर्गाचा अनियंत्रित राज्यकर्ता म्हणून अद्याप तसाच राहिलेला आहे. ब्राह्मणेतर वर्ग समतेचा पुरस्कर्ता आहे पण त्याला विषमतेच्या पुरस्कर्त्या ब्राह्मणवर्गाला नेस्तनाबूद करून समाजात समता आणि देशात लोकशाही स्थापन करता आली नाही.

ब्राह्मणेतर पक्ष या इलाख्यात वीस वर्षे सत्तारूढ होता तरी त्याला ब्राह्मणवर्गाला नेस्तनाबूद करता आले नाही, याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे या पक्षातील लोकांचा स्वार्थांधपणा, गतानुगतिकत्वाची ओढ, सुशिक्षित ब्राह्मणेतरांची समाजापासून अलिप्त राहण्याची प्रवृत्ती, पक्षातील ध्येय धोरणांचा संकुचितपणा आणि संघटनेतील शिथिलता ही होत. हा पक्ष 1917 ते 1937 या वीस वर्षात सत्तारूढ झाला. पण त्याला जनतेच्या हिताचे कार्य करण्यापेक्षा ब्राह्मणवर्गाला शिव्याशाप देणे हेच जास्त महत्त्वाचे वाटले. त्यातच त्या पक्षाची सारी शक्ती खर्च झाली. खेडेगावातील जनता दारिद्र्याने पिडलेली आहे, ती सावकारांच्या पाशात अडकलेली आहे. तिच्या हितासाठी उद्योगधंदे काढणे, सावकारांच्या तावडीतून तिला सोडविणे वगैरे कार्य करण्याचे भान या पक्षाला राहिले नाही. आपल्या नातलगांना नोकऱ्या देणे, हेच मुख्य कार्य या पक्षाने केले. नोकऱ्यावर लावलेले तरुण ब्राह्मणेतर समाजापासून अलिप्त राहून चैनीत दिवस काढू लागले. ब्राह्मणांना शिव्याशाप देणारे ब्राह्मणेतर ब्राह्मणांप्रमाणे गंध लावणे, पूजा करणे, पोशाख करणे वगैरे ब्राह्मणी आचार विचारांचा अवलंब करून राहू लागले. यामुळे ब्राह्मण्य नष्ट करण्याचे जे ब्राह्मणेतर पक्षाचे धोरण होते ते सांदीकोपऱ्यात पडून राहिले आणि ब्राह्मण्य तसेच जिवंत राहिले. ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मणांपासून आपण अगदी निराळे आहोत. त्यांचे व आपले तत्त्वज्ञान यात जमीन अस्मानाचे अंतर आहे, याची पूर्ण कल्पना आली नाही व त्याप्रमाणे वर्तन करण्याचे ध्येय त्यांना साध्य करता आले नाही. ब्राह्मण हे पहिल्या दर्जाचे ब्राह्मण होत व आपण दुसऱ्या दर्जाचे ब्राह्मण आहोत हीच कल्पना ब्राह्मणेतरांच्या वागणुकीवरून सिद्ध झालेली आहे. ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी हेही विद्वान व तर्कशुद्ध विचार करणारे उच्च दर्जाचे नव्हते. त्यांच्यात पक्षाचे धोरण व्यापक करून पक्षाला लोकशाही स्थापन करण्यासाठी राबविता आले नाही.

पुढारी कसे असावेत ? स्पष्ट धोरण आखणारे व त्या धोरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जीवाचे रान करणारे. गांधी अगर जिनांसारखे पुढारी नसावेत. गांधी आज एक मत देतील तर उद्या त्याच्या उलट देतील. अशी उदाहरणे अनेक देता येतील. पाकिस्तानाबद्दल त्यांनी आतापर्यंत अनेक परस्पर विरोधी मते प्रकट केली आहेत. जिना तर हुकूमशहा आहेत. ते लीगमधील कार्यकारी मंडळ स्वतः तयार करतात. लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींना ते मान्यता देत नाहीत. गांधी व जिना यांना त्यांचे अनुयायी पुढारीपणापासून पदच्यूत का करीत नाहीत ? कारण तसे झाले तर काँग्रेस व लीग या पक्षात बजबजपुरी माजेल, हे ते ओळखतात. कारण या दोन पुढाऱ्यामुळेच त्यांच्या पक्षात संघटना टिकून राहिलेली आहे. ब्राह्मणेतर पक्षांच्या पुढा-यांनाही दूर केले तर त्या पक्षाची संघटना होणार नाही. कारण ही संघटना मुळी विस्कळीत आहे. ती सिमेंटप्रमाणे घट्ट नाही. म्हणूनच 1937 च्या निवडणुकीत त्या पक्षाला ब्राह्मणेतर मतदार बहुसंख्य असताही हार खावी लागली.

डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र ले. चा. भ. खैरमोडे, खंड 9 पृष्ठ 381-383

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password