Categories

Most Viewed

20 जुलै 1937 भाषण

“शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षाचे ध्येय.”

स्वतंत्र मजूर पक्षातील मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या सभासदांची पहिली सभा मंगळवार तारीख 20 जुलै 1937 रोजी पुणे येथे अहिल्याश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती.

कौन्सिलमधील कामकाजासंबंधी नियम वगैरे पास करण्यात आल्यावर स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची कडक शिस्त व संघटना याची जाणीव करून दिली. कोणत्याही पक्षाला आपले नैतिक बलाने कार्य करावयाचे असेल तर त्याने शिस्त व संघटना या दोन गोष्टींकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे. आपल्या अंगिकारलेल्या कार्यात प्रथम अपयश मिळाले तरी हरकत नाही. परंतु आपण आपल्या ध्येयापासून कधीही अलिप्त होता कामा नये. मनुष्याच्या अंगी जितके नैतिक बल अधिक असेल तितका त्याचा आत्मविश्वास वाढत जाऊन पराजयातूनही त्याला शेवटी सन्मानाचे यश मिळविता येते. इंग्लंडमधील निरनिराळ्या राजकीय पक्षांचे सिंहावलोकन आपण केल्यास तेथेही शिस्त आणि संघटना याची जिवाभावाची सांगड झालेली दिसून येईल. इंग्लंड मधील एकेकाळी चिमुकला वाटणारा मजूर पक्ष, शिस्त आणि संघटनेच्या बळावरच शेवटी अधिकारारूढ झालेला आपण पाहिला आहे. परंतु त्यांची पूर्वीची शिस्त व संघटना थोडीशी ढासळताच तो पक्ष अधिकारपदावरून कसा घसरला याचेही प्रत्यंतर आपण पाहिले आहे.

जगातल्या राजकीय घडामोडीत यश मिळविणे काही सोपे काम नव्हे. त्यासाठी एक प्रकारची तपश्चर्याच करावी लागते. आपला पक्ष सबळ होण्यासाठी आपणामध्ये कोणत्या प्रकारच्या उणीवा आहेत या गोष्टीकडे प्रथम लक्ष द्यावे लागते. राजकीय स्वरूपाच्या पक्षात नुसत्या श्रीमंतांचा व आपल्या आवडत्या माणसांचा समावेश करून भागत नसते. निरनिराळ्या विषयांवर अध्ययन केलेले आणि निरनिराळ्या विषयांवर तज्ज्ञ म्हणून ज्यांना संबोधिता येईल अशाच माणसांना आपापल्या पक्षाच्या जबाबदारीच्या जागांवर नेमून कार्याची दिशा आखावी लागते, भावनामय प्रभावी भाषेने अज्ञान जनतेची दिशाभूल करून संख्येने मोठा असलेल्या पक्षापेक्षा शिस्त, संघटना व उज्ज्वल ध्येयाची जाणीव असलेला अल्पसंख्यांक लोकांचा लहानसा पक्ष शेवटी राजकीय क्षेत्रात खरा प्रभावी ठरून यशस्वी होतो. आपला स्वतंत्र मजूर पक्ष आज दिसायला लहान असा पक्ष आहे. परंतु आपण आखलेल्या ध्येयमुक्त कार्याची रुपरेषा ही इतकी उज्ज्वल अशी आहे की, त्यात आपणास पुढेमागे अपूर्व यश मिळाल्याशिवाय राहाणार नाही.

मुंबई असेंब्लीतील स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांनी या गोष्टींना प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी शिस्त व संघटना या बाबी आपल्या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येक सभासदांच्या हृदयावर पूर्णपणे बिंबविण्याचाही प्रयत्न करावयास पाहिजे. बहुजन समाजाशी समरस होण्याचा आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे. गोरगरीब, कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण करणे हे आपल्या पक्षाचे पहिले कार्य आहे. ते कार्य करण्यासाठी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची शिस्तीने संघटना वाढून आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमण करण्याचा आजच संकल्प करावा. निःस्वार्थवृत्तीने केलेल्या कार्यात आपणास खात्रीने यश मिळेल यात बिलकुल शंका नाही.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 31 जुलै 1937 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password