Categories

Most Viewed

11 सप्टेंबर 1938 भाषण

“दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.”

पुणे येथील अस्पृश्य विद्यार्थ्यांचे 11 वे संमेलन रविवार तारीख 11 सप्टेंबर 1938 रोजी, पुणे येथे डी. सी. मिशनच्या हॉलमध्ये भरवण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष व मुख्य वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती.

संमेलनाच्या पूर्वी शनिवारी व रविवारी, विद्यार्थ्यांचे मर्दानी व मैदानी खेळ, एक नाट्य प्रयोग, वक्तृत्व कलेची चढाओढ व भोजन वगैरे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले होते. या कामी मि. टी. बी. भोसले, संमेलन सेक्रेटरी व त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी बरीच मेहनत घेतली होती. संमेलनाचे चेअरमन श्री. राजाराम भोळे, एम. एल. ए. यांनी संमेलन चालक मंडळीस जे उत्तेजन व सहाय्य केले त्यामुळे या वर्षाचे संमेलन विशेष यशस्वी झाले असे म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. यंदाच्या संमेलनाच्या चिटणीस मंडळीत कु. घटकांबळे या विद्यार्थीनीने सहकार्याने काम केले होते. कॉलेज विद्यार्थिनींमध्ये त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत.

संमेलनाचे मुख्य चिटणीस मि. भोसले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गेल्या 10 संमेलनाचे महत्त्व निवेदन केले. या संमेलनाला आमदार भाऊराव गायकवाड, डी. जी. जाधव, के. एस. सावंत, रोहम, वराळे, काळे, बँकवर्ड क्लास ऑफिसर श्री. देवधर, भा. र. कद्रेकर, सौ. गीताबाई गायकवाड, श्री. बाबुराव भातनकर, गंगाधर घाटगे, सुपरवायझर श्री. ढिखळे, के. आर. मधाळे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती.

या 11 व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,

आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्यांचे असले तरी येथे बसलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्येतर अधिक आहेत असे दिसून येईल. जसे भाताच्या खिचडीत तांदळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे. ज्याअर्थी हे विद्यार्थी संमेलन आहे त्याअर्थी विद्यार्थ्यांना उपदेशपर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. कारण मी जो आज येथे आलो आहे तो विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी आलो आहे. आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळास काही अटी घातल्या. त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केल्या असल्यामुळे आजच्या या संमेलनाचे वैभव व शोभा थोडी कमी झाली असेल. माझे भाषण मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताच असल्याने इतरेजनास ते जरी नीरस वाटण्याचा संभव आहे. तथापि, ते विद्यार्थ्यांना आवडेल असे मला वाटते. विद्यार्थ्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे हे माझे कर्तव्य समजतो.

माझे आयुष्य सध्या खेड्यापाड्यातील अशिक्षित, अडाणी, जुलूमाने त्रस्त झालेल्या अशा लोकांची गाऱ्हाणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यात व त्यांच्या विवंचनेत जात आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जितके द्यावयास पाहिजे तितके लक्ष देण्यास अवसर सापडत नाही. त्यामुळे मी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतो असा काहींचा समज झाला असून कधी कधी तसा सूरही निघत असल्याचे मी ऐकले आहे. परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हास सांगू इच्छितो ती ही की, एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारची कार्ये उत्तम तऱ्हेने पार पाडू शकत नाही. या बाबत एका ग्रंथकर्त्याचे सुभाषित मला आठवते. If you want success you must be narrow minded. वरील म्हणण्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे. कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू म्हणेल तर तसे करणे त्याला अशक्य होईल. तेव्हा एक ना धड भाराभर चिंध्या यासारखे कोणतेही एक कार्य धड न करता अनेक कार्याना हात घालणे योग्य नाही. आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपणास उपलब्ध असलेली साधन सामुग्री फारच अल्प आहे. तेव्हा माणसाने लहान लहान कार्ये हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच दीनदुबळ्या, स्पृश्य समाजाच्या जुलूमाने त्रस्त झालेल्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आहे. त्या कार्यामुळे विद्यार्थ्यांकडे जितके लक्ष द्यावयास हवे तितके देता येणे शक्य नाही. अर्थात त्याचा अर्थ मी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे असे नाही. उलट मी जरी राजकारणात, समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थी आहे. तेव्हा विद्यार्थ्याला विद्यार्थ्याविरुद्ध कसे राहता येईल ? मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात. आज मजवर रूपये 1,000 (एक हजार) पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे. असे जरी असले तरी माझी पत दांडगी आहे. ती अजून गेली नाही. मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तके उधार आणू शकतो. परंतु माझ्या विद्यार्जनाच्या कार्यात खंड पडू देत नाही, कारण विद्यार्जन हे माझे दांडगे व्यसन होऊन बसले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मी कसा राहीन ?

विद्यार्थ्यांनी विद्यार्जनानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावे या बाबत उपदेश करण्यास मी अपात्र आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो आहे. कारण माझा गृहस्थाश्रम फुकट गेला आहे. तथापि, त्यांनी विद्यार्थीदशेत कसे वागावे या बाबत माझ्या स्वानुभवाने काही ना काही सांगू शकेन. ज्या समाजात गेली हजारो वर्षेपावेतो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलिकडे बी. ए. व एम. ए. वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही ? मागे आपल्या समाजात बी. ए. चा पदवीधर औषधालासुद्धा मिळत नव्हता. मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथम बी. ए. झाला होता. त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी. ए. लिहिल्यास पोस्टमन ते पत्र त्यासच नेऊन देत असत. इतका तो बी. ए. झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता. आज तर आपल्या समाजात अनेक बी. ए. झाले आहेत. इतकेच नव्हे तर विनोदाने बोलावयाचे झाल्यास येथे असलेल्या लोकात जर खडा फेकला तर तो बी. ए. झालेल्यासच लागेल. बी. ए. झालेले जरी काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी आहे की, आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यावयाची आहे ते लोक पुढारलेले आहेत. आजच्या जीवन कलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही नीरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही. कारण आज सर्व सत्ताधारी म्हणून पुढारलेलेच वर्ग आहेत. नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफीसात गेल्यास तेथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघडे नागडे सत्य आहे. नुसत्या बी. ए. होण्यामुळे तुम्हास नोकरी मिळणार नाही. पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही. अगर पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत, उलट आज शेकडो वर्षे जसे आपणास व आपल्या बापजाद्यांना त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की, त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर बी. ए. झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा. मी प्रथम बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारडा बॅरिस्टर म्हणून मला हिणवणीने पुढारलेल्या वर्गाचे बॅरिस्टर म्हणत असत. परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत.

आपणास चांगले दिव्य केल्याशिवाय महत्त्व येत नाही. नाही. इतर समाजाचे तसे नाही. ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कोठे इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील. त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्यास सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे. हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे. आपण असे पहा की जर एखाद्या महारीन अगर मांगीन अगर चांभारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असा समज उच्च म्हणविणारे वर्ग करून घेत असतात. तद्वतच पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी पितळेचे दागिने वापरल्यास ते सोन्याचेच असावेत हा समज दृढ झाला आहे. तद्वतच इतर बाबतीतही आपले झाले आहे. आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशः चांगले करू तेव्हा कोठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ. हे सर्व करण्यासाठी आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय ? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. मी सुद्धा तुमच्या सारखाच एका महारीन बाईच्या पोटी जन्मास आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करिता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई-बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी त-हेने पुरा केला. हे करण्यासाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी 24 तासापैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. अलिकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते. नाही तर सिगारेटस् ओढीत हातपाय ताणून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही.

दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळविण्याने काही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमविलेली साधन सामग्री होय. विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता याचा काही संबंध नाही. या बाबतीत एक मननीय उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन. मरहूम सातवे एडवर्डच्या नंतर पंचम जॉर्ज हे जेव्हा 1911 साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्थानात येऊन गेल्यानंतर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयांना अनेक लाखांची ग्रँट दिली. अर्थात त्या ग्रँटच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरले व त्याप्रमाणे त्यास बोलावण्यात आले. येथे आल्यानंतर जे एम. ए. असतील त्यांनीच त्याच्या क्लासला हजर राहावे असे ठरले. त्यावेळी मद्रास येथे रामानुज नावाचा रेल्वेच्या ऑफिसात दरमहा रूपये 20 वर काम करणारा एक कारकून होता. त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली. त्याने आपल्या व्याख्यानाला मला हजर राहाण्याची परवानगी असावी म्हणून विनंती केली. परंतु रामानुज हा नुसता मॅट्रिकच असल्याने तो या वर्गात आला असता त्यास काही समजणार नाही असे प्रथम या गणित पारंगतास वाटले. तथापि रामानुजास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहाण्याची परवानगी देण्यात आली. रामानुजाने त्या प्रोफेसराची पाचसहा व्याख्याने ऐकली. परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणितशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसरची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी लिहित बसत असे. त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला. दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस म्हणून म्हटले, त्यावर रामानुजाने सांगितले की, ”महाराज, आपण आज शिकवीत आहात ती गणिताची प्रमेये मी विद्यार्थी दशेतच सोडविली आहेत. त्यात नवीन असे मला काहीच आढळत नाही. इतकेच नव्हे तर ही पुढीलही प्रमेये मी ज्या वहीवर सोडवून ठेवली आहेत ती मजजवळ आहेत. प्रोफेसर मजकूर यांनी त्याच्या वह्या तपासल्या, त्याने गणित शास्त्राचे मोठमोठे अजब प्रॉब्लेम्स सोडविले होते. ते पाहून प्रोफेसर मजकूर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळविले. जो इसम गणित शास्त्रात इतका पारंगत आहे त्यास खर्डे घासण्यास दरमहा रूपये 20 पगारावर ठेवण्यात आले असल्याने खेद प्रदर्शित करण्यात आला. इतकेच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतेस बोलावून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बड्या पगारावर, गणितशास्त्रात पारंगत असल्याने, तिकडील लोकांना गणित शिकविण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला. परंतु रामानुज हा ब्राह्मण असल्याने त्याचे ब्राह्मण्य आड आले. त्यानी विलायतेला जाताना आपल्याबरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामग्री नेली होती. विटाची चूल करून त्यावरच स्वतः स्वयंपाक करून तो जेवीत असे. युरोपियन्स हे यवन आहेत तेव्हा त्यांना स्पर्श झाल्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागे. इंग्लंडमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये जेथे युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवार खेरीज स्नान करीत नसत तेथे हा पठ्ठा दररोज सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करीत असे. स्नानाने त्यास निमोनिया झाला व त्यातच त्यांचा अंत झाला. तसेच लिबरल पक्षाचे श्री. चिंतामणी हे अत्यंत बुद्धिमान, हुषार म्हणून त्यांचा बोलबाला आहे. इतकेच नव्हे तर सबंध हिंदुस्थानात पहिल्या दर्जाचा संपादक व लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या विद्यार्थ्यांची अशी समज झालेली दिसते की, बी. ए. पदवीधर झाला की आता पुढे काहीच शिकावयाचे राहिले नाही, परंतु खरे पाहाता बी. ए. झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजेच जे शिकायचे आहे ते पुढेच असते. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल.

विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. विद्या ही तरवारीसारखी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणा-यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही, परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसविण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. दरेक खेडेगावात तेथे असलेले ब्राह्मण, वाणी व इतर शिकले सवरलेले गावगुंड लबाड्या करून कसे फसवितात हे आपण पाहिले असेलच. लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाड़ी अगर फसवाफसदी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकात शीलाची अत्यंत आहे. शीलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे.

माझे भाषण संपविण्यापूर्वी राजकारणाविषयी दोन शब्द सांगणे या ठिकाणी मी माझे कर्तव्य समजतो. सर्वसाधारणपणे आपल्यातील लोक गरिबीमुळे विद्येचा उपयोग पोट भरण्यापलिकडे करीत नाहीत. मी त्यांना त्याबद्दल दोष देत नाही. शिकल्यासवरलेल्या लोकांपुढील अडीअडचणी तुम्ही दृष्टीआड करून चालणार नाही. आज अधिकारारूढ असलेला स्पृश्य समाज आहे. त्यामुळे स्पृश्य मानलेल्या समाजाची स्थिती फार समाधानकारक आहे. त्यांचा मार्ग सर्व दृष्टीने सुकर आहे. परंतु त्याच्या उलट तुमचा मार्ग कंटकमय आहे. कोणत्या उपायांनी तो मार्ग सोपा होऊ शकेल याचा तुम्ही सर्वांनी एव्हापासूनच विचार करावयास पाहिजे. आपल्या समाजाची सर्वच बाजूने कुचंबणा होत आहे. तिचा पाढा या ठिकाणी वाचणे अशक्य आहे. आपण अल्पसंख्यांक आहोत. संख्येच्या बळावर स्पृश्य मानलेला समाज वाटेल तो जुलूम सध्या करीत आहे. आज जर आपण कोर्टकचे-यात प्रवेश केला तर आपणास काय दिसेल ? मॅजिस्ट्रेट ब्राह्मण, कारकून ब्राह्मण, सर्कल इन्स्पेक्टर ब्राह्मण, तलाठी ब्राह्मण, मुन्सफ ब्राह्मण, फौजदार ब्राह्मण. अशास्थितीत जर आपले खटले अशा कोर्ट कचे-याकडे न्यायासाठी गेले तरी तेथे न्याय मिळतो काय ? मुळीच नाही. कित्येक खटल्यांच्या निवाड्यात मॅजिस्ट्रेट लोकांनी महारांच्या बाजूने महार साक्षीदार आहेत सबब त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, असे म्हटले आहे. परंतु स्पृश्य जातींच्या बाजूने स्पृश्य जाती साक्षीस असल्या तरी मॅजिस्ट्रेटास ते चालते. फार कशाला आजचे काँग्रेसचे दिवाण हे सुद्धा जो कोणी काँग्रेसवाला असेल त्यासच मदत करण्यास तयार असतात. तेव्हा अशा परिस्थितीत मा-याच्या जागा आपल्या ताब्यात आल्याशिवाय होत असलेला जोरजुलूम थांबणार नाही. परंतु या जागा कशा मिळू शकतील, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आज तर चोर व लबाड अशांच्या गट्टी सारखी गट्टी या स्पृश्य मानलेल्या काँग्रेसच्या लोकांची आहे. त्यांच्या गट्टीत जे सामील होतील त्यांच्याकडे ते जरा सहानुभूतीने पाहतील. जे लोक त्यांना सामील नाहीत त्यांच्याकडे खुनशीपणाने ते पाहत असल्याची प्रचिती आपणास आहेच. तेव्हा त्यासाठी मी आपणास दोन गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की, आपण सर्वानी संघटन केले पाहिजे. आपण जर सर्व अस्पृश्य मानले गेलेले लोक एकत्रित झालो तर या भेदांच्या नगरीच्या किल्ल्यास कोठेतरी चीर गेल्याशिवाय राहणार नाही. लोक अडाणी आहेत. ते वाचू अगर विचार करू शकत नाहीत. गावातील शिरजोर लोकांच्या सांगण्याप्रमाणे अगर इच्छेप्रमाणे ते वागावयास तयार होतात. भीतीमुळे माणसे फुटून जाण्याचा फार संभव असतो. या जुटीसाठी विद्यार्थी वर्ग काय करावयास तयार आहे ? विद्यार्थी वर्ग ही एकजूट कशी सांभाळील याबद्दल मोठी शंका आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटाये ही उत्कृष्ट समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर या संघटनेच्या कार्याची अंशतः धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीच पाहिजे, आपल्या सा-यांच्या इच्छा तृप्त करण्याचे सामर्थ्य आपल्या कोणातच नाही आणि म्हणून ज्यांनी त्यांनी आपल्या वैयक्तिक मनिषा अगर आकांक्षा पु-या न झाल्या तर लगेच फटकून वागण्यात आपण आपला आत्मनाश करून घेत आहोत. तेव्हा या गोष्टी डोळ्यांपुढे ठेऊन स्वार्थास फाटा देऊन संघटना करण्यासाठी आपण सर्वांनी झटावे. व्यक्तीगत स्वार्थापेक्षा समाजाच्या फायद्याकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे.

दुसरी गोष्ट अशी की, आपला उद्धार करण्यासाठी हरिजन सेवक संघासारख्या हजारो संस्था स्थापन झाल्या आहेत. परंतु त्यांचे अंतिम ध्येय काय आहे ते उमगत नाही. त्यांचे कार्य कर्तव्य करण्याच्या इराद्याने सुरू आहे की कोंबडीस दाणे टाकून कापण्यासाठी पकडण्याच्या स्वार्थी बुद्धीचे आहे ? या संस्थांच्या लाभाचा काय परिणाम होईल, हा मोठा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. या ब्राह्मणी संस्थेपासून आपल्या विद्यार्थ्यांनी फायदा उचलल्यास ‘ज्याचे मीठ खावे त्यास बेईमान होऊ नये’ या अनेक वर्षांच्या शिकवणुकीने आम्ही आमचे स्वत्व विसरण्याची मोठी भिती वाटते. या बाबत द्रोण व भीष्माचार्य यांची उदाहरणे आपल्या डोळ्यांपुढे आहेतच. पांडवांचा प्रश्न जरी न्यायाचा असला तरी तुम्ही त्यांच्याविरुद्ध कसे लढता असा प्रश्न भीष्मास विचारला असता त्यांनी उत्तर दिले की ‘अर्थस्य पुरुषो दासः.’

ज्यांचा मी भात खातो त्यांच्या बाजूने मला लढले पाहिजे. या उत्तरात मनुष्याच्या सर्वसाधारण स्वभावाचे चित्र रेखाटले आहे आणि म्हणून स्पृश्य वर्गांनी काढलेल्या या संस्थाचा फायदा घेण्यापूर्वी तो आम्ही घ्यावा की नाही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अर्थात याबाबत मला एक गोष्ट सांगावयाची आहे. ती ही की, पुरातन काळी देव व राक्षस यांचे युद्ध चालले होते. युद्धात राक्षसाचा गुरु शुक्राचार्य यास संजीवनी विद्या अवगत असल्याने लढाईत मेलेल्या राक्षसांना तो या जोरावर पुन्हा जिवंत करीत असे. परंतु देवाच्या बाजूने लढाईत मेल्यास त्यांना काही जिवंत करता येत नसे. त्यामुळे दिवसानुदिवस देवांचे सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा सर्व देवांनी एकत्र बसून याचा खूप खल केल्यानंतर असे ठरविले की, देवांच्या गुरुचा मुलगा कच यास राक्षसांच्या गुरुकडे संजीवनी विद्या शिकविण्यासाठी पाठवावे. त्याप्रमाणे कच शुक्राचार्याकडे विद्या शिकण्यास गेला. परंतु राक्षसांना देवांचे हे कारस्थान समजताच त्यांनी कचास ठार मारले व त्यास जाळून त्याची रक्षा शुक्राचार्यास दारुमध्ये मिसळून पिण्यास दिली. हेतु हा की, या कचाने शुक्राचार्याच्या देवयानी नावाच्या मुलीशी प्रेमसंधान जुळवून तिला आपलीशी केले होते व त्याला संजीवनी विद्या शिकवावी असा हट्ट ती आपल्या बापाजवळ धरून बसली. तिच्या आग्रहावरून जर शुक्राचार्यानी कचास संजीवनी विद्या शिकविलीच तर मग आपली धडगत नाही. या भीतीने व शुक्राचार्याच्या पोटात दारुद्वारे त्याची राख गेल्यास त्याला जिवंत करावयाचे झाल्यास शुक्राचार्यांना मरावे लागेल व अशा स्थितीत देवयानी भलता हट्ट धरणार नाही असे राक्षसांना वाटून त्यांनी हे सर्व केले. परंतु हे सर्व कारस्थान जेव्हा देवयानीस कळले तेव्हा तिने शुक्राचार्याच्या पोटात असलेल्या कचास प्रथम संजीवनी विद्या शिकविण्यास देवयानीने हट्ट धरला. त्यामुळे शुक्राचार्याने पोटात असलेल्या कचास ती संजीवनी विद्या शिकविली व नंतर मंत्रोच्चार करताच शुक्राचार्याचे पोट फाडून कच बाहेर पडला व त्यास अवगत झालेल्या विद्येच्या जोरावर त्याने शुक्राचार्यास पुन्हा जिवंत केले, अशी आख्यायिका आहे. परंतु देवयानीस तुझ्याशी लग्न करीन अशी जरी कबूली असली तरी आपले कार्य फस्त होताच ते तो सर्व विसरला व देवायानीशी लग्न न करताच तडक आपल्या गोटात निघून गेला. कचाच्या या कृत्यास अनेक लोक कृतघ्न म्हणतात, परंतु मी मात्र त्याचे ते कृत्य कृतघ्नपणाचे मानीत नाही. त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी अनुकरण केल्यास मला त्यात वाईट वाटणार नाही. या बाबत इंग्रजीत असलेले सुभाषित मला आठवते.
“No man can be grateful at the cost of his honour, no woman can be grateful at the cost of her chastity and no nation can be grateful at the cost of its liberty “
गांधींच्या आजच्या सत्य आणि अहिंसा या म्हणण्याचा मला अजून अर्थच कळला नाही. सत्य कोणास व केव्हा सांगावे याचे उत्तर गांधींनी अजून दिलेले नाही. कल्पना करा की माझ्या शेजारी एक श्रीमंत गृहस्थ आहे. तो माझा स्नेही असल्याने त्याची ठेव तो कोठे ठेवतो हे मला माहीत आहे. तेव्हा जर काही चोर आले व म्हणाले की तुमच्या शेजा-याची ठेव कोठे असते ते सांगा. तर अशा वेळी मी सत्य सांगून स्नेह्याचा घात करावा किंवा खोटे सांगून मित्राला वाचवावे ? अशी एक ना शंभर उदाहरणे देता येतील. असो.

शेवटी मला आपणास एवढेच सांगावयाचे आहे की, जर आपण एकजुटीने वागाल तर काहीतरी करू शकाल. आपल्या समाजावर हजारो वर्षांपासून होत असलेला जोर जुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे. आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरूरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे.

या बाबतीत शिस्त अत्यंत कठोरपणे पाळली तरच काहीतरी होऊ शकेल. नाहीतर सर्वत्र बजबजपुरी माजून समाजनाश व निःसंघटना होईल. तरी अशा वेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी. शेवटी आपल्यात संघटना, शील व शिस्त वाढवा व समाज उन्नतीस त्याचा फायदा द्या. एवढे सांगून आपली रजा घेतो.”

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 01 ऑक्टोंबर 1938 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password