Categories

Most Viewed

02 ऑक्टोबर 1927 भाषण

“बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे भवितव्य”

बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक संमेलन पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, बार-अँट-लॉ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, तारीख 2 ऑक्टोबर 1927 रोजी उत्साहाने पार पडले. समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. संमेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. या सामन्यात महार, मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे नमूद करण्यास आनंद वाटतो. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार होता. त्यासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृताचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, बार-अँट-लॉ हे डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत पाच वाजता येऊन दाखल झाले. अध्यक्षांच्या स्वागतासाठी गव्हर्मेंट डी. सी. हॉस्टेल व डी. सी. मिशन या संस्थांच्या बालवीरांची पथके दारापाशी सज्ज होऊन राहिली होती. दरवाजापाशी अध्यक्ष येताच सुभेदार घाटगे यांच्या आधिपत्याखालील बालवीरांच्या पथकानी त्यांना खडी तालीम दिली. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जयजयकाराचा प्रचंड ध्वनी निघाला. या जयजयकारातच पाहुणे मंडळी आश्रमात येऊन दाखल झाली. नंतर उपहार आटोपल्यावर अध्यक्ष, विद्यार्थी व काही निमंत्रित पाहुणे यांचा ग्रुप फोटो घेण्यात आल्यावर सहा वाजता बक्षीस समारंभ सुरू झाला.

पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तावडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु गायकवाड, तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती. नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळ्या सामन्यातील बाबीचे मार्मिक विवेचन केले. अध्यक्षांनी स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर अध्यक्षांनी आपले भाषण केले. त्यात त्यांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत अध्यक्षांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले. नंतर आभारप्रदर्शन झाल्यावर अध्यक्षास पुष्पहार घालण्यात आला व अशारीतीने हा संस्मरणीय प्रसंग पार पडला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password