“ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणी जातीभेदाच्या विषाने मानवी सद्गुणांना मुकले.”
दिनांक 26 सप्टेंबर 1944 रोजी संध्याकाळी कोकीनाडा येथील शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, रचुपेटे डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, वर्मा आंध्र इव्ह्युक्यूज असोसिएशन, वलंदरपेटा, आदि आंध्र असोसिएशन आणि प्रबोधन साहित्य समिती या संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पी. आर. कॉलेज हॉल मध्ये मानपत्रे देण्यात आली. त्यांना उत्तर देताना बाबासाहेबांनी भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
बंधुंनो आणि भगिनींनो,
कोणताही वर्ग अगर कोणतीही जात एखाद्या देशाच्या समाजात प्रभुत्व गाजवणारी का होते ? त्या वर्गाच्या अगर जातीच्या हातात सत्ता असते म्हणून. मग ती सत्ता आर्थिक, धार्मिक, राजकीय अगर इतर कसलीही असो. ब्राह्मणांनी हे पाचसहा हजार वर्षापूर्वी ओळखले. म्हणून ब्राह्मण लोक आपली जात सर्व हिंदू समाजाच्या डोक्यावर मि-या वाटणारी कशी करता येईल ? याबद्दल विचार करीत होते. त्यासाठी त्यांनी वेदात चातुर्वर्ण्याची उत्पत्ती केली. समाजाचा प्रमुख, देवळांचा प्रमुख, गावांचा प्रमुख ब्राह्मणच असला पाहिजे. ब्राह्मणाला सर्व जातीच्या बायका करता याव्यात. त्याला आपला मुख्य प्रधान, पुरोहित व सेनानी राजाने करावे वगैरे नियम मनू व इतर धर्मशास्त्रकार यांनी आपापल्या स्मृतीग्रंथात तयार करून ते हिंदू समाजाच्या बोकांडी मारले. ब्राह्मणांचे हे श्रेष्ठत्व हाणून पाडण्यासाठी ब्राह्मणेतरांनी वैदिक काळात नंतर एकंदर सात मोठे झगडे केले. ब्राह्मण मुठभर व ब्राह्मणेतर लाखोनी मोजता येतील असे असता या झगड्यात ब्राह्मणेतरांना हार खावी लागली. कारण ब्राह्मणेतर लोक हे ब्राह्मणी जातीभेदाच्या विषाने मानवी सद्गुणांना मुकलेले होते. तेव्हा अस्पृश्य वर्ग जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर त्याच्या हातात राजकीय व आर्थिक सत्ता आली पाहिजे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा मोका सध्या अस्पृश्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना अशी संधी गेल्या हजारो वर्षात मिळाली नाही. या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपापसातील मतभेद सोडून द्यावेत व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये सामील व्हावे. तुम्ही राजकीय सत्ता काबीज केली की, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ता मिळवण्याचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील.
मात्र या मार्गात एक मोठी मानसिक अडचण आहे. गांधी व काँग्रेस यांनी हरिजन सेवक संघातर्फे अस्पृश्यातील लहानथोर विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतरांना आर्थिक मदत देण्याचे सत्र सुरू केले. यात त्यांचा हेतू पवित्र नसून दुष्ट आहे. त्यांना माहित आहे की, आपल्या पैशाने हे लोक मिंधे होतील व आपल्या बाजूने राहून, ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ या न्यायाने काँग्रेसच्या चळवळीला उचलून धरतील. महाभारतातील पांडवांची बाजू न्यायाची व कौरवांची अन्यायाची होती हे माहीत असूनही भीष्म व द्रोण हे कौरवांचे मीठ खाणारे होते म्हणून त्यांनी कौरवांना सहाय्य केले व शेवटी त्यांचा सत्यानाश झाला. त्याचप्रमाणे हरिजन म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांची परिस्थिती होणार आहे. म्हणून मी आमच्या तरुण विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना देतो की, या सापळ्यात अडकून पडू नका. माझ्या इशाऱ्याचे तुम्हाला प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर तुम्ही हरिजन सेवक संघवाले, अगर काँग्रेसवाले हिंदू किंवा गांधी यांना सामाजिक समतेची मागणी करून पाहा. ते तुम्हाला दटावून गप्प बसायला लावतील हे मी नक्की सांगू शकतो.
डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र लेखक चां. भ. खैरमोडे, खंड 9 पृष्ठ 393-394.