“युद्धानंतर हुकूमशाही प्रस्थापित होता कामा नये.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मद्रासहून राजमहेंद्रीकडे जाण्यासाठी सोमवारी रात्री 25 सप्टेंबर 1944 ला निघाले. ते द्वारपौडी स्टेशनला मद्रास मेलने मंगळवारी 26 सप्टेंबर 1944 ला सकाळी येऊन पोहोचले. तेथून ते मोटारीने रामचंद्रपूरला आले. तेथे अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून त्यांची मोटार कोकीनाडाकडे निघाली. रस्त्यात वेलंगी या गावच्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांना मानपत्र दिले. संध्याकाळी ते कोकीनाडाला पोहोचले. तेथे त्यांना ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट बोर्डातर्फे मानपत्र दिले. बोर्डाचे अध्यक्ष राय बहादूर बी. बी. सर्वेरायडू हे मानपत्र समारंभाचे अध्यक्ष होते. मानपत्राला उत्तर देताना बाबासाहेबांनी भारताची सध्याची परिस्थिती व तीत देशाचे हिताचे धोरण कोणते याबद्दल भाषण केले. ते म्हणाले.
युद्धाला बिनशर्त मदत करणे, सशर्त मदत करणे, काहीच मदत न करणे आणि युद्धाला विरोध करणे असे विचार प्रवाह भारतात चालू आहेत. यामुळे देशातील राजकीय परिस्थितीत मोठा गोंधळ उत्पन्न झालेला आहे. युद्धाकडे पाहण्याची निरनिराळ्या पक्षांची व पुढाऱ्यांची दृष्टी वेगवेगळी आहे. हे युद्ध आमचे नव्हे, यात ब्रिटिशांचा पराजय झाला तर बरेच वगैरे उदगार हे पक्ष व पुढारी काढतात. पण ही त्यांची भूमिका चुकीची आहे. ब्रिटिशांचे राज्य संपून भारतात जपान अगर जर्मनी यांचे राज्य सुरू झाले तर भारतातील सर्व लोकांना पशुसमान जीवन घालवावे लागेल. ब्रिटिशांनी भारतावर अनेक अन्याय केलेले आहेत व त्याविरुद्ध भारतीयांना, चळवळ करण्याची व बोलण्याची घटनात्मक स्वतंत्रता होती व आहे. परंतु जपान अगर जर्मनीच्या हुकूमशाही राज्यांमध्ये हे स्वातंत्र्य उपभोगायला मिळणार नाही. युद्ध संपल्यानंतर भारताला जादा हक्क नक्की मिळतील. ते हक्क मिळवण्यासाठी युद्धात जपान व जर्मनी यांचा पाडाव करण्यासाठी भारतातील सर्व पक्षांनी हातभार लावणे आपल्याच हिताचे आहे. या बाबतीत ‘छोडो भारत’ चळवळ करून युद्धाला उपयुक्त प्रयत्न जे होतात ते गुप्तपणे हाणून पाडण्याचे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांना सरकारने तुरुंगात डांबले. यात सरकारकडून अन्याय झालेला नाही. जीना आणि गांधी यांच्यात जी तडजोड व्हावी असे लोकांना वाटते तेवढ्या तडजोडीवरून भारताचे राजकीय प्रश्न सुटणार नाहीत. अस्पृश्य हिंदू, मुसलमान वगैरे सर्व वर्गातील व पक्षातील लोकांनी एकत्र बसून हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ले. चां. भ. खैरमोडे, खंड 9, पृष्ठ 392-393