“दूरदृष्टी आणि काटकसर हे वैभव भावी पिढीने टिकविले पाहिजे.”
कोकणस्थ महार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, खार, मुंबई तर्फे श्री. चांगदेव नारायण मोहिते, श्री. गणपत विठ्ठल कासारे आणि श्रीमती मुक्ताबाई दगडू साताम्बेकर या तिघांनी खार येथे नवीन टुमदार घरे बांधली. त्याच आनंदोत्सवाप्रित्यर्थ त्यांनी रविवार तारीख 22 सप्टेंबर 1940 रोजी 4 वाजता आपल्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थाटाची चहा पार्टी दिली. प्रथम मोहिते मास्तर यांनी स्वगृही त्यांना पुष्पहार अर्पण केला. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समवेत सर्व पाहुणे मंडळीचा ग्रुप फोटो घेण्यात आला. फोटोनंतर सर्वांना थाटाची गार्डनपार्टी देण्यात आली. नवीन तीन घरे व कॉलनीतर्फे डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर मोहिते मास्तर यांनी बाबासाहेबांचे आणि आलेल्या पाहुणे मंडळीचे समयोचित शब्दात आभार मानले. पाहुणे मंडळीतर्फे सुरबा टिपणीस यांनी यजमानाचे आभार मानले. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,
मला तुमची घरे पाहून फार आनंद होत आहे. तुम्ही हे धाडस केल्याबद्दल मला अभिमान वाटतो. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करितो. हे तुमचे सुख पुत्रपौत्रापर्यंत कायम टिकेल असा प्रयत्न झाला पाहिजे. घराचे हप्ते व्यवस्थित देऊन संसार सुखाचा करा. तद्नंतर त्यांनी दापोली कँप येथील सेवानिवृत्त सुभेदारांचे वैभव आणि जीवनक्रम सांगितला. त्याचनंतर त्यांच्या मुलांबाळांची झालेली दुर्दशा वर्णन केली. बाप सुभेदार व मुलगा झाडुवाला हे अत्यंत मोठे दुर्दैव होय. तेव्हा तुम्ही सर्वांनी दूरदृष्टीने आणि काटकसरीने वागून तुमचे हे वैभव भावी पिढीने टिकविले पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा तऱ्हेची घरे जरूर बांधावी आणि आपला संसार सुखाचा करावा. तुमच्या शेजारी झोपड्यात जीवन कंठणाऱ्या आपल्या गरीब भाऊबंदांशी गुण्यागोविंदाने वागा. त्यांच्यासाठी बांगली घरे बांधून देण्याविषयी मी सरकार व बांद्रा म्युनिसीपालिटीकडे प्रयत्न चालविला आहे.
शेवटी यजमानांचे कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी आपले भाषण संपविले. सदरहू प्रसंगी प्रो. व्ही. जी. राव, बॅ. एस. एन. माने, मेसर्स कमलाकांत चित्रे, भाई चित्रे, सुरेन्द्रनाथ टिपणीस, इझिकेल, आर. जी. भातणकर, के. व्ही. सवादकर. टी. टी. शिर्के, एन. बी. आसगोलकर, एस. एल. वडवलकर, संभाजी गायकवाड, बी. बी. उनबरकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती.
सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 28 सप्टेंबर 1940 रोजी प्रसिद्ध झाले.