Categories

Most Viewed

20 सप्टेंबर 1944 भाषण

“इतर कुठल्याही जमातीपेक्षा अस्पृश्यांना स्वातंत्र्याविषयी अधिक आस्था आहे.”

निझामच्या हैद्राबाद संस्थानला बाबासाहेबांनी पहिली भेट दिनांक 20 सप्टेंबर 1944 ला दिली ती अविस्मरणीयच म्हटली पाहिजे. ते दक्षिण भारताच्या दौऱ्यावर निघाले होते. मुंबईतील कार्यक्रम आटोपून हैद्राबादला गेले. त्यावेळी त्यांचे दोन ठिकाणी अपूर्व स्वागत झाले. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे नामपल्ली आणि दुसरे ठिकाण म्हणजे सिकंदराबाद ते हैद्राबाद. बेगमपेट रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी हैद्राबाद संस्थानच्या फेडरेशनचे अध्यक्ष श्री. जे. सुबय्या, सौ. सुबय्या, श्रीमती राजमणी देवी, श्री. माद्रे इत्यादि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

नामपल्लीच्या अपूर्व स्वागतात पुरुषांपेक्षा स्त्रियांनी केलेले स्वागत उस्फूर्त होते. हैद्राबाद शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या पुरुष स्वयंसेवकांनी एकाच नमुन्याच्या बुश शर्टचे युनिफॉर्म चढविले होते. तर फेडरेशनच्या महिला स्वयंसेवकांनी विविधरंगी पोशाखाने सर्व नामपल्ली मढवून टाकली होती. त्यातून महिला स्वयंसेवकांनी स्वतःच जो शिस्तबद्ध बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे एकूण कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा बनला होता. परंतु यावरही कळस महिला स्वयंसेवकांनी केला होता. या स्वयंसेविकांच्या वतीनेच बाबासाहेबांना देण्यात आलेला गार्ड ऑफ ऑनर, व्हॉईसरॉयला मिळणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरला मागे टाकणारा असा विलोभनीय दिसत होता. “आंबेडकर झिंदाबाद” च्या घोषणांनी नामपल्ली परिसर नुसता दुमदुमून गेला होता.

बाबासाहेबांचे रेल्वेचे खास सलून जेव्हा सिकंदराबादेत आले, तेव्हा त्यांच्या भेटीस अनेक थोरा मोठ्यांची रीघ लागलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने, नबाब मैना, नबाब जंग बहादूर, हैद्राबाद संस्थानचे पोलिटिकल एजंट व माहिती खात्याचे ऑफिसर, कॅप्टन डब्ल्यू. एफ. क्रॅशन्शन, रेसिडेंटचे ऑनररी अंडर सेक्रेटरी, छतारीच्या नबाबाचे ए. डी. सी. हेही भेटी देणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये होते. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनपासून तर हजारो स्त्री पुरुषांची विराट मिरवणूक निघाली होती. सदर मिरवणूक रस्ता काटीत काटीत, मार्केट स्ट्रीट वरुन, के. ई. एम्. रोड वरून किंग्जवेकडे आगेकूच करीत निघाली. पुढे धनमंडीला मिरवणूक पोहोचल्यावर तर एकच तोबा गर्दी उसळली. अशी अपूर्व मिरवणूक त्यात बँडच्या संगीताचे झंकारच झंकार, एकामागून एक अशा उठविल्या जाणा-या “आंबेडकर झिंदाबाद” च्या घोषणांचे असंख्य ध्वनी प्रतिध्वनी आणि सर्व रस्त्यावर फडकत राहिलेल्या रंगी-बेरंगी पताका. या सर्वांची एकमेकात जणू प्रचंड स्पर्धाच चालली होती. याशिवाय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे असंख्य ध्वज जिकडे तिकडे डौलाने फडकत होते.

बाबासाहेबांना अशा मिरवणुकीतून नेण्यात येत होते. सर्व सिकंदराबाद व हैद्राबाद ही दोन्ही जुळी शहरे जणू एकत्र लोटली होती. प्रथमतः बाबासाहेबांना पाच-बंधु-सेवा-हॉल मध्ये नेण्यात आले. हे जनतेची सेवा करणारे केंद्र होते. कोणत्याही गोरगरीब मनुष्याचे काही गा-हाणे असल्यास त्यास मोफत सहाय्य करण्यासाठी सदर केंद्र उभारण्यात आल्याचे बाबासाहेबांना सांगण्यात आले. या केंद्रानंतर मिरवणूक विस्तीर्ण अशा जीरा मैदानाकडे वळली. तेथे भला मोठा मंडप उभारण्यात आला होता. सर्व मैदान तुडूंब भरून गेले होते. महिलांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी स्वागत समितीचे प्रमुख प्रेमकुमार यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. तर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने जे. एच. सुबय्या यांनी बाबासाहेबांना मानपत्र सादर केले.

बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उठले तेव्हा त्या जनसागराने टाळ्यांची प्रचंड साथ दिली. बाबासाहेब सुमारे 45 मिनिटे हिंदुस्तानी भाषेतून बोलले. परंतु त्यांनी सर्व श्रोतृवर्गाला आपल्या भाषणाने मुग्ध करून टाकले होते. बाबासाहेबांचे प्रभावी भाषण, हृदयास भिडणारी भाषा, गोरगरिबांशी एकरूप होणारी त्यांची प्रवृत्ती, शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या ध्येयाचा न्यायीपणा व त्यांची विद्वत्ता यामुळे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकजुटीने अस्पृश्यांचे हक्क मिळविण्यासाठी कसे लढावे याचे त्यांचे विवेचन प्रत्येकाच्या हृदयास जाऊन भिडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,
आज तुम्ही जे माझे प्रचंड प्रमाणात स्वागत केलेत त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. मी आपल्याकडे पहिल्यांदाच आल्यामुळे आजच्या स्वागताची अपेक्षा करीत नव्हतो. परंतु माझे आयुष्य व जीवनाकडे पाहिले म्हणजे ह्याप्रकारचे मला आश्चर्य वाटत नाही.

आजच्या स्वागतात, सभेत व मिरवणुकीत तरुणांनी जो उत्साह दाखविला त्याबद्दल मला फार समाधान वाटते. आपल्या समाजाची मदार आजच्या तरुण पिढीवर अवलंबून आहे. तरुण पिढीने आपल्या समाजाकरिता स्वार्थत्याग केल्याशिवाय आपले उद्दिष्ट लवकर हस्तगत करता येणार नाही. येथे चळवळ करण्याच्या सवलती असत्या तर तुमची फार प्रगती झाली असती, असे मला वाटते.

आजच्या समारंभात स्त्रियांचा उत्साह पाहून तर मला विशेष वाटते. इथल्या स्त्रिया चांगली भाषणे करू शकतात, असे माझ्या निदर्शनास आले आहे. इथल्या स्त्रिया स्वच्छ राहावयास शिकल्या आहेत. समता सैनिक दलाची शाखा इथे स्थापन करून स्त्रियांनीसुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे. त्याबद्दल फार समाधान वाटते. आजच्या प्रसंगी मला स्त्रियांना जो संदेश द्यावासा वाटतो तो हा की, त्यांनी पुरुषांबरोबर सार्वजनिक आयुष्यात उतरले पाहिजे. पुरुषवर्ग पुढे जाऊन जर स्त्रिया पाठीमागे राहिल्या तर कुठल्याही समाजाची प्रगती होणार नाही. गाडीचे एक चाक जर लुळे असेल तर गाडी चालू शकत नाही. म्हणून स्त्रियांनी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे, म्हणजे आपले स्वातंत्र्य आपणाला लवकर मिळेल.

आपल्या चळवळीचा अखेर कोठे आहे ? आपल्या समाजाला व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपले ध्येय आहे. पण या देशात अनेक पंथ आहेत. (1) हिंदू (2) मुस्लीम (3) इसाई व (4) अस्पृश्य. अस्पृश्य कोण आहेत ? अस्पृश्य जात ही हिंदुपासून वेगळी आहे. हिंदू समाजाने आपणाला हजारो वर्षांपासून सामाजिक, आर्थिक, राजकीय बाबतीत गुलाम करून टाकले आहे. गुलामगिरीचे बंधन आम्ही आता तोडू इच्छितो. असे टाहो फोडून सांगण्यात येते की या देशाला प्रजासत्ताक राज्य पाहिजे. परंतु अस्पृश्य वर्गाला वगळून प्रजासत्ताक राज्य होऊ शकते काय ? हा माझा हिंदू समाजाला प्रश्न आहे. प्रजासत्ताक राज्यात मुसलमानांना हक्क मिळतील, इसाई लोकांनासुद्धा हक्क मिळतील पण आम्हाला हक्क मिळणार नाहीत, अशी हिंदूंची कारवाई चालू आहे. परंतु आम्ही त्यांचे भाऊबंद नाही. आम्ही त्यांचे सगे नाही. हिंदू समाजावर विसंबून, ते आम्हाला हक्क देतील यावर आमचा विश्वास बसूच शकत नाही. मि. जिना यांनी पूर्वी सर्व अल्पसंख्यांकांची बाजू धरली होती. पण त्यांनी आता मुस्लिम लीगच्या वतीने पाकिस्तानची मागणी केली व इतर अल्पसंख्यांक जमातीच्या हिताचा लढा सोडून दिला आहे. ते फक्त आता मुसलमानांचेच हित साधू पाहतात. एवढेच नव्हे तर उलट जास्तीतजास्त प्रसंग विशेषी, इतर अल्पसंख्यांकांचे हक्क हिरावून आपण अधिक सत्ता हस्तगत करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की हिंदूच काय पण मुसलमानसुद्धा आमच्या विरुद्ध आहेत.

काँग्रेसने व गांधीने आपणाला कसल्याही प्रकारचे हक्क मिळू नयेत, आपणाला स्वतंत्र अस्तित्त्व असू नये, आपण या देशात मानाने व सन्मानाने राहू नये व आपणाला राजकीय क्षेत्रातून कायमचे नष्ट करून आपल्या पायात हजारो वर्षापासून चालत आलेल्या श्रृंखला अधिक घट्ट करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. आपण डोके वर काढू नये व सदैव त्यांचे गुलाम म्हणून राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.

ब्रिटिश सरकार, हिंदू-मुसलमान यांना आम्ही सांगतो की देशाच्या सत्तेमध्ये आमचा वारसा पाहिजे. त्याकरिता आम्ही लढू, मरू. आमचा अत्याचारावर विश्वास नाही व अत्याचाराची आम्ही पर्वा करीत नाही. ब्रिटिश सरकार, हिंदू, मुसलमान व इतर जमातींना आता कळले पाहिजे की ज्यात हिंदू, मुसलमान व वर्गाचे प्रतिनिधी असतील तेच खरे राष्ट्रीय सरकार म्हणता येईल. अस्पृश्य हे हिंदू समाजाचे एक घटक नाहीत, ते एक निराळे राष्ट्रच आहेत. स्वतःचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चळवळ करण्यास व लढण्यास अस्पृश्य वर्ग तयार आहे.

आपली मागणी फार मोठी आहे. आपल्या मार्गात अनेक संकटे आहेत. आपणाला शत्रु फार आहेत. त्याकरिता आपण आपली संघटना उभारली पाहिजे. आपण संघटन केले तर गांधी, जिना, सावरकर आपले हक्क नाकारू शकणार नाहीत. सरकारकडे जाणे हे आपल्याला कमीपणाचे आहे. आपण आपले संघटन वाढवून आपल्या मागण्या मान्य करण्यास लावणे हे आपले आजचे कार्य आहे. आपली शक्ती वाढल्याशिवाय आपणास काही मिळणार नाही.

“हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याबद्दल अस्पृश्यांना फारशी आस्था नाही” अशाप्रकारचा खोडसाळ, निंद्य व दुष्ट प्रचार काँग्रेस व राष्ट्रीय वर्तमानपत्रांकडून केला जातो. आपण राष्ट्रविरोधी, देशबुडवे आहोत अशाही प्रकारचे हल्ले आपणावर करण्यात येतात. अस्पृश्यांना माणुसकी पाहिजे, समता पाहिजे, त्यांना इतरांबरोबर राजकीय दर्जा पाहिजे. ती या देशात शासनकर्ती जमात बनली पाहिजे, याकरिता आपली चाललेली चळवळ जर देशबुडवी आहे असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांच्या या करणीबद्दल मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. अस्पृश्यांना इतर कुठल्याही जमातीपेक्षा स्वातंत्र्याविषयी कमी आस्था नाही, उलट ती अधिक आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्याबरोबर स्वतःच्या समाजाचेही स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 02 डिसेंबर 1944 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password