Categories

Most Viewed

19 सप्टेंबर 1932 जाहीर पत्रक

बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीर पत्रक.

सर्वपक्षीय पुढा-यांच्या परिषदेच्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 1932 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी म. गांधींच्या आमरण उपोषणाच्या निमित्ताने आपली न्याय्य भूमिका विशद करणारे आणि गांधीजींचा उपवास, अस्पृश्यांचे हक्क व हितसंबंध यांच्याविरोधी कसा आहे हे दर्शविणारे पत्रक जाहीरपणे प्रसिद्ध केले. मूळ इंग्रजी पत्रकाचा हा मराठी अनुवाद –

ब्रिटिश सरकारने आपखुषीने अगर लोकमताच्या दडपणामुळे नाईलाजाने अस्पृश्य समाजाला दिलेला स्वतंत्र मतदार संघाचा हक्क जाहीरपणे जर रद्द केला नाही तर मी अन्नत्याग करून प्राण देईन, ही गांधीजींची प्रतिज्ञा ऐकून मला खरोखरच विलक्षण आश्चर्य वाटले. महात्मा गांधींनी केलेल्या या आत्महत्त्येच्या संकल्पामुळे त्यांनी मला कसल्या विपरित व बिकट परिस्थितीत आणून सोडले आहे व माझ्यावर केवढ्या मोठ्या अरिष्टकारी जबाबदारीची घोरपड टाकली आहे. याची कल्पना कोणालाही सहज होण्यासारखी आहे.

ज्ञातिविषयक निर्णयाचा प्रश्न इतर प्रश्नांच्या मानाने क्षुल्लक आहे असे गोलमेज परिषदेत गांधीजी प्रतिपादन करीत होते. मग त्यांच्या मते ‘क्षुल्लक असलेल्या या प्रश्नासाठी त्यांनी आपला एवढा मोठा प्राण पणास का लावला हे मला समजत नाही ! त्यांच्या सारख्यांच्या दृष्टीने पाहता असले जातिविशिष्ट प्रश्न म्हणजे हिंदुस्थानच्या राज्यघटनात्मक रूपी पुस्तकाला जोडण्यात येणारे ते केवळ परिशिष्ट समजले पाहिजे! जातिविशिष्ट प्रश्न हा काही त्या पुस्तकाचा मुख्य अगर महत्त्वाचा भाग समजला जात नाही. हिंदुस्थानला पूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मुद्यावर गांधीजींनी राऊंड टेबल परिषदेत केवढा तरी जोर दिला होता व या गोष्टीचा केवढा मोठा आग्रह धरला होता.

अशा या राजकीय स्वातंत्र्यासारख्या मोठ्या प्रश्नासाठी गांधीजीनी जर आपला प्राण पणास लावला असता तर ते रास्त तरी दिसले असते. पण राजकीय स्वातंत्र्यासारखे खुद्द त्यांच्याच मते मोठमोठ्या महत्त्वाचे असलेले अनेक प्रश्न तसेच टाकून अस्पृश्यांच्या मतदानाचा एक क्षुल्लक प्रश्न त्यातून मुद्दाम त्यांनी वेचून घ्यावा य त्याचे निमित्त करून आपला प्राण पणास लावावा ही गांधीजींची कृती म्हणजे तापदायी आश्चर्याचा एक उद्वेगजनक व खेदजनक नमुना आहे. स्वतंत्र मतदारसंघ एकट्या अस्पृश्य समाजालाच मिळाला आहे असे नाही. इंडियन खिश्चन, अँग्लो इंडियन यांना त्याचप्रमाणे मुसलमान, शीख यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर जमीनदार वर्ग, मजूर वर्ग व व्यापारी वर्ग यांच्याकरिताही खास अगर स्वतंत्र मतदारसंघाची योजना करण्यात आली आहे. अगदी आरंभी फक्त मुसलमान व शीख सोडून बाकी सर्वांच्या स्वतंत्र मतदारसंघास गांधीजींनी हरकत घेतली होती व विरोध केला होता. आता केवळ मुसलमानास अगर शीखासच नव्हे तर अस्पृश्यांबरोबर जमीनदार, व्यापारी, अँग्लो इंडियन खिश्चन वगैरे वर्गासही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आहेत. गांधीजींना जर आता विरोधच करावयाचा होता तर त्यांनी तो निदान या सर्वांच्या स्वतंत्र मतदारसंघांना करावयास पाहिजे होता. पण त्या सर्वांना त्यांनी सोडले व एकट्या अस्पृश्य समाजाला मिळालेल्या या सवलतीचे निमित्त करून त्या योजनेविरुद्ध मात्र आपला प्राण पणास लावण्याचा संकल्प त्यांनी कायम केला.

अस्पृश्य समाजाला काही काळ स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने मोठे अनर्थ कोसळतील अशा प्रकारची गांधीजींनी आपली जी भीतिप्रद समजूत करून घेतली आहे ती निव्वळ काल्पनिक आहे. मुसलमानांना व शीखांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने जर राष्ट्राचे तुकडे उडतात असे गांधीजींना वाटत नाही व त्या बाबतीत जर ते कबूल होतात तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्याने हिंदू समाजाची शकले होतील असे सांगून या योजनेला प्राण जाईपर्यंत विरोध करणे गांधीजींना न्यायाचे अगर सुसंगतपणाचे कसे वाटले ? अस्पृश्य वर्गाखेरीज इतर समाजांना व वर्गांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असता त्याविरुद्ध गांधीजींची सद्सद्विवेक बुद्धी उठावणी करीत नाही, पण एकट्या अस्पृश्यांना मिळालेल्या या सवलतीमुळे मात्र त्यांचीही सदबुद्धी खडबडून जागी होते व प्राण इरेस घालून त्याविरुद्ध बंड पुकारते या न्यायनिष्ठुर पणाला काय म्हणावे ?

येऊ घातलेल्या स्वराज्याच्या अमदानीत बहुसंख्याक वर्गाच्या जुलूमापासून अल्पसंख्यांक समाजाचे संरक्षण होण्यासाठी राजकीय हक्कांच्या खास सवलती जर कोणत्या एखाद्या समाजाला सर्वाच्या आधी व सर्वांच्या अधिक प्रमाणात मिळणे अत्यावश्यक असेल तर तो अस्पृश्य समाज होय. ही गोष्ट विचारी माणसाला पटलेली आहे अशी मला खात्री वाटते. अस्पृश्य समाज हाच एक असा वर्ग आहे की, सभोवार चाललेल्या जीवन कलहाच्या तीव्र झगड्यात टिकाव धरून जगण्यास त्याच्यापाशी बिलकूल त्राण नाही. ज्या धर्माचा त्याने आश्रय घेतला आहे व ज्या धर्मबंधनांनी त्याला सर्वतोपरी जखडून टाकण्यात आलेले आहे त्या धर्मामुळे त्याचा सन्मान होण्याऐवजी उलट महारोग्याच्या किळसवाण्या अवस्थेला या धर्माने अस्पृश्य समाजाला आणून बसविले आहे. या धर्माने त्याची माणुसकीच कलंकित व खच्ची करून टाकलेली आहे. रोजच्या साध्या व्यवहारात सन्मानपूर्वक भाग घेण्याची योग्यताही या धर्माने अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्या ठायी राहू दिलेली नाही. आर्थिकदृष्ट्या पाहताही अस्पृश्य समाज हा सर्वतोपरी परावलंबी असा एक वर्ग आहे. रोज लागणाऱ्या भाकरीच्या तुकड्यासाठी देखील उच्चवर्णीय हिंदूवर त्याला अवलंबून राहावे लागते. स्वाभिमानपूर्वक अगर स्वतंत्ररित्या जगण्याचा अगर आपले पोट भरण्याचा एकही मार्ग अस्पृश्य समाजाला खुला नाही. या गुलामगिरीतून मुक्त होण्याची त्याला कधीही संधी मिळू नये म्हणून स्वावलंबनाचे व आत्मोन्नतीचे त्याचे सर्व मार्ग रोखून धरण्याचे खास प्रयत्न बुद्धिपुर:सरपणे करण्यात येत आहेत. स्पृश्य हिंदुचे आपापसात कितीही जातीभेद असले तरी अस्पृश्यांनी वर डोके काढण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी त्यांना दडपून टाकण्यास व त्यांच्यावर नाना तऱ्हेने जोरजुलूम करण्यास तेवढ्यापुरते तरी सारे स्पृश्य हिंदू निर्दयपणे एक होतात असा प्रत्येक खेड्यातील नेहमीचा प्रत्यक्ष अनुभव व जीवनक्रम आहे असे म्हटल्यास त्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.

अशा परिस्थितीत सर्व विचारी व न्यायी माणसांनी तर उलट असे प्रयत्न केले पाहिजेत की ज्यामुळे या सर्वतोपरी नाडलेल्या व स्पृश्य हिंदुच्या जुलूमाखाली सर्वस्वी दडपून गेलेल्या अस्पृश्य समाजास आत्मरक्षणासाठी व या तीव्र जीवनकलहाच्या झगड्यात त्याला तग धरता यावा म्हणून आधारादाखल राजकीय सतेचा थोडा फार हिस्सा निश्चितपणे त्याच्या पदरी पडेल.

माझी तर अशी अपेक्षा होती की, अस्पृश्य समाजाचा कोणताही खरा हितचिंतक त्या समाजाच्या हाती राजकीय सत्तेचा शक्य तितका अधिक हिस्सा पडावा म्हणून जीवापाड झटेल. पण गांधीजींची विचारसरणी पहावी ती उल्टी व विलक्षण दिसते आणि म्हणून मला त्यांच्या या चमत्कारिक विचारसरणीचा काहीच उलगडा होऊ शकत नाही. अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सत्तेची सूत्रे शक्य तितक्या अधिक प्रमाणात आणण्यासाठी गांधीजी झटत तर नाहीच, पण उलट ब्रिटिश सरकारच्या ज्ञातिविषयक निर्णयामुळे जो अल्पसा का होईना पण राज्यसत्तेचा हिस्सा निश्चितपणे अस्पृश्य समाजाच्या हाती भावी राज्यघटनेत येऊ पाहत आहे. तो देखील अस्पृष्य समाजाच्या हातून हिरावून घेण्यासाठी आपला प्राण पणास लावून गांधीजींनी विरोध चालविलेला आहे । अस्पृश्य समाजाच्या पदरी राजसत्तेचा यत्किंचितही हिस्सा पडू नये व राजकीयदृष्ट्या त्यांचे अस्तित्व दृष्टिआड करावे एवढ्यासाठी गांधीजींनी चालविलेली ही काही पहिलीच धडपड नव्हे. अल्पसंख्यांकांचा करारनामा (मायनॉरिटी पैक्ट) अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच अस्पृश्यांना राजकीय सत्ता यत्किंचितही मिळू नये म्हणून मुसलमानांना हाती धरून गांधीजींनी खटपट करून पाहिली.

अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला विरोध करण्यासाठी तुम्ही मला हातभार लावा म्हणजे मी तुमच्या चौदाच्या चौदा मागण्या मान्य करतो अशी खलबते गांधीजींनी मुसलमानांबरोबर केली ! पण मुसलमान प्रतिनिधींच्या चांगुलपणामुळे गांधीजींचा तो प्रयत्न फसला. असल्या कृष्ण कारस्थानास पाठिंबा देण्याचे मुसलमानांनी नाकारले. मुसलमान जर गांधीजींना वश झाले असते तर अस्पृश्यांचा दुहेरी कोंडमारा झाला असता. गांधीजींच्या व मुसलमानांच्या विरोधी कात्रीत अस्पृश्य समाज सापडला असता, पण मुसलमान प्रतिनिधींनी गांधीजींची साथ करण्याचे नाकारल्यामुळे अस्पृश्य समाजावरील हे दुर्धर अरिष्ट टळले.

ज्ञातिविषयक निर्णयाला गांधीजींचा विरोध का असावा याचाच मुळी मला उलगडा होत नाही. गांधीजी म्हणतात की, या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून विभक्त पडतो ! पण डॉ. मुंजे तर काही असे म्हणत नाहीत ! आणि डॉ. मुंजे म्हणजे कट्टे हिंदू व मोठे लष्करी बाण्याचे हिंदू हितसंरक्षक समजले जातात ! विलायतेहून आल्यानंतर डॉ. मुंजेंनी जी व्याख्याने दिली त्या सर्वातून त्यांनी असा ध्वनी काढला आहे की, ब्रिटिश सरकारने दिलेल्या ज्ञातिविषयक निर्णयामुळे अस्पृश्य समाज हा हिंदू समाजापासून मुळीच अलिप्त झालेला नाही. उलट डॉ. मुंजे तर अशी बढाई मारीत आहेत की, ब्रिटिश सरकारने दिलेला हा निर्णय त्यांच्या सारख्यांच्या प्रयत्नाचे फल आहे व अस्पृश्य समाजाला राजकीयदृष्ट्या हिंदू समाजापासून अलिप्त करण्याचा डॉ. आंबेडकरांचा जो प्रयत्न होता तो ब्रिटिश सरकारने दिलेल्या या निर्णयामुळे फसला ! या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हा हिंदू समाजापासून विभक्त होत नाही. या घटनेचे श्रेय डॉ. मुंजे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या स्वतःकडे जरी जात नसले तरी ते जे म्हणतात हे काही खोटे नाही. ब्रिटिश सरकारने दिलेल्या या निर्णयामुळे डॉ. मुंजे म्हणतात त्याप्रमाणे मलाही वाटते की. अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून राजकीयदृष्ट्याही विभक्त पडला जात नाही. असे असता या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून अलिप्त पडतो ही गांधीजींची भीती निराधार व खोटी आहे. जी भीती डॉ. मुंजेसारख्या कट्टर हिंदू सभावाल्यांच्या दृष्टीला दिसत नाही ती भीती गांधीजीसारख्या राष्ट्रीय समजण्यात येणाऱ्या पुढा-यांच्या दृष्टीला भासमान व्हावी व हिंदुच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या मुद्यावर त्यांनी आपला प्राण पणास लावण्यास उद्युक्त व्हावे हे खरोखरीच मोठे चमत्कारीक गूढच समजले पाहिजे ! डॉ. मुजेसारख्यांना देखील ज्या निर्णयात वेगळेपणाचे भूत दिसत नाही त्या निर्णय असल्याचा गांधीजींनी तर नुसता संशयही घ्यावयाला नको आहे.

ब्रिटिश सरकारच्या वतीने मुख्य प्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जो निर्णय दिला आहे व त्यात अस्पृश्यांच्या बाबतीत जी योजना मुक्रर केली आहे ती माझ्या मते हिंदूंनो संतुष्ट राखण्याजोगी आहे, इतकेच नव्हे तर रावबहादूर राजा, गवई, पी. बाळू वगैरे अस्पृश्य समाजात संयुक्त मतदार संघाचा पुरस्कार करणारे जे लोक आहेत त्यांनाही या निर्णयाला नाके मुरडण्याचे मुळीच कारण नाही. असे असता रावबहादूरांनी असेंब्लीतील आपल्या भाषणातून या सरकारी निर्णयाविरुद्ध जो गिल्ला माजविला व जी कुरकूर केली तीही एक पाहण्या ऐकण्यासारखीच गंमत होती! परवापर्यंत स्वतंत्र मतदार संघाचे अनन्य उपासक व उच्चवर्णीय हिंदुच्या जातिभेद जनक जुलूमाचे कट्टे दुष्मन असलेल्या या रावबहादूरांच्या हृदयात संयुक्त मतदार संघाविषयी व उच्चवर्णीय हिंदूसंबंधी आता नव्याने उद्भवलेले एवढे अलोट प्रेम पाहून कोणाला बरे गंमत वाटणार नाही ? रावबहादूर राजांच्या ठायी उद्भवलेल्या या आकस्मिक प्रेमाच्या मुळाशी, राऊंड टेबल परिषदेत स्थान न मिळाल्यामुळे गमावलेल्या प्रसिद्धीच्या प्राप्तीची स्वाभाविक हाव कितपत आहे व या त्याच्या नव्या प्रेमात प्रामाणिक हृदयपरिवर्तनाचा अंश कितीसा आहे याची छाननी मी तूर्त करू इच्छित नाही.

सरकारने दिलेल्या निर्णयाविरुद्ध रावबहादूर राजाने सध्या जी कुरकूर चालविलेली आहे तिच्यात त्यांनी पुढील दोन मुद्यावर भर दिलेला आहे. अस्पृश्यांना त्यांच्या संख्येपेक्षा कमी प्रमाणात जागा मिळाल्या हा या निर्णयाविरुद्ध त्यांचा पहिला आक्षेप आहे आणि या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदूंपासून विभक्त झाला हा त्यांच्या शोकाचा दुसरा मुद्दा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कमी जागा या निर्णयामुळे अस्पृश्य समाजाच्या पदरात पडल्या ही रावबहादूरांची तक्रार मलाही मान्य आहे. पण ह्या ज्या कमी जागा मिळाल्या त्याची जबाबदारी गोलमेज परिषदेला गेलेल्या आम्हा दोघा प्रतिनिधींवर आहे व आम्ही अस्पृश्य समाजाच्या हिताचा घात केला अशा प्रकारचे आरोप रावबहादूर राजांसारख्यांनी आमच्यावर करण्यापूर्वी आपण स्वतः सेन्ट्रल कमिटीवर असता काय दिग्विजय लावला याचा तरी थोडा विचार त्यांनी करावयाला पाहिजे होता. त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये मद्रासच्या वाटणीला 150 पैकी फक्त 10, मुंबईला 114 पैकी फक्त 8, बंगाल मध्ये 200 पैकी 8, यु. पी. मधील अस्पृश्यांच्या वाट्याला 182 पैकी 8, पंजाबमध्ये 150 पैकी फक्त 6. बिहार आणि ओरिसामध्ये 150 पैकी 6, मध्यप्रांत व व-हाड़ मध्ये 125 पैकी फक्त 8 व आसाममध्ये अस्पृश्य व इतर मागासलेल्या रानटी जातीकरिता म्हणून 75 पैकी निव्वळ 9 अशी वाटणी केलेली आहे. ही विभागणी अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाहता किती तरी भयंकर अपुरी आहे आणि रावबहादूर राजा याच कमिटीचे एक सभासद होते! सरकारने दिलेल्या जातिविषयक निर्णयात अस्पृश्यांना कमी जागा मिळाल्या याबद्दलच्या दोषांचे खापर आमच्या माथी फोडण्यापूर्वी आपण स्वतः सेंट्रल कमिटीचे सभासद असताही वरील भयानक काट आपण बिनबोभाट कशी करू दिली व त्यावेळेस आकाशपाताळ एक का करून सोडले नाही याचा रावबहादूर राजापाशी समाधानकारक असा काय खुलासा आहे ? अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळणे हा अस्पृश्य समाजाचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो त्याला आत्मरक्षणासाठी पूर्णतः मिळणे ही अगदी आवश्यक व न बदलणारी अशी घटना आहे असे जर रावबहादूरांना वाटत होते तर मग तसे झालेच पाहिजे असा आग्रह धरून तो शेवटास नेण्याची सेन्ट्रल कमिटीचा सभासद म्हणून त्यांना जी संधी लाभली होती तिचा लाभ त्यांनी का करून घेतला नाही ?

सरकारने दिलेल्या निर्णयामुळे अस्पृश्य समाजाचा हिंदू समाजापासून तुकडा पाडण्यात आला या रावबहादूर राजाच्या तक्रारीत माझ्या मते काही अर्थ नाही. (डॉ. मुंजेना देखील तसे वाटत नाही). स्वतंत्र मतदार संघाविरूद्ध रावबहादूर राजासारख्यांची सद्सद्विवेकबुद्धी जर हरकत घेत असेल तर स्वतंत्र मतदारसंघात उमेदवार राहण्याची अगर मत देण्याची जबरदस्ती या निर्णयामुळे त्यांच्यावर केली जात नाही. संयुक्त अगर सार्वत्रिक मतदारसंघात उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे राहण्याचा व मत देण्याचा असे दोनही हक्क या निर्णयाने त्यांच्या सारख्यांना देऊन ठेवले आहेत व त्याचा अनुभव घेण्याची त्यांना पूर्ण मुभा आहे. हिंदुच्या दृष्टिकोनात आमुलाग्र बदल झाला आहे व अस्पृश्यांच्या बाबतीत या अवघ्या सहा सात महिन्यात (ते डॉ. मुंजेंना मिळाल्यापासून) स्पृश्य हिंदुचे विलक्षण मतपरिवर्तन घडून आले असे रावबहादूर राजा अगदी आक्रोशपूर्वक व वेशीवर उभे राहून सर्वांना सांगत सुटले आहेत. या त्यांच्या नव्या सांगण्यावर ज्या अस्पृश्य लोकांचा विश्वास बसत नाही व जे स्वतंत्र मतदार संघाची मागणी करतात अशा लोकांची खात्री पटण्यासाठी तरी रावबहादूर राजासारख्यांनी संयुक्त मतदारसंघात उभे राहून निवडून येण्याची व स्वतंत्र मतदारसंघाची अस्पृश्यांना आवश्यकता नाही असे त्यायोगे सिद्ध करून दाखविण्याची ही संधी मुळीच दवडू नये. अस्पृश्य समाजाविषयी आम्हाला प्रेम व सहानुभूती वाटते असे म्हणणाच्या हिंदूंना देखील रावबहादूर राजासारख्यांना निवडून देऊन आपल्या म्हणण्याची सत्यता पटवून देण्याची संधी या निर्णयातील व्यवस्थेमुळे प्राप्त झालेली आहे.

सरकारने दिलेला हा निर्णय इतर बाबतीत जरी अपुरा असला तरी ज्यांना स्वतंत्र मतदार संघ पाहिजे त्यांचे व ज्यांना संयुक्त मतदार संघ पाहिजे त्यांचे असे दोघांचेही त्यात समाधान करण्याची व्यवस्था झालेली आहे आणि या दृष्टीने पाहता व अस्पृश्य समाजापुरतेच बोलावयाचे झाल्यास हा निर्णय म्हणजे तडजोडीच्या स्वरुपाचा (Compromise) आहे व दोन्ही पक्षाने त्याला मान्यता देणे इष्ट आहे.

गांधीजीविषयी म्हणाल तर त्यांना पाहिजे तरी काय हेच स्पष्टपणे समजत नाही, असे मानण्यात येते की, गांधीजी जरी स्वतंत्र मतदार संघाच्या विरुद्ध असले तरी ते संयुक्त मतदारसंघ व राखीव जागा देण्याच्या विरुद्ध नाहीत, पण ही मोठी भूल आहे. आज त्यांचे मत काय बदलले असेल ते असो. पण लंडनमध्ये असताना अस्पृश्यांना हिंदूपेक्षा राजकीय असे वेगळे अगर स्वतंत्र अस्तित्व देणारी कोणतीच योजना आपल्याला पसंत नसल्याने त्यांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केलेले होते. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासच नव्हे तर संयुक्त संघातील राखीव जागेच्या योजनेसही आपला प्राणांतिक विरोध असल्याचे त्यांनी लंडनला जाहीरपणे बोलून दाखविले होते. सार्वत्रिक मताचा अधिकार व सर्वसाधारण निवडणुकीत ते मत देण्याचा हक्क यापलिकडे अस्पृश्यांच्या खास हितरक्षणार्थ त्यांना कोणतीही कायदेशीर सवलत देण्यास गांधीजी तयार नव्हते, अशातऱ्हेचे धोरण त्यांनी तेथे असताना आरंभी स्वीकारले होते. पुढे माझ्याशी वाटाघाट करताना माझ्या समजुतीसाठी एक योजना त्यांनी शेवटी सादर केली. त्याची ही योजना निरूपयोगी तर होतीच होती पण तिलासुद्धा कायद्याचे स्वरूप अगर पाठिंबा देण्यास त्यांची तयारी नव्हती.

गांधीजीच्या या योजनेप्रमाणे अस्पृश्य वर्गातील उमेदवाराने निवडणुकीसाठी उभे राहावे. उच्चवर्गातील दुसरेही उमेदवार अर्थात त्याच जागेकरता उमेदवार म्हणून उभे राहतील. पुढे निवडणूक होऊन तिच्यात अस्पृश्य उमेदवार निवडून आला नाही म्हणजे त्याने वाटल्यास या निवडणुकीच्या निकालाविरूद्ध अर्ज या अर्जाप्रमाणे, केवळ अस्पृश्य वर्गीय म्हणून हा उमेदवार निवडून आला नाही असा जर त्याला न्यायाधिशाकडून निकाल मिळाला तर गांधीजी म्हणाले की. निवडून आलेल्यापैकी एखाद्या उच्चवर्णीय हिंदूने आपल्या जागेचा राजीनामा द्यावा अशी मी व्यवस्था करीन. मग पुन्हा या पराभूत अस्पृश्य उमेदवाराने अगर वाटल्यास दुस-याने निवडणुकीला पुन्हा उभे रहावे व पुन्हा तो पडल्यास त्याने वाटल्यास प्रथम केला होता तसाच अर्ज वगैरे करून व तसाच निर्णय मिळवून पुन्हा निवडणुकीची ही शर्यत खेळावी. याप्रमाणे गांधीजींची ही योजना म्हणजे पुन्हा पडा व पुन्हा उभे राहा, अशा प्रकारचा एक पोरकट खेळच होता। गांधीजींची ही योजना मी आज प्रकट करण्याचे कारण इतकेच की, संयुक्त संघ व राखीव जागा अस्पृश्यांनी स्वीकारल्यास गांधीजींच्या सदसद्विवेक बुद्धीचे समाधान होईल असे जे पुष्कळांना वाटते ते कसे निराधार आहे हे सर्वांच्या ध्यानी यावे. गांधीजीनी आता एखादी नवी योजना तयार केली असल्यास ती त्यांनी आधी सादर करावी असा मी जो आग्रह धरला आहे तो एवढ्याचसाठी होय, गांधीजींचे जुने म्हणणे व जुनी योजना काय आहे ते सारे मला माहीत आहे व त्याला काय उत्तर द्यावयाचे तेही मी देऊन ठेविले आहे. त्या जुन्या गोष्टीचा काथ्याकूट करीत बसण्यात अर्थ नसल्यामुळे गांधीजीनी आपले नवे म्हणणे असल्यास ते सादर करावे असा माझा आग्रह आहे.

गांधीजी अगर काँग्रेस यांना जे योग्य व न्यायाचे दिसेल तेच अस्पृश्य समाजाच्या बाबतीत घडेल या नुसत्या शाब्दिक आश्वासनाचा मला स्वीकार करता येणे शक्य नाही हे मी प्रथमतःच सांगून ठेवतो. माझ्या अस्पृश्य बांधवांच्या हितसंरक्षणासारखा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न नुसत्या शाब्दिक आश्वासनावर व कागदी करारनाम्यावर विसंबून ठेवण्यास मी तयार होणे शक्य नाही. गांधीजी महात्मा असले तरी ते काही अमर नाहीत. अगर सर्वव्यापी नाहीत व काँग्रेसही वरच्या वर्गाच्या वैभवासाठी, गोरगरीब वर्गांना पायदळी व आपल्या हुकमतीखाली ठेवू पाहणारी अशी एक अरिष्टकारी संस्था नाही असे जरी मानले तरी तिचे मोठेपण व वजन कायम टिकणारे आहे असेही मुळीच नाही. अस्पृश्यता नष्ट करावी व अस्पृश्य जनतेला हिंदू समाजात आत्मसात करून घ्यावे म्हणून प्रयत्न करणारे उदंड महात्मे या भूमीत आतापर्यंत जन्मून गेले, पण त्यापैकी कोणालाही यश आले नाही. अनेक महात्मे अवतरले व अनेक निमाले पण अस्पृश्य मात्र अस्पृश्यच राहिले.

हिंदू सुधारकाच्या सुधारणेची गती सरड्याच्या धावेप्रमाणे कशी मर्यादित आहे व त्यांचा विश्वास कसा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव महाड व नाशिकला जे प्रकार घडले त्यावरून मला आलेला आहे. असे असल्यामुळे अस्पृश्यांचे जे नि:पक्षपाती व विचारी हितचिंतक आहेत ते हिंदूतील अशा या अवसानघालकी सुधारकाच्या हाती अस्पृश्याचे भवितव्य निर्धास्तपणे सोपवा असा सल्ला कधीही देणार नाहीत. आपल्या जातभाईचे मन दुखवू नये अगर त्याचा रोष होऊ नये म्हणून जे सुधारक ऐन आणीबाणीच्या वेळी आपल्या तत्त्वाशी बेईमान होतात त्यांचा अस्पृश्यांना मुळीच उपयोग नाही.

अशी वस्तुस्थिती असल्यामुळे माझ्या लोकांच्या हितार्थ कायदेशीर संरक्षण बंधनाचा आग्रह धरणे मला भागच आहे. जातिविषयक निर्णय बदलला जावा असा गांधीजींचा जर आग्रह असेल तर त्यांनी दुसरी योजना सादर केली पाहिजे व आज जे काही अस्पृश्यांना मिळाले आहे त्यापेक्षा आपल्या या योजनेत अस्पृश्यांचे अधिक हित आहे व ते हित अमलात येण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर तरतूद त्या योजनेत आहे असे त्यांनी सिद्ध करून दाखविले पाहिजे. मला आशा वाटते की. गांधीजींनी जो निर्वाणीचा मार्ग धरला आहे तो ते सोडून देतील. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात हिंदू समाजाचे अहित करावे असा आमचा बिलकूल हेतू नाही. आमचे भवितव्य आमच्या हाती असावे. स्पृश्य हिंदूंच्या खुषीवर अगर त्यांच्या गोड लहरीवर आमचे भवितव्य पूर्वीप्रमाणे सर्वस्वी अवलंबून असू नये या एकाच हेतूने प्रेरित होऊन आम्ही ही मागणी केलेली आहे. चुका अगर पाप करण्याचा देखील आम्हाला अधिकार आहे असे इंग्रज राज्यकर्त्यांना उद्देशून गांधीजी म्हणतात. आम्हालाही तो अधिकार आहे व असला पाहिजे एवढेच आम्ही गांधीजींना सांगू इच्छितो आणि आमचा अधिकार हिरावून घेण्याचा ते प्रयत्न करणार नाहीत अशी आम्ही अपेक्षा करतो.

अन्नत्याग करून प्राण समर्पण करण्याची आपली दुर्धर प्रतिज्ञा त्यांनी दुसऱ्या एखाद्या थोर कार्यासाठी राखून ठेवावयाची होती. हिंदू व मुसलमान अगर स्पृश्य व अस्पृश्य या वर्गामधील दंगे धोपे अगर रक्तपात थांबविण्यासाठी गांधीजी जर अशी घोर प्रतिज्ञा करते तर तिचे स्वाभाविकत्व व महत्त्व मी समजू शकलो असतो. या आजच्या प्रतिज्ञेमुळे अस्पृश्य समाजाचे हित होईल अगर त्यांच्या दुःखाचा भार कमी होईल असे मुळीच नाही. गांधीजींना या परिणामाची जाणीव असो वा नसो पण त्यांच्या कृत्याचे पर्यवसान शेवटी अत्याचारात होईल. सर्व देशभर अस्पृश्य जनतेचा त्यांच्या हिंदू अनुयायांकडून व चाहत्यांकडून अनन्वित छळ होईल, पण या जबरदस्तीने ते हिंदू समाजाला चिकटून न राहता उलट चिडून दूर मात्र जातील. तुम्हाला हिंदू समाज पाहिजे की राजसत्तेचा हिस्सा पाहिजे असा जर प्रश्न गांधीजींनी अस्पृश्यांना विचारला तर मला खात्री आहे की. हिंदू समाजा पेक्षा राजकीय सत्तेचेच आम्हाला अधिक महत्त्व वाटते असे त्यांना बिनचूक सांगण्यास व अशातऱ्हेने आत्महत्येच्या प्रतिज्ञेपासून त्यांना वाचविण्यास अस्पृश्य जनता एकदम तयार होईल, या सर्व गोष्टींचा या अशा परिणामाच्या दृष्टीने गांधीजी जर शांतपणे विचार करतील तर अशा उपायांनी आपला होणारा हा जयजयकार अगर आपल्या प्रतिज्ञेची होणारी ही विजयशाली पूर्तता संपादन करण्याच्या अगर प्राप्त करून घेण्याच्या किंमतीची अथवा लायकीची आहे असे गांधीजींनासुद्धा वाटेल की नाही याबद्दल मला शंका वाटते.

विचार करण्याजोगी याहीपेक्षा चिंतेची गोष्ट म्हटली म्हणजे गांधीजी आपल्या या कृत्यामुळे हिंदू जनतेतील अनिवार व मुर्दाड अशा विकारांना मोकाट सोडून राहिले आहेत. स्पृश्य व अस्पृश्य यामधील द्वेषबुद्धीची त्यांच्या या कृत्यामुळे खच्ची न होता उलट वृद्धि होणार आहे. उभय समाजातील परकेपणाचे अंतर भरून निघण्याऐवजी या प्रकारामुळे ते अधिक वाढणार आहे. कारण गोलमेज परिषदेत अस्पृश्यांच्या वतीने गांधीजींच्या धोरणास मी विरोध करताच माझ्याविरुद्ध या देशात सर्वत्र एकच गिल्ला करण्यात आला. राष्ट्रीय म्हणविल्या जाणाऱ्या सर्व उच्चवर्णीय हिंदू पत्रकारांनी व देशभक्तांनी मला ‘राष्ट्रद्रोही’ वगैरे अनेक शिव्या देण्याचा व माझ्याविषयी करता येईल तितका गैरसमज उत्पन्न करण्याचा जणू काय विडाच उचलला होता. माझ्याविरुद्ध सर्व अस्पृश्य समाज आहे असे जगाला भासविण्यासाठी स्पृश्यवर्गीय हिंदू सुधारकांनीसुद्धा नाना तऱ्हेच्या खोट्या संस्था निर्माण केल्या व कधी न भरलेल्या सभांचेही मोठमोठे बनावट रिपोर्ट तयार करून ‘राष्ट्रीय’ पत्रातून त्यांना प्रसिद्धी देण्याची चढाओढ चालविली. माझ्या वतीने येणाऱ्या तारा व पत्रव्यवहार दडपून टाकण्याचा व त्यांना प्रसिद्धी न देण्याचा सर्व राष्ट्रीय पत्रांनी जणू काय कटच केला होता.

अस्पृश्य वर्गातील काही लोकांना’ सिल्व्हर बुलेट (द्रव्या) चे आमिष दाखवून माझ्याविरुद्ध ओरड करण्यास उभे करण्यात आले. काही ठिकाणी स्पृश्य व अस्पृश्य समाजात झटापटी होऊन थोडेफार रक्तपातही झाले, हे सर्व अनिष्ट व अनर्थकारी प्रकार पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात घडावे अशी गांधीजींची इच्छा नसल्यास त्यांनी कृपा करून या सर्व गोष्टींचा शांतपणे फेरविचार करावा व भावी अनर्थ परंपरा टाळावी. असे घडावे हे गांधीजींना पाहिजे असेल असे मला वाटत नाही. पण जर त्यांनी आपली ही प्राणघातकी प्रतिज्ञा मागे घेतली नाही तर आपल्या या कृतीचे भयंकर परिणाम घडू नयेत अशी त्यांची कितीही इच्छा असली तरी तिचा काही उपयोग होणार नाही. दिवस मावळल्यावर रात्र यावी हे जितके स्वयंसिद्ध आहे तितकेच गांधीजींच्या या प्रतिज्ञेचे पर्यवसान शेवटी अत्याचारात व सर्व प्रकारच्या अनर्थात व्हावे हे स्वाभाविक आहे. शेवटी सर्व जनतेच्या निदर्शनास एक गोष्ट मी प्रामुख्याने आणू इच्छितो आणि ती ही की, या बाबतीत कोणाशीच चर्चा करण्याचे मला कारण नाही असे म्हणण्याचा जरी मला पूर्ण हक्क असला तरी केवळ गांधीजींसाठी म्हणून या प्रश्नाच्या बाबतीत त्यांच्या कोणत्याही नव्या योजनेचा विचार करण्यास मी तयार आहे आणि मला आशा वाटते की, गांधीजीचा प्राण व माझ्या लोकांचे हक्क या दोहोंपैकी कोणत्या तरी फक्त एकाच गोष्टीची निवड करण्याचा दुर्घर व नाजूक प्रसंग गांधीजी माझ्यावर येऊ देणार नाहीत. कारण तसाच प्रसंग आल्यास मी कोणत्या गोष्टीची निवड करीन हे न सांगताही समजण्यासारखे आहे. काही झाले तरी स्पृश्य हिंदूंच्या हवाली माझ्या लोकांचे भवितव्य सोपविण्यात मी कदापिही कबूल होणार नाही.

सदर पत्रक जनता वृत्तपत्रात दिनांक 24 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password