“आपण धडा घालून दिला पाहिजे की, आपण कोणाहीपेक्षा कमी नाही.”
शनिवार, तारीख 17 सप्टेंबर 1927 रोजी रात्रौ 9 वाजता एल्फिन्स्टन रोड वरील डेव्हिड मिलच्या चाळीच्या कंपाऊंडात महाड येथे तारीख 25 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहाबद्दलची पहिली जाहीर सभा डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेस अस्पृश्य वर्गाच्या लोकांची अलोट गर्दी लोटली होती. सभेत मेसर्स गणपत जाधव, घोंडीराम गायकवाड, साळुंके बुवा, शिवतरकर यांची सत्याग्रह का करावा याबद्दल भाषणे झाली. नंतर अध्यक्ष डॉ. आंबेडकर साहेब यांनी अगदी सोप्या भाषेत लोकांना सांगितले की,
सद्गृहस्थहो,
आपण सत्याग्रह का करावा या संबंधाने आपणास आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितले आहेच. अस्पृश्यता हा आपल्यावरील कलंक नव्हे पण आपल्या आईबहिणीवरील कलंक आहे. कारण जे लोक आपणा स्वतःला स्पृश्य समजतात त्यांना असे वाटते की, माझी आई ही अस्पृश्य मनुष्याला जन्म देणाऱ्याच्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु खरे पाहू गेले असता असे आहे की, दरेक स्त्री नऊ महिन्यांनीच प्रसवत असते. तेव्हा कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून जो दुसऱ्याला आपणापेक्षा कमी समजतो त्याला आपण योग्य धडा घालून दिला पाहिजे की, मी कोणापेक्षाही कमी नाही. मनुष्य म्हटला की त्याचा धर्माच्या दृष्टीने हक्क सारखाच आहे. म्हणून आपणाला सत्याग्रह करून आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत. या सत्याग्रहात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी अवश्य घ्यावा, परंतु ज्यांना आपल्या कामधंद्याच्या अडचणीमुळे भाग घेता येणार नाही. त्यानी फूल ना फूलाची पाकळी तरी द्रव्य रूपाने मदत करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. नंतर अध्यक्षांचे व आलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.
सदर भाषण बहिष्कृत भारत वृत्तपत्रात दिनांक 30 सप्टेंबर 1927 रोजी प्रसिद्ध झाले.