” अस्पृश्य स्त्रियांनी सर्वांगीण सुधारणेसाठी झटावे “.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून विलायतेला भरणाऱ्या दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेला शनिवार तारीख 15 रोजी जाणार होते. त्याप्रित्यर्थ त्यांना अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून शुक्रवार तारीख 14 ऑगस्ट 1931 रोजी कोटामधील सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली प्रेमाचा निरोप देण्याचा समारंभ साजरा करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री आठ वाजता प्रथम भगिनीवर्गातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. अस्पृश्य मानलेल्या असंख्य भगिनीवर्गाच्या समुदायाने कावसजी हॉल फुलून गेला होता. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भगिनी वर्गातर्फे तसेच पुरुष वर्गातर्फे निरोप देण्यात आला. डॉ. आंबेडकरांची प्रकृती विशेष सुधारलेली नव्हती. तरी पण त्यांनी याप्रसंगी येऊन भगिनीवर्गाला निरोपादाखल उपदेश केला. त्यांनी आपल्या भाषणात मुख्यतः भगिनीवर्गास आपल्या स्वावलंबी लढ्याची जाणीव करून देताना ते म्हणाले,
” आजपासून आपणास आपल्या उन्नतीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी विशेष जोमाच्या संघटनेने कार्याला लागले पाहिजे. आपल्या गळ्याभोवती स्पृश्य हिंदूनी व सरकारने गुलामगिरीचा पाश घातला आहे. तो ताडकन तोडून आपले स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. आमच्या स्त्रियांनी याकरिता आपल्या राहणीमध्ये व इतर व्यावहारिक गोष्टींमध्ये पुष्कळच सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. अंगावरील कथल पितळेच्या दागिन्यांचा अगदी प्रथम त्याग करून टाकला पाहिजे. नेसण्यासवरण्यात स्पृश्य समाजाप्रमाणे जो प्रघात पडत आहे तोच कायम ठेवून आम्ही स्वावलंबनाने वाटेल ती क्रांती घडवून आणू हे इतर समाजाच्या नजरेस आणून दिले पाहिजे. तसेच पुरुषवर्गाच्या सहकार्याने आपले कार्य मोठ्या प्रमाणावर चालेल असे सहाय्य तुम्ही करावयास नेहमी तयार झाले पाहिजे. पुरुषवर्गाला त्यांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव करून द्यावयाची मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर आहे. पुरुषवर्गाला व्यसनापासून व इतर विघातक कृत्यापासून अलिप्त ठेवण्याचे प्रयत्न तुम्ही करावयास पाहिजे. भावी पिढीला आजच्या गुलामगिरीचा मागमूसही दिसणार नाही अशी अलौकिक स्वार्थत्यागाची कामे अगदी निर्भयपणे तुम्ही करावयास सज्ज झालात की, माझ्या कार्याची जबाबदारी आपोआपच पार पाडल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडेल “.
(भगिनी वर्गाला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले प्रस्तुत भाषण आहे. पुरुषवर्गाला उद्देशून दिलेले भाषण त्यानंतर स्वतंत्र दिले आहे. – संपादक )