Categories

Most Viewed

03 जुन 1953 भाषण

“शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य.”

पूर्वी ठरल्याप्रमाणे रावळी कँप महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन, दिनांक 3 जून 1953 रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सौ. माईसाहेब आंबेडकर यांचेसह रावळी कँपला भेट दिली.

सदर प्रसंगी स्त्री-पुरुष समुदाय अतिशय प्रचंड होता. प्रथम अनेक भगिनींनी व संस्थांनी डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यास हार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो व बंधुनो,
येथील स्त्रियांनी इमारत फंडाला 1,001 रुपये देण्याचे कबूल करून आज जी रक्कम दिली त्याबद्दल मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या वस्तीत मी आज प्रथमच आलो आहे. आज येथील स्त्रियांनी जशी मदत केली तशीच येथील एक सोसायटीही इमारत फंडाला मदत देणार आहे. या सोसायटीची काही रक्कम म्युनिसीपालिटीत शिल्लक आहे. ती रक्कम ते इमारत फंडाला देणार आहेत. ती रक्कम या वस्तीने आतापर्यंत दिलेल्या सर्व रकमांपेक्षाही मोठी आहे. अर्थात ती घेण्यासाठी मला परत याठिकाणी यावे लागणार आहे व त्यावेळी मी जरूर येईन.

तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगणार आहे. परवा दिनांक 27 मे 1953 रोजी आपण मोठ्या प्रमाणावर बुद्ध जयंती साजरी केली. वास्तविक आपण ही एक मोठी चांगली गोष्ट केली. असे मला वाटते. परंतु काही वर्तमानपत्रांनी या गोष्टीला विपरित स्वरूप दिले. जेथे तीस हजार लोक हजर होते तेथे तीन हजार लोकच होते असे आपल्या बातमीत डोळ्यावर कातडे ओढलेल्या वर्तमानपत्रांनी ठोकून दिले. काहींनी तर बुद्ध जयंतीच्या बातमीला आपल्या वर्तमानपत्रात थाराच दिला नाही. हे त्यांचे नेहमीचेच आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य म्हटले की, एकतर त्याला प्रसिद्धीच द्यावयाची नाही. प्रसिद्धी दिलीच तर त्या कार्याला गौणत्व तरी आणावयाचे किंवा विपरीत स्वरूप तरी द्यावयाचे ! बुद्ध जयंतीवर वर्तमानपत्रात जी टीका आलेली आहे त्या टीकेला समर्पक व सविस्तर उत्तर मी देणार आहे. या वर्तमानपत्रात आलेल्या टीकेचा तुमच्यावर मात्र विपरीत परिणाम होऊ देऊ नका. मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या व मगच त्यावर विश्वास ठेवावयाचा नाही ते ठरवा.

वर्तमानपत्रात एक पाढा नेहमी म्हटला जातो की, “काही जरी केले तरी अस्पृश्यता जाऊ शकत नाही, राजकारणाने म्हणा किंवा धर्मकारणाने म्हणा अस्पृश्यता जाणार नाही. अशा लोकांना माझ्याबरोबर चर्चा करावयाची, असल्यास माझी तयारी आहे. हे लोक उपजत आंधळे आहेत, असे मला वाटते. त्यांनी इतिहास वाचला नाही. जगात आतापर्यंत किती परिवर्तन झाली याची त्यांना माहिती नाही. म्हणून ते अशी मूर्खपणाची टीका करतात.

आज या ठिकाणी बसलेला प्रचंड स्त्री-पुरुष समुदाय हाच मागची परिस्थिती काय होती व आजची परिस्थिती काय आहे हे समजावून देईल. लोक काय म्हणतात इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते जे काही लिहितात ते तुमचा गैरसमज करण्याकरिता लिहितात. सर्व वर्तमानपत्रे माझ्यावर टीका करतात, मात्र, त्याची मला पर्वा नाही. त्यांच्या टीकेमुळे माझे वजन घटेल असे समजण्याचे कारण नाही. मी दरवर्षाला पाहतो तो माझे वजन वाढतच आहे.

नाशिक सत्याग्रहाची गोष्ट घेऊ. आता खऱ्या गोष्टी तुम्हाला सांगावयास हरकत नाही. श्री. भाऊराव गायकवाड इत्यादि पाच-सहा प्रमुख लोकच माझ्या मदतीस होते. त्यावेळी रात्री 12 वाजता सभा घेतली. सत्याग्रहासाठी किती लोक नावे देतात ते आम्ही पाहिले. त्यावेळी आम्ही काय प्रकार पाहिला ? सकाळपर्यंत आम्हाला एकही गड़ी सत्याग्रहासाठी मिळाला नाही. सत्याग्रह केला तर काय होईल याची भीती लोकांच्या मनात होती. सकाळी आम्ही एक मिरवणूक काढण्याचे ठरविले. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा या मिरवणुकीतल्या लोकांवर इतर लोकांनी दगड धोंडे टाकले. त्यामुळे प्रथम आम्हाला पंधरा-वीस सत्याग्रही मिळाले. नंतर लोकांच्या लक्षात आले की, सत्याग्रह करणे यात स्वाभिमान आहे. ही गोष्ट समजल्यावर आम्हाला सत्याग्रही मिळण्यास अडचण पडली नाही. नंतर आम्ही एक-दोन वर्षे नव्हे तर चार-पाच वर्षे सत्याग्रह चालवू शकलो. पूर्वीच्या गोष्टीचा विचार केला तर आता पुष्कळच सुधारणा झाली आहे. असे मला म्हणावयाचे आहे.

आपण शिक्षणाचीच गोष्ट घेऊ. माझ्यावेळी मला शाळेत घ्यावे की नाही ” याचा खल करण्यासाठी तीन दिवस मास्तरांची सभा भरली होती. सरकारकडून तीन रुपये स्कॉलरशिप मिळत होती. मला त्यावेळी या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे. या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यावयाचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. त्यात ब्राह्मणी जोडा घालावयाचा. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये गेलो तर माझ्या 40 वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेले शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता. त्यावेळी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असंख्य मुले शिकावयास होती. तर महाराचा मी एकटाच पोर त्या शाळेत होतो. आज सिद्धार्थ कॉलेजात पाहा. इतरांपेक्षाही आपल्या मुलांचा पोशाख चांगला असतो. पहिल्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजात अस्पृश्यांची 15 ते 20 मुलेच होती. परंतु आज पाहा. अस्पृश्यांची 300 मुले सिद्धार्थ कॉलेजात शिकत आहेत.

दुसरी गोष्ट धर्माची. मनुष्याने स्वार्थच करीत न राहाता थोडाफार परार्थही केला पाहिजे, यासाठीच धर्माची जरूरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडरळीसुद्धा भरते. “कबीर कहे कूच कीजे । उद्दम आप खाये, और औरनको दीजे | या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा, आपण खा व दुसऱ्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा मात्र समाजकार्यालाही मदत करा.

एका लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला दोन प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न हा की, विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्गानाच शिकविली पाहिजे. शूद्र या चौथ्या वर्गाला विद्या शिकविता कामा नये, हे तत्त्व तू का मान्य करीत नाहीस ? याला उत्तर मिळाले ते असे. चार वर्ग हे धंद्याकरिता पडलेले आहेत. परंतु ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्न होऊ शकत नाही. जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले अत्यंत नुकसान ज्ञान हे होते. उदा. नाशिकला एका शेतकऱ्याकडे एक खतपत्र होते. सर्व काही व्यवस्थित होते. केस त्याच्या बाजूची व्हावयास पाहिजे होती. परंतु त्याच्या वकिलाने त्याला दम दिल्यामुळे विरुद्ध निकाल लागला. हे झाले ते त्या शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झाले.

हिन्दुस्थानात जातीभेद राहिला. याला मुख्य दोन कारणे आहेत. एकतर सर्वांना शस्त्रे वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट अज्ञान, मी पूर्वजांना पुष्कळ शिव्या देतो की, त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार का केला नाही. परंतु त्याला वर वर्णन केलेली परिस्थितीच कारणीभूत होती.

‘तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा’ या न्यायाने आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे. आपण अशारीतीने सुधारलो तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या काम करावेच लागणार व त्यांना मान द्यावाच लागणार. आमची व त्यांची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखणारच नाहीत.

प्रत्येक माणसाची काया, वाचा व मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारितीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार ? आमच्या उन्नतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे.

आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मातराचा ठराव केला. सर्वकाही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. अशारितीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे. आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तरवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तरवार आहे. तिचा सदुपयोग की दुरूपयोग कराव्याचा हे त्या माणसाच्या शीलावर अवलंबून राहील. तो त्या तरवारीने एखाद्याचा खूनही करील किंवा एखाद्याचा बचावही करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील. परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करील. शील हे धर्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. ज्यांना स्वार्थापलिकडे काही दिसत नाही. ज्यांना थोडाही परार्थ करता येत नाही. ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले ? त्यांचा दुसऱ्याला उपयोग तो काय ? तव्याचा जाय बुरसा. मग तो सहजच होय आरसा : शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे.

जोतीबा फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झाली आहे. जोतीबांचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग, चांभार हे निव्वळ उष्ट्याचे धनी झाले आहेत. प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत. परंतु आमची चळवळ निष्काम बुद्धिने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की, एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण न कमविलेले खात आहेत त्यांनाच पुढे शरम वाटेल.

प्रत्येकाने बुद्धाचा फोटो आपल्या घरात लावावा एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password