“व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय”
बुधवार तारीख 03 ऑक्टोबर 1945 रोजी पुणे येथील अहिल्याश्रमाचे जागेत आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेचा उद्घाटन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ते मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी राजकारणाच्या अभ्यासू मार्गदर्शन करण्यासाठी व प्रचलित हिंदी राजकारणाचे शास्त्रशुद्ध ज्ञान देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत विद्वत्ताप्रचुर असे भाषण केले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या या भाषणात विशेषतः गांधींनी हिंदी राजकारणात पदार्पण केल्यापासून काँग्रेसला तत्त्वहीन आणि बुद्धिहीन मेंढरांच्या कोंडवाड्याचे स्वरुप कसे दिले आहे व त्यामुळे देशाचे किती भयंकर नुकसान झाले आहे याचे अत्यंत मार्मिक विवेचन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
राजकारणाचा अभ्यास करण्याच्या ज्या उद्देशाने ही संस्था उघडण्यात आली आहे तो उद्देश मला मान्य आहे. तुमचा माझ्यावर आत्यंतिक विश्वास असल्यामुळे आज मी माझे विचार मनमोकळेपणाने तुमचे पुढे मांडणार आहे.
कोणत्याही पिढीतील लोकांपुढे त्यांच्या काळातील जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न स्वतंत्रपणे विचार करून सोडविण्याचे स्वातंत्र्य त्या लोकांना असलेच पाहिजे. जो समाज पारतंत्र्यात जखडला गेला असेल त्या समाजाने स्वातंत्र्यासाठी अहर्निश लढा दिलाच पाहिजे.
काही विशिष्ट विचार पवित्र मानले जाऊन त्यांचा अवलंब अव्याहतपणे पिढ्यान पिढ्या केला जाईल. अशी नैतिक बंधने घातलेली विचारसरणी समाजाच्या रोमरोमी भिनून गेली तर तो समाज शेवटी अधोगतीला जाणार यात मुळीच शंका नाही. महंमद पैगंबर ख्रिस्त हे महान तत्ववेत्ते असू शकतील. पैगंबराचे कुराण, ख्रिस्ताचे बायबल व श्रीकृष्णाची ‘गीता’ ह्या धर्मग्रंथांचा विचार करा. कुराणात महमद पैगंबराने जे जे म्हटलेले आहे. बायबलामध्ये येशू ख्रिस्ताने जे काही सांगितले आहे व गीतेत श्रीकृष्णाने जे काही निवेदिले आहे ते सर्वच्या सर्वच यावच्चंद्रदिवाकरौ सत्य आणि प्रमाणभूत मानण्यात यावे, असे बंधन घालण्यात आल्यामुळे माणसाच्या बुद्धीला कायमचा ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे सत्य कोणते, असत्य कोणते, आपल्या उद्धाराचा मार्ग कोणता, अधोगतीला जाण्याचा मार्ग कोणता हे समजावून घेण्याचाही प्रयत्न कोणी करू शकत नाही. ही गोष्ट बहुजन समाजाच्या व देशाच्या दृष्टीने सर्वस्वी विघातक आहे. तुम्ही मला देव मानीत नाही हे मी माझे सद्भाग्य समजतो. मी आजतागायत तुम्हाला जे जे सांगितले आहे ते ते तुमच्या बुद्धीला पूर्णपणे पटेल याच भूमिकेवरून सांगितले. बुद्धीच्या कसून केलेल्या परीक्षणातून तावून सुलाखून निघालेल्या गोष्टीच मी आजपर्यंत प्रतिपादित आलो आहे. माझा धर्म कायद्यावर किंवा काही विशिष्ट तत्त्वावर आधारलेला नसेल पण त्यात वास्तवता मात्र तुम्हाला नक्कीच आढळेल.
प्रत्येकाने हे अवश्य लक्षात ठेवले पाहिजे की, प्रत्येक पिढीसमोर जे निरनिराळे प्रश्न उभे असतात ते प्रश्न सोडविण्यासाठी मागच्या पिढीतील लोकांच्या विचारांचाच आधार घेऊ म्हटले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असा विचार करा की, जर आपणाला एखादा राजकीय प्रश्न सोडवावयाचा असला तर लो. टिळक हयात असते तर त्यांनी तो प्रश्न कसा सोडविला असता हे पाहून जर आपण आपल्या पुढील आजचा प्रश्न सोडवू तर तो यशस्वीरित्या सुटू शकणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
मनुष्य प्राण्याला जन्मतःच राजकारणाचे ज्ञान असते. असे जर कोणी म्हणत असेल तर ते म्हणणे मूलतःच चुकीचे आहे. उलट मी तर असे म्हणेन की, मनुष्यमात्रामध्ये राजकीय दृष्टिकोन निर्माण करणे ही फार कठीण किमया आहे. माझ्या या म्हणण्यास इंग्लंडच्या इतिहासाची पाने साक्ष देतील. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय.
गांधी हिंदी राजकारणात घुसण्यापूर्वी आपल्या देशात राजकारणाचे धडे देणाऱ्या दोन शाळा-मतप्रणाली होत्या. एक रानडे-गोखले या उदार मतवाद्यांची (Liberal School of Thoughts) व दुसरी बंगालमधील क्रांतिवाद्यांची (School of Revolutionaries) उदारमतवाद्यांच्या शाळेत निर्बुद्धांना दाखल करण्यात येत नसे. क्रांतिवाद्यांच्या शाळेत तत्त्वहीन लोकांना प्रवेश मिळू शकत नव्हता. रानडे-गोखल्यांच्या शाळेत बुद्धिवाद्यांनाच दाखल होता येत होते. ज्ञान संपादन व अभ्यासूवृत्ती यावरच त्यांचा अधिक भर असे. राजकारणात पारंगत असलेल्यांनाच उदारमतवाद्यांच्या शाळेत स्थान असे. क्रांतिवाद्यांच्या शाळेचेही अत्यंत कडक नियम होते. प्राणावर तिलांजली देण्याची प्रतिज्ञा घेतलेल्यांनाच त्या संप्रदायात घेण्यात येत असे. परंतु गांधींनी उघडलेल्या शाळेचा दरवाजा केवळ निर्बुद्धांना व तत्त्वहीन लोकांनाच सताड़ उघडा ठेवण्यात आला. काँग्रेसच्या राजकारणात बुद्धिवाद्यांना बिलकूल स्थान नाही. म्हणून बुद्धिवाद व अभ्यासूवृत्ती यापासून काँग्रेसवाल्यांची पुरीच फारकत झालेली आहे, असे स्पष्ट म्हणणे भाग आहे.
काँग्रेस श्रेष्ठींना राजकारण कशाशी खातात याचे मुळीच ज्ञान नाही. यामुळे काँग्रेसच्या राजकारणाला वेळोवेळी जोरदार ठोकरा बसल्या. त्यामुळे देशाचे आणि बहुजन समाजाचे लवकर भरून न येणारे असे अपरिमित नुकसान झाले आहे. जातीय सलोख्याचा प्रश्न आजपर्यंत जो लोंबकळत राहिला आहे तो काँग्रेसवाल्यांच्या निर्बुद्धपणामुळे, अभ्यासहीनतेमुळे व तत्त्वशून्यतेमुळेच. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँक्टमध्ये व्यापाराबाबतच्या संरक्षणासंबंधीचे 51 वे जे कलम आले आहे ते केवळ एका माणसाच्या शुद्ध मूर्खपणामुळेच.
प्रत्येक पक्षाने आपल्या ध्येयसिद्धीसाठी सतत लढत राहिले पाहिजे. प्रत्येक पक्षात बुद्धिवादी लोक असलेच पाहिजेत. ज्ञान ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. मी रानडे-गोखले यांच्या तत्त्वप्रणालीचा असल्यामुळे मला अभिमानपूर्वक समाधान वाटते.