“स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !”
दिल्ली येथे तारीख 10 जून 1956 रोजी आंबेडकर भवनाच्या पटांगणात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात तीस हजारांच्यावर समुदाय हजर होता. ही सभा 2500 वा बुद्ध महापरिनिर्वाण, जयंती आणि संबोधी दिन साजरा करण्याकरिता भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्ली येथील शाखेमार्फत बोलावण्यात आली होती. कंबोडियाचे आदरणीय वीर धर्मवीर महाथेरा हे या सभेचे अध्यक्ष होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
ब्राह्मण धर्म हा अन्याय, निर्दयता आणि गरिबांची पिळवणूक यांचे माहेरघर आहे. वर्णव्यवस्थेत सर्वात वर ब्राह्मण असून त्यांच्या खाली क्षत्रिय नंतर वैश्य व सर्वांचे ओझे डोक्यावर असलेला शूद्र सर्वात खालच्या रांगेत आहे. जर शूद्राला आपली उन्नती करून घ्यावयाची असेल तर त्याला तिन्ही वरच्या वर्णाशी झगड़ा करावा लागेल. या तिन्ही वर्णाना स्वतःच्या कल्याणाची मुळीच काळजी कराविशी वाटत नाही. धर्म ग्रंथानी ब्राह्मणांकडे वैश्य-क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठत्त्व दिले असल्यामुळे ते अक्षरशः ब्राह्मणवर्गाचे धार्मिक गुलाम आहेत. साध्या शब्दात सांगायचे म्हणजे शूद्राच्या प्रगतीआड येणारे हे तीन वर्ण त्याचे शत्रु आहेत.
ज्या समाजव्यवस्थेत धार्मिक पिळवणूक होत असेल तेथे तुम्ही प्रगतीची कशी अपेक्षा करू शकता ? याच कारणामुळे शूद्राला नेहमी टाचेच्याखाली ठेवण्यात आले. जेव्हा जेव्हा शूद्रांनी विरूद्ध लढण्यासाठी कंबर कसली तेव्हा तेव्हा त्यांची मुंडकी उडविण्यात आली.
याउलट बौध्द धर्माकडे पाहा. नाही. सर्व अधिकार समसमान. उच्च नाही अन् कोणी नीच नाही. येथे जातीयतेला आणि विषमतेला थारा. सर्वांना धर्मात सारखे अधिकार. कोणी स्वतः बुध्दाने अन्यायाविरूद्ध झगडून बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशा धर्माची स्थापना केली.
पूर्वी आर्य (ब्राह्मण) पूजाविधी करीत असताना हजारो पशुंचा बळी देत असत पशु हत्त्येचा इतिहास (गाई आणि म्हशींची कत्तल) जर आपण पाहिला तर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी या देशातील जेवढ्या गाई मारून खाल्ल्या नाहीत त्यापेक्षाही अधिक गाई त्या काळातील ब्राह्मणांनी खाल्लेल्या आहेत.
अगोदर चार प्रकारचे ब्राह्मण होते. मग कालांतराने त्यांच्या सतरा पोटजाती झाल्या. ब्राह्मण धर्मग्रंथावरून असे दिसून येते की, गोमांसाच्या वाटणीवरून, गाई-म्हशीच्या कातड्याच्या मालकीबाबत त्या ब्राह्मणांनी आपसात नेहमी युद्धे केली आहेत. ब्राह्मणाच्या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी जे पशुहत्त्या करीत नसत त्यांना ब्राह्मण धर्मानुयायी समजण्यात येत नसे. याचमुळे बौद्ध धर्म अस्तित्त्वात आला. बौद्ध धर्माने मानवाला विचार करण्याचे स्वातंत्र्य देऊन पूर्ण विचाराअंती योग्य मार्ग अनुसरण्याची परवानगी दिलेली आहे. नैतिकतेवर आधारलेल्या अहिंसेचा उपदेश बौद्ध धर्मात आहे. याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हिंसेचा अर्थ लोकांनी चुकीचा लावला. माणसाने पशुहत्या करू नये किंवा हातात तरवार घेऊन देशरक्षणाकरिताही लढू नये. ही अहिंसा नाही. अहिंसा दोन गोष्टीवर आधारलेली आहे. आवश्यकतेसाठी हत्त्या आणि हत्या करण्याची इच्छा होणे ! जर राष्ट्रावर परचक्र आले. देश संकटात सापडला तर हातात तरवार घेऊन राष्ट्ररक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन उडी घेणे आणि शत्रुचा निःपात करणे, त्यांची हत्त्या करणे हे प्रत्येक नामरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ ही हिंसा आवश्यक होती. त्याला बौद्ध तत्वज्ञानात उच्चतम प्रतीची अहिंसा म्हणतात. दुसरी, मारण्याची इच्छा होणे, म्हणजे स्वतःच्या समाधानाकरिता पशुबली देणे, पशुहत्त्या करणे ही हिंसा होय.
बौद्ध तत्त्वज्ञान जसेच्या तसे उचलून त्यात आपली जातीभेद वगैरे तत्त्वे दडपून देऊन हिंदू तत्त्वज्ञानी ते आपले म्हणून मिरवितात. ब्राह्मण धर्माचे लेखक म्हणतात की, वेद प्रजापतीने दिले. भगवान बुद्धाने प्रश्न विचारला की, प्रजापती कोणत्या ठिकाणाहून जन्माला आला. हिंदुचे वेद आणि गीता यांचा अभ्यास केला तर भगवतगीता हे दुसरे तिसरे काही नसून ‘धम्मपद’ आहे. ही धम्मपदाची नक्कल करताना त्यात जाती संस्था घुसडून देण्यास ब्राह्मण विसरले. स्वतः श्रीकृष्णाने आपल्या शिष्यांना उपदेश केला की, ब्राह्मणेतरांना कोणतेही ज्ञान देऊ नका अथवा धर्मोपदेश करू नका !
प्रार्थना केल्याने अथवा कोणाचे पाय धरल्याने ते तुम्हाला काही देणार नाहीत. झगडा करावयाचा तर आपल्याला अंगात पहिलवानासारखे बळ पाहिजे. पहिलवान खूप खातो. पचवितो आणि सामर्थ्य निर्माण करतो. तसे तुमचे मानसिक बल वाढले पाहिजे. जर सत्य व योग्य मार्गाचे अवलंबन केले तर तुम्हाला मानसिक शक्ती प्राप्त होईल. मित्रे भागूबाई कधीच लपू शकत नाहीत. मी ह्या अस्पृश्यतेचे वैगुण्य घालविण्याचा प्रयत्न कसोशीने अनेक वर्ष करीत आलो. परंतु अद्याप माझा उद्देश पूर्णपणे सफल झाला नाही. माझे मन मजबूत आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत लढेन. जुलूमशाहीविरूद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बल पाहिजे. ते तुम्हास प्राप्त व्हावे यासाठी मी नवा मार्ग तुम्हाला दाखवितो, तुम्ही जर बुद्धमार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल एवढेच नव्हे तर, तुम्हाला बलप्राप्ती होईल. तुमच्या मुलाबाळाचा भविष्यकाळ उज्वल राहील. समानता आणि स्वाभिमानाने जगण्याचे स्थान दाखविल्याबद्दल ते तुमचे आभारी राहातील.
मी असे ऐकले आहे की, लोकांनी जुलूमाविरूद्ध झगडे करू नये. यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी काँग्रेस काही लोकांना पैसे वाटत आहे. सरकार मलाही पैसा घेण्यास सांगत होते. हेतु हा की माझे तोंड बंद करावे. पण मी पैसा कधीच घेतला नाही, हे तुम्हाला माहीत आहेच. माझ्या उदरनिर्वाहाकरिता मी आपले श्रम करून पैसे मिळवीन. अस्पृश्यांच्या हितासाठी व हक्कासाठी शेवटपर्यंत झगडत राहीन. एवढ्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की, काही झाले तरी तुमचा स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकणार नाही याची खबरदारी घ्या. समाजाची मान नेहमी उंच राहील यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहा. सर्वस्व पणाला लावून तुमचा आणि समाजाचा स्वाभिमान कायम राखा. मी प्रेषित नाही, पैगंबर नाही किंवा ईश्वराचा प्रतिनिधीही नाही. मी भगवान बुद्धाचा विनम्र शिष्य आहे. मी तुम्हाला हा मार्ग दाखवित आहे. जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटत असेल तर त्याचे अनुकरण करा. परंतु हा मार्ग स्वीकारण्यापूर्वी त्याचा सर्वांगीण विचार करा. भगवान बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगितले की, कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पूर्ण विचाराअंती करा. आंधळेपणाने स्वीकार करू नका. निसर्गतः मानव स्वतंत्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की, स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !