“घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा.”
भारताचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईस परत येत असता, तारीख 10 जून 1950 रोजी, त्याचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले. चॅबरच्या प्रशस्त हॉलमध्ये सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अस्पृश्य बांधव यांची खूपच गर्दी होती, घटना व घटनात्मक नीती यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समयोचित असे भाषण केले. ते म्हणाले.
प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे :
सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्यांकांच्या नियमाचे पालन:
त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत: देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे. असे दिसून आल्यास घटनात्मक नीतीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्यांकांबद्दल आदर बाळगला पाहिजे. शेवटची गोष्ट म्हणजे राज्यशासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.
आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहाणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्त्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटीवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसूत्रे खाली ठेवली पाहिजेत.
: अल्पसंख्यांकांबद्दल आदर :
अल्पसंख्यांकांबद्दल सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्यांकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेंटरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे.
त्याचप्रमाणे निःपक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्य आहे. ब्रिटिश जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमापन त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे, त्याला खूष ठेवले पाहिजे, अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही. भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.
जुन्या घातक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गे लागतील अशी मला आशा आहे.