“अस्पृश्यांना बौद्ध धर्माशिवाय दुसरा कोणताही अभ्युदयाचा मार्ग नाही.”
दिनांक 6 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे एक भाषण कोलंबो येथील टाऊन हॉलमध्ये झाले. टाऊन हॉलमधील समारंभ अखिल सिलोन दलित फेडरेशनच्या विद्यमाने घडविण्यात आला होता. सिलोनमधील दलित वर्गीयांचा प्रचंड समाज समारंभास हजर होता. या प्रसंगी करण्यात आलेल्या सत्कारास उत्तर देताना आपल्या ज्ञातिबांधवास उद्देशून डॉक्टर साहेब म्हणाले.
सिलोन देश हा बौद्ध धर्मीयांचा देश आहे. अस्पृश्यांच्या मुक्तिचा मार्ग बौद्ध धर्माच्या स्वीकारातच आहे. अशी माझी खात्री झाली असल्याने एक तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते. मला सिलोनमधील बौद्ध धर्मीय जनतेस सागावेसे वाटते की, दलित वर्गीय बंधुंना त्यांनी दिलजमाईने बौद्ध धर्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानीव पुत्राप्रमाणे त्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करावे.
सिलोनापुरते बोलावयाचे झाल्यास हा देश बौद्धधर्मीय असल्याने मी असेच म्हणेन की, ‘अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटित होण्याचे कारण नाही. भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे अनुकरण करण्याची तुम्हास आवश्यकता नाही. बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानावे काय व त्याप्रमाणे ओळखिले जावे की काय, या प्रश्नाचा विचार करण्याची आज परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्हास राजकीय हक्क प्राप्त व्हावेत, कायदेमंडळात जागा मिळाव्यात आणि समाजाने समतेने वागवावे म्हणून भारतात आम्ही एक प्रदीर्घ राजकीय युद्ध खेळीत आहोत. तथापि आम्ही अद्यापि यशस्वी झालो नाही. या गोष्टीचा अर्थ असा की, राजकीय संग्रामातून आम्हास मुक्ती मिळालेली नाही.
गेली 35 वर्षे मी राजकीय लढाई चालविली आहे. या लढाईत मोठमोठ्या व उच्च हिंदुच्या तरवारीबरोबर तरवार मला भिडवावी लागली. याच काळात जगातील सर्व धर्मांचा मी अभ्यासही केला. आता शेवटी एका अपरिहार्य निर्णयास मी येऊन पोहोचलो आहे. तो निर्णय हाच की, बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तिचा मार्ग नाही. फक्त बौद्ध धर्मातच अस्पृश्यतेच्या निवारणाचा चिरकालीन उपाय आहे. जर तुम्हास, समतेचे तत्त्व हवे असेल आणि आर्थिक दास्यातून मुक्तता करावयाची असेल तर बौद्धवादा शिवाय कोठेच दुसरा आश्रय नाही.
सिलोनचे मान्यवर नागरिक बनण्याची संधी तुम्हास कायद्याने मिळालेली आहे. या कायद्यातील काही कलमांविरुद्ध तक्रार करण्यास पुष्कळ जागा आहे. हे खरे आहे. परंतु मला खात्री आहे की, भारत सरकार व सिलोन सरकार यांच्या सलोख्याने व स्नेहभावाने अन्यायी तरतुदींचे निराकरण करता येईल.