बौद्ध धर्म ब्राह्मणी धर्माला आव्हान.
सध्या अखिल मानव जातीपुढे ‘नैतिक मूल्यांचा प्रश्न’ हा अत्यंत निकडीचा झाला आहे. सांस्कृतिक संघर्ष, युद्धाची भाषा आणि धार्मिक -हास यांच्या विषमय वलयामध्ये अखिल मानव जात सापडली आहे. वैचारिक अराजकतेला तर सीमाच उरलेली नाही.
अशा अत्यंत, आणीबाणीच्या काळात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे विवेचन करताना कोलंबो येथे जी धर्मवाणी उच्चारली तिजपासून सर्व देशातील आणि विशेषतः भारतातील जनतेस खरा प्रकाश दिसेल आणि खऱ्या नैतिक मूल्याचे महत्त्वमापन केले जाईल असे मानण्यास हरकत नाही.
“भारतातील बौद्ध धर्माचा उदय व अस्त” या विषयावर कोलंबो येथील यंग मेन्स बुद्धिस्ट असोशिएनच्या विद्यार्थ्यांपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विचारप्रवर्तक व क्रांतिकारक असे दिनांक 6 जून 1950 रोजी भाषण झाले त्यावेळी ते म्हणाले.
भारतात बौद्ध धर्माचा -हास झाला असून तो जवळजवळ नष्ट झाला आहे असे म्हटले तरी मला ही गोष्ट मुळीच मान्य नाही. ऐहिक दृष्ट्या बौद्ध धर्माचा प्रसार वा चिन्हे भारतात दिसून येत नसतील आणि ती गोष्ट घटकाभर मी मान्यही करीन तथापि, आध्यात्मिक शक्ती म्हणून बौद्ध धर्म भारतात अद्यापिही ज्वलंत प्रभावाने अस्तित्वात आहे. ही गोष्ट कोणासही नाकबूल करता येणार नाही. मात्र खेदाची गोष्ट अशी की, बौद्ध धर्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला या प्रश्नाचा विचार अद्याप व्हावा तेवढा झालेला नाही. बौद्ध धर्माचे महत्त्व लक्षात घेता, सदर विषयाचा अभ्यास वास्तव दृष्टीने व खोलवर व्हावयास पाहिजे. अशा अभ्यासाचे महत्त्व भारतात आज तरी अधिक आहे, या विषयावर अधिकृतपणे माहिती देणारे ग्रंथ अगर इतर वाड्मय उपलब्ध नाही हीही एक अडचणीची गोष्ट आहे.
बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात यावे असे ज्यांना ज्यांना वाटते. त्यांच्यापुढे असा प्रश्न उभा राहतो की, बौद्ध धर्मात जर काही चिरंतन मूल्ये होती तर या धर्माचा हास कसा झाला? या संबंधीची माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत मी जमविलेल्या माहितीप्रमाणे, बौद्ध धर्माच्या उदय-अस्ताबद्दल जी अनुमाने मी बसविली आहेत ती जवळ जवळ बरोबर आहेत असेच मला वाटते.
भारतात प्रथमपासून हिंदू धर्म होता असा बहुतेकांचा समज आहे. परंतु इतिहासाच्या आधारावर या घटनेची छाननी केली तर हा समज टिकाव धरु शकत नाही. हिंदू धर्म भारतात प्रथमपासून मुळीच नव्हता. हिंदू धर्माची आज मितीची स्थिती पाहता तो अगदी अलिकडे निर्माण झाला आहे असेच दिसून येते. हिंदू धर्माची उभारणी स्थित्यंतरातून झालेली आहे. प्रथमतः भारतात वैदिक धर्म होता. त्यानंतर ब्राह्मणी धर्म आला आणि आता शेवटी हिंदू धर्म निर्माण झाला. अशातऱ्हेचे बदल क्रमशः घडलेले आहेत.
ब्राह्मणी धर्माच्या काळातच बौद्ध धर्माचा उदय झाला आणि ती अवस्था स्वाभाविक होती. ब्राह्मणी धर्माचा आत्मा विषमतेचा होता; तर बौद्ध धर्माचा आत्मा समतेचा होता. अर्थात या दोन भिन्न विचार प्रणालीच्या धर्मात संघर्ष होणे अपरिहार्यच आहे. बौद्ध धर्म हा ब्राह्मणी धर्माला आव्हानासारखा होता. कारण बौद्ध धर्माचा चातुर्वर्ण्य पद्धतीस विरोध होता. फ्रेंच राज्यक्रांतीने समता प्रस्थापनेचे जे कार्य केले तेच क्रांतीकार्य बौद्ध धर्माच्या उदयामुळे घडले आहे. अशातऱ्हेने बौद्ध धर्माचा उदय कोणत्या परिस्थितीत झाला हे समजावून घेतल्यास त्याचे महत्त्व कळेल.
शंकराचार्याच्या तत्त्वज्ञानामुळे आणि युक्तिवादामुळे बौद्ध धर्म निष्प्रभ ठरला असे अनेक लोक म्हणताना आढळतात. माझ्या मते ही गोष्ट चुकीची आहे. कारण शंकराचार्यांच्या निधनानंतर देखील अनेक वर्षे बौद्ध धर्म भारतात उत्कर्षाने वावरत होता. मला तर असे वाटते की, शंकराचार्य व त्यांचे गुरू हे दोघेही बौद्धधर्मीयच होते.
वैष्णव धर्म व शैव धर्म यांच्या भडक प्रचारामुळे बौद्ध धर्म हळू हळू नाहिसा झाला. बौद्ध धर्माचीच नक्कल या धर्मानी केली होती. नकलेने बौद्ध धर्मास नाहीसा करण्याची ही क्लृप्ति और होती. यातच मुसलमानी स्वा-याची भर पडली. अल्लाउद्दीन खिलजीने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने सुमारे पाच हजार ते सहा हजार बौद्ध भिक्कुना सर्रास कापून काढले. त्यामुळे धाक निर्माण झाल्याने उरलेले बौद्ध भिक्कु चीन, नेपाळ व तिबेट या देशात दिसेल त्या मार्गाने पळून गेले. त्यानंतर बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण दरम्यानच्या काळात हिंदू धर्माचा फैलाव होऊन 90 टक्के लोकांनी हिंदू धर्माची दीक्षा घेतलीही होती.
हिंदू धर्म आचरण्यास सोपा आहे म्हणून तो राहिला. बौद्ध धर्म आचरण्यास कठीण असल्याने तो अस्तास गेला हे त्याचे सरळ व साधे उत्तर आहे. याशिवाय भारतातील राजकीय वातावरण जसे हिंदू धर्माला अनुकूल होते तसे बौद्ध धर्माला नव्हते हीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.