Categories

Most Viewed

24 सप्टेंबर 1941 भाषण

“इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून.”

गेले महायुद्ध बंद झाल्यापासून महार लोकांना पलटणीमध्ये घेण्यात येत नव्हते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून महार लोकांच्या दोन पलटणी उभारण्याचे हिंदुस्थान सरकारने ठरविले आहे. त्यानुसार महार तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि पलटणीमध्ये भरती व्हावे म्हणून बुधवार, तारीख 24 सप्टेंबर 1941 रोजी रात्री 9 वाजता आर. एम. भट हायस्कूल परेल येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. सभेत इतका जनसमुदाय लोटला होता की, हॉल व गच्ची भरून बाहेर देखील लोकांना ताटकळत उभे राहावे लागले.

बरोबर सव्वा नऊच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभास्थानी आले. त्यावेळी बाबासाहेबांच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडाटात वातावरण दुमदुमून गेले. नंतर जनता ‘ पत्राचे मॅनेजर श्री. के. व्ही. सवादकर यांनी सभेचे प्रयोजन काय वगैरे जनसमुदायास सांगून बाबासाहेबांना बोलण्यास विनंती केली. बाबासाहेब टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उठले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

सद्गृहस्थहो !
आजच्या या तातडीने बोलाविलेल्या सभेचा मुख्य हेतू हिंदुस्थान सरकारने आपल्या समाजाकरिता ज्या दोन बटालियन्स उभारलेल्या आहेत त्याबद्दल मी आपणास माहिती सांगावी असाच आहे. 1932 साली 111 वी महार पलटण उभारण्यात आली होती. त्या पलटणीतील शिपायांनी गेल्या महायुद्धात महार समाजाचे क्षात्रतेज लोकास दाखवून दिले होते. परंतु महायुद्ध संपल्यानंतर सरकारने ही पलटण कमी केली. त्यानंतर पलटणीमध्ये भरती व्हावे म्हणून ब-याच महार तरुणांनी अर्ज केलेले होते. परंतु त्यांना पलटणीत घेण्यात येत नव्हते. चालू असलेले हे युध्द झाल्यानंतर सरकारने अस्पृश्य लोकांचे कामगार पथक (Labour Corps) उभारण्याची योजना पुढे आणली. याबाबतीत ज्यावेळेस मला विचारणा करण्यात आली. त्यावेळेस मी सरकारला सांगितले की, तुम्ही ज्याअर्थी अस्पृश्यांना पलटणीत घेत नाही, त्याअर्थी आमचे लोक तुमच्या या कामगार पथकामध्ये भाग घेणार नाहीत. तुम्हाला कामगार पथकात आमची माणसे पाहिजे असतील तर अगोदर आमच्या माणसांना पलटणीत सामील करून घ्या. माझ्या सांगण्याचा सरकारच्या मनावर परिणाम झाला. आपली एक पलटण उभारण्याचे सरकारने निश्चित केले. आणखी दुसरीही एक पलटण उभारण्याचे आश्वासन मला देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मी त्यांना असेही सांगितले होते की, पलटणीतील महारलोक शिपाई व त्यांच्यावरचे अधिकारी इतर वरच्या जातीचे असता कामा नये. तर अधिकारी देखील महारांचेच पाहिजेत. याही माझ्या म्हणण्याला सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार आपले लोक जमेदार, सुभेदार याच हुद्यावर घेतले जातील असे नसून लेफ्टनंट सारख्या हुद्यावर देखील घेतले जातील, येथपर्यंत ही गोष्ट येऊन ठेपलेली आहे. गेल्या शनिवारी माझी व ना. गव्हर्नरांची मुलाखत झाली. तेथे मला सांगण्यात आले की, आतापर्यंत 600-700 अस्पृश्यांनी या नव्या पलटणीमध्ये नावे दिलेली आहेत. परंतु त्यांना वाणवा जर कशाची असेल तर अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याकरिता आपल्यातील लायक उमेदवारांची. मला असेही सांगण्यात आले की. ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या अटी मान्य केल्या, त्याचप्रमाणे अंमलदारांच्या जागा भरण्यासाठी तुमच्यातील लायक माणसे पुरविण्याचे कर्तव्य तुमचे आहे. म्हणून आपण अंमलदारांच्या जागेकरिता, दोन्हीही पलटणीकरिता लायक उमेदवार पाठविणे जरुरीचे आहे.

काही लोकांच्या मनात या पलटणी बाबत शंका उत्पन्न झाल्या आणि त्यांनी मला विचारले की, सरकारने व्हाइसरॉयच्या विस्तृत केलेल्या कार्यकारी मंडळात अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी घेतला नाही. त्याचप्रमाणे सरकारने महार वतनावर जुडी लादल्यामुळे हल्ली आपण या अन्यायाविरूद्ध चळवळ करीत आहोत मग त्याच सरकारला आपण लष्करात भरती होऊन मदत कशी करावयाची ?” याच प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता आजच्या सभेचा मुख्य हेतू आहे.

हल्ली हिंदुस्थानातील इतर समाजांची विचारसरणी कशी आहे ती मी तुम्हास सांगतो. काँग्रेस म्हणते की, ज्याअर्थी इंग्रज लोक आपल्याला स्वराज्य देत नाहीत त्याअर्थी आपणही त्यांना मदत करू नये. याबाबत मी आपणास दोन गोष्टी सांगतो. त्यातली पहिली अशी की, समजा एका मनुष्याच्या मालकीचे घर आहे. त्यात मालकाला जबरदस्तीने बाहेर काढून एक माणूस शिरलेला आहे. दुसरा एक माणूस येऊन घरात गेलेल्या पहिल्या माणसाला बाहेर निघण्यास सांगत आहे व तो बाहेर निघत नाही असे पाहून त्या घराला आग लावील म्हणून धमकी देत आहे. तीच गोष्ट हल्ली झालेली आहे. आपण या देशाचे मालक आहोत व आपल्या देशात इंग्रज हे घुसलेले आहेत. ते येथून जावेत अशीच इतरांप्रमाणे आपली इच्छा आहे. जर हिटलर आला आणि इंग्रजांना म्हणू लागला की, तुम्ही या देशातून जा, नाहीतर या देशाची मी राख रांगोळी करील. सांगा, तसे त्याने केले तर कोणाचे नुकसान होईल ? हे नुकसान इंग्रजांचे होणार नाही. तर या देशातील लोकांचे होणार आहे. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवावयास पाहिजे.
या युद्धात इंग्रजांना मदत करा, असे जे मी सांगतो ते काय इंग्रजांना वाचविण्यात यावे म्हणून नाही तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून हे सांगतो.

दुसरी गोष्ट अशी की, लोक म्हणतात की, व्हाइसरॉयने डॉ. आंबेडकरांना आपल्या कार्यकारी मंडळात घेतले नाही, मग आपण पलटणीत कशाला भरती व्हायचे ? या बाबत मला असे सांगावयाचे आहे की, निकराचा लढा व रूसवा यात पुष्कळ अंतर आहे. होय ना ? आपला प्रतिनिधी कार्यकारी मंडळात घेतला नाही हा आपल्यावर अन्याय झालेला आहे हे मला कबूल आहे. त्याचप्रमाणे सरकारला देखील कबूल आहे. खुद्द ना. व्हाइसरॉयने माझ्या देखत हा अन्याय कबूल केलेला आहे. परंतु जर सरकार हम करे सो कायदा या नीतिमत्तेचा अवलंब करू लागले व गर्वाने फुगून जाऊन आपल्याला म्हणू लागले की, जा वाटेल तशी चळवळ करा, आम्ही तुमच्याकरिता काहीही करणार नाही. तर आपण सरकारचे काय करू शकणार आहोत. आपल्याजवळ साधने देखील उपलब्ध नाहीत. अशा वेळी आपल्याला सरकारवर रुसून बसण्यापलिकडे काय साधन आहे? मला माझ्या लहानपणाच्या एका प्रसंगाची आठवण झाली. आम्ही 3-4 भावंडे आमच्या आत्याकडे राहात असू जेवणाच्या वेळेस याला जास्त, त्याला कमी यावरून आम्हा भावडांच्या नेहमी तक्रारी होत असत. या असल्या भांडणात माझा पहिला नंबर असे. एकदा आमच्या आत्याने वांग्याचे कालवण केलेले होते. जेवणाच्या वेळी मला इतरापेक्षा कमी वांग्याच्या फोडी मिळाल्या म्हणून मी तक्रार उपस्थित केली. त्या दिवशी मला काहीच मिळू द्यावयाचे नाही म्हणून माझ्या भावडानी चंग बांधला असल्यामुळे माझ्या तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही. मला मात्र फार राग आला व मी जेवणावरून उठून रूसून बाहेर गेलो. माझ्या मागे मला ज्या वांग्याच्या फोडी मिळाल्या होत्या त्या देखील माझ्या भावंडानी खाऊन टाकल्या. त्या दिवशी मला संबंध दिवस काहीच खावयास न मिळता उपाशी रहावे लागले. सांगावयाचा मतलब एवढाच की, दोन पक्ष जर शक्तितुल्य असले तरच भांडण योग्य होय. नाहीतर रुसून बसण्यात काही शहाणपणा आहे असे मला वाटत नाही. आपल्या जवळ काही अधिकार नाहीत. बोलण्यात आणि लढण्यात फार अंतर आहे. व्हाईसरॉयने अन्याय केलेला आहे यात जरी शंका नसली तरी रुसून एखाद्या झोपडीत बसून राहाण्यात काही फायदा नाही.

मुस्लिम लीग ही मुसलमानाची अगदी बलाढ्य अशी संस्था आहे. सर्प व मुंगूस यांचे जसे एकमेकात वैर असते त्याचप्रमाणे इंग्रजांचे व या संस्थेचे वैर आहे. असे जरी असले तरी मुसलमान लोक जे साधवून घेता येण्यासारखे आहे. ते साधवून घेत आहेत. लष्करात शेकडा 80 लोक मुसलमान आहेत. शेकडा 50 अंमलदार आहेत व शेकडा 80 ते 90 मिलिटरी कॉट्रक्टस मुसलमान आहेत. अशी खरी वस्तुस्थिती आहे. मुसलमान लोक दांडगाई पेक्षा व्यवहाराकडे पहात असून ते वाहत्या नदीत हात धुवून घेत आहेत. मुसलमान लोकांनी जर ब्रिटिशांना नाही म्हटले तर ब्रिटिशांना त्यांची मनधरणी करावी लागेल. कारण मुसलमानाच्या हातात शक्ती आहे. तशी परिस्थिती आपली नाही. आपण सर्व दृष्टीने नाडलेलो आहोत. असे असताना देखील त्यांनी आपल्या अटी कशा मान्य केल्या याचेच मला आश्चर्य वाटते.

म्हणून कॉलेजामध्ये शिक्षण घेणारे व त्याचप्रमाणे इतर सुशिक्षित तरुणांनी उभारण्यात आलेल्या या दोन पलटणी मधील अंमलदारांच्या जागा पटकाविण्याकरिता पुढे झाले पाहिजे. सरकारने मला असेही आश्वासन दिलेले आहे की, जर यदाकदाचित युद्धानंतर या पलटणी मोडल्या तर पलटणीतील लोकांना सिव्हीलमध्ये चांगल्या नोकऱ्या देण्यात याव्यात याबद्दल तजवीज करण्यात येईल. तेव्हा तुम्हास सांगावयाचे की, एवढ्या सवलती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचा फायदा करून घेणे आपणावर अवलंबून आहे. जी शिकलेली माणसे आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये.

आपल्या तरुणांनी सावलीत बसण्याची प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. माझी देखील अशीच इच्छा होती की, सावलीत काम मिळावे. हल्ली सर्व लोक महाराविरुद्ध आहेत. इतर जातींच्या मनात मांगाविषयी, चांभाराविषयी, भंग्याविषयी प्रेम आहे, परंतु महाराविषयी मात्र नाही. त्याचे कारण दुसरे तिसरे नसून मी आहे. इतर लोक मला पिशाच्च म्हणून समजतात आणि माझ्या भोवताली असलेल्या महारांना भुतावळ म्हणून मानतात. 1926 पासून अस्पृश्यांच्या न्याय्य हक्काकरिता मी भांडत आहे. अस्पृश्यांना पोलिसमध्ये घ्यावे म्हणून मी सरकार जवळ भांडलो आणि त्याचा फायदा म्हणजे हल्ली 2 चांभार व 1 मांग सब-इन्स्पेक्टर्स आहेत. महार एकही नाही ! याचे कारण काय ? ज्या महार उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्यात आले होते त्यांना तुम्ही डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आहात का असे प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी होय म्हटले, त्यांची निवड करण्यात आली नाही. आता पोलीस सब-इन्स्पेक्टरच्या जागेशी माझ्या अनुयायित्वाचा काय संबंध आहे ? त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात आपल्या काही पदवीधरांना मामलेदारांच्या जागेकरिता मुलाखतीकरिता मध्य भागातील रेव्हेन्यू कमिश्नरने बोलाविले होते, त्यांना तेथे जुडीविषयी प्रश्न विचारण्यात आले. गेलेले तिघेही उमेदवार महारच असल्यामुळे एकाचीही निवड झाली नाही. पण मला या अधिकाऱ्यांना असे विचारावयाचे आहे की, जादा जुडीचा व उमेदवारांच्या मुलाखतीचा काय संबंध आहे ? आणि त्या जुडीबाबत योग्य उत्तरे मिळाली असताना देखील एकही महार उमेदवारला का निवडू नये ? सारांश, महार जातीवर सर्वांचा फार कटाक्ष आहे. आपल्या समाजातील तरुणांना मामलेदार, सब-जज, डेप्युटी कलेक्टर होणे कठीण जाईल. परंतु 2 वर्षे मिलीटरीत नोकरी केल्याने तुम्हाला मोठा अधिकारी होणे फारच सोपे जाईल यात मुळीच संशय नाही. म्हणून आपल्याला पुढे जर फायदा करून घ्यावयाचा असेल तर प्रथम काही दिवस त्रास सहन करणे जरूर आहे. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नसते हे लक्षात ठेवावे. म्हणून जे मॅट्रीकपर्यंत शिकलेले असतील, जे बी. ए. झालेले असतील त्यांनी या संधीचा फायदा घेणे अवश्य आहे.

या अंमलदाराच्या जागेकरिता आपण जर आपली माणसे पाठविली नाहीत तर त्या जागेवर इतर जातीचे अधिकारी नेमण्यात येतील. वरच्या जातीच्या लोकांच्या मनात आपल्याविषयी प्रेमभाव नाही हे मी आपणास सांगावयास पाहिजे अशातले नाही. आपल्याला ते माहीत आहेच. ते जर अधिकारी झाले तर आपल्या शिपायांच्या विरुद्ध वाटेल तसे खोटेनाटे रिपोर्ट करून, महार लोक लष्करामध्ये काम करण्यास नालायक आहेत असे सरकारच्या नजरेस आणून दिल्याशिवाय कधीही राहाणार नाहीत.

म्हणून आपल्यातील शिकलेल्या तरुणांना ही चांगली संधी आलेली आहे. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर आपल्या तरुणांना ऑफिसामध्ये कारकुनाच्या नोकऱ्या कराव्या लागतात. त्यात त्यांना जास्त बढती मिळत नाही. मामलेदारांच्या जागेकरिता खेटा घालण्यापेक्षा २ वर्षे मिलीटरीमध्ये नोकरी केली तर त्या माणसाला भरपूर पगार मिळतो. युद्ध संपल्यानंतर सिव्हीलमध्ये ज्या काही वरीष्ठ नोकऱ्यांच्या जागेवर नेमणूका करतेवेळेस लढाईत नोकरी केलेल्या माणसास सवलती देण्यात येणार आहेत. आपल्या पलटणी मोडल्या तर हा प्रश्न उपस्थित होईल परंतु आपल्या या पलटणी युद्धानंतर देखील कायम राहातील असे आश्वासन मला सरकारकडून देण्यात आलेले आहे.

लढाईत नावे देण्यास लोक घाबरतात. परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीकडे पाहिले तर युद्ध लवकरच संपेल असे अनुमान काढण्यात येत आहे. म्हणून ‘करंड्यात असलेले कुंकू लेईल ती सौभाग्यवती व जी न लेईल ती रांडाव’ या म्हणीप्रमाणे आपल्या तरुणांनी या संधीचा फायदा अवश्य घ्यावा, एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो.

तद्नंतर पुण्याचे श्री. पां. ना. राजभोज यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला ही संधी मिळालेली आहे तरी सर्वांनी तिचा फायदा करून घेणे जरूर आहे. वगैरे.

नंतर डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा बरखास्त झाली.

सदर भाषण जनता वृत्तपत्रात दिनांक 27 सप्टेंबर 1941 रोजी प्रसिद्ध झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password