Categories

Most Viewed

11 मे 1941 भाषण

“श्वानवृत्ती सोडून मनुष्यत्वाची धारण करा.”

रविवार तारीख 11 मे 1941 रोजी मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन तिसरे, यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडास पर्स अर्पण करण्याकरिता, प्रि. दोंदेसाहेब, बी.ए. म्युनिसीपल कार्पोरेटर, यांच्या अध्यक्षतेखाली जंगी जाहीर सभा आर. एम. भट हायस्कूल, परळ, मुंबई येथे भरविण्यात आली होती. सभास्थानी अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येताच त्यांचे जमलेल्या जनसमूहाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत केले.

श्री. व्ही. एस. पगारे यांनी प्रिं. दोंदेसाहेब यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. श्री. साळवे यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्षांनी आभार प्रदर्शनार्थ प्रास्ताविक भाषण केले.

श्री. एस. डी. गायकवाड (इंटर आर्टस्) यांनी एकंदरीत विद्यार्थी समूहाने इमारत फंडास कशा तऱ्हेने निधी जमा करण्यात आला. त्याचा सविस्तर अहवाल वाचून दाखविला. सदर निधी अस्पृश्य विद्यार्थी संमेलन तिसरे यातर्फे जमा करण्यात आला. संमेलनप्रसंगी काटकसर करून इमारत फंडास थोडी फार मदत करावी, असा विद्यार्थ्यांचा मानस होता. परंतु संमेलनास जमलेला निधी अपुरा होऊन त्यांना (विद्यार्थ्यांना) इमारत फंडास मदत करणे अशक्य झाले. ही महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त लहान बॅजेस तयार करून ती विकून त्यांनी एकूण रूपये 86-0-6 रक्कम जमा केली. त्यापैकी रूपये 34-15-3 खर्च वजा जाता शिल्लक 51-1-3 ची रक्कम येथे डॉक्टर बाबासाहेबांस इमारत फंडाकरिता अर्पण करण्यात येणार आहे. सदर रकमेपैकी निम्मे अधिक रक्कम कुमारी कमल मुरवाडकर हिने जमा केली आहे.

सदर प्रसंगी वि. भंडारे व एस. जे. जाधव यांनी इमारत फंडाविषयी परिणामकारक भाषणे केली.

नंतर कुमारी कमल मुरवाडकर हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुणवर्णनपर छोटेसे भाषण करून त्यांना विद्यार्थी समितीतर्फे 51 रूपये 1 आणा 3 पैसै ची पर्स अर्पण केली. (टाळ्या)

नंतर सुप्रसिद्ध जलसाकार श्री. भीमराव धोंडिबा कर्डक यांनी नाशिक जिल्ह्यातर्फे जनता पत्रास एकूण 113 रूपये ची थैली अर्पण केली आणि भाषण केले.

तद्नंतर श्री. दगडूजी जाधव यांनी परेल गव्हर्नमेंट गेट, लाल चाळीतर्फे 80 रूपये चा पहिला हप्ता म्हणून डॉ. बाबासाहेबांना इमारत फंडाकरिता दिला. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले.

विद्यार्थी आणि बंधुभगिनींनो
आज या ठिकाणी येताना काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलण्याचा माझा हेतू होता. परंतु याठिकाणी जमलेला जनसमुदाय अतिशय अल्प असल्यामुळे तो हेतू मी आज येथे तुम्हास सांगू शकत नाही. आज तीन वस्तीतून याठिकाणी समाजकार्याकरिता पैसे देण्यात आले आहेत. त्याबद्दल तेथील मंडळींचा मी आभारी आहे.

आपणास पैशाची अत्यंत जरूरी आहे. इमारत फंडाशिवाय इतरही काही प्रसंग आपल्यावर येत आहेत. पैशाची आपत्ती सारखी वाढत आहे. इमारतीस सुरवातीला दोन-अडीच लाख रुपये लागतील असा माझ्या इंजिनियरने अंदाज केला होता. आता सिमेंट, लोखंड वगैरे सामान महाग झाल्यामुळे दोन-अडीच लाख रुपयांऐवजी 4 लाख रुपये खर्च येण्याचा संभव दिसत आहे.

चार लाख रुपयांची जबाबदारी कुठे आणि या सभेत मिळालेल्या अल्प निधीची जबाबदारी कुठे ? ही जबाबदारी लोकांना पार पाडणे शक्य नाही. त्यांच्यासाठी मला दुसरा उपाय योजावा लागेल. परंतु एका गोष्टीचा मला मोठा आनंद वाटतो. हल्लीच्या तुम्हा लोकात समाजकार्याविषयी उत्कट भावना निर्माण झाली आहे. काम करण्याचा तुमचा हा उत्साह पाहून मला अत्यंत समाधान वाटते, म्हणून येथील लोकांचा मी फार ऋणी आहे.

माझ्या स्वतःच्या मनात असे वाटते की, वरच्या वर्गाच्या संस्था ज्या उपायांनी कार्य करतात ते उपाय अंमलात आणावे हे चांगले. पुण्यातील ब्राह्मणांची सेवासदन सारखी संस्था घ्या. या संस्थेत मुलींना शिक्षणाचा लाभ मिळतो, त्या मुली काहीतरी काम करतात. उत्सव, सण वगैरे प्रसंगी त्या तिकिटे विकून पुष्कळ पैसा जमवितात. पूर्वी माझ्याकडेही असे लोक येत असत. पण आता मात्र ते येत नाहीत. याचे कारण माझी हल्लीची भूमिकाही असू शकेल.

आपले लोक सण वगैरे पाळीत नाहीत असे एका विद्यार्थ्याने सांगितले, लोक होळी पेटवीत नसतील, गणपती आणीत नसतील, पाडव्याच्या दिवशी तोरणे लावत नसतील परंतु सणाचा कारभार ते व्यवस्थित पार पाडीत असतील असे मला वाटते. अशा प्रसंगाला जे लोक समाजाच्या कार्याप्रित्यर्थ तिकिटे घेऊन घरोघर फिरतील तर बरे होईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. शिक्षण घेणे हे जरूर आहे. तुमची सर्वांची अशी भावना झाली आहे की, महार म्हणजे सरकारचा भिकारी, भाकरी मागणे हा आपला हक्क आहे असे आपण समजता पण तो खोटा आहे. मागणे हे कुत्र्याचे जीवन आहे. भीक मागण्याची वृत्ती लोकांनी सोडून दिली भाकरी पाहिजे. काँग्रेसने सत्याग्रहाची चळवळ केवळ आपले हक्क मिळविण्यासाठी सुरू केली आहे. मी जर काँग्रेसमध्ये गेलो तर 4 लाख रुपयाऐवजी 10 लाख रुपये इमारतीसाठी जमा करीन. पण ही श्वानवृत्ती आहे. माणसाची नाही. ही वृत्ती आपण सोडली पाहिजे. माणसाची वृत्ती धारण केली पाहिजे. आपण आपली जबाबदारी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते.

दुसरी गोष्ट अशी की, वर्ष दोन वर्षापासून जनता पत्रावर अनेक आपत्ती आलेल्या आहेत. जनता पत्राच्या जबाबदारीचे मूळ अत्यंत महत्त्वाचे असे आहे. तुम्ही जनता घेता. या अंकातील अग्रलेख काल रात्री 11 वाजता मी लिहून दिला व सकाळी ‘जनता’ तयार झाली. जनतेस लागणारा कागद साडे नऊ वरून साडे दहा रुपयापर्यंत गेला आहे. इतका प्रसंग पत्रावर आला असताना पत्र बंद करावे असे वाटू लागते. परंतु पत्र हा चळवळीचा आत्मा आहे. कोणत्या ठिकाणी कोणती विशेष गोष्ट घडली हे पत्राद्वारे आपणास समजते. म्हणून सांगतो की, ज्या दिवशी जनता पत्र बंद पडेल, त्याच दिवशी तुमची चळवळ मातीत जाईल. गेल्या शनिवारी आमची सभा झाली. पत्र बंद करावे की काय ? आठवड्याचे पत्र काढल्यास एक पान ठेवावे की काय ? पाक्षिक काढावे की काय ? युद्धामुळे जनतेस दरमहा 400 रु. ची तूट येते. ती भरून कशी काढावी ? शेवटी प्रेसमधील काही माणसे कमी करून 150 रु.ची बचत कशी तरी करता येईल असे ठरले. वेळ कठीण आहे. लढाईमुळे कागद महाग झाला आहे. कदाचित तो पुढे मिळणार नाही. सध्या जनता पत्र चालविण्याचे आम्ही ठरविले आहे. तथापि पत्राची जबाबदारी तुम्ही घेणे महत्त्वाचे आहे. येथेच विराम करून सर्वांचे आभार मानतो.

आता जास्त न बोलता तुमची जबाबदारी काय आहे याचा विचार करा असे सांगून शेवटी आभार प्रदर्शनार्थ श्री. एस. व्ही गायकवाड, बी. ए. यांनी भाषण केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password