Categories

Most Viewed

11 मे 1938 भाषण

“तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तारीख 11 मे 1938 रोजी नागपूर येथे सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यातर्फे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्याभ्यास संपल्यावर समाजकार्य हाती घ्यावे व समाजाची सेवा करावी वगैरे आशयाचे त्यांचे भाषण झाले. 10 वाजता पासून 4.30 पर्यंत कचेरीत गेले. नंतर संध्याकाळी 6 वाजता कामठी मुक्कामी श्री. हरदास एल. एन. यांच्याबरोबर स्वागत करण्यात आले. लोकसमुदाय फार मोठा होता. पण दुष्ट पावसाला ही गोष्ट खपली नाही. लोकांचा उत्साह दाबण्याकरिता त्याने आपले उग्र स्वरूप धारण केले. यामुळे समारंभ थोडक्यातच संपवावा लागला. लोकांना हार अर्पण करण्याकरिता वेळ नसल्यामुळे शेकडो हार मोटारीवर वरून टाकण्यात आले.

याप्रमाणे कामठीचा समारंभ संपवून आल्यावर त्यांच्या मुक्कामी बरीच कार्यकर्ती मंडळी जमली. त्यांच्यातील चर्चा जनतेच्या हिताच्या असल्यामुळे खाली देणे अयोग्य होणार नाही.

प्रथम जी. आय. पी. रेल्वे कामगारांनी आम्ही रेल्वेच्या युनियनमध्ये सामील व्हावे किंवा नाही म्हणून प्रश्न केले. त्यावर डॉक्टरसाहेब म्हणाले युनियन तुमच्या हिताचे कार्य करीत असेल तर तिचे सभासद सर्वांनी व्हावे. जर ही संस्था तुमचे हिताचे कार्य करीत असेल, तुमच्या हिताकरिता तुम्ही दिलेल्या वर्गणीतून एक पंचमांश भाग तुमच्या हिताकरिता राखून ठेवणे, तुमच्या संख्येच्या मानाने तुमचे प्रतिनिधी घेणे वगैरे गोष्टी राखीव करून तुमच्या हिताकरिता ठेवत असतील तर जरूर सर्वांनी भाग घ्यावा, नाही तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी. (हा प्रश्न गिरण्यातील कामगारांना देखील लागू आहे.) यानंतर नागपूर येथील कार्यकर्त्यांकडे त्यांचा मोर्चा फिरला. या वेळेला एम. एल. ए. सेक्रेटरी, सि. स्टे. सं. कमेटी, म्यु. सभासद, श्री. आर. आर. पाटील, सेक्रेटरी, मध्यप्रांत आणि वऱ्हाड फेडरेशन व इतर काही विरोधी पक्ष याशिवाय बरेच नागरिक हजर होते. ही खाजगी चर्चा रात्रीचे साडेबारा वाजेपर्यंत झाली. तिचा मुख्य व त्रोटक वृत्तांत खाली दिला आहे.

विरोधी पक्ष व डॉ. बाबासाहेबांचा पक्ष यांच्यातील एकमेकांच्या वैगुण्याविषयी बरीच चर्चा झाल्यावर यावर रामबाण उपाय डॉक्टरसाहेबांनी खालील प्रमाणे सुचविला.

(1) स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद हजारोंनी करा व ह्या पक्षाचे एकोप्याने बल वाढवा.
(2) दलित फेडरेशनचे कार्य जातीय ऐक्यापुरते ठेवा. [Optional]
(3) समता सैनिक दलातर्फे सार्वजनिक विहिरी व स्थळे हस्तगत करा.

यानंतर पक्षाचे तुकडे पाडणारांचे बरेचसे समर्थनपर भाषण झाले. पण बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होऊन सर्वांनी याच पक्षाखाली नवीन प्रतिनिधी निवडून एकच पक्ष ठेवावा. स्वतंत्र मजूर पक्षाचेच कार्य जोराने चालवावे. बाबासाहेबांच्या भाषणाने इतर विरोधी पक्ष दिपून गेले. आता लोकनियुक्त कारभार चालल्यास आमची गती काय होईल हे त्यांनाच समजेनासे झाले. डॉक्टर साहेबांच्या नावाचा उपयोग करून स्वतःला आंबेडकर पक्षीय म्हणविणाऱ्या इतर मंडळींना आमची सूचना आहे की, आतातरी बाबासाहेबांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे. आपापले प्रतिनिधी निवडून देऊन सर्व नागपूरात एकच एक डॉ. बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष कायम ठेवावा अशी श्री. आर. आर. पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password