Categories

Most Viewed

10 मे 1938 भाषण

“निवडून दिलेली माणसे आपले कर्तव्य करतात की नाही यावर पाळत ठेवा.”

नागपूर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मंगळवार, तारीख 10 मे 1938 ला सकाळी मेलने आले. ते एका क्रिमिनल खटल्याच्या निमित्ताने आले होते. ते नागपूरात आले हे कोणालाही पाहिल्याशिवाय खरे वाटेना. कित्येकांनी गिरण्यातून रजा काढून स्वनेत्रांनी त्यांना बघितल्यावर खात्री केली. अशा रितीने जनसमुदाय त्यांच्या दर्शनाकरिता हजारोंनी जमू लागला. आज कचेरीचे काम नसल्यामुळे थोडा विचारविनिमय करण्यास थोडी संधी मिळाली. तिचा फायदा घेऊन आपल्या दर्शनाचा लाभ करून देण्याकरिता रात्रीच्या वेळी आपला अर्धा तास देण्याची त्यांना विनंती करण्यात आली. स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर आणि समता सैनिक दल वगैरे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्थांनी इंदोरा येथे ताबडतोब जाहीर सत्कार करण्याची व्यवस्था केली. समारंभाच्यावेळी जोराचा वारा, जोराचा पाऊस व विजेचा कडकडाट असताना देखील बाबासाहेबांच्या दर्शनास लोकसमुदायाचे थवेच्या थवे जमू लागले. सत्यप्रसारक जलसा मंडळ, इंदोरा यांच्यातर्फे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले. समता सैनिक दलाचे सैनिक आपल्या गणवेषात हजर झाले. या सभेला निदान वीस हजारावर स्त्री-पुरुष, आबालवृद्ध जमले व बाबासाहेबांच्या आगमनाची उत्कंठतेने वाट पाहू लागले. तोच रात्री साडेनऊ वाजता डॉक्टर साहेबांची मोटार येताच सैनिकांतर्फे प्रथम बँडची सलामी व गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. बाबासाहेब विराजमान होताच टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाच्या जयघोषाने सर्व पटांगण दुमदुमून गेले. तेव्हा व्यासपीठावर येऊन श्री. आर. आर. पाटील, सेक्रेटरी, मध्यप्रांत आणि वऱ्हाड दलित फेडरेशन यांनी जमलेल्या लोकसमुदायाला उद्देशून म्हटले, “बंधु भगिनींनो ज्या देवाची एक तासापासून मोठ्या उत्कंठतेने वाट पहात आहा, तो देव आपल्या सर्वांच्यासमोर विराजमान झाला आहे. त्यांना हार अर्पण करण्यास आपण उत्सुक झाला आहात. मी ज्यांची नावे सूचवीन त्या अनुक्रमाने आपण येऊन बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करा.” स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर दलित फेडरेशन व समता सैनिक दलातर्फे हार अर्पण केल्यावर भारतीय सत्यप्रसारक जलसा मंडळ, बेझनबाग, आंबेडकर सोशल क्लब लायब्ररी, साहित्य चर्चा मंडळ, अस्पृश्य महिला वसतीगृह, आंबेडकर सहाय्यक समाज, विजयी समाज, महार नवयुवक दल, भानखेडा, बालवीर वाचनालय, सिरसपेठ, समताविजयी समाज, कुंभारपुरा वगैरे असंख्य गटांकडून हार अर्पण करण्यात आले. त्यांची यादी देणे स्थलअभावी कठीण होईल, यानंतर एक लहानसा पोवाडा डॉक्टर साहेबांच्या कामगिरीवर श्री. बाबू मेश्राम इंदोरा यांच्यातर्फे म्हणण्यात आला. बाबासाहेबांना दोन उपदेशपर गोष्टी सांगण्याबद्दल विनंती करण्यात आली. क्षणार्धात सुई पडेल तिचा आवाज ऐकू येईल इतकी शांतता झाल्यावर बाबासाहेब बोलण्यास उठत आहेत हे पाहून जोराचा टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाचा जयघोष केल्यावर बाबासाहेब म्हणाले,

बंधु भगिनींनो,
इतक्या अल्पावधीत वारा, पाऊस व विजांच्या कडकडाटात माझ्या अपेक्षेच्या बाहेर जमलेला लोक समुदाय पाहून मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. दुसरे असे की, मी ज्या कामाकरिता येथे आलो त्या कामाची मंडळी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी वाट पहात आहेत. अशावेळी त्यांना जास्त वेळ तिष्ठत ठेवणे हे देखील मला योग्य होणार नाही. तरी आपला जास्त वेळ न घेता एक दोन गोष्टींचा उल्लेख करून मी माझे भाषण संपवीन. तुमच्या प्रांतात झालेल्या बेकीचा विचार करण्याकरिता मला आता वेळ नसल्यामुळे त्याचा विचार मी पुढे कधीतरी करीन. तुम्हास माहीत असेल की तुमच्या प्रांतात ज्या 20 जागा मिळविल्या आहेत. त्या किती त्रासाने व कष्टाने मिळविल्या आहेत. तेव्हा त्या राखणे तुमचे कर्तव्य आहे. अस्पृश्य समाज गरीब व निर्धन आहे. त्याला राजकीय सत्ता हाती ठेवणे महाकठीण आहे. त्यातल्या त्यात काँग्रेस सारख्या मोठ्या संस्थेशी टक्कर देणे अत्यंत कठीण आहे. तेव्हा अशा कठीण वेळी ही तुम्हास मिळालेली राजकीय सत्ता राखणे अत्यंत कठीण आहे. तुम्ही निवडणुकीच्या वेळी निवडून दिलेली माणसे आपल्या हिताचे कार्य करतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. त्यांच्या कामावर पाळत ठेवणे, कौन्सिलमध्ये जे कार्य होते त्यात आपल्या हिताचे प्रश्न, ठराव वगैरे मांडतात किंवा नाही, हे पाहणे तुमचे कर्तव्य होय. प्रत्येक सेशनच्या शेवटी या लोकांनी केलेल्या कामगिरीचा जाब आज भरविलेल्या सभेप्रमाणे सभा बोलावून त्या सभेत त्यांना विचारू शकता. जे तुमच्या हिताचे कार्य करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते ज्या कॉन्स्टिट्युअन्सी मधून निवडून आले असतील त्या कॉन्स्टिट्युअन्सी मध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचार करणे हे तुमचे कर्तव्य होय. जसे निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे तसेच त्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे तुमचे आद्यकर्तव्य होय. यांच्यावर अशारीतीने पाळत ठेवल्याने ते भीतीने तरी कौन्सिलमध्ये कार्य करतील. अशारितीने तुमचे कार्य चालल्यास तुमच्या हिताचे बरेच कार्य होईल. आज मला वेळ नसल्यामुळे माझे भाषण येथेच संपविणे बरे होईल. असे म्हणून डॉक्टर साहेबांनी आपले भाषण संपविले. यानंतर डॉक्टर साहेबांचे व जमलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर डॉक्टर साहेबांच्या जयघोषात समारंभ संपला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password