“स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय अस्पृश्यांना तरणोपाय नाही.”
मे 1932 मध्ये सोलापूर अस्पृश्य जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थाटाच्या समारंभात मानपत्र दिले. हा मानपत्र समारंभ में पापया बाबाजी बेलपवार, ऑ. बेंच मॅजिस्ट्रेट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या समारंभास महार, मांग, चांभार, भंगी वगैरे सर्व जातींच्या लोकांनी भाग घेतला होता. या समारभ सभेस म धर्माजी नरसू खरटमल म्यु. कौन्सिलर, मोहनदास अन्याबा बाबरे, म्यु. कौन्सिलर, विश्राम जीना, भंगी, पंढरी सखाराम बंदसोडे, सिद्राम, बाबूराव जाधव, दत्तू तात्या सर्वगोड, म्यु. कौन्सिलर, नामदेव बुधाजी बंदसोडे, वगैरे निरनिराळ्या जातीचे पुढारी प्रामुख्याने हजर होते.
अस्पृश्यांनी आता यापुढे स्वतःच्या पायावर उभे राहून आपली सर्वांगीण उन्नती करून घेतली पाहिजे. हिंदू समाजाच्या सोवळ्या सहकार्याने अस्पृश्यता कदापिही नष्ट होणार नाही उलट आपल्या अंगी स्वावलंबनाचे वारे खेळू लागले आहे ते मात्र कमकुवतपणामुळे नष्ट होईल, अशा आशयाचा स्फूर्तिदायक उपदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानपत्रास उत्तर देताना केला.
भाषणाची तारीख दर्शविलेली नाही – संपादक.