Categories

Most Viewed

00 मे 1926 भाषण

“मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे.”

सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे 1926 च्या मे महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. डॉ. आंबेडकर मुंबईहून रहिमतपूरला आले व महारवाड्यातील तक्क्यात मुक्काम ठोकून राहिले. शिवतरकर, वनमाळी, गायकवाड, खोलवडीकर, खंडकर, जावळे इत्यादी मुंबईची मंडळी, कृष्णराव कदम, मा. सा. गायकवाड, जनार्दन रणपिसे, धर्माजी सावंत वगैरे पुण्याचे लोक आणि फलटणचे माधवराव अहिवले वगैरे सातारा जिल्ह्यातील लोक अधिवेशनासाठी आले होते.

अधिवेशनाला दुपारी तीन वाजता सुरवात झाली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती धनजीभाई कूपर, एज्युकेशनल अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीताराम रामजी तावडे मामलेदार दुदुस्कर, रामचंद्र ग सोमण, वकील वगैरे अधिवेशनास हजर राहिले होते. बहिष्कृत वर्गातील योग्य इसमास जे. पी. करावे असा एक ठराव होता. या ठरावाला सोमणांनी विरोध केला. देशात स्वातंत्र्य मिळविण्याची चळवळ चालली आहे. बहिष्कृतवर्ग सरकारने पदव्या च किताब आम्हाला द्यावेत अशी विनंती करून देशाच्या गुलामगिरीला पाठिंबा देत आहे. हे ठीक नव्हे, असा त्यांच्या विरोधी भाषणाचा साराश होता. सोमणाचे भाषण संपताच साहेब ताडकन उठले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

हिंदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषतः ब्राह्मण लोक यांनी आपल्या देशबांधवाना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले. हेच लोक हिंदू, मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्यांचे पाय चाटून ऐषारामी जीवन जगत आले. याच लोकांनी स्वार्थाधपणे आपल्या धर्मबांधवांना व देशबांधवांना परक्याच्या व स्वतः च्या गुलामगिरीत डांबून ठेवले. ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकवून ठेवली. आता हेच लोक राजकीय गुलामगिरीविरुद्ध बकवा करीत आहेत. हेच लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत. हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक समता देण्यास तयार नाहीत. या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरीने सत्यानाश केला आहे. या माझ्या विधानाची कोणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर ती मी देण्यास तयार आहे. माझे हे म्हणणे खोटे आहे असे येथे कोणाला सांगावयाचे असेल तर त्याने ते सांगावे. ते मी खोडून काढण्यास तयार आहे. अस्पृश्यांच्या हातात सत्ता व संपत्ती जसजशी अधिक येत जाईल तसतशी त्यांची प्रगती होत जाईल. जे. पी. होणे किंवा आमदार होणे ही प्रगती घडवून आणण्याची साधने होत. ती आम्ही हाती घेतलीच पाहिजेत. ती तुम्ही घेऊ नका असे सोमणांसारखे जे लोक म्हणतात ते आमच्या लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आहे त्याच गुलामी परिस्थितीत ठेवण्याचा डाव खेळत आहेत. सोमणांच्या जातभाईनी गेल्या पाच हजार वर्षात ब्राह्मणेतरांचा व अस्पृश्यांचा अनेक युक्त्या योजून छळ केला. धार्मिक हक्क नाहीत, ब्राह्मणापेक्षा तुम्ही नीच आहात असे त्यांच्या जातभाईनी तुम्हाला पुराणादी धर्मशास्त्रात लिहून त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याकडून करविली. आता ते म्हणतात. देशाभिमान हा फक्त ब्राह्मणांचाच सद्गुण आहे. म्हणून ब्राह्मण लोक देशासाठी तुरुंगवास, देहदंड व सुळावरची शिक्षा सोसत आलेले आहेत. ब्राह्मणेतर व अस्पृश्य शिक्षा सहन करण्यास पुढे येऊ लागले तर हेच ब्राह्मण लोक म्हणतील तुम्हाला राजकारण समजत नाही. सरकारी नोक-यातील बहुतेक सर्व मोक्याची ठिकाणे ब्राह्मणांच्या हातात आहेत. ती ठिकाणे ब्राह्मणेतर व अस्पृश्य हस्तगत करण्याची तयारी करू लागले की हे ब्राह्मण म्हणतील की या जागा भूषविण्यास तुम्ही लायक (एफिशिएंट) नाही. सांगण्याचा हेतू असा की, धर्म राजकारण, इत्यादी गोष्टीतही आम्हीच काय ते श्रेष्ठ व बाकीचे सर्व कनिष्ठ असे समजून आतापर्यंत ब्राह्मण वागत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक माजोरीपणा आणि बौद्धिक व्यभिचारीपणा आलेला आहे. ब्राह्मणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आतापर्यंत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौद्धिक व्यभिचाराला भिऊन त्यांचे गुलाम म्हणून गुपचुपपणे वागत आलेले आहेत. परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे. हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील, परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे. कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचारांच्या कितीही वल्गना मारीत असले तरी ते अद्याप मनाने क बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत. आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे. या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौद्धिक लबाड्या चव्हाट्यावर माडून अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती सोमणासारख्या भोंदू व मेदक लोकांनी तयार केलेल्या खड्ड्यात पडणार नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password