Categories

Most Viewed

08 मे 1955 भाषण

“बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे.”

भारतीय बौद्धजन समितीच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव श्री मंगलदास पक्वासा, माजी राज्यपाल, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 8 मे 1955 रोजी सायंकाळी 7 वाजता, नरे पार्क, सेंट्रल रेल्वे वर्क्स शॉप समोर परळ, मुंबई नं. 12 येथे मोठ्या थाटात साजरा करावयाचा आहे. मिरवणुकीसाठी तीन मार्ग आखलेले आहेत. त्याप्रमाणे ठिकठिकाणच्या लोकांनी या मिरवणुकीत भाग घेण्याची कृपा करावी. मिरवणुकीच्या लोकांनी 4.30 वाजता मिरवणुकीस सुरुवात करून सात वाजेपर्यंत नरे पार्क मैदानावर येण्याची खबरदारी घ्यावी. इतर ठिकाणच्या लोकांनी परस्पर नरे पार्क मैदानावर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत यावे, असे समितीच्या सचिवाने, जनता, दिनांक 7 मे 1955 च्या अंकात प्रसिद्ध केले होते.

यानुसार मुंबई नरे पार्क येथे दिनांक 8 मे 1955 रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला 80 हजार जनसमुदाय हजर होता. त्याला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

अध्यक्ष महाराज बंधु आणि भगिनींनो,
आज या ठिकाणी माझे येणे झाले आहे. ते एका दृष्टीने आगंतुक आहे. सभेला मी हजर राहीन, अशी अपेक्षा नव्हती. जाणार अशा अपेक्षेत मी होतो. या आज, उद्या, परवा दिल्लीला पण कर्मधर्म संयोगाने मला 12 तारखेपर्यंत गाडीचे तिकीट न मिळाल्यामुळे राहावं लागलं. त्या संधीचा फायदा घेऊन मी या सभेला हजर राहावं म्हणून मला आग्रह करण्यात आला. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी येथे उपस्थित झालो.

माजी गव्हर्नर अध्यक्ष असताना मला सभेला येण्याचे कारण नव्हते. माझ्या येण्याने सभेला महत्त्व येईल, असे वाटत नव्हते. परंतु लोकांचे म्हणणे धुडकावून लावणे योग्य नाही. या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला आनंद वाटतो. मोठा तुम्हा सर्व लोकांना चाळीचाळीचा अभिमान. तो माझगावच्या अड्यात राहणारा मी भायखळ्याच्या पिवळ्या चाळीत राहणारा ! जो कार्यक्रम व्हावयाचा असेल तो माझ्या अड्यात व्हावा ही इच्छा. आपापल्या गल्लीत कसला तरी समारंभ साजरा करतात. ही रूढी टाकून एकमताने हा समारंभ साजरा केलात याबद्दल अभिनंदन. तुम्ही नवीन घडा घातलेला आहे. तो दरवर्षी अशारीतीने चालवीत राहाल, अशी उमेद आहे.

मला अन्य गोष्टींचा आज समाचार घ्यावयाचा आहे. आज एक महिना मी मुंबईत आहे. मुंबईची वर्तमानपत्रे मी वाचतो. कोणीतरी माझ्याकडे कटिंगही पाठवित असतो. बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल अनेक लोकांची मते वाचायला मिळतात. किमानपक्षी सर्व वर्तमानपत्रातून टीका येते. अस्पृश्य लोक या कार्याला उद्युक्त झालेले आहेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आंबेडकर बहकविण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही धर्म स्वीकारल्यास तुमचे नुकसान होईल, डॉ. आंबेडकर वेडा आहे. त्यांच्या मागे लागू नका, तुम्ही खड्ड्यात पडाल, अशी ते टीका करतात. सार्वजनिक कार्यात टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. याचा मला खेद वाटतो अशातला भाग नाही. माझा जन्म दुसऱ्याची टीका सहन करण्यात गेला. ज्याप्रमाणे लहान पोराला त्याची आई दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावते त्याप्रमाणे हे लोक मला नेहमी काजळ लावतात. या कृत्याचे मला विशेष काही वाटत नाही.

आपल्यातील पुष्कळसे लोक अज्ञानी व काही सज्ञानी आहेत. त्यांच्यावर वर्तमानपत्रातल्या लिखाणाचा परिणाम होत असेल. त्या लिखाणाचा परामर्ष घेणे अगत्याचे आहे. तथापि, मला एक गोष्ट सांगावयाची आहे की टीका करण्याचा हक्क कोणाचा ? कोणी कोणावर टीका करायची ? ज्याला सहानुभूती आहे. त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणारालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाराला व मारणाराला टीका करण्याचा अधिकार नाही..

भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त शिकारी होता. त्याला शिकार करण्याचा नाद, तिरकमठा घेऊन पक्षी मारायचा. भगवान बुद्ध अहिंसेचा भक्त. देवदत्ताचे करणे भगवंताला नापसंत होते. ते म्हणत निरपराधी श्वापदांचा जीव घेऊ नका.’ त्यांना इतर लोक म्हणत तू नामर्द आहेस. तू क्षत्रिय नाहीस. एकदा देवदत्ताने शिकारीला जाण्याचे ठरविले. तेव्हा बुद्धाने सांगितले मी तुमच्या बरोबर शिकारीला येईन, पण बाजूला बसेन, तुम्ही शिकार करा. शेवटी ते शिकारीला गेले. एका झाडाखाली भगवान बुद्ध बसले. त्यानंतर देवदत्त तेथून निघून गेला. काही अवकाशानंतर एक पक्षी आकाशातून खाली पडला. तिथे भगवान बुद्ध बसले होते. तो पक्षी भगवंताने पाहिला. तो पक्षी तीर लागून पडला होता त्यांनी त्याच्या छातीतील तीर काढला. त्याला पाणी पाजले. त्याला छातीजवळ घेऊन ऊब दिली. त्याला सावध केले. देवदत्त पक्षाचा शोध घेत आला. त्याने बुद्धाला विचारले. मी एका पक्षाला उडत असताना बाण मारला तो कोठे पडला तुला माहीत आहे काय ? तो तुझ्या भवती पडला असेल. भगवंताने सांगितले पक्षी माझ्याजवळ आहे. त्याच्या पोटात बाण होता तो काढून टाकला. त्याची जखम धुतली, त्याला उब देऊन सावध केले.

देवदत्त म्हणाला, हा पक्षी माझा आहे. त्याबद्दल बराच वाद झाला. देवदत्ताने सांगितले शिकारीचा नियम असा आहे की, ज्याने जनावराला मारले तो त्याचा धनी. मी याला मारले आहे. मी याचा धनी. बुद्धाने सांगितले, “जो मरणासन्न जीवाचे रक्षण करील तोच धनी, मारणारा धनी नव्हे “. उभयताचे पुष्कळ वेळ भांडण झाले. ते म्हणाले : आपण हे पंचायतीपुढे मांडू. प्रत्येकाने आपापला प्रश्न पंचायतीसमोर मांडला. पंचायतीने बुद्धाच्यातर्फे निकाल दिला. जो रक्षण करतो तो धनी, हीच नीती खरी आहे.

म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते ? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की, अस्पृश्यांसाठी या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार ? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की, तुम्ही तोड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलात. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. खड्ड्यात पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय. त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. ह्या पडीत जमिनी तुम्ही स्वखुशीने दिल्या आहेत काय ? आम्ही आमच्या पायावर उभे राहू. हिंदुनी आमच्यासाठी काय केले ? त्यांनी एकच सुधारणा केली. ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या डब्यामध्ये बसतात. तेही माहीत नसत म्हणून (हशा)

पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबाबत कायदे होते. माझी आई सांगत असे, महार लोकांना कपडा विकत घ्यावयाचा असेल तर तो लांबून पाहावयाचा. त्याचे दाम काय ते विचारावयाचे. दुकानदार दुकानातून कपडा हालवीत असे. त्या माणसाने कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे. त्या कपड्यावर शिंपडावयाचे, नवीन कपडा चिखलात घासावयाचा. कारण त्यांनी नवीन कपडा घालू नये । फाटलेला कपडा त्यांनी वापरावयाचा. माती मध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करावयाचे. नंतर महाराने पैसे ठेवावयाचे व कपडे घेऊन जावयाचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो. ती पेशव्यांचीच आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी नि-या घालायच्या. ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रूमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळावयाचा, असा हा नियम होता.

इंग्रज सरकार आल्याने मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. सोनारावर पेशव्यांचा फार डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण. पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणासारखी धोतरे नेसत. त्यांनी अशी धोतरे नेसू नये, भ्रष्टाकार झाला, म्हणून सर्व पत्रामध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला, असे ओरडू लागले. साहेब बावरले. पेशव्याची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनावर निर्बंध होता. ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटी घालतात. ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला बालक होती. बाळकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटा घालीत होते. सोनाराने कसोटा घालावयाचा नाही. पंचानी 50 रुपये दंड सांगितला. आता लोक कोट-पाटलोन घालतात.

यांच्यात गाडीत बसण्याखेरीज दुसरा काही फरक झाला नाही. मग हे लोक टीका का करतात? हे आमचे हितचिंतक ? ते म्हणतात की तुम्ही बौद्धधर्मीय झाला तर स्कॉलरशिप्स जातील. पण गिरणीत जाणाऱ्यांना स्कॉलरशिप्सचं काय महत्त्व कळणार. ह्याचे महत्त्व जे शाळेत जातात त्यांना. ह्या पत्रकारांना असे कसे वाटते ? म्हणे स्कॉलरशिप्स मिळणार नाही. पण त्यासाठी मी जिवंत आहे ना ! (टाळ्या) मी मरेन तेव्हा काय व्हायचं असेल ते होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत भिण्याचे कारण नाही. शीख अस्पृश्यांना स्कॉलरशिप्स मिळते. धर्मावर स्कॉलरशिप्स अवलंबून नाहीत. त्या दैन्यावस्थेवर अवलंबून आहेत. तुम्ही दिली ती किती दिवस दिली. यावच्चंद्रदिवाकरौ असे तर नाही ना? चंद्र-सूर्य आहे तोवर स्कॉलरशिप्स मिळेल काय ? हे एक वर्षाचं, दोन वर्षाचं किंवा चार वर्षाचं कुंकू लावायचं आहे तर नवरा जगेल किंवा नाही, याचा भरवसा पाहिजे. आता सरकारी नोकरी किती वर्षे राहील. मी विधान केल्यानंतर पाच महिन्यांनी मुन्शी साहेबांच्या पोटात गोळा उभा राहिला. त्यांनी मुसलमानांच्या सवलती काढून घेतल्या. ख्रिश्चन होते त्यांनाही सवलती दिलेल्या होत्या. पण त्यांचा एक मनुष्य होता. त्यांना गव्हर्नर व्हावयाचे होते. त्यांनी मला काही नको म्हणून सांगितले. मग माझ्याकडे कागद आला. मी तो फाडून टाकला. दुसरे सोन्याची सरी घालतात म्हणून आम्ही काय फास लावायचा? मी लिहून दिले नाही म्हणून. आजपर्यंत आम्ही ते ठेवलं, पण आज त्याचा काही उपयोग नाही.

आमच्यातला एक मनुष्य इंजिनियर होण्याच्या लायकीचा आहे. पण त्याला अजून इंजिनियर करण्यात आले नाही. आमचा मुख्यमंत्रीदेखील त्यात सामील ! राजा जर प्रजाजनाला मारू लागला तर मग त्यांनी जावं कोणाकडे ? भूसके लड्डू जिसने खाया वह फसा. न खाया वह भी फसा.

. मला शिकलेल्या लोकांना सांगावयाचे आहे. महार लोक काय करीत होते ? रात्री उठून तराळला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावयाचा. फलटण गावामध्ये महार होते. त्यांना 24 बिघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते. त्यात अन्नछत्र होत असे. आपले एक निस्टर होते. एक गाडी लाडू, जिलेबी, चपाती वगैरे या छत्रालयातून देण्यात येत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जावयाचे. एवढे मिळाल्यानंतर महारांना जमीन मिळवायची काय गरज ! काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर हे महार म्हणाले, “आमची एवढी जमीन होती. ती मराठ्यांनी घेतली.” देवळातील उष्टे मिळायचे. अशी त्यांची अवस्था होती.

जळगावाला श्राद्ध झालं तर महार भिकारड्यासारखे कच-यावर बसायचे. हा ख्रिस्ताव झाला, तोंडचा घास काढला याने, याचं कसं बरं होईल, असे लोक मला म्हणत. माझा एक ब्राह्मण विरोधी होता. तो दरदिवशी त्रैराशिक मांडायचा. ढोराचे मांस, शिंगे, कातडी, हाड याची दोन-चार हजाराची किंमत दाखवीत असे. ‘डॉ. आंबेडकरांनी केलेले महाराचे नुकसान असा मजकूर केसरीतून येत असे. पण मी त्याला कधी उत्तर दिले नाही.

संगमेश्वरला एकदा सभा होती. महारांच्या सभेत मला या ब्राह्मणाकडून विचारणा झाली. मी जेवावयाला बसलो होतो. जेवल्यावर येतो म्हणून सांगितले. त्यांना जर वेळ असेल तर त्यांनी आत याये असे मी त्याला सांगितले. तो गृहस्थ म्हणाला. काम थोडसं आहे पण महत्त्वाचं आहे. तो म्हणाला “तुम्ही या सर्व लोकांना सांगता मांस खाऊ नका. ढोर ओढू नका. हे तुम्ही महारांचे नुकसान करता हे बरे का ?” मी बरे म्हणून सांगितले. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर खाजगी देऊ की सभेत देऊ म्हणून विचारले. सभेत उत्तर द्या. असे तो म्हणाला. मी लोकांना सांगितले यांना प्रश्न विचारावयाचे आहेत. तुम्ही त्यांचा प्रश्न लक्षात घ्या. त्यांनी त्रैराशिक मांडले. तुमची चळवळ नुकसानकारक आहे त्याने मांडलेले त्रैराशिक खरे होते. त्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान होते, असा त्यांचा प्रश्न होता. मी सांगितले, मी हे तुम्हाला एक हजार रुपये द्यावयास तयार आहे आणि तुम्ही जर ही ढोर ओढाल तर एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यासही मी तयार आहे; पण त्याच्याबरोबर तुम्ही वागायला हवं.

स्वाभिमान अत्यंत आवश्यक आहे. एखादी बाई कामाठीपुऱ्यात गेल्यावर पलंग, सोन्याचांदीचे दागिने आणते. सकाळी हाटेलवाल्याला हाक मारून सांगते. ए. अर्धा प्लेट खिमा, एक स्लाईस रोटी आण. चार वाजता चहा. संध्याकाळी पावडर लावून बसावयाचं. तिचे जीवन सुखमय असते, पण वेश्येला काही किंमत नाही, अब्रू नाही हे लक्षात ठेवा.

आम्हाला स्वाभिमानाचं जीवन हवं. त्यात दारिद्र्य प्राप्त झालं तरी हरकत नाही. मी 48 नंबरच्या चाळीत 50 नंबरच्या खोलीत राहात असे. झोपायला जागा नाही. उशी आणि धोतर घेऊन वर गच्चीवर झोपायला जायचा. खायला प्यायला मिळतय हा प्रश्न महत्त्वाचा नाही. स्वाभिमानाच्या जीवनाला महत्त्व आहे. किडा मुंगीचे जीवन आम्ही जगणार नाही. मी बौद्धधर्मात गेल्याने काही लोक म्हणतील, पॉलिटिक्स मधला किडा गेला ! पण हा पॉलिटिक्स मधला किडा जाणार नाही. राहाणार आहे. या लोकांना घेऊन राहाणार आहे.

माझी बौद्धधर्माची कल्पना वेगळी आहे. या धर्मातील लोक वकील, बॅरिस्टर, प्रधानमंत्री होतील, अशी तरतूद हवी आहे. हा धर्म आम्हाला पुनीत करणार. पथभ्रष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नावर विश्वास ठेवू नये.

हे लोक हिंदू धर्मात व बौद्ध धर्मात फरक नाही, असे म्हणतात. मग त्यातली चांगली वैरण आहे ती का खात नाहीत ? आम्हाला का खाऊ देत नाहीत ? बौद्ध धर्म वाईट आहे असे कोणी सांगू नये. हा वाईट धर्म आहे असे म्हणण्याची कोणाची प्रज्ञा नाही. सा-या हिंदुस्थान देशाने बौद्ध धर्म स्वीकारावा, बुद्ध धर्म व हिंदु धर्म एकच आहे. ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. यासाठी मी 5 ते 7 मुद्दे सांगणार आहे. हिंदू धर्मात खंडोगणती देव आहेत. तेहतीस कोटी देव आहेत. त्यांचे देवाशिवाय चालत नाही. सृष्टी कशी उत्पन्न झाली? कोणी सांगतं कुणीतरी अंड टाकलं, पण कुणी टाकलं हे माहीत नाही. भगवंताने सांगितले सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगता यावयाचे नाही. हा प्रश्न महत्त्वाचा नाही. ती कशापासून तरी केली किंवा काही अस्तित्वात नसताना केली. हे दोनच पर्याय असू शकतात. तिसरा पर्याय नाही.

जगामध्ये काही नसताना सृष्टी निर्माण केली ही गोष्ट दुरापास्त ईश्वर हा सृष्टीचा निर्माण कर्ता नव्हता. हिंदू धर्मात ईश्वर आहे. बुद्ध धर्मात ईश्वर नाही, हा मुख्य भेद आहे. बुद्ध धर्मात आत्मा नाही. हिंदू धर्मात आत्मा आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले आत्मा कसा आहे ? आत्मा वस्तु अशी आहे की, लोखंडाने ज्याला कापले तरी घाव पडत नाही असे उत्तर मिळाले. लोखंड हे लोखंडाने कापता येते. आत्मा ही वस्तु अशी आहे की लोखंडाने घाव करता येत नाही असे असू शकेल काय ? त्याचप्रमाणे आत्मा जळू शकत नाही. असे श्रीकृष्णाने उत्तर दिले. त्याचे असे सांगणे आहे की आत्म्याला क्लेश नाही. ताप येतो, खोकला येतो, पडसं होतं, हे सर्व थोतांड आहे. सत्य नाही. याच्यात भगवंताने एकदा विचारले आत्मा किती मोठा आहे ? त्याचा साईज काय आहे. लांबी-रूंदी काय आहे ? हा आत्मा आहे तरी कोठे ? असे याज्ञवल्क्य याला हजारो प्रश्न विचारले ब्राह्मणांनी ग्रंथ रचून ब्रह्म आहे, हे लोकांच्या घशात कोंबल आहे.

तिसरी गोष्ट, हिंदू चातुर्वर्ण्य मानतात पण बुद्ध धर्मात चातुर्वर्ण्य व जातीभेद नाही. एकदा लोहित ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला की तू शूद्रांना विद्या का शिकवितोस ! जो पात्र असेल त्याला विद्या, अपात्र असेल त्यांना विद्या नाही. ब्राह्मणी धर्म असा नाही. एकदा बुद्धाने आईला प्रश्न विचारला, संकट समयी मारणं हे कर्तव्य कसं ? बौद्ध धर्मात असे नाही. वैश्यांनी दगाबाजी करावयाची हे काय म्हणून बौद्ध धर्मात जातीभेद, असमानता, चातुर्वर्ण्य नाही. जातीभेद नष्ट करण्यासंबंधी ठराव करण्यात येतात. पण ते पुराणातील वांगी पुराणात, याप्रमाणेच होत. प्रत्यक्ष करायला सांगितले तर ते करीत नाहीत, जातीभेदाने अपरिमीत नुकसान झाले आहे. जातीभेद नष्ट करा! अवधेची धरू सुपंथ! पण त्यांना सुपंथ नको आहे.

बंधू आणि भगिनीनो, शिवाजीचे अष्ट प्रधान ब्राह्मण होते. त्यांची कुळकथा निराळी आहे. ते मराठ्यांना पंगतीला जेवावयाला घेत नसत. शिवाजीने बाळाजी आवजीला हे सांगितले, तो म्हणाला तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही. शेवटी शिवाजीने सांगितले काय करावयाचे असेल ते तुम्हीच करा. मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता. तो म्हणाला, लेका शुद्रा तू आमचा राजा होणार!’ त्याने शिवाजीची बेइज्जत केली. शेवटी बाळाजी आवजी हा राजपुतान्याकडे गेला. तेथे त्याने शिवाजीची वंशावळी तयार केली आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्याभिषेक करविला.

जातीभेदाच्या शेणातील किडे हे शेणातच राहतील. त्यांची शेणातून निघण्याची इच्छा नाही. त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल तेव्हा ते आपल्यामागे येतील. त्यांना असं वाटतं. दोनच माणसे हिंदू समाजातून जातील. डॉ. आंबेडकर व त्याची बायको. परंतु बौद्धधर्मसंबंधाने मतपरिवर्तन फार झाले आहे. पुढच्या वर्षी सारनाथ येथे बुद्धशिष्य जमा होतील. खर्चासाठी उत्तरप्रदेश सरकार पस्तीस लाख रुपये खर्च करणार आहे. सरकार दोन कोटी रुपये खर्च करणार. उत्तरप्रदेश मागासलेला देश. त्यांच्या भारत त्याला पूर्वी गोंडवण-आर्यावर्त म्हणत, उत्तरप्रदेश सरकारचे पस्तीस लाख रुपये म्हणजे उगवणाऱ्या झाडाची हिरवी पाने. कोणी काही तरी केले तरी बुद्ध धर्म या देशात येणार त्याला कोणी आड येऊ शकत नाही. या पुरामध्ये सर्व जे उलट दिशेला वाहून जातील. जातील तेही वाहून जातील. या देशातील सारी जनता अज्ञान होती. ब्राह्मणांनी पुस्तकात काय लिहिलय याची त्यांना कल्पना नव्हती. 2-4 आण्याला ही पुस्तकं मिळतात. मी इथं येण्याच्यापूर्वी भागवत वाचीत होतो. त्यावरून ज्ञानवान माणसे असे कसे लिहू शकतील अशी शंका येते.

तुम्ही अज्ञान आहात. तुमच्यातली शिकलेली मुलंही अज्ञान आहेत. मी दोन-चार दिवसापूर्वी उपनिषद वाचीत होतो. त्यातील छांदोग्योपनिषदात गुरुशिष्यांचा संवाद दिला आहे. शिष्याने शंका विचारली आहे. पण शंका काढण्याला देखील ज्ञान लागतं.. तुला ज्ञान आहे काय ? तुला ज्ञान नाही तर मग तुला शंका काढण्याचा अधिकार काय ? असे गुरुने उत्तर दिले. आमच्या विद्वानांना याचं काय ज्ञान,

भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले. मी सांगतो म्हणून हा धर्म तुम्ही घेऊ नका. घ्या. व्यवहारात हा धर्म चालू शकेल असं तुम्हाला वाटलं तरच तुमच्या बुद्धिला पटला तरच हा धर्म माना, एकजीवाने, अंक चित्ताने आपणाला गेलं पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल.

बौद्ध धर्मामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. या धर्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे. आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यावयाचे आहे. हेच कर्तव्य होय. दोन-चार दिवसापूर्वी आम्ही एक संस्था स्थापून रजिस्टर केली आहे. या संस्थेचे सभासद व्हावे, अशी विनंती आहे. वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही. कार्याला सुरवात तर झाली पाहिजे. तरी सर्वांनी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे. यासाठी एक रुपया भरावा लागेल. आपल्याला मंदिरे बांधावी लागतील. तेथे स्त्रिया-पुरुष जाऊन भक्तिभावाने पूजा करतील. आपल्यात उपटसुंभ लोक फार आहेत. तो प्रकार मी इथं होऊ देणार नाही. पावती घेतल्याशिवाय कोणी पैसे देवू नयेत. श्री. बी. एस. गायकवाड, श्री. का. वि. सवादकर, श्री. बाळू कबीर हे तुमच्याकडून फॉर्म भरून घेऊन पावती देतील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password