Categories

Most Viewed

08 मे 1954 भाषण

“तुम्ही बांधलेल्या देवळात बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.”

मुक्काम देहू रोड, जिल्हा पुणे येथे संत चोखोबाराय व बुद्ध वाचनालय मंदीर बांधण्यात आले आहे. या मंदिरासाठी आजपर्यंत एकूण 1,200 रुपये जमा झाले. या रकमेत मंदिराचा कळस होऊन अर्धे अधिक काम व्हावयाचे आहे. या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोणावळा मुक्कामी आले असता, मंदीर समितीच्या काही सदस्यांनी त्यांची भेट घेतली. सदरप्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी बौद्धधर्माबद्दल सविस्तर माहिती सांगून, बौद्धधर्म प्रचाराची अत्यंत आवश्यकता असल्याचे मंडळीस समजावून देताना ते म्हणाले.

तुम्ही चोखोबारायाचे मंदीर बांधले आहे. ज्या चोखोबाची मूर्ती आपल्या नजरेसमोर नाही किंवा पाहिलेली नाही. किंबहुना त्या काळात चोखोबाला आपल्या जीवनात काही करता आले नाही. त्या चोखोबाबद्दल आपण आस्था बाळगणे हितावह नाही. आणि म्हणून आपण आता ज्या भावनेने प्रेरित झालो आहोत त्या भावनेला या काळात तरी पायाखाली तुडविता येत नाही.

माझ्या कार्याचा एक भाग जर मी या विषयासाठी ठेवला असता तर या गोष्टीबद्दल जनतेत आदर निर्माण झाला असता व माझ्या ध्येयाचे धागेदोरे हमखास जगभर पसरले असते. परंतु माझ्या मागे अनेक कामांचा व्याप असल्यामुळे मला या गोष्टीसाठी थोडाही वेळ देता आला नाही.

धर्म प्रचलित रुढीच्या आहारी गेलेली दलित जनता अंधश्रद्धेने अधोगतीस गेली आहे. हिंदू धर्माच्या 33 कोटी देवांची पूजा करताना हजार पावसाळे त्यांनी घालविले. धर्माचा अभिमान म्हणून आजवर ही भोळी जनता त्याची री ओढीत आहे. परंतु सत्यता, अहिंसा, परोपकार या त्रिवेणी संगमाचा झरा वाहणाऱ्या झ-याला शंकराचायांनी बांध घातला. आज तीच नदी समुद्र होऊन तिच्यात काही अंधश्रद्धाळू पूज्य भावनेने स्नान करून पापाचे क्षालन करीत आहेत. ज्या धर्मात माणुसकी नाही त्या धर्माच्या देवाबद्दलसुद्धा आपलेपणा वाटणे इष्ट नाही. आता यापुढे आपणास अन्य भावनेने किंवा हेतूनेच पुढील कार्याची आखणी करावयास पाहिजे. मला तुम्हाला असा सल्ला द्यावासा वाटतो की, तुम्ही बांधलेल्या देवळात बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.

शेवटी मंदिर समितीने. मूर्तीची प्रतिष्ठापना डॉ. बाबासाहेबांच्या हस्तेच करण्याची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. तेव्हा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी जातीने हजर राहाण्याचे आश्वासन देऊन, मित्राकडून बुद्धाची मूर्ती देवविण्याचेही डॉ. बाबासाहेबांनी कबूल केले आहे.

टिप : जनतेच्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीची तारीख दर्शविली नाही. संपादक.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password