Categories

Most Viewed

08 मे 1932 भाषण

“अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच.”

कामठी येथे दिनांक 7 आणि 8 मे 1932* ला अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता लोकांचा उत्साह अतिशयच दांडगा होता. डॉ. आंबेडकर हे शुक्रवार तारीख 6 मे 1932 रोजी मुंबई येथून नागपूर मेलने निघणार हे नागपूरला आगाऊच जाहीर झाले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब मुनुस्वामी पिल्ले व मद्रासकडील प्रतिनिधी हेही शनिवारी सकाळी येण्याचे जाहीर झाले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी 5-45 च्या नागपूर मेलने डॉ. आंबेडकर व मुंबईतील इतर प्रतिनिधी निघाले. त्यांना बोरीबंदरवर निरोप देण्यात आला होता. नागपूर मेल झपाझप आपला मार्ग आक्रमित मोठमोठ्या स्टेशनवर थांबत असे. बोरीबंदर सोडल्यापासून मेल कल्याण येथे थांबते. कल्याणच्या प्लॅटफार्मवर गाडी येताच ‘डॉ. आंबेडकर की जय’ म्हणून जयनाद उमटताच स्टेशनभर चोहोकडे खळबळ व गडबड सुरू झाली. लोकांनी डॉ. आंबेडकरांना हारतुर अर्पण केले व त्यांच्या कार्यास यश चिंतिले. अगदी हा व असलाच प्रकार कसारा, इगतपुरी, देवळाली. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, मुर्तिजापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव वगैरे स्टेशनवर झाला. ह्याच गाडीला आसामचे गव्हर्नर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना प्लॅटफार्मवर सोडण्यात आले नाही. तरीपण लोकांनी दर एक स्टेशनचे वातावरण डॉ. आंबेडकरांच्या जयजयकारानी अगदी निनादून सोडले. दिनांक 7 मे 1932 रोजी नागपूर मेल बरोबर 9 वाजता नागपूर स्टेशनवर पोहचताच ‘डॉ. आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय’ च्या गगनभेदी गर्जना चोहोकडे घुमू लागल्या. जवळ जवळ 5000 लोक प्लॅटफार्मवर डॉ. साहेबांच्या स्वागतास आतुरतेने वाट पाहात बसले होते. डॉ. आंबेडकर डब्यातून उतरताच व श्री. तुळशीराम साखरे, एम. एल.सी. ह्यांनी त्यांचे स्वागत करताच नागपूर येथील समता सैनिक दलाच्या बँडचे सुस्वर नाद वातावरणात विलीन होऊ लागले. लोकांच्या गर्दीपुढे, सिटी मॅजिस्ट्रेट, पोलीस सुपरिन्टेंडेंट व इतर पोलीस ऑफिसर्सना बंदोबस्त करता करता नाकीनऊ आले. स्टेशनबाहेर पडलाच समता सैनिक दलाच्या एक हजार व्हालंटियर्सनी पाहुणे मंडळीस गार्ड ऑफ ऑनर दिला. स्टेशन कंपाऊंड मध्ये लोकांचा नुसता तोबा उडून गेला होता. दहा ते पंधरा हजारांचा प्रचंड लोकसमुदाय बाहेर “डॉ. आंबेडकर की जय” म्हणून सारख्या घोषणा देत होता. आज नागपूर येथील सर्व गिरण्या, कामगार लोक डॉ. आंबेडकरांच्या स्वागतास आल्यामुळे बंद होत्या. एका गिरणीत हिंदू व काही मुसलमान कामगार फक्त गेले होते.

ह्या कंपाऊंड मध्ये लोकांना डॉ. साहेबांचे दर्शन व्हावे म्हणून लहानसे आसन तयार करण्यात आले होते. गार्ड ऑफ ऑनरची सलामी होताच डॉ. आंबेडकर लोकांच्या जयजयकारात येथे येऊन बसताच अगोदरच आलेले काँग्रेसचे अध्यक्ष व रावबहादूर श्रीनिवासन तेथे येऊन बसले. लोकांकडून ह्या तिन्ही पाहुण्यांचा हारतुऱ्यांनी सन्मान झाला. अध्यक्ष व डॉ. आंबेडकर ह्याची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगताच लोकात आणखीच उत्साह वाढला. नानाप्रकारच्या फुलांनी श्रृंगारिलेल्या मोटरमध्ये डॉ. आंबेडकर मुनुस्वामी पिल्ले व रा. ब. श्रीनिवासन ह्यांना बसविण्यात आले होते. इतर पाहुण्यांकरिता आणखी मोटारी देखील मिरवणुकीत होत्या. बरोबर 9.45 ला मिरवणूक सुरू झाली. दहा ते पंधरा हजारचा प्रचंड जनसमुदाय डॉ. आंबेडकर की जय करीत बरोबर चालत होता. वरून ऊन्ह जरी जोराने तापत होते तरी लोक त्याला दाद देत नव्हते. इंदोरा, गड्डीगुदामला मिरवणूक येताच जवळ जवळ 500 स्त्रिया डॉ. आंबेडकरांना पुष्पहार घालण्याकरिता सामो-या आल्या. काही वेळ मिरवणूक थांबविण्यात आली. डॉक्टर साहेबांनी त्यांचा प्रेमाने निरोप घेतल्यावर मिरवणूक पुढे गेली. मांडवापर्यंत मिरवणूक येताच श्री साखरे यांनी कॉंग्रेसचे अधिवेशन संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल म्हणून सांगितले व लोकांना आपले जेवणखाण आटोपण्यास विनंती केली. स्टेशनवरून निघालेली मिरवणूक इंदो-यापर्यंत आली. तेथे ती लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संपविण्यात आली. पाहुण्यांच्या मोटारी मग तशाच कामठी येथे जाण्यास निघाल्या. नागपूरपासून कामठी गाव अवघे 10 मैल आहे. येथे गावच्या वेशीजवळ येताच पुन्हा कामठी येथील लोकांतर्फे स्वागत होऊन काँग्रेसच्या मांडवापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ह्याही मिरवणुकीत सहा सात हजार स्त्रीपुरूष मंडळी होती. समोर बैंड वाजत होता व डॉ. आंबेडकरांचा जयघोष चालू होता.

पंजाब, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार, ओरिसा, मुंबई वगैरे ठिकाणचे प्रतिनिधी शुक्रवारीच कामठीस येऊन पोहचले होते.

काँग्रेसचा मांडव फारच मोठा असून त्यात 15 हजार पर्यंत लोकसमुदाय बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून तो लतापताकांनी सुशोभित केला होता. अध्यक्ष व इतर पुढाऱ्यांकरिता चांगला सुंदरसा प्लॅटफार्म तयार करण्यात आला असून त्यावर कोचेस, खुर्च्या वगैरे ठेवण्यात आलेल्या होत्या. आलेल्या प्रतिनिधींकरीता प्रशस्त बंगले भाड्याने घेण्यात आले होते. काँग्रेसच्या मांडवात जाण्याकरिता एक मुख्य व इतर तीन दरवाजे ठेवण्यात आलेले होते. जवळच प्रतिनिधीचे टिकीट घेण्याचे ऑफिस उघडण्यात आले असून बाजूलाच पण जरा दूर दुकानदारांची सोय करण्यात आलेली होती. अध्यक्षास थोडासा उशीर झाल्यामुळे बरोबर 6 वाजता काँग्रेसच्या बैठकीस सुरवात झाली. प्लॅटफॉर्मवर दर एक प्रांतातील प्रमुख पुढा-याची बसण्याची सोय केलेली होती. ह्या प्रमुख लोकात बंगालचे श्रीयुत मलिक, दुसीया, विश्वास, यु. पी. चे स्वामी अच्छुतानंद, रामसहाय बलदेव प्रसाद जयस्वाल, शामलाल बक्तायरलाल, पंजाबचे मि. हंसराज, हरीराम, जालंदरचे गुरुहतासिंग, बिहारचे श्री. श्रीधर रासमल, पुण्याचे सुभेदार घाडगे, नाशिकचे पतितपावनदास, मदासचे श्री. कॅनन व रा. ब. श्रीनिवासन, मुंबईचे डॉ. आंबेडकर, शिवतरकर, खोलवडीकर, वनमाळी वगैरे पुढारी लोक प्रामुख्याने दिसत होते. बरोबर 6 वाजता स्वागत कमिटीचे अध्यक्ष श्री हरदास हे भाषण करावयास उभे राहिले. स्वागताध्यक्षांचे भाषण होऊन अध्यक्षांचे भाषण झाले. नंतर ठिकठिकाणाहून आलेल्या 50-60 तारा व तेवढीच पत्रे स्वागत कमिटीचे सेक्रेटरी ह्यांनी वाचून दाखविली. त्यात फक्त एक तार खेरीज करून बाकी सर्व तारा स्वतंत्र मतदार संघाला पाठिंबा देणाऱ्या, राजा-मुंजे कराराचा निषेध करणाऱ्या व रावबहादूर श्रीनिवासन व डॉ. आंबेडकर यांच्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या होत्या. या सर्व पत्रव्यवहाराचा व तारांचा या ठिकाणी तरजुमा देणे किंवा उल्लेख करणे स्थलाभावामुळे अशक्य आहे. तथापि काहीचा उल्लेख करणे अवश्य आहे. त्यापैकी मुंबई इलाख्यातील मुक्काम मदग, जिल्हा धारवाड येथून रा. निलाप्पा एलाप्पा बेलोडी, म्युनिसीपल स्कूल मेंबर व बसाप्पा नागप्पा घोडके, जनरल मर्चंट यानी स्वागताध्यक्ष यांना खालील पत्रक लिहिले होते.

“सप्रेम नमस्कार, वि. वि. आपल्या कॉंग्रेस बद्दलची नोटीस जनता पत्रातून पाहिली. काही अडचणीमुळे आम्हास सभेस हजर राहाता येत नाही. आमच्या कडील सर्व अस्पृश्य लोकांचा डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असून तेच आमच्या अस्पृश्य समाजाचे खरे पुढारी आहेत. डॉ. मुंजे व रा. ब. राजा यांच्या पॅक्टला आमच्या कर्नाटकी जनतेचा पाठिंबा नाही. रावबहादूर राजा व गवई यांनी आयत्यावेळी स्वतंत्र मतदार संघाला विरोध करून जो अवसानघातकीपणा केला याच्याबद्दल इकडील सर्व जनतेला त्यांचा निषेध करणे भाग पडले आहे. आमचे हे पत्र सभेत वाचून दाखविण्याची मेहेरबानी करावी.

मुंबईहून रोहिदास ज्ञानोदय समाज या संस्थेने रा. वनमाळी यास आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. त्यांच्याबरोबर जो संदेश पाठविला होता, त्यात स्वतंत्र मतदार संघच अस्पृश्यांना पाहिजे असे म्हटले आहे.

रा. वनमाळी व रा. निलप्पा एलाप्पा बेलोडी हे जातीने चांभार आहेत व रा. बसाप्पा नागाप्पा घोडके हे जातीने ढोर आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवली म्हणजे काँग्रेसच्या लोकांकडून जी फुटाळकीवजा विधाने केली जातात की, डॉ. आंबेडकरांच्यावर फक्त महार जातीचाच विश्वास आहे तसेच स्वतंत्र मतदार संघ फक्त महार लोकांनाच पाहिजे. चांभार, ढोर स्वतंत्र मतदार संघाचे विरोधी आहेत ते किती फोलकट आहेत हे सहज दिसून येण्यासारखे आहे. उल्लेख करण्यासारखे दुसरे पत्र म्हणजे, आसाम प्रांतातील अस्पृश्यांचे पुढारी बाबू सोनाधरदास सेनापती यांनी रा. ब. एम. सी. राजा यांना डॉ. आंबेडकरांच्या मार्फत पाठविलेले होय.

परिषदेला कलकत्त्याहून अखिल भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे जनरल सेक्रेटरी यांचेही एक पत्र आले होते. त्यात परिषदेचे अभिष्ट चिंतून सर्व अस्पृश्य वर्गांनी बुद्ध धर्माची दीक्षा घ्यावी असे सूचित केले होते.

नंतर विषय नियामक कमिटीची निवड करण्याचा प्रश्न विचारात घेण्यात आला. रात्री बरोबर 11 वाजता विषय नियामक कमिटीच्या बैठकीस सुरूवात होऊन कमिटीचे काम रात्री 3 वाजता संपले. विषय नियामक कमिटीत ज्या ज्या लोकांचे जे काही प्रश्न होते त्या सर्वांस डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट उत्तरे देऊन सर्वांचे चांगले व पूर्णपणे समाधान केले.

: दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम :

दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कॉंग्रेसच्या अधिवेशनास पुन्हा सुरुवात झाली. लोकसमुदाय पहिल्या दिवसाइतकाच होता. सुरवातीस अध्यक्षांनी काँग्रेसचे यश चिंतणाऱ्या आणखी तारा आल्याचा उल्लेख केला. नंतर काँग्रेसच्या खुल्या अधिवेशनात खालील ठराव मांडण्यात आले.

: काँग्रेसमधील ठराव :

ठराव 1 ला : ही काँग्रेस सार्वभौम बादशहाठायींची आपली राजनिष्ठा व्यक्त करते.

ठराव 2 रा : ही काँग्रेस खुनाच्या चळवळीचा व कायदेभंगाच्या चळवळीचा निषेध करते. ह्या चळवळीला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारने करावा, अशी सरकारास सूचना करते.

ठराव 3 रा : – बंगाल प्रांतातील मिदनापूर जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट मि. डगलस, आय. सी. एस. यांचा अमानुषपणे खून करण्यात आला. त्याचा ही कॉंग्रेस निषेध करते व रा. डगलस यांच्या कुटुंबाबद्दल आपली सहानुभूती व्यक्त करते.

ठराव 1,2,3 हे अध्यक्षांनी अध्यक्षपदावरून मांडले ते सर्वानुमते पास झाले.

ठराव 4 था : – नवीन राज्यघटनेत अस्पृश्यांचे हितसंबंध पूर्णपणे रक्षण करण्याची व्यवस्था करू, अशा प्रकारचे अभिवचन दिल्याबद्दल ही कॉंग्रेस सेक्रेटरी ऑफ स्टेट यांना धन्यवाद देते. परंतु सरकारशी सहकारिता करणाऱ्या पक्षाकडे दुर्लक्ष करून सरकारशी असहकार करणाऱ्या पक्षाची मनधरणी करण्याचा सरकारी धोरणाचा जो कल दिसून येतो. त्याबद्दल ही कॉंग्रेस आपली दिलगिरी व्यक्त करते.

ठराव मांडणार- मि. विश्वास (बंगाल)
अनुमोदन-मि. बलदेवप्रसाद (संयुक्त प्रांत)
ठराव सर्वानुमते पास झाला.

ठराव 5 वा : (अ) राऊंड टेबल कॉन्फरन्समधील अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यास ही कॉंग्रेस आपली संमती देते.

(ब) ही कॉंग्रेस सार्वभौम सरकार यास असे कळवू इच्छिते की, अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यात जे काही हक्क अस्पृश्यांचे म्हणून दर्शविले गेले आहेत ते कमाल हक्क नसून किमान हक्क आहेत . त्यात कोणत्याही प्रकारची छाटाछाट किंवा फेरबदल करण्यास ही कॉंग्रेस कबूल नाही व तशी छाटाछाट किंवा फेरबदल करण्यात आल्यास त्यासंबंधी अस्पृश्य वर्गाच्या हल्लीच्या राजकीय धोरणात फेरबदल करणाचा अधिकार ही काँग्रेस राखून ठेवीत आहे.

(क) ही कॉंग्रेस सार्वभौम सरकारास असे जाहीर करू इच्छिते की. अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यात वीस वर्षांनंतर अस्पृश्य वर्ग स्वतंत्र मतदार संघाच्या ऐवजी एकत्रित मतदार संघ मान्य करील, असे जे कलम आहे त्याच्या पूर्ततेसाठी शिरोगणती मतदान पद्धत ही एकच शर्त नसून अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यात जेवढ्या प्रतिनिधींच्या जागा मागण्यात आल्या आहेत तेवढ्या त्यांना मिळणे ही महत्त्वाची शर्त आहे.

(ड) अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी कमी व्हावेत म्हणून अस्पृश्यांची लोकसंख्या कमी दाखविण्याचा हिंदू लोकाचा जो उपक्रम चालू झाला आहे. त्याचा ही कॉंग्रेस निषेध करते व त्यांनी दिलेली लोकसंख्या खरे मानणे हे धोक्याचे आहे, असे सार्वभौम सरकारास जाहीर करते.

(इ) ही काँग्रेस असे स्पष्टपणे जाहीर करू इच्छिते की, स्वतंत्र प्रतिनिधीत्वाचा हक्क हा अस्पृश्य वर्गाचा त्यांच्या आत्मसंरक्षणाकरता असलेला नैसर्गिक हक्क आहे. तो तत्कालिक स्वरूपाचा नाही. आणि म्हणून लोथियन कमिटीपुढे साक्ष देताना अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधीत्वाचा हक्क फक्त काही कालपावेतो पाहिजे, असे विधान रा. ब. राजा यांनी केले. त्या विधानाचा ही कॉंग्रेस साफ इन्कार करते.

मांडणार- मि. एम. बी. मलिक (बंगाल)
मांडणार- मि. एन. सी. घुसिया (बंगाल)
अनुमोदन-मि. रामसहायी (यू.पी.)
अनुमोदन-मि. साखरे (सी. पी.)
अनुमोदन- मि. हंसराज (पंजाब)
अनुमोदन-मि. गाडेकर (मुंबई)
अनुमोदन-मि. कानन (मद्रास)
पुष्टी – महात्मा कालिचरण नंदागवळी (सी. पी.)
पुष्टी मि. ओगले (व-हाड)
पुष्टी- स्वामी अच्छुतानंद (यू.पी.)
पुष्टी श्रीमती अंजनिबाई (सी. पी.)

मि. खांडेकर (सी. पी.), मि. जाटव (दिल्ली) हे दोन विरुद्ध बाकी सर्वानुमते पास.

ठराव 6 वा : – राजा-मुंजे करार हा अस्पृश्य वर्गाच्या राजकीय हितसंबंधास विघातक असल्यामुळे ही कॉंग्रेस त्याचा इन्कार करते व तो अस्पृश्य वर्गास बंधनकारक नाही असे जाहीर करते.


मांडणार- पि. बी. मलिक (बंगाल)
अनुमोदन – स्वामी अच्छुतानंद (सं. प्रांत)
पुष्टी – बलदेवप्रसाद (सं. प्रांत) बिहाडे (म. प्रात)

मि. खांडेकर (म. प्रांत) व जाटव (दिल्ली) हे दोन विरुद्ध बाकी सर्वानुमते पास

ठराव 7 वा : राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्य वर्गाला फारच थोडे प्रतिनिधी देण्यात आले. त्याबद्दल ही कॉंग्रेस आपली दिलगिरी प्रदर्शित करते. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पुढील अधिवेशनात अस्पृश्य वर्गास भरपूर प्रतिनिधी देण्यात यावेत अशी सरकारशी आग्रहाची मागणी करते.

मांडणार- दुलोरलाल (म. प्रांत)
अनुमोदन सुभेदार घाटगे (मुंबई)
पुष्टी-पाटील (सं. प्रांत)
ठराव सर्वानुमते पास,

ठराव 8 वा : – डॉ. आंबेडकर व रा. ब. श्रीनिवासन यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जी कामगिरी केली तिच्याबद्दल ही काँग्रेस त्यास धन्यवाद देते. त्यांच्यावर अस्पृश्य वर्गाचा पूर्ण विश्वास आहे असे जाहीर करते.
ठराव अध्यक्षांनी अध्यक्षपदावरुन मांडला व तो सर्वानुमते पास झाला.

ठराव 9 वा : पंजाबच्या कायदेकौन्सिलात अस्पृश्य वर्गाचा एकही प्रतिनिधी देण्यात आलेला नाही. याबद्दल ही कॉंग्रेस आपली दिलगिरी व्यक्त करते. येत्या वेळी त्यांचा प्रतिनिधी घेण्याची तजवीज करावी, अशी सरकारास आग्रहाची विनंती करते.

मांडणार-हंसराज (पंजाब)
अनुमोदन कानन (मद्रास)
पुष्टी गुसावीलाल (म. प्रांत)
ठराव सर्वानुमते पास.

ठराव 10 वा : – मूलभूत हक्कांचा तक्ता जो तयार करण्यात येत आहे. त्यात खालील मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात यावा.


(अ) स्थानिक स्वराज संस्थातून अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र मतदार संघामार्फत त्यांचे प्रतिनिधी घेणे.

(ब) मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यात उच्चप्रतिच्या शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता काही रक्कम निदान काही मुदतीपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी घेणे,

मांडणार-शामलाल (म. प्रांत)
अनुमोदन – वनमाळी (मुंबई)
पुष्टी-बारसे (सं. प्रांत)
पुष्टी-मेढे (मुंबई)
ठराव सर्वानुमते पास.

ठराव 11 वा.”ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन” या नावाची सर्व अस्पृश्य वर्गाची मध्यवर्ती संस्था स्थापन करण्यास ह्या काँग्रेसची पूर्ण संमती आहे. या मध्यवर्ती संस्थेचे काम चालविण्याकरिता नेमलेल्या तात्पुरत्या कमिटीस आपली संमती देते.

ठराव 12 वा : –ही काँग्रेस नाशिक सत्याग्रहीचे अभिनंदन करते.
ठराव 11 व 12 हे अध्यक्षांनी अध्यक्षपदावरून मांडले व ते सर्वानुमते पास झाले.

काँग्रेस पुढील ठरावावर श्री. मलिक, रामसहाय, नंदागवळी व साखरे ह्यांची अतिशय परिणामकारक भाषणे झाली. सर्व ठराव पास झाल्यावर डॉ. आंबेडकरांनी निदान दोन शब्द तरी बोलावेत म्हणून लोकांचा आग्रह सुरू झाला. लोकांच्या या आग्रहास्तव डॉ. आंबेडकर जवळ जवळ 1.30 वाजता बोलावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे येणे फारच आवश्यक आहे. याकरिता सर्व लोकांनी संघटित होऊन आपला राजकीय दर्जा संपादन केला पाहिजे. जोपर्यंत ह्या देशाच्या राजकीय नियंत्रणावर अस्पृश्य लोकांचा ताबा चालू शकत नाही तोपर्यंत त्यांची अस्पृश्यता जाणार नाही. नंतर रा. ब. श्रीनिवासन ह्यांनीही दोन शब्द सांगितले.

शेवटी काँग्रसचे पुढील अधिवेशन बंगाल प्रांतात भरविण्याचे आमंत्रण श्री. मलिक ह्यांनी दिले. अध्यक्षांचे समारोपाचे लहानसे भाषण झाले व स्वागत कमिटीच्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आभार मानण्यात आल्यावर बरोबर 2.30 वाजता काँग्रेसचे अधिवेशन डॉ. आंबेडकर की जय ह्या घोषात संपले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password