“आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि हिंमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू”.
अखिल भारतीय दलित फेडरेशनचे तिसरे अधिवेशन मुंबई येथे तारीख 5 व 6 मे 1945 रोजी अत्यंत उत्साहाने पार पडले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आज प्रचंड घडामोडी चालू असताना हिंदुस्थानातील आठ कोटी अस्पृश्य जनतेला कोणते प्रश्न सर्वात जास्त जिव्हाळ्याचे वाटतात. त्या प्रश्नाच्या बाबतीत तिचे काय म्हणणे आहे हे समजण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते.
अस्पृश्य समाज आपल्या देशातील जनतेचा सर्वात गांजला जाणारा विभाग आहे. गुलामगिरी, पिळवणूक, विटंबना या समाजाइतकी दुसऱ्या कोणाच्याही वाट्याला आलेली नाही. असा हा समाज आज जागृत झाला आहे. दलित फेडरेशनची प्रचंड संघटना उभारून त्याने ताकद पैदा केली आहे व शासनकर्ती जमात’ बनण्याचे ध्येय पुढे ठेवून त्याकडे वेगाने प्रगती करण्याचा त्याने निर्धार केला आहे. हे या अधिवेशनात स्पष्टपणे दिसून आले.
या अधिवेशनाला हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतातून अस्पृश्य समाजाचे सुमारे एक हजार प्रतिनिधी आले होते. याखेरीज बाहेरून आलेल्या प्रेक्षकांचा भरणाही फार मोठा होता. एकट्या नागपूरहूनच सुमारे 500 लोक आले होते. त्यापैकी 50 हून अधिक स्त्रिया होत्या. गुजरात मधून 200 लोक आले होते.
परळ येथील ‘नरे पार्क’ चे विस्तीर्ण मैदान अधिवेशनाच्या वेळी लोकसमुदायाने भरगच्च भरले होते. प्रेक्षकांसाठी कमीतकमी एक रुपयाची तिकीटे ठेवली असताही 50 हजाराहून अधिक लोक अधिवेशनाला आले होते. त्यापैकी सुमारे 5 हजार स्त्रिया होत्या. डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात सभेला जमलेल्या लोकांची संख्या एक लाख ते दीड लाख असल्याचा उल्लेख केला. मुंबईत अस्पृश्य समाजाची वस्ती सुमारे दोन-अडीच लाख आहे. यापैकी निम्याहून अधिक कुटुंबातून प्रत्येकी एकतरी माणूस सभेला आला होता असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. तान्ही मुले व म्हातारीकोतारी माणसे यासह संबंध कुटुंबच्या कुटुंब सभेला आल्याची शेकडो उदाहरणे नजरेस पडत होती.
: मुंबईत 26 हजार सभासद :
या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. प्रथम त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई शहरापुरती दलित फेडरेशनची परिषद भरविण्याचे ठरविले होते. पण त्यानिमित्त डॉ. आंबेडकरांची भेट घेण्यासाठी फेडरेशनच्या मुंबई शाखेचे सेक्रेटरी श्री. एस. बी. जाधव दिल्लीस गेले तेव्हा फक्त मुंबई शहराऐवजी अखिल भारतीय अधिवेशन ताबडतोब भरविण्याचा निर्णय त्यांना कळविण्यात आला. थोड्या मुदतीत सर्व तयारी पार पाडण्याचे कार्य स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट एवढ्या रीतीने बजावले. प्रथम त्यांनी मुंबई हा दलित फेडरेशनच्या संघटनेचा आदर्श बनविण्यासाठी सभासद नोंदणीची मोहीम जोरात सुरू केली. मुंबईतील फेडरेशनच्या 20 वार्ड कमिट्यांनी धुमधडाक्याच्या प्रचाराने सभासदांची संख्या 6 हजारावरून 26 हजारावर नेली. नरे पार्क वर शोभिवंत मंडप उभारण्याचे काम झटपट पार पाडण्यात आले. बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींना व प्रेक्षकांना उतरण्यासाठी परळ भागातील म्युनिसिपल शाळात सोय करण्यात आली. नरे पार्कवर अधिवेशनाच्या वेळी जमलेला प्रचंड जनसमुदाय मुंबईतील दलित फेडरेशनच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जिवापाड मेहनत घेऊन निर्माण केलेल्या प्रचंड उत्साहाचा पुरावा होता.
: दहा हजारांची मिरवणूक :
शुक्रवार, तारीख 4 रोजी संध्याकाळी दादर स्टेशनवर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे अध्यक्ष रावबहादूर शिवराज यांचे थाटाने स्वागत करण्यात आले. परळ महिला संघातर्फे सौ मीनांबल शिवराज यांना हार घालण्यात आला. तेथून नरे पार्कपर्यंत अध्यक्षांना मिरवणुकीने नेण्यात आले. मिरवणुकीत 10 हजार लोकांनी भाग घेतला होता. “आठ कोटी दलित जनतेचे सामर्थ्य अजिंक्य आहे.” “डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिरायु होवोत.” “दलित फेडरेशनच्या झेंड्याखाली एक व्हा.” “हरिजन या नावाचा धिक्कार असो“ “समता सैनिक दलात सामील व्हा.” वगैरे ब्रीदवाक्ये लिहिलेल्या लाल पताका मिरवणूकीत प्रामुख्याने दिसत होत्या. डॉ. आंबेडकरांच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमून गेले होते.
पाऊण मैल लांब पसरलेली ही मिरवणूक नरे पार्क वरील ‘साध्वी रमाबाई आबेडकर नगर’ मध्ये पोहचल्यानंतर तेथे वीस हजारांच्या समुदायासमोर रा. ब. शिवराज यांच्या हस्ते झेंडावंदनाचा गंभीर समारंभ झाला. जहाजाच्या नांगराचे चित्र असलेला दलित फेडरेशनचा लाल झंडा उंचावरून फडकू लागताच समता सैनिक दलाच्या तीन हजार स्वयंसेवकांनी त्याला खडी सलामी दिली व सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला.
: खुले अधिवेशन :
शनिवार, तारीख 5 रोजी संध्याकाळी फेडरेशनचे खुले अधिवेशन सुरू झाले. भोवताली पडदे लावलेल्या मैदानात दुपारपासूनच लोक जमण्यास सुरवात झाली होती. दरवाज्याशी ऑफिसवर तिकिटे विकत घेणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्या वेळी मैदानात 40 हजाराहून अधिक लोक होते.
मैदानाच्या एका बाजूला विस्तीर्ण व्यासपीठ तयार केले होते. त्याच्या मध्यभागी शोभिवंत कमानीवर गौतम बुद्धाचे शांत-गंभीर चित्र काढलेले होते. हिंदुस्थानातील सामाजिक विषमतेवर हल्ला चढविण्याच्या पहिल्या देशव्यापी चळवळीचा संस्थापक म्हणून गौतम बुद्धाला अस्पृश्य समाज फार मोठा मान देत असतो.
व्यासपीठावर निरनिराळ्या प्रांतातले व निरनिराळ्या प्रकारचा पोषाख घातलेले प्रमुख प्रतिनिधी बसले होते. प्रांतिक कायदेमंडळात व म्युनिसीपालिट्या वगैरे संस्थात निवडून आलेले अस्पृश्यांचे प्रतिनिधी तेथे दिसत होते. तसेच खेड्यापाड्यात किंवा शहरात अत्यंत निकृष्टावस्थेत राहून स्वार्थत्यागपूर्वक आपल्या बांधवांची सेवा करणारे इतर तरुण व वृद्ध कार्यकर्तेही तेथे नजरेस पडत होते.
प्रथम मराठी, हिंदुस्थानी, तामिळ वगैरे निरनिराळ्या भाषात स्वागतपर गाणी झाली. ही गाणी म्हणण्यासाठी वृद्ध, तरुण, स्त्रिया, पुरुष वगैरेमध्ये जणू काय चढाओढच लागली होती. वेळेच्या अभावी कैक उत्साही कवींना गाणे म्हणण्याची संधी मिळाली नाही. अनेक युगांच्या गुलामगिरीच्या यातनांचे खोल पडसाद या गाण्यातून उमटत होते. त्याचवेळी संघटनेमुळे उत्पन्न झालेला अमर्याद आत्मविश्वास, ध्येयाची निश्चितता व ते साध्य करण्याचा लढाऊ निर्धार या गाण्यात स्पष्टपणे व्यक्त होत होता. अस्पृश्य जनतेच्या एकजुटीचे व सामर्थ्याचे प्रतीक या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित फेडरेशन यावरील अढळ भक्ती व्यक्त करताना गाणाराप्रमाणेच असंख्य श्रोत्यांचेही हृदय अभिमानाने उचंबळून येत होते.
फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. पी. एन. राजभोज यानी गेल्या वर्षीच्या कामाचा अहवाल परिषदेला सादर केला.
स्वागत समितीचे ज. से. श्री. एस. बी. जाधव यांनी अधिवेशनासाठी आलेले शुभसंदेश वाचले. त्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर सी. डी. देशमुख I.C.S., मुंबईचे मेयर डॉ. आल्बन डिसोझा सिटी इंजिनियर मोडक, नॅशनल वॉरफ्रंटचे सर रुस्तम मसाणी, मुंबई गव्हर्नरचे सल्लागार मि. मदन I.C.S. व टाँटन IC. S., सर कावसजी जहांगीर, मुंबई प्रांताचे माजी मुख्य प्रधान बाळासाहेब खेर, आसामचे माजी मंत्री श्री. सेखिया, मद्रास जस्टिस पार्टीचे के. ए. पी. विश्वनाथन्, कानपूरचे प्राणदत्त, मुंबईचे श्री. वेलणकर, बॅरिस्टर माने, बडोद्याचे मणिलाल परमार वगैरे प्रभूतीचे संदेश होते. तदनंतर स्वागताध्यक्ष श्री. जी. एम. जाधव उर्फ मडकेबुवा हे भाषण करावयास उठले. पेंन्डालमध्ये जमलेला अफाट जनसमुदाय पाहून त्यांना गहिवरून आले. प्रस्तावनेदाखल थोडेसे बोलून त्यांचे भाषण वाचून दाखविण्यास आमदार पी. जे. रोहम यांना त्यांनी विनंती केली. त्यांच्या भाषणानंतर अधिवेशनाच्या अध्यक्षांना त्यांनी पुष्पहार आणि गुच्छ अर्पण केल्यावर रा. ब. एन. शिवराज हे बोलावयास उठले. प्रेक्षकातून सारखा टाळ्यांचा निनाद ऐकू येत होता. ऑ. इं. शे. का. फेडरेशनचे तिसऱ्यांदा अध्यक्ष निवडल्याबद्दल त्यांनी धन्यता व्यक्त केली. आपले अध्यक्षीय भाषण अध्यक्षांनी इंग्रजीतून केलेले सर्व लोकांना कळावे म्हणून आमदार मा. कृ. गायकवाड यांनी त्यांचे विचारपरिप्लुत भाषण सुंदर मराठीतून लोकांपुढे ठेवले. या अधिवेशनाला सुरवातीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.
: परिषेदेचे ठराव :
डॉ. आंबेडकरांच्या भाषणानंतर परिषदेपुढील चार महत्त्वाच्या ठरावांवर निरनिराळ्या वक्त्यांची भाषणे झाली.
- पहिल्या ठरावात सप्रू योजनेला विरोध करण्यात आला आहे. घटनासमितीची कल्पना दलित फेडरेशनला नापसंत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
- दुसऱ्या ठरावात फेडरेशनच्या वर्किंग कमिटीने सप्टेंबर 1944 मध्ये मद्रास येथील बैठकीत मांडलेल्या राजकीय मागण्यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
- बंगालचे श्री. मनोहर घाली यांनी मांडलेल्या तिसऱ्या ठरावात हिंदुस्थान सरकारच्या औद्योगिक धोरणाविषयी तीव्र नापसंती दर्शविण्यात आली असून उद्योगधंदे व जमीन सरकारी मालकीच्या झाल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे. याच ठरावात बंगालमधील दुष्काळाने उडालेल्या हाहाःकाराबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे. त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी उपाय योजण्यास सरकारला बजावले आहे.
- चौथ्या ठरावात युद्धानंतर बेकार होणाऱ्या अस्पृश्य सैनिकासाठी योग्य तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
: महिला परिषद :
याच प्रसंगी सौ. मिनांबल शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य महिला परिषद भरविण्यात आली होती. परिषदेपुढील मुख्य ठराव शिक्षणासंबंधी होता. कु शांताबाई दाणी, डॉक्टर कु. लोंढे, सौ. विमलाबाई भोसले, सौ. गीताबाई गायकवाड, सौ. सर्वगोढ, सौ. शांताबाई वडळकर वगैरे वक्त्यांनी जोरदार भाषणे करून अस्पृश्य महिलांना फेडरेशनची संघटना बळकट करण्याचा संदेश दिला.
: म्युनिसीपल कामगारांच्या मागण्या :
शनिवारी रात्री भरलेल्या मुंबई म्युनिसीपल कामगार संघाच्या परिषदेत अशी मागणी करण्यात आली की, म्युनिसीपल कामगारांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने एक कमिटी नेमावी. तसेच पुरेशा महागाई भत्त्याचीही मागणी करण्यात आली. अस्पृश्य समाजापैकी बराच मोठा भाग म्युनिसीपल कामगारांचा असल्यामुळे ह्या परिषदेचे विशेष महत्त्व होते.
: विद्यार्थी परिषद :
रविवारी सकाळी श्री. प्यारेलाल तलीब यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विद्यार्थी परिषदेत अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा व कॉलेजे उघडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
: समता सैनिक दल :
दुपारी श्री जे. एच. सुबय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समता सैनिक दलाच्या परिषदेत अस्पृश्य तरुणांना या संघटनेमध्ये हजारोंच्या संख्येत सामील होण्याचा संदेश देण्यात आला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली संस्थानातील दलित फेडरेशनचे अखिल भारतीय अधिवेशन झाले.
: प्रतिनिधींशी मुलाखत :
परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता त्यांच्याकडून बरीच उदबोधक माहिती मिळाली. अहमदाबादहून आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले की श्री. गुलजारीलाल नंदाच्या मजूर महाजनचे लोक स्पिनिंग खात्यातील अस्पृश्य गिरणी कामगारांना दमदाटी करून मजूर महाजनचे सभासद करून घेतात. कोणी न ऐकल्यास मालकाकडून त्याला कामावरून काढून टाकावयास लावतात. राजकीय बाबतीत अहमदाबादच्या अस्पृश्य कामगारांचा दलित फेडरेशनलाच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
यवतमाळ येथील एका प्रतिनिधीने संयुक्त मतदारसंघामुळे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अशी माहिती सांगितली की, त्या जिल्ह्यातील एका म्युनिसीपालिटीमध्ये अस्पृश्यांच्या राखीव जागेसाठी हिंदू व मुसलमानानी एका अस्पृश्येतर इसमाच्या अस्पृश्य रखेलीला निवडून दिले ! अस्पृश्य समाजाला मुद्दाम चिडविण्याचे हे उदाहरण अपवादात्मक नाही, असे त्याने आपल्या अनुभवाच्या आधारे सांगितले.
: खेड्यातील जुलूम :
वऱ्हाडातील दुसऱ्या एका प्रतिनिधीने खेड्यात अस्पृश्यांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टाची माहिती सांगितली. तेथे सनदी नोकर म्हणून काम करणाऱ्या अस्पृश्य कामगाराला गाव-कोतवाल म्हणतात. पूर्वी त्याला जमीन किंवा बलुते नेमून दिले असे. पण त्याबरोबर त्याने भीक मागितली पाहिजे अशी स्पृश्य समाजाने रूढी पाडून ठेवली होती. ही रूढी पाळण्याचे अस्पृश्यानी त्यांचे बलुते बंद करण्यात आले आहे व त्यांना दरमहा 8 रुपये पगार व 4 रुपये महागाईभत्ता देण्यात येतो. तसेच त्यांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार गावच्या पोलीस पाटलाला असल्यामुळे त्यांच्या या तुटपुंज्या पगारातून बराचसा भाग पोलीस पाटील स्वतः उपटतो. शिवाय त्यांना आपल्या शेतात व घरी मोफत काम करण्यास सक्ती करतो.
: गिरणी कामगारांच्या तक्रारी :
नागपूर येथील गिरणीत काम करणाऱ्या काही प्रतिनिधीनी रुईकरांविषयी आपले तीव्र असमाधान व्यक्त केले व फारच कमी पगार व महागाईभत्ता मिळत असल्याचे सांगितले. नागपूरात शेकडा 70 गिरणी कामगार अस्पृश्य समाजातले आहेत व त्याच्यापैकी बरेचजण युनियनचे सभासद आहेत.
: दलित समाजाची एकजूट :
अस्पृश्य समाजातील बहुसंख्याक भाग स्वतः ची जमीन नसलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा व गिरण्या कारखान्यात मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचा आहे. त्यांच्या विशिष्ट मागण्यांचे प्रतिबिंब दलित फेडरेशनच्या ठरावात व कार्यात दिवसेंदिवस जास्त प्रमाणात दिसून येईल यात शंका नाही. तथापि, राजकीय मागण्यांच्या बाबतीत संबंध अस्पृश्य समाज आज दलित फेडरेशनच्या पाठिशी उभा आहे हे स्पष्ट आहे. ही संघटना अधिक बळकट करण्यात व इतर राजकीय संस्थांशी तिचे सहकार्य घडवून आणण्यात अस्पृश्य समाजाचेच नव्हे तर देशातील समग्र जनतेचे हित आहे याची फेडरेशनच्या या अधिवेशनावरून कोणाचीही खात्री पटेल.
: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण :
रविवार तारीख 6 मे 1945 रोजी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या तिस-या अधिवेशनानिमित्त उभारलेल्या विस्तीर्णशा साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात अखिल भारतीय महिला परिषदेचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे प्रचंड अशा जनसमुदायापुढे ऐतिहासिक महत्त्वाचे भाषण झाले. डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचे वेळी सुमारे 1,50,000 (दीड लाख) लोक हजर होते. लोकांपुढे येवून त्यांना दर्शन देण्याबद्दल स्वागत मंडळाकडून डॉ. बाबासाहेबांना विनंती करण्यात आली. ती त्यांनी मान्य केली. श्री. मडकेबुवा यांनी डॉ बाबासाहेबांना पुष्पहार घातल्यावर, स्टेजच्या जरा पुढे वक्त्यांसाठी खास उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब 7 वा. 5 मि. नी भाषण करण्यास उभे राहाताच आंबेडकर झिंदाबाद’च्या प्रचंड जयघोषांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले. या जनसमुदायात सबंध हिंदुस्थानातील अस्पृश्य लोक उपस्थित होते. या सर्व लोकांची आपल्या एकमेव पुढाऱ्यावर किती अनन्यभक्ती आहे हे कट्टर विरोधकांनाही मान्य करावे लागले. या अफाट अस्पृश्य जनसागरास स्वाभिमानाचा, स्फूर्ती व चैतन्याचा जणू पूर आला होता !
डॉ. बाबासाहेबांचे भाषण सुरू होताच सर्व लोक चित्रासारखे तटस्थ होवून ऐकू लागले. सुई पडली तर तिचा आवाज ऐकू येईल इतकी निवांत शांतता पसरली.
डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
हा जो अफाट जनसमुदाय जमलेला आहे तो पाहून कोणाही सार्वजनिक काम करणाऱ्या माणसाला अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही. सार्वजनिक कार्यात कार्यकर्त्यास विशेष विद्या किंवा बुद्धी लागते असे नाही. जर कार्याची खरीखुरी तळमळ असेल, त्याग करण्याची प्रवृत्ती असेल तर कोणीही चांगले कार्य करून दाखवू शकेल. असे लोक आपल्यात आहेत व आणखीही निर्माण होतील, अशी मला आशा आहे. आपले कार्य अतिशय बिकट आहे. काँग्रेस, मुस्लिम लीग किंवा हिंदू महासभा यांच्यासारखा आपल्याजवळ पैसा नाही. त्यामुळे पगारी लोक नेमून जागृतीचे कार्य करू शकत नाही. आपले काही लोक अती अज्ञानी व भोळसर असल्यामुळे काँग्रेसच्या किंवा हिंदू महासभेच्या लोकांनी काही आमिष दाखविले तर असे लोक त्यांना वश होतात. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे अगर हिंदू महासभेचे प्रचारक बनून आपल्या चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आपल्या चळवळीच्या प्रचाराकरिता आपल्या हाती वर्तमानपत्रे नाहीत. काँग्रेसची वर्तमानपत्रे आपल्या बातम्याच देत नाहीत, बातमी दिलीच तर ती विकृत स्वरूपाची देतात. या समुदायाकडे पाहिले तर कोणलाही म्हणावे लागेल की येथे सव्वा, दिड लाख लोक हजर आहेत. पण एका मराठी वर्तमानपत्राने काल फक्त सहाशे लोक हजर होते असे लिहिले आहे !!
लॉर्ड वेव्हेलसाहेब विलायतेला गेले आहेत. ते का हे कुणालाही ठाऊक नाही परंतु ज्या बातम्या पसरल्या आहेत त्यावरून असे दिसते की हिंदुस्थानच्या नवीन बंधारणाची वाटाघाट करण्यासाठी लॉर्ड वेव्हेलसाहेब गेले आहेत. भुलाभाई देसाई व काँग्रेसची पत्रे यांनीच या बातम्या उठविल्या असल्याने त्यात काही सत्यांश असावा असे वाटते. त्या बाबतीत दोन शब्द सांगावयाचे मी ठरविले आहे. माझे भाषण इंग्रजीत लिहिले आहे. मातृभाषेऐवजी इंग्रजीत भाषण लिहून आणण्याचा खेद वाटतो. परंतु इंग्रजी ही राजकीय भाषा असल्यामुळे सरकारला व इतर सर्व प्रकारच्या लोकांना कळविण्याकरिता भाषण इंग्रजीतच लिहावे लागले. तुमच्या सर्वांच्या माहितीकरिता माझ्या इंग्रजी भाषणाचे मराठीत भाषांतर आपल्या ‘जनता’ पत्रकातून येईल.
आज बरेच लोक अस्पृश्य वर्गाकडे टक लावून पाहत आहेत. एकेकाळी अस्पृश्यांना कोणी विचारीत नव्हते. 1928 साली सायमन कमिशन नेमले गेले. त्यावेळी लॉर्ड बर्कन हेड हिन्दी लोकांना म्हणाले की “तुम्ही काही राजकीय घटनेची निर्मिती करून दाखवा!” या लॉर्ड बर्कन हेडच्या म्हणण्यावरून काँग्रेसने 1928 साली नेहरू कमिटी नेमली व या नेहरू कमिटीने हिन्दी राज्यघटना संबंधी जो रिपोर्ट लिहिला तो वाचण्यासारखा आहे. अस्पृश्यांनी तर तो जरूर वाचला पाहिजे. 150 पानांच्या या रिपोर्टात फक्त तीनच वाक्यात अस्पृश्यांचा निकाल लावला आहे. नेहरू रिपोर्टर्टाने या तीन वाक्यात म्हटले आहे की, अस्पृश्यांचा प्रश्न राजकीय नसून धार्मिक आहे. फक्त शीख, खिश्चन यांच्या बाबतीत काही प्रश्न सोडवावे लागतील. यावरून काय दिसते ? 1928 साली काँग्रेस 7 कोटी अस्पृश्यांना शून्य समजत होती. दोन वर्षानंतर राऊंड टेबल परिषद भरली. तेथे अस्पृश्य लोकांनी काही जरी नाही तरी शून्याचे दहा केले. एकावर पूज्य वाढविले. (टाळ्या) पण गांधींनी दहाचे पुन्हा शून्य करण्याचा घाट घातला. पण त्यांचे साधले नाही. (हशा)
गेल्या वर्षात सर्वाच्या दिलजमाईकरिता सप्रू समिती जन्माला आली. त्या समितीने नवे बंधारण कसे असावे याबाबत एक खर्डा तयार केला आहे. सप्रू समितीच्या मते 10 चा आकडा 50 वर नेला पाहिजे, याचा अर्थ असा की, अस्पृश्यांची उन्नती वरून 50 वर आली आहे. (प्रचंड टाळ्या)
कॉंग्रेस, रॉय ग्रूप व कम्युनिस्ट हे आपल्याशी सलगी दाखवितात. ते आपल्या चळवळीचा विचका करण्यासाठी ! कम्युनिस्टाचे संदेशपर पत्र याच वाईट हेतूने आले होते. काल ते पत्र वाचण्याचे अर्ध्यावर बंद केले गेले.
1920 सालापासून तो आजतागायत काँग्रेसशी आमचे भांडण आहे. ते मिटेल की नाही हे सांगता येत नाही. गेल्या अनेक वर्षात आमचा काँग्रेसशी घनघोर लढा चालला असताना हे कम्युनिस्ट व रॉयिस्ट-दुरुस्त निमूटपणे पाहात असत व आमची टवाळी करीत असत. आम्हाला राजकीय दृष्ट्या संरक्षक अशी बंधने असली पाहिजेत. या बाबतीत या लोकानी गेल्या 20 वर्षात काही केले नाही. आताच त्यांना आपुलकी का वाटू लागली आहे ?
रॉयवादी म्हणतात, अस्पृश्यांनी आमच्यात का येऊ नये ? कम्युनिस्ट म्हणतात आमच्यात का येऊ नये ? काँग्रेसच्या बाया महारवाड्यात जाऊन आमच्या बायाच्या डोक्यातील उवा काढतात, त्यांची लुगडी घुतात, पोरांना आंघोळी घालतात. नुकतेच काँग्रेसच्या बायांनी पुण्याच्या मांग वाड्यात जाऊन आमच्या मुलांना दूध पाजले. पण दुसऱ्याच दिवशी त्या मुलांना हगवण लागली, अशी बातमी उठली (हशा) । ही आपुलकी व स्नेहभाव हे लोक का दाखवितात हे तुम्ही सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे.
आमचे तरुण विद्यार्थी भाईच्या व रॉयिस्टांच्या नादाला लागतात. पण ज्या लोकांनी सतत विरोध केलेला आहे. त्यांना आजच पुळका का आला, हे समजून घेतले पाहिजे. गुळाच्या ढेपीला मुंगळे जडतात ते ती गुळाची ढेप जतन करण्याकरिता नसून खाण्याकरिता जडतात. अस्पृश्य लोक गुळाची ढेप आहेत. म्हणून कम्युनिस्ट, रॉयिस्ट हे मुंगळे आले तर गूळ खातील ही गोष्ट. सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.
स्वराज्य म्हणजे काय हे आम्हाला चांगले कळते. कम्युनिस्ट किंवा इतर कोणी सांगितले तरच आम्हाला कळेल अशातला काही अर्थ नाही. आम्ही काँग्रेसला राजकारण शिकवू शकतो. आम्ही आमच्या कर्तृत्वाने व हिंमतीने देशाकरिता व स्वतः करिता जे काय करावयाचे ते स्वतंत्रपणे करू. कोणाच्या साहाय्याची आम्हास जरूरी नाही. या देशात हिन्दू आणि मुसलमान यात तडजोड करून राष्ट्रीय सरकार आणण्याची खटपट चालल्याचे बरेच दिवसांपासून माझे कानावर आले आहे. त्या लोकांनी 40 टक्के मुसलमान, बाकीचे इतर असा फॉर्मुला कोणत्या तत्त्वावर बनविला आहे ते मला काही कळत नाही. 22 टक्के मुसलमानांना 40 टक्के व अस्पृश्य आणि शीख 30 टक्के असताना त्यांना 20 टक्के ! हा न्याय कोठला ? मला हिन्दू लोकांची कीव वाटते. हिंदुना पूर्ण ठाऊक आहे की, अस्पृश्य समाज निर्धन, दडपलेला व मागासलेला आहे. असे असता त्यांना फक्त 20 टक्केच व जे राजवंशाचे त्यांना 40 टक्के । हा काय न्याय आहे ?
एका तरूण मनुष्याला त्याच्या रांडेपासून चार मुले झाली. ती बाई मेल्यावर तो मनुष्य साधु बनला, त्याचे नाव गुरुघंटाळ. त्याचा एक शिष्य व एक वामनभट नावाचा मित्र व ही चार पोरे असा त्यांचा परिवार होता. एकदा त्याला एका गृहस्थाने श्राद्धानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. गुरुघंटाळाने यजमानास आठ पोळ्या करावयास सांगितले. त्या अशासाठी की स्वतः करिता 4. वामन भटाकरिता 2 शिष्याकरिता 1 व बाकीची 1 चार पोरांकरिता !! हाच न्याय राष्ट्रीय सरकार बनवू इच्छिणाऱ्यांना लावला तर काय दिसून येईल ? काँग्रेसवाले हिन्दू म्हणतात आम्हाला 3. मुसलमानांना 3 व बाकीच्या 2 इतरांना !
आपण आपली तयारी ठेवली पाहिजे. आता जी घटना होणार ती शेवटचीच होणार. याच वेळी आपण जोरदार लढा दिला पाहिजे. ही शेवटची वेळ आहे. आतापर्यंत कॉंग्रेस व हिन्दू लोक यांच्याशीच आपला भांड होता.
पण आता मुसलमानांशी भांड करावा लागणार आहे. सप्रू समितीच्या निर्णयावरुन मुसलमानांकडून पत्रातून अस्पृश्यांवर टीका होऊ लागली आहे. मुसलमान म्हणतात की अस्पृश्य हिंदूच आहेत. हिंदुंच्या जागा कमी करून अस्पृश्यांना दिल्या तर त्यात आमचा काय फायदा ? मला मुसलमानाच्या या विचारसरणीबद्दल खेद वाटतो. मला त्यांच्याशी भांडावयाचे नाही. मुसलमानांनी 1907 साली माँटेग्यूना जे मानपत्र दिले त्यात त्यांनीच अस्पृश्यांना हिन्दुपासून अलग करण्याची प्रथम मागणी केली. तेव्हापासून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघ वगैरे मागण्यांना मुसलमान पाठिंबा देऊ लागले. पण तेच आज उठलेले आहेत. अशी स्थिती असल्यामुळे आपण फार जोराने लढा दिला पाहिजे. आपण जिंकलो आहो. अशी कोणीही कल्पना करू. नये. शेवटी चळवळीच्या मजबुतीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठाचे हुकूम बिनतक्रार मानले पाहिजेत. “
आपण इतर कोणत्याही पक्षाच्या सहानुभूतीवर अवलंबून न राहाता आपली स्वतंत्र संघटना जोरदार उभी करावयास पाहिजे.
श्री. मडकेबुवांचा गौरवपूर्ण उल्लेख करून ते म्हणाले, “आपणापैकी कोणालाही मग तो कितीही अशिक्षित असो, आपल्या समाजाची सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे व असे कार्य करणारे नेते आपल्यातून उत्पन्न होतील अशी माझी खात्री आहे.
आपण सर्वांनी जो एवढा उत्साह व कार्यक्षमता दाखविली त्याबद्दल मी धन्यवाद देऊन माझे भाषण संपवितो. (प्रचंड टाळ्या).