“ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकी नाही तो धर्म, धर्म नव्हे.”
सोमवार तारीख 4 मे 1936 हा दिवस अमरावतीकर अस्पृश्य बाधवांना सुवर्णमय दिवस वाटला. या दिवशी अस्पृश्य समाजाचे सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार हे ऐकून रेस्ट हाऊस पासून ते नेकोलेट पार्कपर्यंत सर्व रस्ता रंगीत लतापताकांनी सुशोभित केला होता. ऊनतहानेची पर्वा न करता हजारों अस्पृश्य बंधुभगिनी स्टेशनवर डॉक्टर साहेबांच्या स्वागतार्थ हजर होत्या. डॉ. बाबासाहेबांची स्टेशनपासून रेस्ट हाऊसपर्यंत बैंडच्या सुस्वर वाद्यात व त्यांच्या नावाच्या जयजयकारात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा सात वाजता नागपूर कॅम्प म्युनिसीपालिटीचे सेक्रेटरी श्री. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली. प्रथम स्वागतपर पदे म्हणण्यात आली. नंतर स्वागताध्यक्ष श्री. एस. जी. नाईक, एम. एल. सी. यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील निरनिराळ्या संस्थेतर्फे जवळ जवळ 75 हारतुरे डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करण्यात आले. स्वागताध्यक्षांच्या विनंतीप्रमाणे डॉ. आंबेडकरसाहेब भाषण करावयास उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. डॉ. बाबासाहेबांची प्रवासात प्रकृती बिघडली होती व त्यांचा घसा धरला होता. तरीपण त्यांनी त्याच स्थितीत भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
मी अमरावतीस आज सात-आठ वर्षांनी येत आहे. मागे येथे अंबादेवीच्या सत्याग्रहाकरिता आलो होतो. त्यावेळी माझ्या अस्पृश्य बांधवांची सत्याग्रह करण्याची काहीच तयारी नव्हती. सत्याग्रहाने तुरूंगवासात जाण्यास फक्त सहा माणसे तयार झाली होती. परंतु ती परिस्थिती आज पालटलेली पाहून मला आनंद होत आहे. येथे येण्यापूर्वी मला महात्माजींनी भेट घेण्यास वर्ध्यास बोलाविले होते. तेथे मी गेलो असताना श्री. जमनालाल बजाज यांनी जे आपल्या मालकीचे श्री. लक्ष्मीनारायणाचे देऊळ अस्पृश्यांकरिता खुले केले आहे ते मला पाहाण्याकरिता नेले होते. मी देवळात प्रवेश केला व देवळाच्या बाहेर येतो तर ती माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच. कारण त्या देवळाकरिता लागणारे पाणी व फुले ही सुद्धा आम्हाला मिळू शकत नाहीत, तर मग आमची देवळात जाऊन अस्पृश्यता कशी निघू शकेल ? असो. आम्हाला पूर्वी देवळावर सत्याग्रह करण्यात जितका आनंद वाटत होता तितकाच आता तिरस्कार वाटत आहे. जेव्हा म. गांधीजींनी स्वराज्याचा प्रश्न हाती घेतला तेव्हाच आम्ही त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका असे बजाविले. परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्वराज्या एक अंग आहे, असे सांगून ते स्वस्थ राहिले. आम्ही धर्मातराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका बाऊ वाटण्याचे कारण काय हेच आम्हाला समजत नाही. हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाही तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणवून का घ्यावे ? ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकीची भावना नाही त्या धर्माला मी धर्म म्हणावयास तयार नाही. दोन हजार वर्षांपूर्वी आमचे पूर्वज अज्ञानी होते. त्यांना कोणत्याही प्रकारची विद्या संपादन करण्याची व शस्त्र हाती धरण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्यांना कोणतेही नवीन कार्य करण्याचे धैर्य नव्हते. अज्ञानाने त्यांची मने मारून दुबळी केली होती. चार वर्णाच्या चौकटीत हिंदू धर्माला बसवून ठेविला आहे. या वर्णव्यवस्थेमुळे आम्हाला आमची लायकी ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ असली तरी गुलामगिरीची कामे आम्हाकडे देण्यात आली. या गुलामगिरीमुळेच आपले पूर्वज स्वतःचा अभिमान साफ विसरून गेले. पण आज परिस्थितीत पालट झाला आहे. त्या स्थितीनुसार आम्हाला हिंदू धर्माच्या अनुदारपणाच्या चौकटीत राहता येत नाही. म्हणून ही धर्मांतराची घोषणा करणे भाग पडले आहे.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हारतुरे अर्पण करून त्यांचे आभार मानण्यात आले व सभा त्यांच्या जयघोषात बरखास्त झाली.