“राजकीय सत्तेचा वापर न्याय्य व उदार बुद्धीने करावा लागेल.”
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर व-हाडकडे दौऱ्यावर गेले होते. रविवारी तारीख 3 मे 1936 रोजी दुपारी नागपूर स्टेशनवर त्यांच्या स्वागताकरता हजारो अस्पृश्यांचा जमाव जमला होता. मि. एस. समिउल्लाखान आणि रावसाहेब आर. डब्ल्यू. फुले हे नागपूर म्युनिसीपालिटीतर्फे स्वागतार्थ स्टेशनवर आले होते. बिडी कामगार युनियनचे लोकही आले होते. संध्याकाळी टाऊन हॉलमध्ये त्यांना नागपूर म्युनिसीपालिटीतर्फे मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राचा आशय पुढीलप्रमाणे होता.
” सार्वजनिक कार्याच्या निरनिराळ्या क्षेत्रात आपण काम केले आहे. अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ आपण राजकीय व सामाजिक कार्यात अत्यंत उत्साहाने व धैर्याने अविश्रांत श्रम घेतले आहेत. नाशिक व महाड येथे सत्याग्रह करून हिंदू समाजाला त्यांच्या चिरकालीन निद्रेतून आपणच जागृत केलेत. अस्पृश्य वर्गाच्या स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना समाजातील त्यांच्या न्याय्य हक्काची जाणीव करून दिलीत. दलित वर्गाच्या हक्कासाठी आणि समाजात योग्य दर्जा मिळविण्यासाठी चळवळ करण्याचे सर्व श्रेय आपणासच आहे. याबाबतीत ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन ही आपल्या परिश्रमाची स्पष्ट साक्ष होय.”
राजकीय बाबतीतही आपण उच्च स्थान पटकाविले आहे. सायमन कमिशनबरोबर सहकार्य करण्यासाठी मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने नेमलेल्या कमिटीचे सभासद या नात्याने आपण लिहिलेल्या भिन्न मतपत्रिकेवरून आपली कुशाग्रबुद्धी दृष्टोत्पत्तीस येते. इतकेच नव्हे तर आपल्या देशाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याविषयीची चिंताही स्पष्ट दिसून येते. गोलमेज परिषदेमध्ये दलित वर्गातर्फे आपण केलेले जोरदार समर्थन आणि ‘पुणे करारा’ च्या बाबतीतील आपले कार्य या दोन गोष्टी इतक्या जगजाहीर आहेत की, त्यांचा उल्लेख करण्याचीही आवश्यकता नाही.
मानपत्राला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
म्युनिसीपालिटीकडून मानपत्र घेण्याचा नाझ्या सार्वजनिक आयुष्यात हा दुसरा प्रसंग आहे. मला पुष्कळशा म्युनिसीपालिट्यांनी मानपत्रे देण्याची इच्छा दर्शविली. परंतु मानपत्रे न घेण्याचे माझे धोरण आहे. मी असा कृतघ्न का ? असे कोणाला वाटेल. पण यात कृतघ्नपणाचा भाग नाही. राष्ट्रीय वृत्तपत्रे व संस्था यांच्या दृष्टीने मी मोठा मनुष्य नाही. लोकांनी माझा गौरव केला किंवा न केला तरी माझे काम पवित्र आहे. असे मला नेहमी वाटत आले आहे. अशा प्रकारची जी मानपत्रे देण्यात येतात त्यात सुधारणेच्या बडेजावाखाली आपण जी खोटी विधाने नेहमी करतो, कनव्हेन्शनल लाइज ऑफ सिव्हिलायझेशन त्याचाच बराचसा भाग असतो. मानपत्र न घेण्याच्या माझ्या धोरणाला मी पहिला अपवाद वसई म्युनिसीपालिटीच्या बाबतीत केला. कारण काही मित्रांच्या मुक्तीसाठी मला ते स्वीकारावे लागले. नागपूर म्यु. च्या बाबतीत मी दुसरा अपवाद केला, याबद्दल मला दुःख होत नाही. म्युनिसीपालिटीच्या सभासदांनी मानपत्राचा खर्च स्वतः देण्याचे कबूल केले आहे. त्यावरून या मानपत्रात कळकळीचा भाग आहे असे मी समजतो.
आजच्या प्रसंगाचा राजकीय व्यासपीठ म्हणून उपयोग करण्याबद्दल आपण मला क्षमा करा. मजविषयी लोकात निरनिराळे गैरसमज पसरविले जात आहेत. मजवर जितकी टीका केली जाते. तितकी इतरांवर क्वचितच केली जात असेल. मजवर टीका करणाऱ्यांचा मुख्य रोख असा आहे की, अल्पसंख्यांकांचा म्हणून जो करार प्रसिद्ध आहे त्याबाबतचा मुख्य गुन्हेगार मी आहे. अशी त्यांची समजूत आहे. वर्तुळ परिषदेत जे धोरण मी ठेवले होते. त्याबद्दल मला यत्किंचितही खेद वाटत नाही. वर्तुळ परिषदेत मी जे कामकाज केले ते वाचण्याची आपण जर तकलीफ घेतली, तर निरनिराळे प्रश्न सोडविण्याबाबत ज्या सूचना मी केल्या, त्या पुष्कळशा राष्ट्रीय पुढा-यांच्या सूचनांपेक्षा श्रेष्ठ दर्जाच्या होत्या, हे आपल्या लक्षात येईल. खुद्द म. गांधी माझ्या म्हणण्यात सत्यता आहे याचा पुरावा देतील.
अल्पसंख्यांकांनी वर्तुळ परिषदेत जे धोरण ठेवले होते. ते न्याय्य होते. इतकेच नव्हे तर उदारपणाचे होते, असे मी म्हणतो. आयर्लंडमध्ये अल्स्टरवाल्यांनी होमरूलच्या चळवळीत काय उत्तर दिले, ते मी आपल्या नजरेस आणू इच्छितो. अल्स्टरमध्ये अल्पसंख्यांक प्रॉटेस्टंट होते व दक्षिण आयर्लंडमध्ये बहुसंख्य रोमन कॅथोलिक होते. दक्षिण आयर्लंडचे प्रतिनिधी श्री. रेडमंड यांनी अल्स्टरवाल्यांना तुम्ही मागाल त्या सवलती देतो, पण इंग्लंडला मिळू नका, होमरूलला पाठिंबा द्या असे सांगितले. तेव्हा जळो तुमचे होमरूल आम्ही कॅथोलिकांच्या राज्यात राहाणार नाही असे कार्सनने सांगितले. वर्तुळ परिषदेत हिंदुस्थानच्या अल्पसंख्यांकांनी रक्षणबंधने मिळोत किंवा न मिळोत. आम्ही हिंदुच्या राज्यात राहणार नाही असे कोठे तरी म्हटले का? नाही. डोमिनियन स्टेटस किंवा होमरूल यांच्या मार्गात आम्ही कोणतेच अडथळे पसरले नाहीत. आम्ही फक्त आम्हाला संरक्षण द्या, एवढेच म्हटले. आमच्यात व इतर देशातील अल्पसंख्यांकांत हा महत्त्वाचा भेद आहे.
आता संरक्षणाबद्दल म्हणाल, तर रोमच्या साम्राज्यातही पॅट्रिशियन्स व प्लेबियन्स असे दोन भाग होते. त्यांच्या निवडणुकी स्वतंत्र मतदार संघातूनच होत असत. स्वतंत्र मतदारसंघात कोणतेही पाप नाही. त्यात कोणतेच कृष्ण कारस्थान नाही. माझे बहुसंख्य हिंदुंना एवढेच सांगणे आहे की, आता तुम्ही बहुसंख्य असल्यामुळे जी सत्ता तुमचे हाती येणार आहे तिचा न्याय्य व उदारबुद्धीने उपयोग करा. हिंदुस्थानच्या राजकीय प्रगतीची जर वाढ खुंटली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. आपल्याला मिळालेले हक्क अल्पसंख्यांकांचे फायद्याचे दृष्टीने तुम्ही ज्या मानाने उपयोगात आणाल त्या मानाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली की नाही, याचा निर्णय होईल. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुन्हा एकवार आपले आभार मानून मी आपले भाषण संपवितो.
त्यानंतर रावसाहेब फुले, उपाध्यक्ष यांनी डॉ. आंबेडकर यांचे व पाहुण्यांचे आभार मानताना, अल्पसंख्यांकांच्या मागण्याबद्दल हिंदुंची तक्रार नाही. फक्त त्यांनी स्पृश्यांशी जे धोरण स्वीकारावयाचे ते राष्ट्रीयत्वाला पोषक व जातीद्वेषाला नामशेष करील असे असावे. त्यामुळे हिंदी राष्ट्राचे जातीय तुकडे होतील, असे वर्तन ठेऊ नये, डॉ. आंबेडकरांचे वर्तुळ परिषदेतील धोरण राष्ट्रीयत्वाला पोषक होते, हे मला कबूल आहे, सर्व अल्पसंख जर राष्ट्रीयतेला पोषक असे धोरण स्वीकारले, तर हिंदू समाजाला जरी कितीही स्वार्थत्याग करावा लागला तरी त्याबद्दल कोणी तक्रार करणार नाही असे सांगितले. त्यानंतर समारंभ खलास झाला.