Categories

Most Viewed

03 मे 1936 भाषण 1

“शेकडो वर्षे थांबून सुद्धा जे कार्य झाले नसते ते या दहा वर्षाच्या अल्पावधीत झाले आहे.”

दिनांक 3 मे 1936 रोजी नागपूर म्युनिसीपालिटीच्या मानपत्र समारंभानंतर संध्याकाळी नागपूरच्या अस्पृश्य बांधवांची जाहीर सभा कस्तुरचंद पार्कमध्ये झाली. यावेळी हजारो अस्पृश्य बंधुभगिनी हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने नागपूर शहर हादरून गेले होते. डॉक्टर साहेबांवर नथीतून तीर मारणारे टीकाकार व पुढारी नागपुरातून कुठे निघून गेले होते, त्यांचा पत्ता नव्हता. डॉक्टर साहेबांच्या प्रेमामुळे त्यांच्यावरील पूर्ण विश्वासामुळे सर्वस्वाला विसरून कार्य करण्याला सज्ज झालेला हजारो अस्पृश्य बांधवांचा जमाव, डॉक्टर साहेबांचे भाषण ऐकावयास उत्सुक झाला होता. डॉक्टर साहेब भाषण करावयास व्यासपीठावर चढले, तोच टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाचा जयजयकार निदान पाच मिनिटे सारखा चालला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात प्रथम गेल्या दहा वर्षांत अस्पृश्य समाजात संघटनेच्या चळवळीमुळे घडलेल्या स्थित्यंतराचे सिंहावलोकन केले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,
या दहा वर्षाच्या अल्पावधीत शेकडो वर्षे थांबून सुद्धा जे कार्य आपल्या हातून झाले नसते, ते झालेले आहे. हे सर्व कार्य केवळ आपल्या स्वाभिमानाच्या आणि स्वावलंबनाच्या चळवळीनेच जणू काय दैवी कार्य घडले आहे. आपल्याकडे काँग्रेस संस्थेसारखा पैसा नाही. आपणास सार्वजनिकरीत्या कार्य करण्यास कॉंग्रेस सारख्या संस्थेप्रमाणे इतरांचे पाठबळ नाही. इतक्या अडचणीतून आपण आपल्या स्वाभिमानजनक चळवळीला आज दहा वर्षांत प्रचंड व्यापाचे स्वरूप आणून दिले आहे. हे सारे तुमच्या प्रेमामुळे, कार्याच्या आतुरतेच्या आचेमुळे घडले आहे. गेल्या दहा वर्षांत हा जो दैवी चमत्कार घडला व ज्यामुळे सर्व समाजाला, काँग्रेसलासुद्धा अस्पृश्यांचा वचक वाटत आहे. त्याचे कारण आपण दाखविलेली एकी होय. थोडे फार लोक सोडून दिले, तर आपण दाखविलेल्या एकीमुळे इतर समाजाचे दृष्टीने आपले राजकीय महत्व वाढले आहे. धर्मांतराची घोषणा आपण केल्यापासून तर मुसलमान, शीख व ख्रिश्चन यांच्या तोंडाला पाणी सुटले असून ते आपल्या दाढीला हात लावू लागले आहेत. आपण जी आजपर्यंत एकी दाखविली तशीच ती कायम ठेवली पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मातून अलग व्हावयाचे जे आपले ध्येय ते आपण गाठू शकू.

नुकतेच स्पृश्य हिंदुनी जोधपूर व गुजरात येथील अस्पृश्यांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. ही अत्याचारांची गुलामगिरी नष्ट करावयाची असल्यास धर्मांतर केल्याशिवाय आपल्याला इलाज नाही. हिंदुना इंग्रज डोमिनियन स्टेटस देत असताही जर इंग्रजांच्या राज्यात राहावयाचे नाही, तर आम्ही तरी हिंदुच्या राज्यात का राहावे ? एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही. त्याला सूर्याचा स्वतंत्र प्रकाश मिळाल्याशिवाय ते वाढीला लागणार नाही. हिंदू धर्माच्या या जीर्ण वृक्षाखाली आमची वाढ होणार नाही, म्हणून आम्ही धर्मातर करणारच.

सदर सभेतही मुसलमानांचा बराच भरणा दिसत होता. काही मुसलमान सभेच्या बाजूस नमाज पडत होते. त्याचप्रमाणे अस्पृश्य पुढाऱ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मोटारी लागल्या, त्या परधर्मीयांनी, ख्रिस्ती पाद-यांनी व मुसलमान पुढाऱ्यांनी मोठ्या आनंदाने दिल्या असे कळते. या सभेला एकही प्रमुख हिंदू पुढारी किंवा धर्मांतरविरोधी अस्पृश्य कार्यकर्ता हजर नव्हता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password