“राज्याचा अभिमान नसेल तर राज्य टिकत नाही.”
बदलापूर जिल्हा ठाणे येथील त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सव तारीख 3 मे 1927 रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉ. बी. आर. आंबेडकर, बार-अँट-लॉ यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत यशस्वी रीतीने पार पडला.
सदर उत्सवाच्या व्यवस्थापक कमिटीत अध्यक्ष कोणाला करावे या संबंधाने पुष्कळ वाटाघाट चालली होती. शेवटी सर्व गावकऱ्यांच्या संमतीने असे ठरविण्यात आले की, या उत्सवाला अध्यक्ष मुंबईचे बहिष्कृत वर्गाचे पुढारी डॉ. आंबेडकर यांसच आणावे. या त्यांच्या ठरावाप्रमाणे उत्सव कमिटीचे मुख्य व्यवस्थापक पालये शास्त्री यांनी मुंबईस जाऊन ब्राह्मण-ब्राह्मणेतर पत्राचे संपादक रा. नाईक यांच्यामार्फत डॉ. आंबेडकरांची भेट घेतली. त्यांना शिवाजी उत्सवाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. पालये शास्त्र्यासारख्या भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणाने विनंती केल्यावरून डॉ. आंबेडकरांनीही त्यांची विनंती मोठ्या आनंदाने मान्य केली. ते उत्सवाच्या दिवशी 4 वाजता मुंबईहून रा. नाईक, रा. सीताराम नामदेव शिवतरकर, रा. गणपत महादू जाधव या मंडळीसह बदलापूर येथे आले. त्यांचा मुक्काम पालये शास्त्री यांच्या घरी होत चहापाणी झाल्यावर डॉ. आंबेडकर हे बरोबर सहा वाजता उत्सवाच्या ठिकाणी आले.
उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी इशस्तवनपर पद्य म्हणण्यात आले. त्यानंतर रा. पालये शास्त्री यांचे प्रास्ताविक भाषण झाले. नंतर नानासाहेब चाफेकर यांनी आजच्या उत्सवाचे अध्यक्षस्थान डॉ. आंबेडकर यांनी स्वीकारावे अशी गावक-यांच्या वतीने सूचना मांडली. त्यास मेसर्स काळे, सुळे, पाटील व मोकाशी यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. आंबेडकर हे स्थानापन्न झाले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शिवाजींच्या अंगच्या निरनिराळ्या गुणांवर अत्यंत परिणामकारक असे एक तासभर भाषण केले. शेवटी सांगितले की, ज्या शिवाजीने आपल्या लोकोत्तर गुणाने राज्य मिळविले ते त्यांचे राज्य चिरकाल का टिकले नाही ? याचे कारण हेच की, त्या राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता. एक राजा गेला व त्याठिकाणी दुसरा राजा आला तरी लोकांच्या नित्याच्या व्यवहारात काहीच फरक होत नसे. नेपोलियनच्या इंग्लंडवरील स्वारीचे वेळी इंग्लंड मधील मजूर लोकांनी आपल्या देशातील लोकांना जे उत्तर दिले तेच उत्तर या ठिकाणी लागू पडते. याप्रमाणे भाषण झाल्यावर रा. नाईक यांचेही विचारपरिपूर्ण असे भाषण झाले. नंतर रा. भा. रा. ओक यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे आभार मानल्यावर उत्सवाच्या कार्यक्रमातील पहिला भाग समाप्त झाला. नंतर अध्यक्ष श्री. पालये शास्त्री यांच्याकडे भोजनास गेले. त्यांनी कसलाही किंतू मनात न बाळगता आपल्या घरात डॉ. आंबेडकर व त्यांच्या बरोबरीच्या अस्पृश्य मंडळीसह सहभोजन केले.
नंतर रात्री 9 ते 11.30 पर्यंत कीर्तन झाले. या कीर्तनात कसल्याच प्रकारचा जातीभेद न मानता लोक कीर्तनश्रवणास बसले होते. काही महार मंडळी तर कीर्तनी बुवांच्या समोरच बसली होती. कीर्तन आटोपल्यावर रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉ. आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली अदमासे 15 हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हा उत्सव समाप्त झाला.