“आपण सात कोटी अस्पृश्य एकाचवेळी धर्मांतर करू.”
वर्धा येथे 1 मे 1936 रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. तेव्हा तेथील अस्पृश्य समाजाने मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. सेठ जमनालाल बजाज व महात्मा गांधी यांनी सेठ वालचंद हिराचंद यांच्यासह त्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी नालवाडीस भेट दिली. निर्भय तरुण संघाने त्यांच्या वर्धा येथील मुक्कामात चांगला बंदोबस्त ठेवला होता. भेटीसाठी ते शेगाव येथे गेले होते. दुपारी 11.30 वाजता अस्पृश्य म. गांधीच्या समाजाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम खापर्डे, शंकरराव सोनवणे, गोमाजी टेंभरे यांनी भेट घेऊन धर्मांतराबद्दल चर्चा केली.
या चर्चेत डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की,
मुसलमानी अथवा ख्रिस्ती धर्माचा पुरस्कार करण्यास मी अजूनही कोणास सांगितले नाही. जे कोणी स्वतःच्या जबाबदारीवर मुसलमानी किंवा इतर धर्माचा पुरस्कार करीत असतील ते स्वतः फसतील याचा जबाबदार मी नाही. मी धर्मांतरांची घोषणा केली खरी. परंतु अमुकच धर्म स्वीकारा असे अजून स्पष्ट सांगितले नाही. तोपर्यंत सर्वांनी धर्मांतराचा प्रचार करीत असावे. पण कोणत्याही विशिष्ट धर्माची तरफदारी करू नये. जेव्हा मी सांगेन, तेव्हाच आपण सर्व सात कोटी अस्पृश्य एकदम धर्मांतर करू.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतर अस्पृश्य पुढाऱ्यांशी खाजगीत चर्चा केली.