“आदिवासी अजूनही रानटी युगातच आहेत. स्वातंत्र्याने त्यांच्या जीवनात बदल घडवून आणलेला नाही.”
भंडारा संसद पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडसा (जिल्हा चंद्रपूर) येथे दिनांक 29 एप्रिल 1954 रोजी आले. तेथे आयोजित सभेला संबोधित करताना ते म्हणाले,
तुम्ही अस्पृश्यांसाठी काय केले ? या प्रश्नास उत्तर देताना येथील प्रचंड निवडणूक सभेत डॉ. आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून अस्पृश्यांसाठी ज्या शैक्षणिक सोयी करवून घेतल्या त्यांचा उल्लेख केला. लेव्हिन कमिशननुसार परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी पाठविण्यात यावयाच्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या साडेबारा टक्के अस्पृश्य विद्यार्थी निवडले जावे अशी तरतूद केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, “हिंदुस्थानात अस्पृश्यांबाबत जी गोष्ट कधीही घडली नव्हती. ती आता घडत आहे. ती म्हणजे एकाच वर्षी एकदम 16 अस्पृश्य विद्यार्थी परदेशात पाठविले जाणार ही होय.
“लोकशाहीत जो कोणी लोकांचा प्रतिनिधी म्हणून अधिकाराच्या व जबाबदारीच्या जागेवर स्थानापन्न होतो, त्याचे दोष उघडकीस आणून व त्यामुळे होणाऱ्या चुका टाळून पर्यायाने देशकल्याण करण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडले पाहिजे. त्यासाठी योग्य टीका करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकास प्राप्त झाला आहे. नेहरू हे कोणी देवाचे अवतार नव्हेत. कुठल्याही जबाबदारीच्या व अधिकाराच्या स्थानावर असलेल्या माणसाचे दोषदिग्दर्शन करण्यासाठी टीका करीन.” घटना परिषदेच्या वेळचे निरनिराळे अनुभव सांगताना डॉ. स्वतःचे राज्यशास्त्रविषयक ज्ञान किती सखोल आहे हे पटवून दिले व नेहरू व आंबेडकर यात राजा भोज कोण व गंग्या तेली कोण हे लोकांनी ओळखावे, असे सांगितले. काश्मीरविषयी ते म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांना हिंदुस्थानच्या भवितव्याऐवजी जर काश्मीरचाच मोह सुटला असेल, तर त्यांनी पंतप्रधानाची जागा रिकामी करून खुशाल काश्मीरचा राजा व्हावे.”
शेवटी ते म्हणाले, “आदिवासी अजूनही रानटी युगातच आहेत. त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल स्वातंत्र्याने घडवून आणलेला नाही. त्याचप्रमाणे सर्वोदयाची कल्पना ही मुक्तेश्वराने वर्णिलेल्या विश्वामित्राच्या सृष्टीची प्रतिकृतीच होय. “