Categories

Most Viewed

27 एप्रिल 1938 भाषण

“दंग्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक”

गेले चारपाच दिवस गाजत असलेले ना. मुन्शी यांचे मुंबईच्या गुंडांना दंग्याच्या वेळी पकडून हद्दपार करण्याचा अधिकार पोलीस कमिशनरला देणारे बिल तारीख 26 एप्रिल 1938 रोजी असेंब्लीमध्ये चर्चेला निघाले. ना. मुन्शी यांच्या मूळ दुरुस्ती बिलाला स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडलेली उपसूचना विशेष महत्त्वाची होती. या सूचनेमुळे मूळ बिलाचा उद्देश निश्चितपणे ठरविण्यात आला. डॉ. आंबेडकर साहेबांच्या सूचनेचा आशय असा आहे की, “मुंबई शहरात किंवा शहराच्या कोणत्याही विभागात निरनिराळ्या जातीमध्ये वैमनस्य उत्पन्न होऊन जर आणीबाणीची परिस्थिती (स्टेट ऑफ इमर्जन्सी) निर्माण झाली तर अशावेळी सरकारने तातडीचा जाहीरनामा गॅझेटच्याद्वारे प्रसिद्ध करुन या बिलातील अधिकार पोलिस कमिशनरला द्यावेत. या अधिकाराची अंमलबजावणी फक्त एक महिन्याची ठेवण्यात येईल. याहीपेक्षा या कायद्याची जरूरी असल्यास पुन्हा जाहीरनामा काढावा. तसेच पोलीस कमिशनरच्या हुकुमावर वीस दिवसांच्या आत प्रांतिक सरकारकडे अपील करण्याचा अधिकार ठेवण्यात आला आहे.” या सूचनेमुळे मुंबई शहरवासीय नागरिकांच्या हक्कांचे योग्यरीत्या संरक्षण करण्यात आलेले आहे.

ही सूचना मांडण्यापूर्वी काही उपसूचना आल्यावर दिनांक 27 एप्रिल 1938 रोजी डॉ. आंबेडकरसाहेब आपल्या सूचनेवर बोलावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

ज्या गुंडांच्या मवालीगिरी विषयी हे बिल सादर करताना ना. मुन्शी यांनी उद्गार काढले त्याविषयी मला पोलीस कमिशनर ना. मुन्शी यांच्यापेक्षा अधिक माहिती आहे. 1911 ते 1933 सालापर्यंतचा माझ्या आयुष्यातील काळ मुंबई इंप्रुव्हमेंट चाळीत राहाण्यात गेलेला असल्यामुळे, गुंड किंवा मवाल्यांपासून गरिबांना कसा भयंकर उपद्रव होतो. याची मला माहिती आहे. तसेच ज्या दंग्यांसाठी ह्या कायद्याची उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहे. त्याविषयीचा थोडा पूर्वइतिहास येथे नमूद करण्यास कोणतीच हरकत नाही. 1851 पासून ते 1938 पर्यंत एकंदर भयंकर स्वरूपाचे असे जातीय दंगे मुंबईत 9 झाले. त्यातील पहिला दंगा 1851 साली मुसलमान व पारशी यामध्ये झाला. दुसरा सुद्धा 1874 साली पारशी व मुसलमान यांच्यामध्ये झाला. त्यानंतर झालेले दंगे 1893, 1929, 1932, 1933, 1936, 1937 व 1938 यावर्षी झाले. हे सर्व दंगे मात्र हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये झालेले आहेत. या सर्व दंग्यात किती जखमी झाले याची आकडेवारी सांगितल्यावर डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की, या दंग्यांच्या वृत्तीकडे पाहिल्यावर त्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी कडक उपाय योजना अंमलात आणणे भाग आहे. दरसाल या सुधारणेच्या मार्गास लागलेल्या मुंबई शहरात रक्तस्नानाचे प्रकार घडावे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय. याचा योग्य बंदोबस्त होण्याकरिता मी या बिलाला पाठिंबा देत आहे. तसेच या बिलामुळे पोलीस कमिशनरला जे नवीन हक्क मिळणार आहेत त्यांच्यापासून नागरिकांच्या स्वातंत्र्याचे योग्य संरक्षण व्हावे म्हणून ही उपसूचना या बिलाला जोडीत आहे. म्हणूनच मी माझ्या उपसूचनेत आणीबाणीच्या वेळी अगोदर जाहीरनामा काढूनच उपाययोजना अंमलात आणावी असे सुचविले आहे. तसेच या अंमलबजावणीची मुदत एक महिन्याची ठेवावी, अशी जी सूचना मांडली आहे त्यामुळे पोलीस कमिशनरच्या अधिकाराचे क्षेत्र फक्त या जातीय दंग्याच्या कालापुरतेच मर्यादित राहील. ना. मुन्शी यांनीही आपल्या भाषणात या कायद्याचा जातीय दंग्याशिवाय उपयोग करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. डॉ. आंबेडकरांची सूचना बहुमतानी पास झाल्यावर या बिलाचे पहिले वाचन पास झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password