Categories

Most Viewed

25 एप्रिल 1954 भाषण

” दीपमालेतील न विझणाऱ्या दिव्याप्रमाणे, आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा निवडणुकीसाठी येतील, त्यावेळेस अस्पृश्यांनी आपली एकेक दिवसाची मजूरी जमवून सुमारे पाच हजार रुपयांची थैली त्यांना अर्पण करावी. असा संकल्प पुलगाव येथील एका जाहीर सभेत प्रगट करण्यात आला होता.

ज्या महान मानव श्रेष्ठाच्या दर्शनाकरिता मध्यप्रदेशातील विशेषतः खेड्यापाड्यातील जनता कित्येक दिवसापासून आशा करीत आहे, त्या महर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेबांचे, दलितोद्धारकाचे अप्रतिम देश-सेवकाचे शुभागमन रविवार तारीख 25 एप्रिल 1954 रोजी पुलगाव (जिल्हा वर्धा) येथील नाचणगावरोड पावर हाऊसच्या भव्य पटांगणावर होईल, या शुभप्रसंगी परमपूज्य डॉ. बाबासाहेबांना पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्याचा निर्धार पुलगाव नगर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या आगमन समितीतर्फे केला आहे. याकरिता या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन या पवित्र कार्यास प्रत्येक अस्पृश्य बंधु-भगिनींनी हस्ते परहस्ते, सढळ हाताने, स्वखुशीने तन-मन-धनाने मदत करुन निधी गोळा करण्याचा अधिकार असलेल्या कार्यकर्त्यां जवळच अधिकारपत्र पाहून निधी देण्याची कृपा करावी. वरील शुभ कार्यास सर्वत्र जनतेनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांच्या अमृततुल्य भाषणाचा फायदा घ्यावा असे ह. दा. आवळे ऑर्गनायझींग व सुपरवायझींग सेक्रेटरी, मध्यप्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन नागपूर, आणि आगमन स्वागत समिती, पुलगाव यांनी जनता 3 एप्रिल 1954 मध्ये प्रसिद्ध केले होते.

त्यानुसार रविवार दिनांक 25 एप्रिल 1954 रोजी पुलगाव (जिल्हा वर्धा) येथे मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या विस्तीर्ण पटांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारार्थ एका प्रचंड सभेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा विभागातील संसदीय पोटनिवडणूकीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भागात निवडणूक प्रचारार्थ दौऱ्यावर आहेत. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी वऱ्हाडातून दूरदूरचे लोक मुद्दाम येथे आले होते.

या प्रसंगी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेबांचे चहाते यांनी पाच हजार रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. या प्रसंगी शे. का. फेडरेशनचे सरचिटणीस श्री. पी. एन. राजभोज, गुजरातचे श्री. परमार, महाराष्ट्राचे श्री. गायकवाड, मराठवाड्याचे श्री. बी. एस. मोरे यांची या सभेत भाषणे झाली.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुनो,
मी या भागात, भंडारा जिल्ह्यात निवडणुकीच्या दौ-यावर आलो आहे. हा विभाग निवडणूक विभागात येत नाही. पण काही लोकांनी पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्याचे मला आश्वासन दिले. पूर्वीच दोन हजार रुपये दिले व सध्या दिड हजार रुपये अर्पण करतो. असे येथील कार्यकर्ते म्हणतात. अशा प्रसंगी निवडणुकीच्या बाबतीत काही सांगणे अप्रयोजक आहे. परंतु ज्या विषयासंबंधाने मी बोलणार आहे ते मात्र महत्त्वाचे आहे.

1952 साली झालेल्या निवडणुकीत सर्व भागात फेडरेशनचा पराभव झाला तेव्हा काँग्रेसला फार आनंद झाला. यावेळी काँग्रेसच्या विरुद्ध झगडणारा फेडरेशन हा एकच पक्ष होता. दुसरे पक्ष आपआपली भूमिका विसरून गेले. आम्ही निवडणुकीत हरलो असे पाहून काही लोक मला म्हणत, आंबेडकरांनी हा पक्ष नाहिसा करावा, खुंटीला टांगून ठेवावा. कारण यात काही जीव नाही, त्राण नाही. बाहेरच्या लोकांप्रमाणेच आमच्यातीलही काही लोक असेच म्हणत. पण मला तसे काही वाटत नाही. आता झालेल्या काही सभातून जे 2-3 लाखाचे वर लोक जमले त्यावरून फेडरेशनची आवश्यकता स्पष्टपणे प्रतीत झाली. (टाळ्या) फेडरेशनची आवश्यकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या परिस्थितीत देशाचा कारभार कसा चालू आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इंग्लंडात जेव्हा एखादा पक्ष अधिकारारूढ होतो तेव्हा तो सर्व लोकांना समभावाने वागवितो. कॉन्झरवेटीव्ह पक्ष अधिकारावर असला तर लायसन्स अथवा ग्रँट देताना व्यक्तीच्या राजकीय पक्षाचा अधिकारी वर्ग मुळीच विचार करीत नाही. हीच नीती इतरही देशात आहे. पण ह्या देशातील राज्यकर्ते इतर पक्षाबद्दल बेपर्वा आहेत. ज्या लोकांनी लहान-मोठ्या संस्था चालविल्या त्यांना मी सांगितल्याप्रमाणे कटु अनुभव आले असतील. इंग्रजांच्या राज्यात अधिकारी वर्ग कोणाबद्दलही मनात अढी न बाळगता न्याय देई. पण आज पांढरी टोपी घालणारा काँग्रेसचा बगळा जिल्हयाचा राजा आहे. तो एखाद्या व्यक्तिला घेऊन न्यायाधिशाकडे जातो व त्याच्याबद्दल शिफारस करतो. त्याने नाही ऐकले तर तो मिनिस्टरपर्यंत पोहोचतो. जर न्यायाधीश प्रामाणिक असेल तर बिचाऱ्याच्या नोकरीवरून पाणीच फिरले म्हणून समजा.

या सा-याचं कारण एकच. या देशात राज्यकर्त्या पक्षाला बंधन घालणारा दुसरा मजबूत पक्ष नाही. अशीच परिस्थिती चालू राहिली तर येथे जर्मनीप्रमाणे हिटलरशाही अथवा रशियाची स्टॅलिनशाही आल्याशिवाय राहणार नाही. याकरिता आम्ही अल्पसंख्य असूनही विरोधाचा अग्नी तेवत ठेवू. या कार्यात इतरांचे सहकार्य मिळो वा न मिळो. केव्हाना केव्हा आमची मनोभावना कार्यशक्ती याचा इतरावर परिणाम होऊन ते आमचे ऐकतील. ज्याप्रमाणे एखाद्या दीपमालेतील सर्व दिवे विझले पण एकच पणती मिणमिणत राहिली तरी पण तीच साऱ्यांना मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील.

इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटमध्ये पराभव झालेली टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही. ती पुन्हा दुसऱ्या वर्षी नव्या जोमाने खेळावयास प्रारंभ करते. असाच आशावाद आपण ठेवला पाहिजे. दोन वर्षांपूर्वी लखनौला भाषण देताना काँग्रेस हे जळते घर आहे. असे मी सांगितले होते. याचे तुम्हाला प्रत्यंतर आलेच असेल. आता या घराचे फक्त आढे जे नेहरू तेच उरले आहे, तेही थोड्याच दिवसात जळून जाईल. आपल्याजवळ आर्थिक बल नाही. फक्त राजकीय सामर्थ्य आहे. शरण जाणे माणसाला शोभत नाही. प्रसंगात माणूस शरण जातो पण पुन्हा तलवार हाती घेतो. आपली स्थिती यापुढे 1952 च्या निवडणुकाप्रमाणे होणार नाही. मनुष्य कितीही दीर्घायुषी असला तरी त्याला उतरती कळा लागणारच. पण आपला मग उत्कर्षच होणार आहे. म्हणून संघटना मजबूत करा हेच माझे नेहमीचे निक्षून सांगणे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password