Categories

Most Viewed

23 एप्रिल 1939 भाषण

“संस्थानात राहाणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही”

स्वतंत्र मजूर पक्षाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, सावंत, देवरूखकर, गायकवाड, के. बी. जाधव, शामराव भोळे वगैरे मंडळीसह फलटणात जात असता वाटेत लोणंद येथे श्री. आबासाहेब खरात यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून थाटानी पानसुपारी दिली. सदर प्रसंगी श्री. सावंत, भाऊराव गायकवाड यांची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात स्वतंत्र मजूर पक्षाचे सर्वानी का सभासद व्हावे याचे थोडक्यात विवरण करून सर्वांनी सभासद व्हावे म्हणून विनंती केली. नंतर श्री. आबासाहेब खरात यांनी डॉ. बाबासाहेब आपल्या विनंतीस मान देऊन मागच्या सर्व गोष्टी विसरून येथे आले त्याबद्दल समाधान व्यक्त करून डॉ. बाबासाहेबांबद्दल वसत असलेली भक्ती व्यक्त केली. त्यांना पुष्पहार अर्पण केला.

तद्नंतर डॉ. बाबासाहेबांनी श्री. आबासाहेब खरात यांनी घडवून आणलेल्या या समारंभाबद्दल आभार मानले. आभार मानताना त्यांनी सांगितले की, मागे असेंब्लीच्या निवडणुकीच्या वेळी सातारा जिल्ह्याचे स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. खंडेराव सावंत यांच्या मदतीसाठी मी दौरा काढला असता श्री. आबासाहेब खरातांचे वडील चिंरजीव श्री. सावंत विरुद्ध होते. अशा प्रसंगी कर्तव्य म्हणून मला श्री. खराताबद्दल खरपूस टीका करावी लागली होती. असे असताही श्री. खरातांनी सार्वजनिक कार्यातील सख्ती जाणून ते सर्व विसरले आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याचेच अनुकरण सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांनी गिरविण्यासारखे आहे. जमलेल्या मंडळींना हारतुरे व पानसुपारी झाल्यानंतर श्री. खरातांकडे जेवण करून डॉ. बाबासाहेब फलटणास दिनांक 23 एप्रिल 1939 रोजी पोहचले.

फलटण संस्थानाधिपतीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरूखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत, के. बी. जाधव, शामराव भोळे वगैरे मंडळीसह बरोबर 4 वाजता फलटण संस्थानाधिपतीच्या खास मोटारने राजवाड्यात आले. तेथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहापार्टी झाली. चहापार्टीनंतर राजवाड्यात डॉ. बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो झाला. नंतर सायंकाळी 5 वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली. सभेसाठी भव्य मंडप व स्टेज तयार केला होता. संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री-पुरुष मंडळी सभेत मुद्दाम आली होती. सुरुवातीस स्वागतपर पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील संस्थानाबाहेरील असा सुमारे दहाबारा हजार जमाव जमला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उठले. ते म्हणाले,

मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी येथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थानाबाहेर लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. अशावेळी संस्थानिकांनीही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत.

आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत. पूर्वीच्या काळी राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो-ब्राह्मण प्रतिपाल करणे एवढेच होय! गो-ब्राह्मण प्रतिपाल हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गो-ब्राह्मण प्रतिपाल म्हणजे गाईना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजाचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही, असे समजण्यात येई. गो-ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न केले तरी चालत असे. आज सर्व संस्थानात राहाणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा मोठी चांगली नाही. याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदुधर्माच्या वरील शिकवणुकीकडेच जाईल. चाणक्यनिती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले तर आपणास असे दिसून येईल की, त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून शाळा काढून लोकांना सुविद्य करणे, अगर लोकहिताच्या गोष्टी करणे याचा कोठेच मागमूसही आढळणार नाही. या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही.

प्राचीन काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी त्यांनी लोकात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून काय स्कॉलरशिपा दिल्या होत्या ? फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे. या आपल्या लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय. देशातील शेकडा 90 लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यासच शरण जाण्याला जर काही कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय.

ही पद्धती नष्ट करण्याला आपण आज काय केले पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे. याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवावयाचा असला तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुर आहे. याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील. परंतु मला ते लपवून ठेवावयाचे नाहीत. इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले. त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या. त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत. त्या आपल्या या हिंदुस्थान देशात 1937 च्या एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत. परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काय हित झाले आहे ? खरे पाहाता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचासुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही. परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही. ते हे लोक करताना दिसतात. ज्या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी आज लोकांच्या मतावर निवडल्या गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निःशस्त्र असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे, असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत.

प्राचीनकाळची गो-ब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय ? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत. त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत. म्हणजेच त्या सर्व प्रांताची सत्ता ब्राह्मणांच्या हातात आहे. असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल, असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे अशक्य आहे. कारण जोपर्यंत या देशात गरीबांचे हितसंबंध हे श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत. एका वर्गाचे हितात दुस-याचे अहित आहे. जेथे श्रीमंतांच्या कल्याणाची कदर करण्यास आजची कॉंग्रेस सरकारे तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकारांकरवी आमचे कल्याण होईल, असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गांनी बाळगिणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय. आज ज्याठिकाणी क्रय-विक्रय वस्तूसारखी आपल्या मताची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्याचा खरेदीकर्ता जेथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे, अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच संभवनीय नाही. असल्या लोकशाहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल. असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. ‘राजा कालस्य कारणम्’ या म्हणीप्रमाणे देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण असतो. आज तरी जर्मनीचा हिटलर, टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत. अशा राजाच्या हातात एकतंत्री सत्ता असता ते प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकाची मते विकत घेऊन लोकशाहीच्या नावाखाली करू शकणार नाहीत.

येथील राजे फार सूज्ञ आहेत. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा करण्यास ते हरकत घेतील, असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थानची लोकसंख्या 58 हजार असून वसूल मात्र अवघा साडेपाच लाख आहे. ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतातसुद्धा शेकडा 75 गावांना अजून शाळा नाहीत. तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा ताबा ठेऊन काय गळफास घ्यावयाचा आहे ? या फलटण संस्थानात साडेपाच लाखाने काही भागणार नाही. त्यांनी हा प्रांत ब्रिटिश मुलखास जोडून घ्यावा.

या संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांना आपली गा-हाणी राजापुढे मांडण्यास मोकळीक असावी. प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यतेमुळे कोणताही धंदा रोजगार करता येत नाही, ज्यांना स्पृश्य मानलेले लोक भांडी घासणे अगर कपडे धुणे या कामासाठी सुद्धा जेथे ठेवत नाहीत असल्या प्रजेस आपल्या राज्यात असलेल्या पडित जमीनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात.

शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी, पुस्तके, स्कॉलरशिपा वगैरे देऊन हातभार लावावा.

या संस्थानात असलेल्या कायदे मंडळात 19 माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी अवश्य घ्यावा. पूर्वी कै. आयवळे नावाचे गृहस्थ कायदे मंडळात 1933 पर्यंत होते. त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये, समजत नाही. एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो अवश्य परत मागावा. तसेच म्युनिसीपालिट्या, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमचे वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात यावे.

शेवटी एक कटुसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याच्याने राहवत नाही. आपल्या समाजात मृतमांसाहाराची अनिष्ट रूढी प्रचारात होती. ती रूढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे. ही अधम चाल आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे. ही घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू, तरी रूढी अविलंब बंद करावी.

शेवटी सर्वांनी जमून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ते खाली बसले.

नंतर श्री. भाऊराव गायकवाड यांनी परिषदेपुढे मांडावयाचे एकंदर ठराव एकत्र मांडून त्यास इतर दोघांनी अनुमोदन दिल्यानंतर एकमताने पास करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password