Categories

Most Viewed

23 एप्रिल 1933 भाषण

“या देशात इंग्रज सरकार काहीच करीत नाही.”

पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा व इतर ठिकाणचे लोक या सर्वातर्फे मानपत्रे व थैल्या अर्पण करण्याचा संयुक्त समारंभ बादशाही थाटात पार पडला. तारीख 23 एप्रिल 1933 रोजी रात्रौ 9 वाजता मुंबईच्या दामोदर हॉल मागील भव्य पटांगणात शृंगारून तयार केलेल्या मंडपात कोच, खुर्च्या वगैरे मांडून स्टेज तयार करण्यात आले होते. पाहाणारास एखाद्या राजाचा दरबारच भरला आहे असे वाटत होते.

सदर समारंभास बरीच बाहेर गावची मंडळीही हजर होती. एकंदर जनसमुदाय 8-10 हजार असेल. स्टेजवर उंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अध्यक्ष रावबहादूर बोले व डॉ. सोळंकी साहेब बसले होते. त्यांच्या भोवती कोचावर श्री. सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक भाई प्रधान, डॉ. प्रधान, सौ. सरलाबाई प्रधान, प्रो. कंगले, सौ. गीताबाई कंगले, असवेकर, कवळी, खांडके भाई चित्रे, कमलाकांत चित्रे. रणखांबे, भाऊराव गायकवाड, दाणी, काळे, जाधव इत्यादि मंडळी विराजमान झाली होती. सदर समारंभाची व्यवस्था ठेवण्यासाठी माहीम चाळ, नायगाव, रेतीचा धक्का, डिलाईल रोड, सैतान चौकी, फत्तरबंदर, करीरोड, वाडिया हॉस्पिटल, सँडहर्स्ट रोड, कोळी वाडा, क्लार्क रोड, आर्थर रोड, वडाळा, शिव, माटूंगा इत्यादि ठिकाणचे 500 च्या वर समता सैनिक दलाचे लाठीबंद सैनिक सर्व समारंभाच्या भोवती कोट करून जय्यत तयार होते.

प्रथम रा. दिवाकर नेवजी पगारे यांनी अध्यक्षाची सूचना आणली. तिला रा. शंकरराव लिंबाजी ओझरकर यांनी अनुमोदन दिल्यावर नियोजित अध्यक्ष रावबहादूर एस. के. बोले, एम. एल. सी. जे. पी. मुंबई यांनी अध्यक्षस्थान सुशोभित केले. त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले. भाषणात ते म्हणाले की, “जमलेल्या समाजावरून तुमच्यात किती जागृती झाली आहे ते दिसून येते. तुम्हाला गाढ झोपेतून जागृत करण्याचे श्रेय डॉ. आंबेडकरांना आहे. डॉ. आंबेडकर आपल्या समाजात जन्मास आल्याबद्दल आपला समाज भाग्यवान आहे. सर्व जगाचे पुढारी होण्यास ते लायक आहेत. त्यांची लायब्ररी पाहिली असता त्यांचे वाचन किती दांडगे आहे त्याची थोडीशी कल्पना येईल. राऊंड टेबल परिषदेमध्ये राज्यघटनेसंबंधी पुस्तके स्वखर्चाने विकत घेऊन त्यांनी राजकारणाचा अभ्यास केला आहे. काही लोक म्हणतात त्यांची जातिविषयक दृष्टी आहे पण ते चूक आहे. सायमन कमिशनला रिपोर्ट सादर करताना हे दिसून आले आहे.. त्यावेळी राष्ट्रीय विचारांच्या पुष्कळ लोकांनीही त्यांची स्तुती केली. डॉ. आंबेडकरांचा स्वभाव फारच निगर्वी आहे. जे. पी. पदवी सरकार त्यांना देऊ लागले त्यावेळेस ते ती घेईनात. डॉ. आंबेडकर फार निस्पृही आहेत. याची साक्ष त्यांची राऊंड टेबल मधील भाषणे देतील. त्यांच्यासारखा मुंबई कौन्सिलात स्पष्टवक्ता सापडणार नाही. आपल्या समाजाच्या हितासाठी ते कोणाचीही पर्वा करीत नाहीत. त्यांना तिन्ही राऊंड टेबल परिषदांना व आताच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीलाही प्रयत्न न करता बोलाविले यावरून त्यांची लायकी दिसून येते. आताही ते आपली कामगिरी योग्यतऱ्हेने बजावतील याबद्दल शंका नाही.”

नंतर रा. पी. एल. लोखंडे यांनी नाशिक जिल्ह्यातर्फेचे मानपत्र वाचून दाखविले व रौप्य करंडकातून अध्यक्षांच्या हस्ते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास अर्पण करण्यात आले. 501 रुपयांची थैलीही नाशिक जिल्ह्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आली. त्यानंतर रा. हरिभाऊ हनुमंत रोकडे यांनी पुणे जिल्ह्यातर्फे मानपत्र वाचून दाखविले. अध्यक्षांच्या हस्ते सोनेरी फ्रेमीतून एक अशा सोनेरी अक्षरांनी लिहिलेल्या मानपत्राच्या दोन प्रती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यातर्फे थैली अर्पण करताना रा. शांताराम अनाजी उपशाम हे म्हणाले की, यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास मदत म्हणून 350 रुपयांची टाईप रायटींग मशीन पुणे जिल्ह्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आली आहे. आजही 200 रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात येत आहे. असे म्हणून त्यांनी ती अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस अर्पण केली. नंतर नायगाव चाळीतील रहिवाशांतर्फेची 91 रुपयांची थैली अर्पण करण्यास रा. विठ्ठल तानाजी साकरे उभे राहिले. ते म्हणाले, “वेळेच्या अभावी आम्हाला जास्त कार्यक्रम करता आला नाही. आमच्या या अल्पशा थैलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार करवा अशी विनंती आहे”, असे म्हणून त्यांनी 91 रुपयाची थैली अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण केली. त्यानंतर ट्राम कंपनीची चाळ चवथा माळा (परळ) येथील पंच मंडळीतर्फे डॉ. आंबेडकरास 50 रुपयांची थैली रा. चांगू बहेरू गाडे यांनी अर्पण केली. भोर संस्थानच्या काही मंडळींनी 10 रुपयांची देगणी दिली.

नंतर समता सैनिक दलातर्फे हार अर्पण करण्यास रा. साळवी हे उभे राहिले. हार अर्पण करताना ते म्हणाले की “समता सैनिक दलाच्या सैनिकांचा पलटणीत प्रवेश होईल असा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करतील अशी मला आशा आहे.” त्यानंतर वांद्रे, डिलाईल रोड वगैरे ठिकाणचे मंडळीतर्फे अनेक हार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस अर्पण करण्यात आले.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले.
अध्यक्ष महाराज, प्रिय बंधु आणि भगिनींनो.
आज या समारंभाला आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालात ही माझ्या दृष्टिने फार समाधानकारक गोष्ट आहे. कारण, जर पूर्वी इच्छिल्याप्रमाणे दरेक जिल्ह्याच्या लोकांनी निरनिराळे कार्यक्रम केले असते तर मला त्यांना हजर राहणे अशक्य झाले असते. शिवाय, आज जमला इतका लोकसमुदाय एकत्रित होण्याचा प्रसंगही लाभला नसता. दुसरी गोष्ट उद्या बंदरावर सर्वांनी येऊन निरोप देण्याचा जो अतिप्रसंग होणार होता तो उद्या होण्याचे काही कारण नाही. याच ठिकाणी मी तुमचा व तुम्ही माझा निरोप घेऊ या. बंदरावर येऊन तुम्ही जो गोंगाट व जयध्वनी करता त्यामुळे मी स्वतः गांगरतो. तसेच माझ्याबरोबर बोटीने जाणाऱ्या प्रतिनिधींच्या मनाला संकोचही वाटत असेल. पुष्कळ लोकांना निरोप देताना कधी कधी चार माणसेही हजर नसतात परंतु मी मात्र याला अपवाद आहे. कारण माझ्यावेळी किडा-मुंगीलाही जागा होणार नाही इतकी माणसे बंदरावर येतात. ही अनर्थाची गोष्ट आहे. गरीब लोकांनी आपला रोजमुरा बुडवून बंदरावर मला पोहोचविण्यास हजर राहावे ही गोष्ट मला उचित व पसंत वाटत नाही. तेव्हा तुम्ही उद्या कोणीही बंदरावर येऊ नये. येथेच एकमेकांना जे काही सांगावयाचे असेल ते सांगता येईल. ज्या जिल्ह्यांतर्फे ही मानपत्रे देण्यात आली त्यांच्या संस्थाचालकांचे मी आभार मानतो.

गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील मानपत्राचे वेळी मी केलेल्या भाषणाचा असा व इतक्या लवकर परिणाम होईल, असे मला वाटत नव्हते. परंतु तुम्हाला समाजकार्याची पूर्ण जाणीव झाली असल्यामुळे समाजकार्य उत्तम तऱ्हेने चालावे यासाठी एकी करून तुम्ही थोड्या अवधीत ज्या आज थैल्या अर्पण केल्या आहेत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

मला काल व आज मिळालेल्या निधीचा विनियोग मी समाज कार्याकडेच करणार आहे. त्यासाठी मी एक योजना ठरविली आहे. माझ्या मनातून समाजातील लोकांना चांगल्याप्रकारचे ज्ञान प्राप्त होईल, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचे पुष्कळ दिवसापासून होते. मुलांनी शाळेत जाऊन चांगले शिक्षण घेतले पाहिजे. त्याप्रमाणे वयात आलेल्या स्त्री-पुरुषांनाही नवीन चांगले सुधारणेला कारणीभूत होईल असे ज्ञान प्राप्त होणे जरूर आहे. त्यासाठी कमीत कमी चार आणे किंमतीची उपयुक्त व चांगल्या माहितीने भरलेली अशी पुस्तके प्रसिद्ध करण्याकरिता एक संस्था स्थापन करावी, असा माझा हेतू आहे. त्यासाठी काल व आज मिळालेले पैसे मी देणार आहे.

राउंड टेबल परिषदेसंबंधी यावेळेस विशेष काही सांगण्याची जरूर आहे, असे मला वाटत नाही. कारण ती परिषद आता जुनी झाली आहे. या शिळ्या बाबीविषयी दोन शब्द सांगण्याबद्दल मला अनुकंपा वाटते. राउंड टेबल परिषदेच्या तीन वा-या झाल्याच आहेत व आता ही शेवटची वारी आहे. त्यासंबंधी विशेष वाच्यता करण्याची माझी इच्छा नाही. एक गोष्ट खरी की, गेल्या चार वर्षात अस्पृश्यांच्या कार्याचे मोठे लोढणे माझ्या गळ्यात होते. ते जर नसते तर माझे राजकारण काही निराळ्या प्रकारचे झाले असते. मी त्यावेळेस दोन पेचात सापडलो होतो. एक. इंग्रजांबरोबर वाद करावा तर गांधींकडून काही फायदा होणार नाही व दुसरा गांधींना साहाय्य करावे तर इंग्रजांकडून काही लाभ होणार नाही. म्हणून व्यापक स्वरूपाच्या राष्ट्रकार्याकडे मी कानाडोळा केला होता. माझी मनोदेवता आता मला सांगू लागली आहे की, कोणत्याही प्रकारचे स्वराज्य आले तरी आता अस्पृश्यांचा फायदाच होणार आहे. या बाबतीत ज्या काही उणिवा राहिल्या आहेत त्याही भरून काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परंतु अस्पृश्यांच्या कार्यावर भर देण्याची आता मला जरूर दिसत नाही.

अस्पृश्यांना नुसती राजकीय सत्ता मिळून उपयोग नाही. ती मिळून जर सत्ता इंग्रज सरकारच्या हातीच राहाणार असली तर 15-20 किंवा 25 प्रतिनिधी जरी आम्हाला मिळाले तरी त्यांचा काही उपयोग नाही. पंगतीला बसण्याचा हक्क मिळविल्यानंतर आपल्यापुढे जे पात्र येणार आहे त्यावर भरपूर अन्न वाढले जाईल याचीही खबरदारी घेतली पाहिजे. तेव्हा अशा त-हेने इंग्रज सरकारपासून या देशाला विशेष हक्क मिळविण्यासाठी मी आता भांडणार आहे. जे लोक परदेशात जातात व परत येतात त्यांना एक गोष्ट समजते की, आपल्या देशात फार दारिद्र्य आहे. येथे आजारी माणसे, गरीब लोक याची काही व्यवस्था नाही. या दृष्टीने इंग्लंड देशात कितीतरी व्यवस्था आहे. तेथे ज्यांना ऐपत नाही अशा लोकांना सरकार मार्फत डॉक्टरची मदत दिली जाते. एखादा माणूस बेकार झाला तर सरकार त्याला नोकरी मिळवून देते किंवा नोकरी मिळेपर्यंत बेकारीचे वेतन देते.

साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यास सरकार त्याला म्हातारपणाचे पेन्शन देते. गरीब लोकांना घरभाडे जास्त पडू नये इकडेही तिकडचे सरकार लक्ष पुरविते. या बाबतीत सरकार घर मालकाला ग्रँट देऊन त्याज जवळून भाडे जास्त घेणार नाही अशी अट लिहून घेते.

तिकडे सर्वत्र प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे व ते फुकट देण्यात येते. एवढेच नव्हे तर दुय्यम व कॉलेजचे शिक्षणही तिकडे फुकटच देण्यात येते. तेच इंग्रज सरकार या देशात काही करीत नाही.

मुंबईत लवकरच एक प्रसंग ओढविण्याचा संभव आहे. येथील गिरणीचे मालक कामगारांना अडवून त्यांचे पगार कमी करीत आहेत. त्यामुळे संप होऊन गिरण्या बंद होत आहेत. परंतु येथचे सरकार इकडे लक्ष पुरवित नाही. इंग्लंड, जर्मनी वगैरे देशात अशी परिस्थिती उत्पन्न झाली असती तर तेथचे सरकार असे थंड बसले नसते.

शांतता ठेवण्यापलीकडे आपले कर्तव्य नाही, असे येथले सरकार समजत असेल तर त्यामुळे येथल्या प्रजेला सुख, स्वास्थ्य मिळणे शक्य नाही. राष्ट्राकरिताच नव्हे तर तुमच्यासाठीसुद्धा व्यापक स्वरुपाची सत्ता येथल्या लोकांच्या हाती येणे जरूर आहे. म्हणून इंग्रज सरकारच्या हातून सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता मला दिल्या गेलेल्या एका मानपत्रात असा उल्लेख आहे की, सुदाम्याच्या पोह्याप्रमाणे आमच्या अल्पशा थैलीचा स्वीकार करावा.”

त्याबद्दल मला सांगावयाचे आहे की, सुदाम्याच्या पोह्यांनी काही होणार नाही. स्वर्गात तुम्हाला चांगली स्थिती प्राप्त होण्यासाठी माझे प्रयत्न नाहीत व ते माझे कामही नाही. या लोकीचेच तुमचे क्लेश कमी व्हावेत. तुम्हाला सुख प्राप्त व्हावे, असे माझे प्रयत्न आहेत. त्यासाठी कलदार पैसा पाहिजे आहे. तो मी तुमच्या जवळून घेणार आहे व तुम्ही तो मला दिला पाहिजे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password