“बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्यासाठी हवा”
[ सोपारे (वसई) येथे दिलेले भाषण ]
अध्यक्ष महाराज, प्रिय बंधुंनो व भगिनींनो,
श्री. वनमाळी यांनी म्हटल्याप्रमाणे सदर परिषद मागेच व्हावयाची होती, परंतु मला तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आमंत्रण आल्यामुळे सभेस हजर राहता आले नसते. त्यामुळे मंडळींची निराशा झाली असती. असो. आजचा प्रसंग ज्या चेवली चांभार मंडळींनी घडवून आणून या भागातील अस्पृश्य वर्गापुढे बोलण्याची मला संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
पहिल्या राऊंड टेबल परिषदेसाठी मी लंडनला गेलो असताना माझी केविलवाणी स्थिती झाली होती. त्यावेळी हिंदू-मुसलमान सभासदात बेबनाव उत्पन्न झाल्यामुळे अस्पृश्यांची बाजू मांडणे फार त्रासाचे झाले. शेवटपर्यंत आमच्यात एकमत न होऊ शकल्याने पहिले वर्ष फुकट गेले असे आम्हा सर्वांनाच वाटले. शिवाय त्यावेळी कॉंग्रेस व तिचे सर्वाधिकारी म. गांधी परिषदेपासून अलिप्त होते.
दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी महात्मा गांधी व कॉंग्रेसचे इतर प्रतिनिधी हजर राहून त्यांनी भाग घेतल्यामुळेच महत्त्व आले. दुसऱ्या परिषदेत काहीतरी भरीव कार्य होईल अशी सर्व हिंदी सभासदांनी आशा व्यक्त केली होती. परंतु अखेर ती फोलच ठरली. त्यावेळी राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या सर्व हिंदी सभासदात इतकी दुही माजली की कोणताच प्रश्न धसाला लावता आला नाही. त्यावेळी असे होण्याचे कारण एकटे म. गांधी हेच होत. एकीकडे मुसलमान व एकीकडे स्पृश्य हिंदू व मधे अल्पसंख्यांक अस्पृश्य वगैरे जातींचे प्रतिनिधी अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मी भांबावून गेलो होतो. अस्पृश्यांविषयी म. गांधी काही स्वतंत्र योजना करतील याची मला आशा नव्हती. कारण मी दुसऱ्या परिषदेला जाण्यापूर्वी त्यांच्या माझ्यात झालेल्या मुलाखतीवरून मला हे समजलेच होते. परंतु अस्पृश्य वर्गासाठी मी जी योजना पुढे मांडीन तिला महात्माजी विरोध मात्र करणार नाहीत, अशी मला पूर्ण आशा होती. परंतु सगळेच उलट घडले, इतरांनी पसंत केलेल्या अस्पृश्यांच्या योजनेला मी विरोध करणार नाही” असे ज्या महात्माजींनी हिंदुस्थानात कबूल केले होते, नव्हे जवळ जवळ मला वचन दिले होते तेच महात्माजी शीख व मुसलमानांना कोऱ्या कागदावर सही करून देण्यास तयार झाले व अस्पृश्यांना सुईच्या अग्रावर राहील इतका हक्कसुद्धा देण्यास आपण तयार नाही, असे म्हणाले. महात्मा गांधींच्या या प्रतिज्ञेमुळे आपल्या समाजाच्या हितासाठी मला अल्पसंख्यांकांच्या गोटात शिरावे लागले. महात्माजींचे म्हणणे असे होते की, “अस्पृश्य व स्पृश्य वर्गाचा मीच प्रतिनिधी असून त्यांचे हिताहित कशात आहे. हे मला चांगले समजते. डॉ. आंबेडकर यांच्यामागे अस्पृश्य समाज मुळीच नसून त्यांनी तयार केलेली योजना व मते ही त्यांची स्वतःची आहेत. त्यांचा अस्पृश्य वर्गाशी मुळीच संबंध नाही.” त्यांच्या या बोलण्यास त्यावेळी हिंदुस्थानात मोठा आधार मिळत होता.
काँग्रेस व हिंदू महासभा यांच्या कार्यकर्त्यांकडून अस्पृश्यात फूट पाडण्याचे सारखे प्रयत्न चालू होते. त्याप्रमाणे चांभार समाजातील काही पोटजाती त्यावेळी माझ्या विरुद्ध गेल्या. त्यावेळी खोट्या सभा, खोट्या तारा वगैरेंचा नुसता वर्षाव चालू होता. त्याचवेळी इतर चांभार जातींकडून होत असलेला विरोध ही चूक आहे. हे श्री. वनमाळी व चादोरकर यांच्या लक्षात आले. मला विरोध करण्यात चांभार समाजाचे हित नाही, हे पूर्णपणे ओळखून माझ्या मागण्यास पाठिंबा देणाऱ्या ज्या अनेक तारा आल्या त्यात चेवली चांभार समाजातर्फे श्री. वनमाळी, चांदोरकर यांचीही एक तार होती, हे मी कधीच विसरणार नाही.
दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर अल्पसंख्यांकांचा निर्णय सरकारकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात त्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊन स्वराज्यात अस्पृश्यांचे स्वातंत्र्य मान्य करण्यात आले होते. सरकारी निर्णय प्रसिद्ध झाल्यावर प्रतिज्ञेप्रमाणे म. गांधींना प्राणान्त प्रायोपवेशन सुरू करावे लागले. त्यातच पूना-करार जन्माला आला. त्या कराराने आपणाला जे राजकीय महत्त्व व हक्क प्राप्त झाले आहेत त्यांचे पालन करणे हे आता तुमच्या हाती आहे. आपल्या जातीचे पुढारी सांगतील तसे ऐकणे व वागणे हा हिंदू धर्मियांचा गुण आहे. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जातीच्या पुढाऱ्यांवर विश्वास ठेवा. मला असे वाटत नाही की हिंदू लोक व त्यांचे पुढारी व तरुण मंडळी तुमच्यासाठी काहीतरी करतील. तुम्हाला देवळात घेऊन जातील, तुम्हाला आपल्या तळ्या विहिरीचे पाणी पाजतील ही आशा फोल आहे. जे लोक सनातन्यांची मर्जी सांभाळून अस्पृश्यता निवारण करीत आहेत त्यांनी हिंदुस्थानच्या भूगोल व नकाशाकडे अजून दृष्टी लावली नाही. ते थोडे निरीक्षण करतील तर त्यांना कळून येईल की त्यांची दृष्टी अटकेवर की विंध्यांद्रीवर आहे ! मला हिंदू समाज व धर्म यांची पर्वा नाही. मला एवढेच पाहावयाचे आहे की, माझा ज्या अस्पृश्य समाजाशी लागाबांधा आहे त्यांचे हित साधणे व तेच मी सध्या करीत आहे.
तुम्हाला माझे इतकेच सांगणे आहे की, धर्म व सामाजिक बाबी दूर ठेवा आणि भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्याकडे आपल्या बुद्धीचा व्यय करा, येथे आताच सार्वजनिक विहिरी, शाळा वगैरेवर पाट्या लावण्याची याचना करणारा ठराव आणला होता. याचना करण्याचे वास्तविक कारणच नाही. म्युनिसीपालिटी व लोकल बोर्डात जर तुमचे खरे व भरपूर प्रतिनिधी असतील तर ते भांडून असे करणे भाग पाडतील. यासाठी असले प्रतिनिधी तयार करण्याकडे व निवडून देण्याकडे लक्ष ठेवा. म. गांधी देवळे उघडण्याचे उपाय शोधण्यात गुंतले आहेत. हिंदू लोक देवळे उघडोत अगर सात कुलपात बंद करोत मला त्याची पर्वा नाही.
हिंदू तरुण जर्मन राजकारणाचा अभ्यास करतील तर त्यांना दिसून येईल की, नाझी पक्ष कम्युनिस्टांविरुद्ध लढत आहे. एकाच राष्ट्रातील लोक न्यायासाठी एकमेकांचे रक्त सांडीत आहेत. 1863 साली अमेरिकेत निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडील गोरे आपसात लढले, हे हिंदी तरुणांना कळत नाही. अस्पृश्यता निवारणासाठी चार हिंदू तरुणांनी चार सनातन्यांची डोकी सडकून काढली असती, तरुणांचे शिंपीभर रक्त सांडले असते तर काय बिघडले असते ? परंतु येथे खरे अस्पृश्यतानिवारण कोणाला करावयाचे नाही. असो. हिंदू धर्म व समाज यांचे काहीही होवो, अस्पृश्यता निवारण केले जावो, अगर तसेच पूर्ववत राहो. तुम्ही त्याकडे आपले लक्ष गुंतवू नका. आपसातील महार-चांभार भेद नाहीसे करून एकी व संघटन वाढवून मिळालेले राजकीय हक्क जपण्याकडे आपले तन-मन-धन खर्ची घाला. इतके सांगून मी आपली रजा घेतो.