Categories

Most Viewed

22 एप्रिल 1933 भाषण

“कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक कामाला पैसा द्या !”

तारीख 22 एप्रिल 1933 रोजी रावबहादूर एस. के. बोले, एम. एल. सी., जे. पी. मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली जी. आय. पी. रेल्वे पोर्टर चाळ, कुर्ला येथे रात्री साडेनऊ वाजता कुर्ला येथील अस्पृश्य समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास एक मानपत्र व 80 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. प्रथम ठरले होते की, डॉ. बाबासाहेब आल्यावर त्यांची कुर्ला स्टेशनपासून डॉ. आंबेडकर रोड, जुम्मा मसजिद रोड, शिवाजी रोड या रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात येईल. त्या दृष्टीने तेथील अस्पृश्य जनतेने मोठ्या उत्साहाने एकंदर तयारीही ठेवली होती. परंतु वेळेच्या अभावी सदर कार्यक्रम एकाएकी बंद करावा लागला. त्यामुळे लोकांची अतिशय निराशा झाली. तरीही मुख्य कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला.

अध्यक्ष रावबहादूर बोले हे रीतसर स्थानापन्न झाल्यावर रा. कर्डक यांनी मानपत्र वाचून दाखविले. अध्यक्षांच्या हस्ते मानपत्र व 80 रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यास अर्पण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हारतुरे घालून गौरव केल्यावर ते बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,

जमलेल्या समुदायाकडे पाहून मला पाचसात वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण होते. कुर्ल्यात येण्याची ही माझी दुसरी वेळ होय. पाच सात वर्षांपूर्वी मी अध्यक्ष व्हावे असे आमंत्रण येथील लोकांनी मला दिले होते. ते दिवस पावसाचे असूनही मी ठरलेल्या वेळी आलो होतो. परंतु आश्चर्य हे की सभेच्या ठिकाणी कोणीच नव्हते. मला त्याचे अत्यंत मोठे आश्चर्य वाटले. प्रत्येक ठिकाणी माझ्या सभेला असंख्य लोक जमत असून येथे असे का झाले याची चौकशी केल्यावर मला समजले की, त्या सभेचे हँडबिल फक्त नाशिक जिल्ह्याच्या लोकांनीच काढले होते. त्यावर नगर, सातारा इत्यादी जिल्ह्यांच्या लोकांची नावे नव्हती म्हणून असे झाले.

ज्या वेळेस या समारंभाचे आमंत्रण देण्यास येथील लोक आले त्यावेळेस मी त्यांना सांगितले की, सर्व लोकातर्फे कार्यक्रम होत असेल तर मी येतो. त्यांनी ते कबूल केले व त्याचप्रमाणे घडवून आणले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करितो. सर्वांनी जुटीने वागणे अत्यंत जरूर आहे. एकाचे दुःख ते सर्वांचे दुःख अशी वृत्ती सर्वांनी ठेवली पाहिजे. आपल्यापुरते पाहण्याची व कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून द्या. तुम्ही सर्व एक झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. मानपत्र अर्पण करून तुम्ही जो माझा गौरव केला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

थैलीत दिलेले हे पैसे मी माझ्या प्रपंचाला लावणार नाही. यापूर्वी पुष्कळ पैसे मला मिळालेले आहेत. परंतु त्यापैकी एक पैही मी माझ्यासाठी घेतली नाही. हे सर्व पैसे मी सार्वजनिक कामाला लावले आहे. तुम्ही आज दिलेले पैसेही मी सार्वजनिक कार्याला देणार आहे. या ठिकाणी जमलेले लोक पाचसहा हजार तरी होतील. एवढ्या लोकसमुदायाकडून फक्त 80 रुपयेच सार्वजनिक कार्याला मिळतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता त्याबद्दल काही करता येणार नाही. परंतु पुढे केव्हा तरी याची भरपाई होईल, अशी मला आशा आहे. सार्वजनिक काम पैशाशिवाय होत नाही. काम करणाऱ्याला वेतन देणे जरूर आहे. काही माणसे सार्वजनिक काम फुकट करतात. परंतु सर्वच लोक फुकट काम करणे शक्य नाही. आपल्या जनता पत्रामध्ये 5-6 माणसे लिहिण्याचे काम करतात. इतर ठिकाणी अशा कामाबद्दल दरमहा 100 ते 200 रूपये द्यावे लागतात. परंतु पाच-सात वर्षांपासून हे लोक मोबदला न घेता अग्रलेख वगैरे लिहिण्याचे काम करतात. तीच गोष्ट भारत भूषण प्रेसची. या छापखान्यात व्यवस्थापक वगैरे जी मंडळी आहेत त्यांना कमीत कमी पगार दिला जातो. हे लोक स्वार्थत्याग करणारे आहेत म्हणून ठीक आहे. परंतु नेहमीच असे चालणे शक्य नाही. म्हणून तुम्ही पैसे दिले पाहिजेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password