” धर्माप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो लफंग्यांचा बाजार ठरेल.”
शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे प्रभावी नेते, अस्पृश्य समाजाचे अध्वर्यू आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सौ. माईसाहेब आंबेडकर ही दोघे तारीख 20 एप्रिल 1954 रोजी सकाळी 10 वाजता विमानाने दिल्लीहून नागपूरला आली. त्यांच्या स्वागतासाठी अस्पृश्य समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. डॉ. आंबेडकर माईसाहेबांसह विमानातून उतरताच ‘आबेडकर झिंदाबाद, थोडे दिनमें भिमराज’ इत्यादी घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा द्विमतदार संघातील संसदीय पोटनिवडणुकीत राखीव जागेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. भंडारा मतदार संघात निवडणूक प्रचार करण्यासाठी ते नागपूरला आले आहेत.
विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पंचवीस हजाराच्यावर अस्पृश्य स्त्री-पुरुषांचा आणि लहान मोठ्यांचा संमर्द उपस्थित होता. समता सैनिक दलाचे गणवेषधारी शेकडो स्वयंसेवक व्यवस्था ठेवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी रांगेने उपस्थित होते.
विमान नागपूर विमानतळावर उतरताच श्री. बापूसाहेब राजभोज यांनी त्यांचे स्वागत केले. विमानातून उतरताच डॉ. बाबासाहेब माईसाहेबांसह प्रचंड जनसमुदायाजवळ सावकाश गेले. तेथे निरनिराळ्या राजकीय पक्षांकडून त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर मोटारीत बसून विश्रांतीसाठी ते माउंट हॉटेलकडे रवाना झाले. तेथेही त्यांच्या स्वागतासाठी दहा हजार जनसमुदाय उपस्थित होता. वाटेतही पुष्कळ ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोकांचे थवेचे थवे जमले होते. रात्री आठ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी माउंट हॉटेलच्या पटांगणात हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उभा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा संसद पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर मध्यप्रदेशातील अनेक पक्षांनी आपला डॉ. बाबासाहेबांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. डॉ. बाबासाहेब येथे आल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम निमंत्रित करण्यात आले. या मेळाव्यात म. प्र. जनसंघाचे दत्तोपंत ठेंगडी, प्र. स. पक्षाचे श्री. आवारी, हातमाग, विणकाम संघाचे श्री. रा. बा. कुंभारे, निर्वासितातर्फे श्री. हंसराजनी, कम्युनिस्ट पक्षाचे श्री. बर्धन, प्रा. शि. संघ आणि सं. महाराष्ट्र परिषद या संस्थेचे श्री भोसले व शे. का. फे. चे श्री. राजभोज दादासाहेब गायकवाड, मुं. वि. सभेचे व शे का के सदस्य श्री बापू चंद्रसेन कांबळे, बॅ. खोब्रागडे, नागपूर कार्पोरेशनचे डे मेयर श्री धरमदास मेश्राम आणि हरिदास आवळे इत्यादी प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक 20 एप्रिल 1954 रोजी आपल्या स्वागत समारंभात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.
राष्ट्र नाशाच्या मार्गाला लागले आहे असे मला वाटते. म्हणूनच मी निवडणुकीस उभा राहात आहे. काँग्रेसशी तडजोड करण्याची तयारी मी दर्शविली असती तर लोकसभेत टिकून राहाणे मला अशक्य झाले नसते. पण धर्माप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो “लफंग्यांचा बाजार” ठरेल. विरोधी पक्षाच्या जागेवरून लोकांपुढे भिन्न दृष्टिकोन ठेवण्यासाठीच मी ही निवडणूक लढवित आहे.
कॉंग्रेस सरकारला आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी भरपूर अवधी दिला गेला असूनही आतापर्यंत कुठलाही प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत. यापुढे नुसते भाविकतेने पाहून चालणार नाही तर चिकित्सक मनाने या सगळ्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. प्रथम देश मागाहून पंतप्रधान नि काँग्रेस अशा निर्लेप मनाने पाहिले पाहिजे. चालू सरकार बदलून घेणे हे लोकांचे आज महान कर्तव्य ठरते.
आज भारताला जगात कुणी मित्र राहिलेला नाही. हिटलरच्या जर्मनीभोवती जसा वेढा पडला होता तसे काहीसे येथे झाले आहे. पाकिस्तानला मिळावयाची अमेरिकन लष्करी मदत ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. तिचे विराट परिणाम होतील, पाकिस्तानला अशी मदत मिळत असता इतस्ततः विखुरलेली खंडित झालेली इतर मुसलमान राष्ट्रही एक होतील. त्यांचे “इस्लामी संयुक्त राज्य” स्थापन होईल, हे काय सांगायला हवे ? या इस्लामी संयुक्त राज्याचा आपल्या संबंध राष्ट्राला वेढा पडेल. मी तुम्हाला असेही निक्षून सांगतो की अफगाणिस्ताननेही अमेरिकन मदत स्वीकारली असून संकल्पित पाक-अफगाण फेडरेशनच्या बातम्यांचा जो इन्कार होत आहे ती केवळ धूळफेक आहे: दुसरे काही नाही. दुसऱ्या बाजूने आशिया काबीज करून त्याला कम्युनिझमच्या प्रभावळीत आणण्यासाठी रशिया व चीनही डाव टाकीत आहेत.
तेव्हा तुम्हाला प्रभावी व्हायचे असल्यास तुम्ही हातात बंदूका घेतल्या पाहिजेत. मऊ गुळगुळीत भाषणांनी काम व्हायचे नाही. तुम्ही कुठलीतरी एक खंबीर भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला पार्लमेंटरी सरकार पाहिजे काय ? ग्यानबाची मेख इथेच आहे. जर पार्लमेंटरी सरकार हवे असेल तर जिथे पार्लमेंटरी सरकार आहे व बाह्य आक्रमणाविरुद्ध त्याचे रक्षण करण्यासाठी जे सिद्ध आहेत अशांना आपण सहकार्य केले पाहिजे. तसे नको असेल तर उद्या आपण रशिया व चीन यांच्याशी दोस्ती करु या.