“तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कार्थी लावा”
गेल्या आठवड्यात बुधवार, तारीख 20 एप्रिल 1938 रोजी, मु. इस्लामपूर व औद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रचंड अशा जाहीर सभा झाल्या. या दौऱ्यात डॉ. आंबेडकर साहेबांबरोबर आमदार सावंत, ससाने मास्तर, मे उबाळे हे होते. इस्लामपूरच्या सभेस सुरूवात करताच श्री. डी. एस. पवार यांच्या भाषणानंतर आ. सावंत. एम. एल. ए. यांचे प्रथम भाषण झाले. त्यात त्यांनी काँग्रेस व स्वतंत्र मजूर पक्ष यांच्या कामगिरीची तुलनात्मकदृष्ट्या कल्पना मोठ्या कुशलतेने मांडली. नंतर सत्यशोधक (ब्राह्मणेतर) पक्ष काँग्रेसने कसा नष्ट केला हे सांगून याबाबत सातारा जिल्ह्यातील मराठा समाजास त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच येत्या जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षातर्फे वाळवे, तालुका इस्लामपूर गटातर्फे श्री. भाऊराव देवजी कांबळे हे उभे आहेत. तासगावतर्फे श्री. खंडनाक राजनाक इनामदार व खानापूरतर्फे श्री. धोंडी मालू साळवे हे उभे आहेत. त्यांना त्या त्या ठिकाणच्या मतदारांनी अवश्य निवडून द्यावे. त्यानंतर डॉ. आंबेडकरसाहेब टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात भाषण करावयास उभे राहिले.
ते आपल्या भाषणात म्हणाले,
या जिल्ह्यात पुढील महिन्याच्या 24 तारखेस जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकाकरता स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांनाच आपण सर्व मतदारांनी मते देऊन निवडून आणा, असे सांगण्यासाठी मी उभा आहे. या सभेत मराठे व अस्पृश्य यांचा एकत्रित जमाव आहे. त्यामुळे मराठे मंडळींना मला जे निराळे सांगावयाचे आहे ते अशक्य दिसते. असो. या देशातील हिंदू समाजाची रचनाच अशी आहे की, सर्व लोकांवर ब्राह्मण प्रभुत्व असणारच. कोणताही विधी ब्राह्मणाखेरीज होत नाही. तसेच इतर व्यवहारही त्यांच्याविना चालत नाही. हायकोर्टातील वरिष्ठ जागापासून तो खेडे गावातील तलाठ्यापर्यंत ब्राह्मणाशिवाय कुणीही दिसणार नाही. 1919 पासून ते 1938 पर्यंत कौन्सिलमध्ये अवघे चार पाच ब्राह्मण दिसत असत. पण आता या ब्राह्मण कौन्सिलरांची संख्या जवळ-जवळ 27 आहे. माझ्या समजुतीप्रमाणे असेम्ब्लीमध्ये ज्या 11 जागा अधिकाराच्या आहेत त्यापैकी 6 ब्राह्मणांनी पटकावल्या आहेत. त्यात पाटलाची किंमत आहे काय ? 175 सभासदात त्यांना कोणीही विचारीत नाही. खरे पाहिले असता या देशातले राजकारण ब्राह्मण जातीशिवाय चालले पाहिजे. आज राजकारणात भटजी, शेठजी, गुजर व सावकारांचे कडबोळे झालेले आहे. शेतकरी वगैरे श्रमजिवी वर्गाला वाव नाही. आजच्या या परिस्थितीचा विचार त्यात गरीब केल्यानंतर गांधीजींच्या पश्चात या राजकारणात गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जो राजकारणात धुडगूस घालीत आहोत त्याला गांधींच्या पश्चात कोणी किंमत देईल काय ? याचा अजून कोणीही विचार केलेला नाही. म्हणून आपल्या हितासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र चळवळ करा. मी माझ्या पक्षात येऊन मिळा असेच म्हणत नाही. पण आपल्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होईल अशीच चळवळ करा. तुम्हा मराठे मंडळीना सांगायचे म्हणजे तुमच्या हितासाठी आमचे श्री. विचारे मास्तर यांनी एक शेतकरी पक्ष काढला आहे. त्याला तुम्ही मराठे मंडळींनी अवश्य मदत करावी. तसेच जेथे राखीव जागा नाहीत तेथील अस्पृश्य लोकांनी या नवीन शेतकरी पक्षातर्फे जे उमेदवार उभे आहेत त्यांना अवश्य मदत करावी. या लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविल त्याला तुम्ही भुलू नका. तुमची पवित्र मते विकू नका तर ती सत्कार्यी लावा.
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर श्री. विचारे यांचे भाषण झाल्यावर पुष्पहार वगैरे अर्पण विधी झाला. नंतर डी. एस. पवार यांनी पाहुणे मंडळीना थाटाची मेजवानी दिली.